उपराजधानी

गरीब रुग्णांच्या मदतीसाठी नागपूर सिटीझन्स फोरमची मेडीसीन बॅंक

दवा-दान उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांचे मोफत औषध वितरण सुरु

नागपूर,ता. २९ एप्रिल:  नागपूर शहरातील गरीब व गरजू कोव्हिड रुग्णांना नागपूर सिटीझन्स फोरमने मदतीचा हात दिला आहे. “दवा दान” या उपक्रमांतर्गत फोरमने मेडीसीन बॅंक सुरु केली आहे. कोव्हिड रुग्णांवर उपचार करतांना दिली जाणारी औषधे महागडी आहेत. 14 दिवसांचे औषध विकत घेण्यासाठी तब्बल दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो. आर्थिक अडचण व बेताच्या परिस्थितीमुळे अनेक जण महागडी औषधे घेण्याचे टाळतात. फोरमच्या सदस्यांनी याविषयी शहराच्या विविध वस्त्यांमध्ये एक छोटे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात पाॅझिटिव्ह व्यक्तींचे नातेवाईक, मेडीकल स्टोर्स चालक व काही डाॅक्टरांशी संवाद साधला. फॅबीपिरावीर नावाचे औषध न घेतल्यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती खालावत असल्याचे या सर्वेक्षणात प्रामुख्याने आढळून आले.

याच पार्श्वभूमीवर नागपूर सिटीझन्स फोरमने “दवा दान” हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. फोरमने शहरातील दान दात्यांना मदतीचे आवाहन करीत मेडीसीन बॅंक उभारली आहे. या मेडीसीन बॅंकेतून शहरातील गरीब व गरजू रुग्णांना मोफत औषधे पुरवली जात आहेत. पाच लाभार्थी कुटुंबियांना औषध किट देऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रतिक बैरागी, अभिजीत सिंह चंदेल, अभिजीत झा, गजेंद्रसिंग लोहिया, अमित बांदूरकर व वैभव शिंदे पाटील उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपयांच्या औषधीचे वितरण केले जाणार आहे. यासाठी औषध किट तयार करण्यात आली आहे. या किटमध्ये फेविपिरावीर, पॅरासिटामाॅल, आयवरमॅक्टिन, लिमची, एझिथ्रोमायसिन, डाॅक्सी, झिंक, डी 3 रिस्क, एलेक्स कफ सिरप या औषधांचा 14 दिवसांचा डोस व मास्क आणि सॅनिटायजर देण्यात येत आहे.

नागपूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने कोव्हिड पाॅझिटिव्ह रुग्णांकडे दुर्लक्ष केले आहे. महानगरपालिका रुग्णांना मोफत औषधे पुरवण्यात फेल ठरल्याचा आरोप नागपूर सिटीझन्स फोरमचे सदस्य व दवा दान अभियानाचे प्रमुख प्रतिक बैरागी यांनी केला आहे. औषधे महाग असल्याने अनेक रुग्ण ते विकत घेण्याचे टाळतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे ते म्हणतात. फेरीपिरावीर सारखे महागडे औषध घेणे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. मात्र ही औषधे घेतली नाही तर रुग्णांना अधिक त्रास होतो व प्रकृती खालावत जाते. त्यामुळेच नागपूर सिटीझन्स फोरमने या विषयाला हात घातला व प्रशासनावर अवलंबून न रहाता काम सुरु केल्याचे ते म्हणालेत.

नागपूर सिटीझन्स फोरमने सामाजिक बांधीलकी जपत हा उपक्रम हाती घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूर सिटीझन्स फोरमने शहरातील दान दात्यांना मदतीची साद घातली होती. शहरातील अनेक दानशूरांनी यास सकारात्मक प्रतिसाद देत मदत केली. काहींनी औषध स्वरुपात तर काहींनी आर्थिक स्वरुपात या उपक्रमाला हातभार लावल्याचे या अभियानाचे प्रमुख अभिजीत सिंह चंदेल यांनी म्हटले आहे.

शहरातील गरीब व गरजू रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी या अभियानाचे प्रमुख प्रतिक बैरागी – 7720076560, व अभिजीत सिंह चंदेल यांच्या 9730015177 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नागपूर सिटीझन्स फोरमने केले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या टेस्टिंग सेंटरवरील कोव्हिड पाॅझिटिव्ह अहवाल, आधार कार्ड व डाॅक्टरांचे प्रिस्क्रीप्शन या आधारावर लाभार्थी निवडून त्यांच्या नातेवाईकांना या किट सोपवल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *