उपराजधानीनागपूर मनपा

१५ जूनपर्यंत नागपूरात काय असणार सुरु काय असणार बंद?

१५ जूनपर्यंत निर्बंधामध्ये शिथिलता:मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे नियम पाळण्याचे केले आवाहन

नागपूर, ता. १ : कोव्हिडच्या वाढत्या संसर्गामुळे नागपूर शहरात लागू असलेल्या निर्बंधांमध्ये १ जूनपासून १५ जूनपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर शहरामध्ये आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सध्या शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली असली तरी नागरिकांनी सतर्क राहून नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये नागपूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. कोरोनाच्या संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रुग्णसंख्या कमी होत आल्याने दिलासा मिळाला. शहरातील रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याने नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने सुरक्षेची काळजी घेत टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे.

यापूर्वी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ वाजता पर्यंतच परवानगी होती. आता यामध्ये काहीसा दिलासा देण्यात येत असून १५ जून पर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आठवड्यातील सातही दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू राहतील. तर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने जी मॉल अथवा शॉपिंग सेंटरमध्ये नाही, अशी सर्व स्टँड अलोन दुकाने शनिवार, रविवार वगळता सोमवार ते शुक्रवार अशी आठवड्यातील पाच दिवस सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेमध्ये सुरू राहतील. याशिवाय यापूर्वी मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशामध्ये जी शिथिलता देण्यात आली होती ती कायम राहिल, असेही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले आहे.

पावसाळ्यापूर्वी शेतीची सुरू होणारी कामे लक्षात घेता शेतीशी संबंधित सर्व दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत सुरू राहतील. हॉटेल, रेस्टॉरेंट, वाईन शॉप यांच्या घरपोच सेवेसाठीच परवानगी असून सकाळी ७ ते रात्री ११ वाजता पर्यंत या सेवेस परवानगी देण्यात आली आहे. सर्व शासकीय कार्यालयांना २५ टक्के क्षमतेच्या उपस्थितीने परवागी आहे. सर्व खासगी कार्यालये बंद राहणार असून वकील व चार्टर्ड अकाउंटंट यांचे खासगी कार्यालय यासह अत्यावश्यक सेवेशी निगडीत खासगी कार्यालयांना १५ टक्के उपस्थितीमध्ये परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक व अन्य वस्तूंच्या सेवेसाठी ई-कॉमर्स सेवेला सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत परवानगी राहिल. लग्न व तत्सम समारंभांना २५ लोकांच्या उपस्थितीत २ तासाची परवानगी कायम आहे. वैद्यकीय सेवा, गॅस एजन्सी, पेट्रोल पम्प, मालवाहतूक आदी सेवा सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.

जीवनावश्यक वस्तू व नवीन आदेशात परवानगी देण्यात आलेल्या वस्तुंची दुकाने सुरू करताना दुकानातील सर्व कर्मचारी, कामगार यासह ऑनलाईन अन्न तसेच अन्य साहित्यांचा पुरवठा करणारे डिलिव्हरी बॉय या सर्वांची मनपाच्या कोरोना चाचणी केंद्रामध्ये नि:शुल्क आरटीपीसीआर चाचणी करावी. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जास्तीत जास्त चाचणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या किंवा बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चाचणासाठी पुढे यावे. तसेच ४५ वर्षावरील लसीकरण मोहिमेमध्ये पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी पुढे येउन आपले लसीकरण करून घ्यावे. मनपाद्वारे जारी दिशानिर्देशांचे पालन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायजर, गर्दी टाळणे, योग्य अंतर राखणे हा मंत्र पाळणे अनिवार्य आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागणूक ठेवावी, असे आवाहन सुद्धा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

नागपुरात १ जून २०२१ ते १५ जून २०२१ पर्यंत काय सुरू राहील- 

(प्रतिष्ठाने व सेवा) सुरु राहण्याची वेळ (नागपूर शहरात परवानगी)
वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स सुरू राहतील
वृत्तपत्र, मीडियासंदर्भातील सेवा (ओळखपत्राच्या आधारे) सुरू राहतील
पेट्रोल पंप, गॅस एजंसी सुरू राहतील
सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवा ऑटोरिक्षा (चालक+ दोन प्रवासी)
टॅक्सी (चालक + ५० टक्के प्रवासी क्षमता)
बस (प्रवासी क्षमतेनुसार)
उभे प्रवासी अनुज्ञेय राहणार नाही
माल वाहतूक सेवा सुरू राहतील
उद्योग/कारखाने सुरू राहतील
बांधकामे (फक्त साईटवरच लेबर उपलब्ध असल्यास) सुरू राहतील
बँक व पोस्ट सेवा सुरू राहतील
कोरोना विषयक लसीकरण सेवा व चाचणी केंद्रे सुरू राहतील
किराणा दुकाने, बेकरी दुकान सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत
दूध विक्री/फळे विक्री व पुरवठा सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत
भाजीपाला विक्री व पुरवठा सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत
चिकन, मटन, अंडी व मांस दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत
पशु खाद्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत
ऑप्टीकल्स दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत
खते व बी-बियाणे दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत
निवासाकरिता असलेले हॉटेल/लॉजेस (५० टक्के क्षमतेने) फक्त हॉटेलमध्ये निवासी असलेल्या ग्राहकांसाठीच किचन सुरू ठेवता येईल.
हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ (घरपोच सेवा) सकाळी ७ ते रात्री ११ वाजतापर्यंत
सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवाअंतर्गत (स्टॅण्ड अलोन) एकल दुकाने (शॉपींग सेंटर व मॉल मधील दुकाने वगळून) (शनिवार व रविवार बंद) सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत
ॲडव्होकेट व चार्टर्ड अकाऊंटंट खाजगी कार्यालय २५ टक्के किंवा ५ च्या क्षमतेने
शासकीय कार्यालये (कोरोनाविषयक कामे नसलेली) २५ टक्के क्षमतेने
मद्य विक्री फक्त होम डिलिव्हरी
लग्न समारंभ २५ टक्के लोकांच्या मर्यादेत/समारंभ फक्त दोन तासांकरिता

पूर्णपणे बंद असलेल्या आस्थापना •

.सलून
• स्पा
• ब्यूटी पार्लर
• जिम्नॅशियम
• शाळा/कॉलेज, कोचिंग क्लॉसेस
• उद्याने
• स्विमींग पूल
• सिनेमा हॉल
• नाट्यगृह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *