उपराजधानीमहामेट्रो

पाच वर्षांपासून विना प्रमाणपत्र मेट्रोचा डेपो सुरु!

हर्डीकर म्हणतात अनुज्ञेयता कधीही घेता येते!

केलेल्या चूका रिपीट न करता सुधारण्याची निरंतर प्रक्रिया सुरु

पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालापमध्ये प्रश्‍नांना दिली मनमोकळी उत्तरे

नागपूर,ता.१५ सप्टेंबर २०२३: मिहानमधील मेट्रोचा डेपो तसेच कॉटन मार्केटमधील स्टेशनच्या सर्वेक्षणासाठी आज रेल्वे सेफ्टीचे कमिश्‍नर सर्वेक्षणासाठी आले असून सर्वेक्षणाचा अहवाल सादर केल्यानंतर हे दोन्ही ठिकाण उपयोगितेसाठी सुरु करण्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.विशेष म्हणजे आधी प्रमाणपत्र नंतर उपयोगितेसाठी वापर असा नियम असताना मिहान मधील डेपो हे मागील ५ वर्षांपासून सुरु आहेत.प्रमाणपत्र नसताना मेट्रोचे मिहान डेपो हे सुरक्षेच्या दृष्टिकोणातून सुरु करणे म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असा प्रकार आहे.यावर आज प्रश्‍न विचारला असता मेट्रो प्रकल्पात कंडीश्‍नल न करता अनुज्ञेयता मिळत असते असे उत्तर महामेट्राचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिले.

ते आज दीक्षाभूमी समोरील मेट्रो भवन येथे पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालप करीत असताना बोलत होते.याप्रसंगी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांना मनमोकळी उत्तरे दिली.मी ब्यूरोक्रेटीक सेटअप मधील अधिकारी असताना आता टेक्नोक्रेटिक ऑरगनायझेशनमध्ये रुजू झालो असल्याचे त्यांनी सांगितले.मी नागपूर महानगरपालिकेमध्ये आयुक्त पदी काम केले आहे मात्र,प्रशासकीय व्यवस्थापनाची चौकट ही ठरलेली असते.मी येथे डायरेक्टर म्हणून काम केले असले तरी तांत्रिक बाजूशी माझा कधीही संबंध आला नाही.मेट्रो हा एक प्रकल्प असून एका प्रकल्पाची टरमिनोलॉजी समजून घेण्याचा मी प्रयत्न करीत असल्याचे हर्डीकर म्हणाले.

मेट्रोची सुरवात नागपूरात २०१५ पासून झाली.या ८ वर्षात मेट्रोची अंमलबजावणी ब-या पैकी झाली आहे.आता टूल ऑपरेश्‍नस सुरु आहे.मेट्रो फेज-२ प्रतिक्षेत आहे.मधल्या काळात कोविड मुळे दोन वर्षांचा कालखंड गेला.आता पुन्हा फंडिग,टायअप,आधीचे प्रोसेस सुरु असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले.

या नव्या जबाबदारीमध्ये आव्हानात्मक काय वाटतं?असा प्रश्‍न केला असता प्रोजेक्ट बेस काम करण्याची आव्हाने ही वेगळी असल्याचे ते म्हणाले.एचआर रिलेटेड इश्‍यूज,फंडिग,बजेट इश्‍यू,प्रशासकीय मान्यता देणे हे सर्वच आव्हानात्मक आहे.२०१५ पासून हा प्रकल्प मार्गी लागला आहे.आधी प्रोसिजर पार पडली मग सिस्टिम लावण्याचे काम हळूहळू होत आहेत. एक-एक टप्पा आपण पुुढे जात आहोत.मेट्रो हा प्रकल्पच भारतात फक्त २५ वर्ष जुना आहे.प.बंगालमध्ये हा प्रकल्प सर्वात आधी राबवला गेला तो ही १० किलोमीटरसाठी होता.डीएमआरसीचा अनुभव या देशाला फक्त २५ वर्षांचा आहे.

आता पर्यंत प्रोजेक्ट हा विषय होता आता ’रन इट फॉर १०० यर्स’अर्थात पुढील शंभर वर्षांसाठीचे नियोजन करने अपेक्षीत आहे.एखादे एस्टाब्लीस्ड ऑरगनायझेशन कशा प्रकारे काम करतं,मेट्रोच्या संदर्भात हा अनुभव फक्त २५ वर्षांचा आहे.दिल्ली मेट्राेची प्रवासी संख्या ७५ लाख आहे,आपल्याकडे ती ८० हजार आहे.पुढील काळात ती किमान दोन लाखांपर्यंत आपल्याला वाढवायची आहे.मधल्या काळात आपण दीड लाखांपर्यंत गेलो होतो मात्र पुन्हा ती कमी झाली,असे ते म्हणाले.

यावर,तिकीट दर १० रुपयांवरुन ३५ रुपये केल्यामुळे प्रवासी संख्या रोडावली का?असा प्रश्‍न केला असता, सुरवातीला प्रकल्प हा अपूर्ण होता त्यावेळी १० रुपये तिकीट दर योग्य होता मात्र हळूहळू प्रकल्प पूर्ण होत गेला. फूल ऑपरेश्‍नस सुरु झाले त्यामुळे खर्चाचा ताळमेळ बसवणे हे देखील गरजेचे आहे.शाळा,महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे किवा पावसाळा हे कारण असू शकेल,कशामुळे नेमकी प्रवासी संख्या ही कमी झाली याचे कारण समजून घ्यायला काही कालावधी लागू शकतो,असे हर्डीकर म्हणाले.

नागपूर आणि पुणे मेट्रोतील प्रवासी संख्येविषयी विचारले असता,पुण्यात पार्शल ओपनिंग झाली असून फूल ओपनिंग झाली नाही.नागपूरच्या तुलनेत निश्‍चितच पुण्यात प्रवासी संख्या ही जास्त राहणार आहे कारण पुण्यातील रस्त्यांवर कंजक्शन फार जास्त आहे,कामाच्या ठिकाणचं अंतर ही जास्त असल्यामुळे मेट्रो प्रवासाला पसंदी मिळेल यात शंका नसल्याचे हर्डीकर यांनी सांगितले.

पुण्यातील हिंजेवाडी येथील एक लाईन ही खासगी संचालकाकडून संचालित होते,भविष्यकाळात नागपूर महामेट्रोमध्ये ही खासगीचा शिरकाव होण्याची शक्यता आहे का?असा प्रश्‍न केला असता, खासगी यायला बरेच फॅक्टर असतात,असे ते म्हणाले.कुठलाही प्रकल्प हा पीपीपी वरती व्हरबल नाही.लोकांना अफोर्डडेबल ठरल्यास व्यवहार्यता येऊ शकते.असे उत्तर त्यांनी दिले.

फक्त पाचच वर्षात मेट्रोच्या रेल्वे लाईन्सखालील पूलांना दोन ठिकाणी तडे गेले,याबाबत विचारले असता ,एखाद्या मोठ्या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना फॉल्टस दिसत राहतात,ऑपरेशन,रेक्टीफिकेशन,रि-टेस्टींग,टेंपररी स्पीड रिकव्हरी टप्प्या टप्प्याने निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचे हर्डीकर म्हणाले.

पाचच वर्षात दोन ठिकाणी मोठे तडे यासाठी कंत्राटदाराला जबाबदार धरणार का?असा प्रश्‍न केला असता,जबाबदारी निश्‍चित केली जाईल,असे उत्तर त्यांनी दिले.

एका प्रश्‍नाच्या उत्तरात मेट्रोच्या संदर्भात अजून खूप काम करायचं असल्याचे ते म्हणाले.मी मनपा आयुक्त असताना फिडर बसच्या प्रकल्पासाठी आग्रही होतो.बस सर्विस मी रिव्हाईव केली.आता देखील नागपूर महानगरपालिकेसोबत बसून एकत्रितपणे मेट्रो आणि आपली बस यांना एकत्रितपणे फायदा होईल,अशा योजनेवर काम करणार असल्याचे ते म्हणाले.पुण्यात याच संकल्पनेतून बस प्रवाश्‍यांची संख्या एक लाखाने वाढली असल्याचे ते म्हणाले.हळूहळू शहरातील ऑटो देखील शेअरिंगमध्ये येतील,असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

‘फूटाळा’हा नागपूरकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे.फूटाळा प्रकल्प हा १२३ कोटींचा असून तलावाच्या आतमध्ये रंगीत कारंजे हा प्रकल्प राबविण्यापूर्वी तेथील पाण्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते का?असा प्रश्‍न केला असता तो नासुप्रचा प्रकल्प असल्याचे हर्डीकर म्हणाले.

मात्र,न्यायालयात फूटाळाला घेऊन सुरु असणा-या खटल्यात महामेट्रोच्या बाजूने दोन्ही वकील आक्रमकपणे पर्यावरणवाद्यांकडून केलेली पीआयएल रद्द करण्याची मागणी न्यायालयाला करीत आहेत हे विशेष. शेवाळ्यामुळे व किड्यांमुळे नादुरुस्त झालेल्या वायरिंग सध्या सुधरविण्याचे काम केले जात आहे,कशावरुन त्या पुन्हा नादुरुस्त होणार नाही?असा प्रश्‍न पर्यावरणवादी करीत असून शेवटी हा जनतेचा पैसा आहे,असा त्रागा ही व्यक्त केला जातो.

फूटाळ्याचा प्रकल्पातून महामेट्रोला ५ कोटींचे वार्षिक उत्पन्न मिळवणे गरजेचे आहे.तसे डीपीआरमध्येच नमूद आहे.ज्या नागपूरकरांना फूकटात फूटाळा बघण्याची सवय जडली आहे ते खरंच ३०० रुपये प्रति व्यक्ती देऊन रंगीत कारंज्यांच्या आनंद उपभोगतील का?कोणत्या स्त्रोतातून महामेट्रो फूटाळ्याच्या प्रकल्पातून ५ कोटी उत्पन्न मिळवणार आहे?असा प्रश्‍न केला असता,याचे योग्य नियोजन केले जाईल असे सांगून,‘ आम्हाला उत्पन्नापेक्षा ऑपरेशन जास्त महत्वाचं असल्याचे हर्डीकर म्हणाले!

मूळात फूटाळ्यातील पार्किंग प्लाझाही आता बीओटी तत्वावर चालविण्याचा निर्णय झाला आहे,याचे नेमके उत्पन्न कोणाला मिळेल?याचेही अतिशय मोघम उत्तर हर्डीकर यांनी दिले.

कॅगचा अहवाल यावर छेडले असता,विहीत पद्धतीने जे शिकायचं आहे ते शिकतोय,केलेल्या चूका रिपीट न करता सुधारण्याची निरंतर प्रक्रिया सुरु असल्याचे ते म्हणाले.कॅगच्या अहवालात कॉटन मार्केट व तसेच एअरपोर्ट स्टेशन या दोन अतिरिक्त स्टेशन्स बांधण्याची गरज नसल्याचे ताशेरे ओढण्यात आले असून या दोन्ही स्टेशन्सवर ४७.२६ कोटी रुपये मेट्रोने खर्च केले.यावर लक्ष वेधले असता,ही एक सुविधा आहे.भविष्याचा विचार करुन पुरविण्यात आलेली सुविधा,असे उत्तर हर्डीकर यांनी दिले.भविष्यकाळात कॉटन मार्केट,संत्रा मार्केट विकसित झाल्यास या स्टेशनचा फायदा होणार आहे,असे ते म्हणाले.

थोडक्यात,प्रसिद्धी परामुख स्वभावाचे हर्डीकर यांनी आज पत्रकारांच्या प्रश्‍नांना मनमोकळी उत्तरे दिली मात्र, त्यांच्याच उत्तरातून अनेक प्रश्‍न निर्माण झालेली आढळतात.एखाद्याला घर बांधण्यापूर्वी अनेक परवानग्यांची आवश्‍यकता असते.त्या मिळाल्यावरच तो घर बांधण्याचा विचार प्रत्यक्षात आणत असतो.मेट्रोच्या प्रकल्पात तर मिहानच्या डेपोचे सर्वेक्षणच झाले नाही वरुन ते गेल्या ५ वर्षांपासून सुरु आहे,याचा अर्थ ’आधी बांधून तर घ्या,सर्वेक्षणाची खानापूर्ती करुन आता बांधलंच आहे तर,रेल्वे सेफ्टीच्या कमिश्‍नरला प्रमाणपत्र देण्यावाचून पर्याय तरी काय आहे?अशी सोयीस्कर मानसिकता दिसून पडते.हर्डीकर यांच्या उत्तरातील ‘अनुज्ञेयता,प्रक्रिया’इत्यादी शब्दातील अर्थ दुस-या शब्दात, नियमांना सपशेल तिलांजली देऊन जनतेच्या जीवाशी खेळण्याचाच व निष्काळजीपणाचा कळस गाठण्याचाच प्रकार ठरतो,यात दुमत नाही.

फूटाळ्याच्या संदर्भात त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे मेट्रोचा संबंध नाही मात्र माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रात मेट्रो हीच फूटाळ्यासाठी ॲथाेरिटी आहे.पाण्याचे सर्वेक्षण झाले नाही तर फूटाळ्यात उडी घेण्या पूर्वी नासुप्रला पाण्याच्या संदर्भात का नाही विचारले?

फूटाळा प्रकल्पातून ५ कोटींचे उत्पन्न मेट्रोने मिळवण्यावर देखील हर्डीकरांचे उत्तर हे भविष्यातील योजनांवर निर्भर होते.

मॉरिस कॉलेजचे मोक्याचे मैदान गेल्या साढे आठ वर्षांपासून महामेट्रोने कोणत्याही उपयोगात न आणता डंपिंग ग्राऊंड बनवून ठेवले आहे.भविष्यात यावर देखील कमर्शियल बांधकाम होईल,यात शंका नाही.कस्तुरचंद पार्क,मॉरिस कॉलेज मैदान,बर्डी,एअरपोर्ट यासारखी नागपूरातील वैभवशाली संपत्तीच मेट्रो प्रकल्पाने कायमची नष्ट केली,हे नागपूरकरही मानतात.

मेट्रो हा एक रेल्वे प्रकल्प असताना बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी झालेली आढळते.मेट्रोसारखा प्रकल्प भारतासाठी फक्त २५ वर्ष जुना असल्याचे हर्डीकर सांगतात मग मेट्रोचा शास्त्रशुद्ध अभ्यास नेमका कोणी केला?फक्त रेल्वेपर्यंत सिमीत न राहता,नागपूरातील सर्व प्रकल्पांचे बांधकाम महामेट्रोलाच कसे प्राप्य आहे?मेट्रोची टरमिनोलॉजी आता कमर्शियल बांधकाम झाली आहे का?
हर्डीकर सांगतात,मेट्रोमुळे शहराची प्रतिष्ठा वाढते.पण,बाहेरुन येणारे फक्त मेट्रो बघत नाही तर शहरातील कच-याचे ढिगारे,खड्डेयुक्त रस्ते ही पाहतात ना?

हर्डीकर सांगतात येत्या काळात २ लाख प्रवासी संख्या करायची आहे मात्र,पाचच वर्षात मेट्रो टॅकच्या दोन पुलांखाली तडे गेले,ते शंभर वर्ष कसे टिकणार?आताच या मार्गावरील मेट्रोची गती कमी करण्यात आली आहे!

हर्डीकर सांगतात,मी डोंबिवलीकर असल्यामुळे मला घरापासून रेल्वेपर्यत पायी प्रवास करण्याचे बाळकडू मिळाले.नागपूरकरांची ही मानसिकता नाही.नागपूरकरांना घराच्या पार्किंग पासूनच दूचाकी किवा चारचाकी लागते.मग,हर्डीकरांनी आता ‘या बाळकडूची सुरवात आपल्या मेट्रो भवनापासून करावी’,त्यांच्या स्टाफला सांगतील का आणि मेट्रोची राईडरशिप वाढवतील का?एवढंच नव्हे तर जी मनपा व नासुप्र ही महामेट्रोची अनेक प्रकल्पात भागीदार आहे त्या ही संस्थांसाठी परिपत्रक काढावे,यातून नागपूरकरांची मानसिकता घडविण्यास निश्‍चितच प्रेरणा मिळेल,यात दुमत नाही.

………………………………………

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *