उपराजधानीमहामेट्रोराजकारण

कोराडीच्या वीज प्रकल्पाला मंजुरी म्हणजे जनतेचा विश्वासघात : विशाल मुत्तेमवार

नागपूर : कोराडी येथील प्रस्तावित वीज प्रकल्पासाठी घेतलेली जनसुनावणी ही नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा आक्षेप घेत स्थानिक नागरिकांनी न्यायालयात अपील केलेले आहे. याबाबतचा निकाल अजूनही प्रलंबित आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचा विचार न करता राज्य मंत्रिमंडळाने या वीज प्रकल्पाला मंजुरी दिल्यामुळे सत्ताधा-यांनी नागपूरच्या जनतेचा विश्वासघात केला असल्याचा घणाघाती आरोप महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष,विशाल मुत्तेमवार यांनी केला.

कोणताही नवीन औष्णिक वीज प्रकल्प सुरू करण्याआधी त्याचे होणारे परिणाम व प्रदूषणाचा विचार करावा लागतो. पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट) अहवाल सकारात्मक मिळाल्याशिवाय संबंधित परिसरात वीज प्रकल्प उभारता येत नाही. पर्यावरण प्रभाव मूल्यांकनाच्या मान्यतेशिवाय प्रकल्प सुरू करणे म्हणजे पर्यावरण आणि वन मंत्रालयाने तयार केलेल्या नियम व अटींचे उल्लंघन करणे होय.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोराडी येथील प्रस्तावित वीज प्रकल्प रद्द करावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. तरी देखील राज्य मंत्रिमंडळाकडून प्रकल्प मंजूर होणे म्हणजे नितीन गडकरी यांनी केवळ विरोधाचा देखावा करून जनतेची फसवणूक केल्याचे यावरून स्पष्ट होते.

जागतिक आरोग्य संघटनेने नोंद केल्याप्रमाणे नागपूर हे प्रदूषित शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे परिसरात कोणताच नवीन औष्णिक प्रकल्प सुरू व्हायला नको, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. हा वीज प्रकल्प जर कोराडी येथे प्रस्थापित झाला तर कोराडी परिसरातील गावांसह नागपूर शहरातील देखील प्रदूषणाचे प्रमाण वाढणार आहे. नागपूर आधीच प्रदूषणाच्या बाबतीत अग्रस्थानी असताना नवीन प्रकल्पाची उभारणी म्हणजे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणे होय. त्यामुळे राज्य सरकारला आग्रहाची विनंती आहे की, त्यांनी हा प्रस्तावित वीज प्रकल्प रद्द करावा आणि जनतेच्या जिवाशी खेळणे बंद करावे; अन्यथा भावी पिढी माफ करणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.

…………………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *