उपराजधानीमहामेट्रोराजकारण

येत्या सहा दिवसात नागपूर मेट्रो गुंडाळणार गाशा!


प्रशांत पवार यांचा दावा

ब्रिजेश दीक्षीत विरोधातील याचिकेत मध्यस्थी याचिका करणार दाखल

नागपूर,ता.३ नोव्हेंबर २०२३: ‘जय जवान जय किसान’संघटनेतर्फे गेल्या वर्षी महामेट्रोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षीत यांचा मेट्रो भवनात सत्कार करण्यात आला होता कारण, त्यावेळी अनेक वेंडर्सचे पैसे महामेट्रोकडे अनेक वर्षांपासून अडकले होते. वेंडर्सची संघटना तसेच आमच्या प्रयत्नातून त्यांना ५० टक्के निधी प्राप्त झाला होता,त्या निमित्ताने दीक्षीत यांचा सत्कार करण्यात आला मात्र,आम्ही ‘मॅनेज’झालो असा आरोप आमच्यावर विविध माध्यमात त्यावेळी करण्यात आला.हा चुकीचा आरोप असून लवकरच आम्ही असा पुरावा सादर करणार आहोत की येत्या पाच-सहा दिवसात एक कागद आम्हाला मिळताच ,महामेट्रो बंद पडेल अर्थात आपला गाशा गुंडाळणार असल्याचा दावा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व ’जय जवान जय किसान’चे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी बजाज नगर येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आज केला.

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, नुकतेच माजी उपव्यवस्थापक(सिग्नलिंग व टेलिकॉम) विश्‍वरंजन बेऊरा यांनी उच्च न्यायालयात महामेट्रोच्या आर्थिक कारभार व भ्रष्टाचाराच्या विरुद्ध फौजदारी याचिका दाखल केली असून, ब्रिजेश दीक्षीत यांच्या कार्याकाळातील नियमबाह्य कार्य व आर्थिक भ्रष्टाराबाबत प्रचंड धाडसाने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.आमची संघटना ही लवकरच यात मध्यस्थी याचिका दाखल करणार असल्याचे सांगून,याचा अर्थ आम्ही ‘मॅनेज’ झालो नव्हतो असाच होतो,असे पवार म्हणाले.

या आर्थिक भ्रष्टाचारामध्ये जो दोषी आहे त्याला लवकरात लवकर तुरुंगात डांबण्यात येईल,यात वाद नाही.इतकंच नव्हे तर येत्या दोन तीन दिवसात ही मेट्रोच बंद झालेली दिसेल असा दावा याप्रसंगी प्रशांत पवार यांनी केला.

दीक्षीत यांनी वेंडर्स लोकांचे फक्त ५० टक्के रकमेचेच भुगतान केले.विद्यमान व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी उर्वरित रकमेेचे भुगतान करण्याचे मान्य केले असल्याचे पवार यांनी सांगितले.आमची संघटना मागील पाच वर्षांपासून सातत्याने महामेट्रोच्या भ्रष्ट कारभाराविषयी आवाज उठवित आहे.मेट्रो प्रकल्पात सुमारे १२०० कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा अंदाज आम्ही वर्तविला होता, त्यावर विश्‍वरंजन बेऊरा यांच्या हायकोर्टातील याचिकेने शिक्कामोर्तब केले,असे प्रशांत पवार म्हणाले.

बेऊरा यांनी दाखल केलेल्या याचिकेतील अनेक मुद्दे हे अतिशय गंभीर असल्याचे पवार यांनी सांगितले.या मुद्दांवर न्यायालयच ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश देतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

‘कॅग‘च्या अहवालात देखील अनेक मुद्दांवर कठोर ताशेरे महामेट्रोवर ओढले आहेत.यात मनिषनगर पुल बांधतांना निविदाच काढण्यात आली नाही.फूटाळा तलावातील फवारा बांधकामामध्ये तांत्रिक बाबींचा अभ्यासच करण्यात आला नाही.नागपूर महानगरपालिका तसेच पंजाबराव कृषि विद्यापीठाकडू सुमारे ७५,००० कोटींच्या जमीनी विनामुल्य घेतल्या परंतु त्याचा विकास करण्यात आला नाही.प्रकल्पाचा खर्च जवळपास ८०० कोटींनी वाढवण्यात आला तसेच ठरलेल्या मुदतीत बांधकाम करण्यात आले नाही.

मेट्रो स्टेशन व मेट्रो भवन यांचे बांधकाम करताना प्रचंड खर्च करण्यात आला.मेट्रो भवनचे बांधकामच अंदाजे १०० कोटींच्या वर असून हे भवन,कुठलीही परवानगी न घेता बांधण्यात आले.५ डी नावाचे बीम नावाचे सॉफ्टवेअर घेऊन त्याचा प्रकल्पाची किंमत कमी करण्यासाठी कोणताही उपयोग करुन घेण्यात आला नाही.

एससी,एसटी,ओबीसी,महिला,दिव्यांग यांना संविधानानुसार आरक्षण न देता, जवळपासच्या नातेवाईकांचा व राजकीय पुढा-यांनी केलेल्या शिफारीशीनुसार नोक-यांची खैरात वाटण्यात आली.पीडब्ल्यूडी,नासुप्र तसेच मनपातील भ्रष्ट निवृत्त अधिका-यांचा भरणा कंत्राटी पद्धतीने करण्यात आला.अश्‍या अनेक बाबींवर ‘जय जवान जय किसान’संघटनेने वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन आवाज उठवला होता.कॅग ने देखील आपल्या अहवालात यातील अनेक बाबींवर कठोर ताशेरे ओढले असल्याचे प्रशांत पवार म्हणाले.

या पार्श्वभूमीवर,ब्रिजेश दीक्षीत यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर देखील फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी याप्रसंगी पवार यांनी केली.आमची संघटना वरील सर्व मुद्दांवर उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करुन,मध्यस्थी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पत्र परिषदेला ‘जय जवान जय किसान’संघटनेचे सचिव अरुण वनकर,समन्वयक विजयकुमार शिंदे,मिलिंद महादेवकर,अभिनव फटिंग आदी उपस्थित होते.
……………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *