उपराजधानीमुक्तवेध

माेदींनी जिंकली २०२४ ची निवडणूक!

(भाग-१)

समाज माध्यमात प्रतिक्रियांचा पाऊस

’राम आग नाही उर्जा आहे’कोणाला होता इशारा?

देशभरात दिवाळी साजरी,कशाचे द्योतक?

डॉ.ममता खांडेकर
( Senior Journalist)

नागपूर,ता.२२ जानेवरी २०२४: कोणताही राजकीय पक्ष असो त्या पक्षाच्या मुख्य नेत्याच्या आजूबाजूला सल्लागारांची एक विश्‍वासू चमू असते, जे नेत्याला सल्ला देण्याचे काम करतात,काँग्रेसचे नेते राहूल गांधींचे सल्लागार कोण आहेत?असा सवाल सध्या समाज माध्यमात फिरत असून, राहूल गांधींना देशातील जनतेच्या मनातील प्रतिमेविषयी जागरुक नाही करु शकली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशच नव्हे तर देशातील किमान ५० टक्के जनतेच्या मनात आपली एक सर्वशक्तीमान अशी स्वप्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवले हे मात्र निश्‍चित.आज अयोध्येत जे काही घडलं ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ‘मोदी जी’वरुन फक्त ‘मोदी’वर का आले याचा उलगडा करणारे ठरले.

एका वृत्तपत्रात भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीचा वृतांत याच मथळल्याखाली प्रसिद्ध करण्यात आला होता.विपक्ष हा विषयच नाही उरला तर या पुढे ‘मोदी वर्सेस भाजपा’अशीच थेट लढत बघायला मिळणार असून, हीच मोदींची कार्यशैली राहीली आहे,आज अयोध्यातील भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेने त्यांच्या या कार्यशैलीवर ‘कळसाध्याय’ चढवला,इतकंच.पक्षापेक्षा मोदी हे कधीचेच मोठे झाले आहेत,हे सत्य आता नेतेच नव्हे तर देशभरातील कार्यकर्त्यांनी देखील स्वीकारले आहे.आज देशभरातील ५० टक्के जनता ही उस्फूर्तपणे अयोध्येच्या उत्सवात सहभागी होती,हा करिष्मा भगवान श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेपेक्षाही जास्त, मोदी यांच्या करिषम्याचा होता,यात दुमत नाही.

प्रत्येक नेता हा जनतेच्या मनात स्वत:विषयी एक दृष्टिकोण तयार करीत असतो.मोदींनी २०१४ मध्ये सत्तेत येताच हिंदूत्वाविषयीचा दृष्टिकोण तयार केला.किंबहूना याच दृष्टिकोणाने त्यांना सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर बसवले,असे म्हण्यास हरकत नसावी.सत्तेत आल्यानंतर ती टिकविणे गरजेचे असते.त्यासाठी देशातील अशाच काही संवेदनशील विषयाला हात घालणे गरजेचे असते,माेदींनीही तेच केले.गेल्या दहा वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात ६० गोष्टी चुकीच्या घडल्या असतील मात्र,४० गोष्टी ज्या त्यांनी केल्या,त्या त्यांना सत्तेच्या सोपाणावरुन खाली उतरवू शकणार नाहीत,हे मान्य करावंच लागेल.आज अयोध्या भूमीवरील त्यांची देहबोली आणि भाषण हे त्याचेच द्योतक होते.

गेल्या दोनशे वर्षांपासून अगदी इंग्रजांच्या काळापासून या देशातील हिंदूंच्या अस्मितेवर जे ओरखडे ओढले जात होते, त्याला देशावर ६५ वर्षांपासून अधिक काळ सत्तेवर असणा-या काँग्रसने खतपाणीच घालण्याचे काम केले.नेहरुंना तर हिंदू म्हणून घेणे ही तीव्र नापसंद होते.तीच परंपरा नेहरु घराण्यातील शीर्षस्थ नेत्यांनी पुढे ही सुरु ठेवली.मुस्लिमांचे लांगूनचालन व हिंदूंचे खच्चीकरण ही सत्तेसाठीची गुरुकिल्लीच जणू काँग्रेसवासियांना गवसली होती.यातून फूटून निघणारे शरद पवार असो किवा ममता बॅनर्जी,आपापल्या राज्यात त्यांनी पक्ष जरी वेगळे केले तरी हीच ‘नीती’तीच कायम ठेवली.परिणामी,हिंदूंना देशात कोणी वालीच उरला नाही.एक घोर निराशेचे वातावरण हिंदूंभोवती होते,हे सत्य नाकारता येत नाही.

भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी नेमकी सत्ताधारी काँग्रेसची हीच चूक हेरुन नव्वदीच्या दशकात जाज्वल्य हिंदूत्वाचा हूंकार भरला.लोकसभेच्या निवडणूकीत ज्या पक्षाला फक्त दोन जागा मिळाल्या,त्या पक्षाच्या हातात संपूर्ण बहूमतासह दोन वेळा सत्ता देणे,हे केवळ काँग्रेसच्या तथाकथित धर्मनिरपेक्ष धोरणामुळेच शक्य झालं,हे वास्तव नाकारता येणार नाही.काँग्रेसने या देशातील बहूसंख्याकांना इतकं गृहीत धरलं की सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखालील सरकारने तर देशाच्या सैन्यातही अल्पसंख्याकांची शिरणगतीचा निर्णय पारित केला!

सैन्यातील शीर्षस्थ अधिका-यांनी काँग्रेसच्या या अविचारी निर्णयाचा तीव्र विरोध करुन देशाच्या सैन्यात फक्त बटालियन,रेजिमेंट्स असतात,हिंदू,मुसलमान किवा जाती-जातीत विभागलेले सैनिक नाही,अशा शब्दात काँग्रेसला खडे बोल सुनावले,परिणामी काँग्रेसला हा आपला अति शहाणपणाचा निर्णय गुंडाळून ठेवावा लागला होता,हे विशेष!

नव्वदीच्या दशकात जेव्हा देशात दहशतवाद चरम सीमेवर होता त्याही वेळेस काँग्रेसला अल्पसंख्यकांना न दुखावण्याच्या निर्णयाबाहेर पडण्याची गरजच वाटली नाही.दिल्लीतील बाटला हाऊस प्रकरणात तर काँग्रेसने तुष्टिकरणाचा उच्चांकच गाठला व बाटला हाऊसची चकमक खोटी ठरवित,हूतात्मा इंस्पेक्टर मोहनचंद शर्मा यांच्या शहादतला चक्क बासनात गुंडाळण्याची असंवैधानिक कृती केली.इंटेलिजेंसच्या सूचनेच्या आधारावर दिल्ली पोलिसच्या स्पेशल सेलने १९ सप्टेंबर २००८ रोजी बाटला हाऊस भागात एका इमारतीमध्ये लपून बसलेल्या दहशतवादांवर धावा बोलला.देशातील अनेक बॉम्बस्फोटात हात असणारे दहशतवादी या बहूमजली इमारतीत लपून बसले असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती.या हल्ल्यात दोन दहशतवादी ठार झाले तर एनकाऊंटर स्पेशलिस्ट इंस्पेक्टर मोहन चंद शर्मा हे शहीद झाले होते.या घटनेचाही राजकीय लाभ काँग्रेसच्या नेत्यांनी उचलण्याची संधी साधली,ही चकमक खोटी ठरवित दहशतवाद्यांप्रति संवेदना जाहीर केली.काँग्रेसच्या एका नेत्याने तर सोनिया गांधी या घटनेमुळे इतक्या दुखी झाल्या की रात्रभर झोपल्या नाहीत,त्यांच्या डोळ्यात अश्रू होते,अशी वल्गना केली!

शहीद मोहन चंद यांच्या कुटूंबियांना मात्र न्यायासाठी न्यायालयाचे खेटे घालणे नशीबी आले.दहशतवादासारख्या मुद्दावर देखील काँग्रेससारखा देशातील सर्वात मोठा व सत्ताधारी पक्ष हा लांगूनचालनाचे राजकारण करीत असल्याचे बघून भाजपसाठी हिंदूत्वाचा झेंडा आणि अजेंडा राबविण्याचे आयते मार्ग मोकळे झाले.

राजपुत्र राहूल गांधी हे जेव्हा जेव्हा आपले आजोळ इटलीला जात असत त्यावेळी विमानतळावरच त्यांच्या सुरक्षेसाठी इटलीचे सुरक्षा सैन्य हजर राहत असे!सोनिया गांधींना भारताच्या सैन्यावर विश्‍वास नसल्याची टिका करीत सोनिया गांधी या भारतीय सैन्याचा अपमान करीत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.या देशातील सर्व मूलभूत संसाधनांवर पहीला हक्क हा अल्पसंख्याकांचा आहे,असे देशाचे तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग म्हणाले आणि देशात या विरोधात तीव्र नाराजी उमटली.देशाचा पंतप्रधानच भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात तुष्टिकरणाच्या राजकारणातून असे शब्द उच्चारतात तेव्हा समाजमनात खोलवर चुकीचा परिणाम होणे स्वाभाविक होते.

तमिळनाडूच्या अरिकल मुलाई हे गाव रामेश्‍वर बेटाचे दक्षीण टोक असून येथून श्रीलंका हा देश हाकेच्या अंतरावर आहे.याच ठिकाणाहून रामसेतू सुरु होतो.काँग्रेसच्या काळात रामसेतूचे अस्तित्वच सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करुन नाकारले गेले होते.ही हिंदूंची कपोल कल्पना असून याला कोणाताही वैज्ञानिक आधार नसल्याचा दावा करण्यात आला मात्र,भाजपने अंतराळातून घेतलेल्या छायाचित्रात रामसेतूचे अस्तित्व असल्याचा प्रभावी प्रचार केला. काँग्रेसची ही कृती देखील देशातील हिंदूंचे खच्चीकरण करणारी ठरली.

२०११ साली काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने काँग्रेसविषयीची हीच, एका गुप्त अहवालातून मिळालेली खदखद सोनिया गांधींच्या समोर ठेवली व २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूकी पूर्वी हिंदूंविषयींच्या धोरणांमध्ये लवचिकता आणण्याची सूचनाही अधोरेखित केली होती मात्र,सोनिया गांधींनी त्या अतिशय महत्वाच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या,परिणामी २०१४ च्या निवडणूकीत आक्रमक हिंदूत्वाचे पुरस्कर्ते व तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे नाव पंतप्रधान पदासाठी भाजपने जाहीर करुन ही निवडणूक ‘हिंदूत्व वर्सेस तुष्टिकरण’या मुद्दाभोवती फिरवली. काँग्रेसला अनेक चुका भोवत असताना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांतून अण्णा हजारे यांनी जनआंदोलनातून काँग्रेसला घेरले.यानंतर जे घडले ते संपूर्ण देशाने बघितले.

संसदेच्या पाय-यावर माथा टेकून आत प्रवेश करणारे तेच नरेंद्र मोदी हे देश,पक्ष आणि सत्तेपेक्षाही फार फार मोठे कसे होत गेले,हे या देशाने अनुभवले आणि आजच्या अयोध्येच्या अध्यायानंतर मोदींनी त्यांचे नाव देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कायमचे काेरले,हे नाकारता येणार नाही अर्थात, ही संधी त्यांना काँग्रेस,सोनिया गांधी,राहूल गांधी यांच्या अदूरदर्शी धोरणातूनच प्राप्त झाली हे ही तितकेच खरे.आता तर इंडिया पक्षातील बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भविष्यात परत एनडीएमध्ये येऊ शकेल,अशी संभावनाही व्यक्त केली जाऊ लागली आहे.

अर्थात मोदी हे शंभर टक्के हिंदूत्वाच्या मार्गावर व संघाला अपेक्षीत हिंदूत्वावर येऊ शकणार नाही,त्यांना राजकीय मर्यादा आहेत हे ही तितकेच खरे आहे.परिणामी, संघाची संपूर्ण दारोमदार योगी आदित्यनाथांवर आहे.योगींनी आपल्या आजूबाजूला कोणतंच वलय निर्माण केलेलं नाही.अशी कोणतीही मर्यादा योगींना नाही.ते पूर्वीपासूनच अंगावर भगवे वस्त्र धारण करुन आहेत. आजच्या अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेमुळे दोनशे वर्षांच्या हिंदूत्वाच्या बंदिस्त साखळदंड या सैल झाल्या आहेत,हे मान्य करावंच लागेल.रामराज्य अवतरणे शक्य नसले तरी जन्मस्थळी राममंदिर झाले ही भावनाच देशातील ५० टक्के जनभावनेला सुखावणारी ठरली.

अश्‍या या अयोध्येतील राम मंदिरासाठी केवळ कारसेवकांनीच हौतात्म्य पत्करले नाही तर लढा पाचशे वर्षांचा असून वेगवेगळ्या काळात लाखो भाविकांनी रामजन्मभूमीला दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी चिवट लढा दिला असल्याचे अनेक दाखले इतिहासात सापडतात.उज्जैनचा सम्राट विक्रमादित्य यांनी इ.स.पूर्व १०० मध्ये काळ्या दगडांपासून उभारलेले ८४ खाबांचे भव्य मंदिर म्हणजे हेच ते अयोध्येतील राम मंदिर होय.आजपासून ४९५ वर्षांपूर्वी मुगल बादशहा बाबरच्या सेनापतीने,मीर बाकी याने या स्थानावर असलेले मंदिर तोफेच्या गोळ्यांनी पाडले व तेथे आपल्या बादशहाच्या नावाने मशीद उभारली.हिंदू समाजासाठी मुगल आक्रमकांची ही कृती फार जीवघेणी ठरली होती.सम्राट विक्रमादित्याने बांधलेल्या मंदिरांचे शृंग घराण्यातील राजांनी वेळोवेळी जीर्णोद्धार केला होता.याच काळात इस्लाम धर्माचा भारतात प्रवेश झाला.अयोध्येकडे ११ व्या शतकात सर्वात आधी वाकडी नजर गेली ती १०३४ मध्ये सैयद सालार मसूद गाजी याची.

(उर्वरित भाग उद्याच्या बातमीत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *