उपराजधानीनागपूर मनपा

देशाच्या गौरवाच्या ठिकाणाची नागपूरात अशीही विटंबना!


ज्वाला धोटे यांचा संताप अनावर

नागपूर,ता.२३ जानेवरी २०२४: ‘तूम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा’अशी जाज्वल्य घोषणा करणारे भारताचे क्रांतीवीर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती २३ जानेवरी रोजी असते.नागपूरात या देशगौरवाचा पूर्णाकृती पुतळा लोहापूल जवळील मानस चौकात बसविण्यात आला आहे.या पुतळ्याचे अनावरण २२ फेब्रुवरी १९७६ रोजी माजी खासदार विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या हस्ते तत्कालीन महापौर भाई भगवंतराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.मात्र,एवढ्या थोर क्रांतीकारकाची जयंती नागपूर महानगरपालिकेने मुख्यालयात व झोनस्तरावर फक्त छायाचित्राला माल्यार्पण करुन तर साजरी केली पण, उपराजधानीत असलेल्या त्यांच्या पुतळ्याची व सभोवतालच्या परिसराच्या स्वच्छतेची कोणतीही दखल मनपा अधिकारी व कर्मचा-यांनी घेतली नाही,परिणामी विदर्भवीर यांची कन्या व ‘अन्याय निवारण समिती’च्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी समाज माध्यमात चांगलाच संताप व्यक्त केला.

महत्वाचे म्हणजे एवढ्या थोर क्रांतीकारकाच्या पुतळ्याची तसेच परिसराची स्वच्छता तर सोडाच या पुतळ्यासमोरच ‘ओरिएंट ग्रूप्स ऑफ हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्टस’च्या जाहिरातीसाठी चक्क भिंत बांधण्यात आली व त्यावर ही जाहीरात कोरण्यात आली.मनपाची दिवाळखोरीच यातून दिसून पडली.या ग्रूपचं प्रमोशन करायचंच होतं तर या थोर क्रांतीकारी युगपुरुषाच्या पुतळयाच्या परिसराबाहेरही जागा होती,त्या ठिकाणी अशी जाहीरातबाजी का करण्यात आली नाही?इतक्या महान क्रांतीकारकाच्या पुतळ्यासमोरचीच जागा मनपाच्या जाहीरात विभागाच्या अधिका-यांना कशी पसंद पडली?असा खरमरीत सवाल ज्वाला धोटे यांनी केला.

नेताजीच्या या पुतळ्याला एक ऐतिहासिक महत्व आहे.या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी खास कलकतावरुन नेताजी यांचे धाकटे बंधू शैलेशचंद्र बोस व त्यांच्या धर्मपत्नी भक्तिबिंदु बोस उपस्थित होते.उपराजधानीतील एवढी ऐतिहासिक धरोधर मनपा अधिका-यांच्या सुमार बुद्धीमत्तेतून दूर्लक्ष्त ठेवण्यात आली.असामाजिक तत्वांचा अड्डा बनली.या ठिकाणी दारुच्या बाटल्या सापडणे ही त्या थोर क्रांतीकारकाची थट्टाच असल्याचे त्या म्हणाल्या.

मानस चौकाच्या मधोमध असणारी थोर संतांची मूर्ती काढून मनपाने ती चक्क नेताजी यांच्या स्मारक परिसरातच स्थापित केली.मनपाच्या या वैचारिक दिवाळखोरीतून एक महान संत व एक थोर क्रांतीकारी दोघांचाही अपमान झाला असल्याचे ज्वाला धोटे म्हणाल्या.या थोर संतासाठी नागपूरात कोणतीही शासकीय जागाच नव्हती का?असा प्रश्‍न त्यांनी केला.मनपाचे अधिकारी आणि नागपूरातील सत्ताधारी यांना अश्‍या कृतीतून नेमकं काय सिद्ध करायचं आहे?असा सवाल त्यांनी केला.

नेताजींच्या स्मारकाजवळील परिसर हा कायम अस्वच्छेसाठी प्रसिद्ध असतो किमान त्यांच्या जयंती दिनी तरी मनपा प्रशासनाने स्मारक परिसरातील स्वच्छता का केली नाही?माजी नगरसेवक निशांत गांधी यांच्यातर्फे या ठिकाणी बेंच बसवण्यात आले मात्र त्यावर गंजेडी,नशेडी चैन करीत असल्याचा संताप ज्वाला धोटे यांनी व्यक्त केला.

जनतेच्या कराचे २०० कोटी रुपये जी-२० च्या नावाखाली तकलादू सौंदर्यीकरणासाठी मनपाने अगदी सढळ हाताने खर्च केले मात्र, स्वातंत्र्यसेनानी क्रांतीकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यास मनपाने का हात आखडता घेतला?किमान स्मारकाचे संरक्षण नशेडी,गंजेडी यांच्यापासून करण्यासाठी काही तर सुरक्षेची पाऊले उचलायला हवी होती.स्मारकासमोरच जो काही धिंगाणा असामाजिक तत्व दररोज घालतात,ते बघून या थोर क्रांतीकारकाला काय वाटत असावं?या साठीच केला होता का स्वातंत्र्याचा अट्टहास?असे नेताजीला वाटत नसावे का?असा प्रश्‍न ज्वाला धोटे यांनी केला.

श्‍वानांची विष्ठा,गाईचं शेण,मेलेले उंदिर अश्‍या घाणीत राहण्याची वेळ मनपाच्या उदासिनतेमुळे एका थोर क्रांतीकारकावर यावी?दारुच्या बाटल्या,चखणा,बिडी,सिगारेट,खर्रेची पाकिटे,बिअरच्या बोटल्स इतक्या पराकोटीच्या घाणीत नेताजींवर राहण्याची वेळ आणणा-या मनपाच्या अधिका-यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.

ओरिएंट ग्रूप्सच्या जाहीरातपर कुंड्या यामुळे स्मारकाचे विद्रुपीकरण करणा-या मनपाच्या जाहीरात विभागाच्या अधिका-यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.ज्या भाजपच्या घोषणापत्रातच कायम नेताजींचा गुणगाण असताे,दिल्लीत पंतप्रधान भव्य पुतळा उभारतात त्याच नेताजींविषयी नागपूरातील भाजपनेते आणि मंत्री एवढी पराकोटीची अनास्था कशी दाखवू शकतात?असा सवाल त्यांनी केला.

या परिसराची त्वरित स्वच्छता करुन,स्मारकाची सुरक्षीतता व सौंदर्यीकरणासाठी मनपाने पावले न उचलल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगत इतक्या थोर क्रांतीकारकाच्या जयंतीच्या दिवशीही मनपाने जो कामचुकारपणा दाखवला आहे याविरुद्ध संबंधित अधिका-यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा इशारा ज्वाला धोटे यांनी दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *