उपराजधानीनागपूर मनपा

आता कचरा संकलन व शौचालयांच्या स्वच्छतेवर तंत्रज्ञानाची नजर!

कचरा संकलन आणि शौचालयांच्या स्वच्छतेसाठी मनपाची आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली

नागपूर.,२५ जानेवरी २०२४:  नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाव्दारे घराघरातून होणारे कचरा संकलन आणि शौचालयांच्या स्वच्छतेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करायला सुरुवात केली आहे. मा. मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात या प्रणाली विकसीत करुन त्यांचा उपयोग केला जात आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले  यांनी गुरूवारी (ता.२५) पत्रकार परिषदेत दिली.

मनपा मुख्यालयातील नागपूर स्मार्ट सिटीच्या श्रध्‍देय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपेरेशन सेंटर मधून मनपाचे ९ कर्मचारी दोन पाळीत मे. ए. जी. इन्व्हायरो इन्फ्रा प्रा. लि. व मे. बी. व्ही. जी. इंडिया लि., स्मार्ट वॉच वापरणारे कर्मचारी आणि शौचालय स्वच्छतेवर निगरानी ठेवत आहेत. मनपाच्या झोनल स्वच्छता अधिकारी, स्वास्थ निरीक्षक जमादार आणि सफाई कर्मचारी यांना स्मार्ट वॉच देण्यात आली असून ते जर कामाच्या निर्धारित वेळी सकाळी ६ वाजतानंतर कर्तव्यावर आल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे.

मे.ए.जी. इन्व्हायरो इन्फ्रा प्रा. लि. व मे. बी. व्ही. जी. इंडिया लि., मार्फत घराघरातून कचरा संकलीत केला जात आहे. मनपाच्या स्वच्छता विभागामार्फत मे. ए. जी. इन्व्हायरो इन्फ्रा प्रा. लि. साठी त्यांच्या निर्धारित मार्गावर १७२३९ कचरा संकलन स्पॉट आणि मे. बी. व्ही. जी. इंडिया लि. साठी त्यांच्या निर्धारित मार्गावर १९००२ कचरा संकलन स्पॉट निर्धारित करण्यात आले असून यावर तांत्रिक पध्दतीने ठेवण्यासाठी एक ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेली आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून दोन्ही कंत्राटदारांच्या वाहनांव्दारे किती स्टॉपवरुन कचरा संकलीत केला जातो याबाबतची माहिती ॲपद्वारे सिटी ऑपेरेशन सेंटरवर मिळेल. दोन्ही एजन्सीच्या ३७९ प्राथमिक कचरा संकलन वाहनांवर तसेच ९७ दुय्यम कचरा संकलन वाहनांवर अश्या एकुण ४७६ वाहनांवर जी. पी. एस. प्रणाली लावण्यात आलेली आहे.

सामुदायीक शौचालय स्वच्छतेसाठी ब्रिस्क एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. शहरातील २१८ सामुदायिक शौचालय आणि मुत्रीघरांची स्वच्छता करण्याची कामे यांना देण्यात आलेली आहे. यामध्ये १४३३ सीट्स असून त्याच्या स्वच्छतेसाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक सीटची स्वच्छता केल्यानंतर त्याचा फोटो या ॲप मध्येच अपलोड करायचा आहे. प्रत्येक सीटला नंबर दिले आहे आणि जिओ फेन्सिंग सुद्धा करण्यात आले आहे. फोटो घेताना सीट वर दिलेला नंबर दिसणे आवश्यक आहे. ॲपव्दारे देखरेख च्या व्यतिरिक्त झोनल स्वच्छता अधिकारी/स्वास्थ निरीक्षक सुद्धा वैयक्तिकरित्या प्रत्यक्ष भेट देउन तपासणी करण्यात येत आहे.

मनपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे मे.ए.जी. इन्व्हायरो इन्फ्रा प्रा.लि. व मे.बी.व्ही.जी. इंडिया लि. करीता मार्स टेलिकॉम सिस्टीम (ई.आर.पी. सोल्युशन पार्टनर ऑफ आयटी डिपार्टमेंट), तसेच मे. ब्रिस्क इंडिया करीता ६ सिम्लेक्स सॉफ्टवेयर सोलुशन्स या संस्थामार्फत तांत्रिक पध्दतीने देखरेख व नियंत्रणाची प्रणाली तयार करण्यात आलेली आहे, असेही अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे लोकेश बासनवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *