उपराजधानीसांस्कृतिक

करोना काळातील वेदना आणि आशेचा ‘हूंकारो’

उजागर ड्रॅमॅटिकच्या असोसिएशनचे सादरीकरण

नाटकातील लोकगीतांनी प्रेक्षकांनी दिला अविस्मरणीय आनंद

नागपूरकर प्रेक्षकांची उंची कळली:कलावंतांची नागपूरकरांना दाद

ज्येष्ठ नाट्यलेखक महेश एलकुंचवार यांचीही कलावंतांना शाबासकी

नागपूर,ता.२३ फेब्रुवरी २०२४: नाटक हे दृकश्राव्य माध्यम आहे.रंगमंचावर जे काही घडतं त्याच्या संहितेशी प्रेक्षक हा एकरुप होत असतो मात्र,२०२० च्या मार्च महिन्यापासून जगभरात व भारत या देशात कोविड-१९ची जी भंयकर त्रासदी कोसळली त्यानंतर जीवन असो की नाटक सगळे परिपेक्ष्य बदलून गेले आहेत.

आपण निसर्गाने वेढलेले आहोत. पाहणे हे आपल्या जीवनात प्रबळ झाले आहे. अशा परिस्थितीत दृकश्राव्य आणि दृकश्राव्य अशा रंगभूमीपुढील आव्हान आहे की ते नवीन रंगभूमीच्या भाषेत पाहणे आणि ऐकणे या दोन्ही गोष्टींची मांडणी करून नव्या प्रेक्षकांना स्वतःशी कसे जोडू शकतात. पण, आपण ऐकायला तयार आहोत का? उजागर ड्रॅमॅटिक असोसिएशन दिग्दर्शित मोहित टाकळकर निर्मित ‘हुंकारो’ हाच प्रश्न विचारतो आणि दाखवण्याऐवजी कथा सांगतो. कथाकथनाच्या प्रक्रियेत नेपथ्य अनुपस्थित आहे. कलाकारांनी आपल्या मनो-शारीरिक अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनातील दृश्य मांडले पाहिजे, असा दिग्दर्शकाचा आग्रह आहे. या सादरीकरणात ते विजयदान देठा यांची ‘आशा अमर धन’, चिराग खंडेलवाल यांची ‘गिद्ध’ आणि अरविंद चरण यांची ‘माई’ या तीन कथा सांगत आहेत. या सादरीकरणात प्रेक्षक निष्क्रिय नाहीत. कलाकार कथा थांबवतात आणि त्यांना प्रश्न विचारतात, कथेच्या परिस्थितीची पुनरावृत्ती करतात आणि प्रेक्षकांना जागरूक देखील करतात. ‘हूंकारो’म्हणजे ही गोष्ट ऐकण्याची आणि या सादरीकरणाचीही अट आहे अर्थात गोष्ट ऐकताना आपण ‘हूं हूं’असा जो गोष्टीला दूजोरा देत असतो तेच या नाटकाला अपेक्षीत आहे.

मोहित टाकळकर यांच्या दिग्दर्शनाखाली रंगमंचावर कमीत कमी उपकरणे वापरून कथा सोप्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जातो, त्यामुळे अभिनेता आणि प्रेक्षक हेच त्याच्या दृष्टीच्या केंद्रस्थानी अधिक राहतात. अजितसिंग पलावत, इप्सिता चक्रवर्ती, पुनित शर्मा, भारती पेरवानी, महेश सैनी आणि भास्कर शर्मा यांच्या अभिनय क्षमतेचा सादरीकरणात चांगला उपयोग करण्यात आला आहे. ‘गिधाड’ या कथेत, जेव्हा भास्कर एका रेडिओ जॉकीच्या शैलीत, लॉकडाऊन संपल्यानंतर पायीच गावी परतणाऱ्या मजुराची कहाणी सांगत असताना, ‘तो चालतो, आणि चालतो’ हा संवाद पुन्हा सांगतो,करोना काळातील वास्तव मार्मिकपणे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर समोर येतं. लॉकडाऊन मुळे देशभरातील लाखो मजूर ३०० ते ५०० किलोमीटर पायी चालून ,अनेक हाल अपेष्टा सहन करीत आपल्या गावी पोहोचले होते.

पुनरावृत्ती हा सादरीकरणाच्या टोनचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि मनोरंजक आहे, ज्यामुळे दृश्यांच्या अनुपस्थितीत प्रेक्षकांच्या मनात कथा स्थापित करण्यात मदत होते.तिन्ही कथा विस्थापन आणि रोजगारासाठी स्थलांतरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल आहेत. विजयदान देठाची कथा ही या सादरीकरणातील कथेला बांधून ठेवणारी कथा आहे, ज्याचे कथन करण्यासाठी अभिनेता लॉकडाऊन कालावधीतील दोन कथा कथन करतो. ही कथा दर्शविते की अत्यंत संकटाच्या क्षणी माणूस आपले मूलभूत मानवी गुण गमावतो परंतु ‘आशा’ ही एक एकमेव गोष्ट आहे ज्याला तो चिकटून राहतो. आशेच्या धाग्याने बांधलेली मुलं वर्षभर आईची वाट पाहत असतात. दुसऱ्या बाजूला आई आपल्या मुलांची वाट पाहते आणि तिसऱ्या बाजूला शेतमजूर गावात पोचल्यावर जगायला मिळेल या आशेने पायी गावात पोहोचतो. या क्रमात त्याला अर्धे गिधाड आणि अर्धा कावळा असलेला  प्राणी  भेटतो.

कलाकार ‘दास्तानगोई ’च्या बैठ्या शैलीत कथा कथन करतात. कथेत बदल होत असताना त्यांच्या बसण्याचा क्रम बदलतो. क्रम बदलण्यासाठी, कलाकार स्टेज सोडतात आणि नंतर पुन्हा प्रवेश करतात. सादरीकरणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे बहुभाषिकता. मोहितने या आधीही आपल्या नाटकांमध्ये हे काम केले आहे. अभिनेते आपापल्या भाषिक पार्श्वभूमीचा वापर करतात आणि राजस्थानी, हिंदी, भोजपुरी, अवधी, हरियाणवी अशा भाषांमध्ये संवाद बोलतात आणि त्यामुळे त्रास होत नाही. सादरीकरणाची सुरुवातच मारवाडीपासून होते, जी प्रेक्षकांना न समजण्याजोगी राहते, पण कलाकार थांबून समजावून सांगतात, ते नीट ऐकले तर भाषेतील आवाज दुर्बोध राहणार नाहीत. भावना, त्यांचा संवाद आणि योग्य रीतीने ऐकणे हे महत्त्वाचे आहे हे नाटक प्रस्थापित करते. राजस्थानीच्या बाजूने उभे असलेले हे सादरीकरण हिंदी प्रदेशातील विविध भाषांच्या समन्वयाच्या बाजूने आहे, त्यासाठी हिंदीला जोडणे आवश्यक आहे, परंतु हिंदीला संयोजकाची भूमिका जबाबदारीने पार पाडावी लागेल.

हे सादरीकरण कोरोनाच्या काळातील वेदनादायक अनुभवांचे ‘नाट्यमय दस्तऐवजीकरण’ आहे आणि त्या काळातील संयमी प्रतिक्रिया देखील आहे. पुनित मिश्रा आणि अजितसिंग पलावत जेव्हा हुकुम खान केसुंबला यांनी संगीतबद्ध केलेली गाणी स्टेजवर गातात तेव्हा ती श्रवणीयसोबतच मनोरंजनात्मक देखील असते.

लोकगीते या नाटकाचा मूळ गाभा ठरतो.सर्वच कलावंतांनी अत्यंत दमदारपणे व तयारीतून ही लोकगीते मंचावर सादर केली मात्र,नाटकाचा बाज बघता प्रेक्षकांना टाळ्या वाजवणे जणू प्रतिंबधकच होते.

प्रेक्षकांच्या पहील्याच रांगेत ज्येष्ठ नाट्यलेखक महेश एलकुंचवार यांची उपस्थिती कलावंतांवरील दडपण वाढवणारी होती,यात शंका नाही.मास्तर समोर बसले आहेत आणि ही आपली परिक्षा सुरु आहे,असाच जणू भास होत होता.नाटकाच्या सादरीकरणानंतर उजागर ड्रॅमॅटिकच्या कलावंतांकडून लेखक मोहित यांनी खास एलकुंचवार यांच्यासाठी मुंबईहून पाठवलेली भेटवस्तू त्यांना देण्यात आली.तब्बल अर्धा तास ग्रीन रुममध्ये बसून एलकुंचवार यांनी कलावंतांसोबत मनमोकळा संवाद साधला.अनेक वर्षांनंतर एवढे अप्रतिम सादरीकरण पाहावयास मिळाले,असा आनंद त्यांनी व्यक्त केला.लेखक मोहित यांच्या विषयी बराच वेळ ते बोलले.काही अनुभव देखील त्यांनी शेअर केले.कलावंतांची लोकगीतांवरील पकड आणि त्यांच्या आवाजाला,सादरीकरणाला एलकुंचवार यांनी मनमोकळी दाद दिली.

नागपूरच्या प्रेक्षकांचेही एलकुंचवार यांनी कौतूक केले.एक फार वेगळे नाटक नागपूरकर इतक्या शांततेत शेवटपर्यंत ऐकत होते,बघत होते यांचे त्यांना फार अप्रूप वाटले.२२ आणि २३ फेब्रुवरी रोजी सादर झालेल्या या दोन्ही नाटकांना नेहमीपेक्षा फार वेगळे प्रेक्षक लाभले असल्याचे आयोजकांनी एलकुंचवार यांना सांगितले.यात तरुणाईची संख्या लक्षणीय होती.

हूंकारोच्या कलावंतांनी संधीचे सोने करीत एलकुंचवार यांच्यासोबत मोबाईलमध्ये फोटो काढून घेतला.त्या क्षणी प्रत्येकाच्या चेह-यावरुन आनंद ओसंडून वाहत होता.‘सत्ताधीश’ने देखील तो क्षण असा अचूक टिपला.

नाटकाच्या सादरीकरणानंतर ‘सत्ताधीश‘ने नाटकातील कलावंतांसोबत संवाद साधत या नाटकातून त्यांना प्रेक्षकांना नेमके काय सांगायचे आहे?असा प्रश्‍न केला असता,करोना काळात सगळं जग बदललं आणि कला दाखविण्याची पद्धत देखील बदलली पाहीजे असा विचार नाट्यकर्मींनी केला असल्याचे त्यांनी सांगितले.करोना काळात कलावंत काहीही करु शकत नव्हते.या नाटकाचे लेखक मोहित टाकलकर यांचं असं म्हणणं होतं की आज जग मोबाईलमुळे इतकं जवळ आलं आहे, की एक मिनिटाचा रिळ सगळं काही सांगून देतो,मग आपण प्रेक्षकांना कसे सांगू शकतो की तुम्ही फक्त आम्हाला ऐका.आम्ही फक्त आमची गोष्ट तुम्हाला ऐकवू.त्यामुळे आम्हाला ‘आमची’ गोष्ट ऐकवायची होती.हे नाटक बसवायला आम्हाला फक्त १८ दिवसांचा अवधी मिळाला.

मात्र,हे नाटक लिहायला तीन महिन्यांचा अवधी लागला.आमच्यातील दोन मुलांनी कथानक निवडल्या.झूमवर बसून कसं कथानक येईल,कश्‍याप्रकारे ते आमचे कथानक असेल,आम्ही ती कशी सांगणार,आमची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत आमचा संघर्ष दाखविण्याची नाही, तर जी कला आम्ही त्यांना दाखवत आहोत त्या मागील विचारांची ही गोष्ट आहे.करोना काळात ज्या पद्धतीचं आपण जीवन जगलो की मास्क लावा,एकमेकांपासून दूर रहा,त्यावेळी आपण सगळेच ही आशा हरवत चाललो होते की पुन्हा हे सगळ सामन्य होईल का?त्यावेळी फक्त एकमेव ‘आशाच’अशी होती जी माणसाला जगवत होती.ज्या वेळी ही आशा हरलो त्या क्षणी आपण जगणेच हरलो होतो,असे ते म्हणाले.बघा आज आपण मास्क शिवाय रंगमंचावर उभे आहोत,हा दिवस एक दिवस नक्की येईल,या आशेनेच हा दिवस दाखविला.

नागपूरच्या प्रेक्षकांविषयी विचारले असता,नागपूरचे प्रेक्षक खूपच चांगले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.आम्ही तर खूप घाबरलो होतो की नागपूरात आम्हाला कसा प्रतिसाद मिळेल पण प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला,इतकंच नव्हे तर नाट्य क्षेत्रातील अनेक नवे मित्र आमच्यासोबत जुळले.आमच्या उजागर ड्रामोटिक असोसिएशनला आठवणीत ठेवतील की आज काय दाखवले आम्ही.आम्ही आज नागपूरातून नवचैतन्य आणि उर्जा घेऊन जात असल्याचे या कलावंत मंडळींनी सांगितले.

या नाटकाला मेटा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे,हे विशेष.

…………………………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *