उपराजधानीदेश-विदेशराजकारण

सुरक्षेच्या कारणाने मतमोजणीसाठी कळमना बाजार राहणार चार दिवस बंद

नागपूररामटेक मतदार संघाच्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळमना यार्डमध्ये होणार आहे. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी ३० एप्रिलला झालेल्या बैठकीत कळमना मार्केट यार्ड अंतर्गत सर्व बाजारातील व्यवहार २१ मे रोजी सायंकाळी ७ पासून २४ मे रोजी सायंकाळपर्यंत कायदा आणि सुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधित पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले आहे. या दिवशी बाजारात कोणतेही व्यवहार होणार नसल्याची नोंद शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल आणि नागरिकांनी घ्यावी. या दिवशी शेतकऱ्यांनी बाजार समितीत माल विक्रीसाठी आणू नये, असे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये होणार आहे. स्ट्राँग रूमच्या अवतीभोवती कुणीही येऊ नये म्हणून सुरक्षा दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मार्केट यार्डमधील काही बाजारात मालाचे ट्रक आणण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी, अडतिये, व्यापारी आणि ग्राहकांना त्रास होत असून, व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेल्या या बाजाराऐवजी प्रशासनाने मानकापूर येथील इन्डोअर स्टेडियममध्ये मतमोजणी करावी, अशी मागणी व्यापारी आणि अडतियांनी लोकमतशी बोलताना केली.

मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणाने बाजार समितीला पत्र पाठवून चार दिवस बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार बाजार समितीने सर्व बाजाराच्या पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून २१ मेच्या दुपारी ४ वाजेपासून २४ मेपर्यंत बाजार बंद ठेवण्याचे पत्र दिले आहे. तसेच शेतकरी, व्यापारी, अडतिये आणि ग्राहकांना बाजारात येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे बाजारात चार दिवसांत मालाची आवक बंद राहील. त्यामुळे कोट्यवधींचा व्यवसाय होणार नाही.

कळमन्यात सहा मोठ्या बाजारपेठा आहेत. संपूर्ण जिल्ह्यात भाज्यांचा पुरवठा करणारा भाजीबाजार बंद राहिल्यामुळे शहरात भाज्यांचा तुटवडा जाणवणार आहे. तसेच आंब्याच्या सीझनमध्ये बाजारात माल येणार नाही; शिवाय कांदे-बटाटे, लसूण, अद्रक आदींची आवकही होणार नाही. त्यामुळे चार दिवस ग्राहकांना या शेतकी मालापासून वंचित राहावे लागेल. तसेच धान्यबाजारही बंद राहणार असल्यामुळे शेतकरी धान्य आणणार नाही. त्यामुळे दररोज होणाऱ्या मालाचे लिलाव बंद राहतील. तपत्या उन्हामुळे अडतिये आणि व्यापाऱ्यांना बाजारात उपलब्ध फळांचा स्टॉक कमी भावात विकावा लागणार आहे. प्रशासनाच्या निर्णयाचा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसणार आहे.

लोकसभेची मतमोजणी कळमना बाजारात करू नये, याकरिता गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी विविध बाजारपेठांमधील पदाधिकाऱ्यांनी शासनाला पत्र लिहिले होते. मतमोजणी मानकापूर येथील इन्डोअर स्टेडियममध्ये घेण्याची मागणी केली होती. पण शासनाने दुर्लक्ष केले. गेल्या मतमोजणीच्या वेळी बाजार दोन दिवस बंद होता, पण यंदा चार दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसणार आहे.
आनंद डोंगरे, माजी अध्यक्ष,
कळमना फळे बाजार अडतिया असोसिएशन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *