उपराजधानीमहामेट्रोराजकारण

न्यायालयाच्या जनहित याचिकेला महामेट्रोचा ठेंगा!

फ्रीडम पार्क बोगदा प्रकरण न्यायालयात असतानाही महामेट्रोने केली वाहतूक बंद!

नागपूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल आणि मेट्रोची घाई:समाज माध्यमांवर रंगली चर्चा

उद्या तातडीने न्यायालयात जाणार:पर्यावरणवाद्यांचा निर्धार

नागपूर,ता. ६ मे २०२४: ‘फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन’ चौकमार्गे जाणा-या इन्सिटयुट ऑफ सायन्स ते मानस चौकापर्यंत प्रस्तावित बोगद्याची गरजच काय?असा खडा सवाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्याच महिन्यात ५ एप्रिल रोजी केला होता तसेच या प्रकल्पाबाबत स्वत:हून दखल घेत जनहित याचिका दाखल करुन घेतली होती.यावर राज्य शासन,जिल्हाधिकारी,पोलिस आयुक्त(वाहतूक)यांच्यासह इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावत, चार आठवड्यांमध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश ही दिले होते. न्यायालयाला यावर जणू उत्तर देत, महामेट्रोने हा मार्गच भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी बंद केला यावर पर्यावरणवाद्यांनी समाज माध्यमांवर मेट्रोच्या या उद्दामपणाविरोधात टिकेची झोड उठवली.

या प्रकरणावर माजी मानद वन्यजीव रक्षक डॉ.जयदीप दास यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहले होते.त्याआधारे ही जनहित याचिका न्यायालयाने दाखल करुवून घेत ॲड.कुलदीप महल्ले यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली आहे.या प्रकरणावर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्या.नितीन सांबरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली होती.

याचिकेनुसार,इन्सिटीट्यूट ऑफ सायन्स ते मानस चौकापर्यंत सध्या डांबरी रस्ता कार्यान्वित असून,या मार्गावर वाहतुकीत कोणताही गोंधळ होत नाही.प्रश्‍न केवळ फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन चौकाचा असून त्या ठिकाणी सिग्नलद्वारे वाहतूक सुरळीत केली जाते.प्रस्तावित असलेला मार्ग हा पश्‍चिम पूर्व दिशेला आहे.तर,वाहतुकीचा ओघ हा उत्तर-दक्ष्ण मार्गावर(संविधान चौक ते सीताबर्डी)जास्त आढळून येतो.सदोष नियोजनामुळे या पूर्वी बांधण्यात आलेले काही उड्डाणपूल आणि बोगदे आज वादाचे विषय झाले आहेत.

यामध्ये,आरबीआय चौक ते सदर उड्डाणपुलामुळे होणारी वाहतुकीची कोंडी,रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपूल पाडण्याची वेळ,मनीषनगर बोगदा,नरेंद्रनगर बोगदा अश्‍या अनेक उदाहरणाचा समावेश आहे.तसेच,प्रस्तावित भुयारी मार्गामुळे वाहतूक सुरळीत होईल,याची शास्त्रीयदृष्टया कुठलीही माहिती उपलब्ध नाही,असे जयदीप दास यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते.

महत्वाचे म्हणजे कोणीही न मागितलेल्या या भुयारी मार्गासाठी या मार्गावरील सुमारे दोनशे वर्ष जुन्या ११५ वृक्षांची कत्तल देखील करण्यात येणार आहे.त्यामुळेच,नागपूरकरांवर ‘विकासाच्या नावाखाली’आणखी एक ‘सदोष’भुयारी मार्ग केवळ आर्थिक लाभासाठी लादण्यावर शहरातील पर्यावरणवाद्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता.विशेष म्हणजे २३ सप्टेंबर २०२३ रोजी अंबाझरी ओव्हरफ्लोमुळे नागपूरातील अनेक भागात जी त्राही-त्राही माजली होती त्यावेळी याच प्रस्तावित भुयारी मार्गावर देखील अनेक फूट पाणी साचले होते!

परिणामी,हा लो लाईन एरिया असल्यामुळे पावसाच्या संकटाच्या वेळी या भुयारी मार्गामध्ये पाणी भरल्यास नागपूरकरांची जल-समाधी अटल आहे,असा दावा पर्यावरणवादी करतात.शहरातील पारडी पूल असो किवा रिझर्व बँक ते मानकापूराचा उड्डाण पूल, निविदेत यांची आखणी वेगळीच होती.प्रत्यक्षात अपघातप्रवण उड्डण पुले व आरओबींचे निर्माण शहरात झाले आहे.स्वत: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी एका पत्रकार परिषदेत हे कबूल केले की रिझर्व बँके समोरील उड्डाण पुलाची रुपरेषा चुकली कारण आम्हाला अपेक्षीत जागा संपादित करता आली नाही!त्यामुळेच आता ही कोंडी सोडविण्यासाठी भुयारी मार्ग बांधला जाईल.त्यामुळेच,जखम डोक्याला पण मलमपट्टी पायाला,असला प्रकार असून, प्रस्तावित भुयारी मार्गाचा विरोध शहरातील पर्यावरणवादी करतात आहेत.

मूळात पारडी पूल संबंधी अनेक घोळ करण्यात आले असून मूळ निविदेला डावलून कंत्राटदारांनी मनमानेल तसे बदल त्या पुलाच्या बाबतीत केल्याचे कागदपत्रांद्वारे समोर आले आहे.२०१९ पर्यंत हा पूल निर्माण होणार होता मात्र हनुमंंताच्या शेपटीप्रमाणे अद्याप ही पुलाचे निर्माणकार्य सुरुच आहे.आजपर्यंत अनेक अपघात या पुलाच्या चुकीच्या निर्माणकार्यामुळे घडले असून नागपूरातील अनेक कुटूंबियांनी या विकासाची चांगलीच किंमत मोजून दिली आहे.पारडी किवा अमरावती महामार्गावरील पुलाचे बांधकाम अपूर्ण असताना पुन्हा नव्याने शहरातील आणखी एक अतिशय वर्दळीचा रस्ता बंद करुन आणखी एक न मागितलेले ६२.८४ कोटींचे ‘विकास कार्य‘’नागपूरकरांच्या गळी उतरवण्यासाठी, गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून नागपूरात अवतरलेल्या महामेट्राला नक्की काय सुचवायचं आहे?असा सवाल विचारला जात आहे.

४०० मीटरचे भुयारी मार्ग दोन महिन्यात दिवस-रात्र करण्यात येणार असल्याचे महामेट्रो सांगते मात्र,यासाठी न्यायालयाची परवागनी मिळाली आहे का?असा सवाल केला असता, न्यायालयाने काम थांबवण्याचे निर्देश दिले नाहीत,असे महामेट्रो सांगते.भुयारी मार्गासाठी किमान हा लो लाईन भाग  मुळीच योग्य नसल्याचे तज्ज्ञ सांगतात तरी देखील याच मार्गावर भुयारी मार्ग बांधण्याचा महामेट्रोचा अट्टहास का आहे?निदान ४ जून पर्यंत तरी महामेट्रोने वाट पाहावी,या दिवशी लोकसभेचा निकाल लागणार असून,पराभवाच्या भीतीतून तातडीने मेट्रोने काम सुरु केले आहे का?असा सवाल नेटीझन्स करतात.महत्वाचे म्हणजे या भुयारी मार्गावर शहरातील इतर आरओबीप्रमाणेच पावसाळ्याचे पाणी साचणार नाही ,याची ‘गॅरंटी’महामेट्रो नागपूरकरांना देणार का?की फक्त करार-मदार फार ‘आधीच’ करुन झाल्याने कसेही करुन ६३ कोटींचा बोगदा खोदायचाच आणि नागपूरकरांना त्यात बुडवायचे, असा निर्धार महामेट्राेने केला आहे,असा खडा सवाल महामेट्रोला नेटीझन्स करतात.

नुकतेच भूकंपाने नागपूर जिल्हा हादरला.या भूकपांची तीव्रता २.५ रिश्‍टर स्केलवर नोंदवण्यात आली.ही तीव्रता ७ पर्यंत गेल्यास पारडीचा अतिशय कमकुवत पूलच नव्हे तर मेट्रोचे पिलर्स देखील धराशायी होणार असल्याचा दावा शहरातील तज्ज्ञ करतात. पारडी पुलाच्या निर्मितीचा संपूर्ण भूगोल,इतिहास,अर्थशास्त्र,आर्थिक लाभाचे बीजगणित अभ्यासून या पुलाच्या निर्मितीवर टिका करतात!महामेट्रोने आपल्या पिलर्सवर महागडा पेंट, पिलर्सला गेलेले तडे लपवण्यासाठीच लावले असल्याचा आरोप देखील केला जात आहे.मेट्राेचे अनेक पिलर्स हे तर भू-जलामुळे भुसभुसीत झालेल्या जमीनीवर उभारण्यात आले असल्याचा दावा देखील ते करतात.संपूर्ण नागपूर शहरात विनाशात्मक विकासाची गंगा अवतरल्याचा आरोप करीत,करोना काळात गंगेच्या तीरी हजारो प्रेतांचा खच जगाने पाहीला,तीच स्थिती या विकास गंगेमुळे नागपूरकरात उदभवत असल्याची जहाल टिका पर्यावरणवादी करतात.

२५ टक्क्यांच्या टक्केवारीतून आधीच या शहराचे अतोनात नुकसान झाले असून ,पुरे झाला आता ‘विकास’असा संताप व्यक्त केला जात आहे.नागपूरच नव्हे तर देशावर लाखो काेंटींच्या कर्जाचे ओझे लादण्यात आल्याचा अहवाल कॅगनेच दिला असल्याची टिका देखील नेटीझन्स करतात.गर्दी कमी होणार असल्याचे कारण आज जरी महामेट्रो देत असली तरी येणा-या काळात हा भुयारी मार्ग नागपूरकरांसाठी जल-समाधी सारखा धोकादायक ठरणार असल्याचा दावा ते करतात.मनीष नगरच्या तसेच नरेंद्र नगरच्या आरओबीमध्ये तर पावसाळा नसला तरी जलाभिषेकाचे तुषार वाहनचालकांवर होत असल्याची खोचक टिका देखील वाचायला मिळते.कोणत्या सल्लागाराने त्याचे डिझाईन तयार केले होते,कोणत्या कंपनीला त्याचे काम मिळाले,खाबूगिरीतून त्यात वेळोवेळी कितीदा बदल झालेत,याचे पुरेपूर ज्ञान नागपूरकरांना असल्याचेही ते सांगतात.

हजारो काटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेले फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन(२०२१ मध्ये) तसेच इन्सिटीट्यूट ऑफ सायन्सकडे जाणा-या डीपी रोडचे तर १४ ऑक्टोबर २०२३ रोजीच लाखो रुपये खर्च करुन उदघाटन करण्यात आले होते.या डीपी रोडच्या उद् घाटनात देखील सामन्य जनतेचा पैसा खर्च झाला होता. आता पुन्हा एकदा त्या नव्या-को-या करकरीत रस्त्याची तोडफोड करुन ६३ कोटींचा भुयारी मार्ग निर्माण करण्यास महामेट्रो सज्ज झाली आहे.

या शहरात गेल्या दहा वर्षात विकास झाला तो फक्त काही नेत्यांचा,कंत्राटदारांचा,प्रशासकीय अधिका-यांचा ,त्यामुळेच या सर्वांच्या संपत्तीचे गेल्या दहा वर्षांचे ऑडिट प्राप्तीकर विभागाने करावे असे आवाहन केले जात असून, नागपूरकरांवर आणखी या भुयारी मार्गाच्या निर्मितीतून ६३ कोटींचे ओझे व कधीही न भरुन निघणारे पर्यावरणाची हानि या विरोधात उद्या तातडीने न्यायलयात दाद मागणार असल्याचा निर्धार पर्यावरणवाद्यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केला.
…………………….

(तळटीप: ‘सत्ताधीश’लवकरच नव्या स्वरुपात वाचकांसमोर येणार असल्यामुळे ७ मे नंतर एका आठवड्यासाठी वेबसाईट बंद राहणार आहे,याची नोंद वाचकांनी घ्यावी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *