उपराजधानीनागपूर मनपा

अखेर बहीण सापडली शालिनीताई मेघे रुग्णालयात मात्र कुटुंबियांना भेटूच दिले नाही!

मेयोमध्ये बहीणीचा मोबाईल,पैसे गेले चोरीला!

नागपूर,ता. १७ सप्टेंबर: पुनम कनोजिया या ६७ वर्षीय वयोवृद्ध महीला रुग्णाला मेयो प्रशासनाने काल बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी अचानक सायंकाळी रुग्णालयातून हलवले आणि त्यांच्या कुटुंबियांना जवळपास ८ तास त्यांच्या शोध घेण्यास जीवघेणी धावपळ करावी लागली,मात्र मध्यरात्री त्यांना मेयोच्या प्रशासनाकडून शेवटी माहिती मिळाली की त्यांची बहीण ही वानाडोंगरी येथील शालिनीताई मेेघे रुग्णालयात भरती आहे!

विशेष म्हणजे मध्यरात्र झाल्यामुळे कुटुंबियांना तिथे जाणे शक्य झाले नसल्याने आज गुरुवारी ते शालिनीताई मेघे रुग्णालयात पाहोचले असता, पुनम या कोविड वॉर्डात भरती असल्यामुळे कोणालाही त्यांना भेटण्याची परवानगी नसल्याचे तेथील प्रशासनाने सांगितले,दूर्देवाने मेयोमध्ये भरती असताना पुनम यांच्याजवळील कुटुंबियांनी दिलेला मोबाईल फोन आणि नकदी पैसे हे देखील चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती ‘सत्ताधीश‘ला त्यांचे बंधू दिपक कनोजिया यांनी दिली.

हा सर्वस्वी मेयो रुग्णालयाच्या ढिसाळ प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला.आठ तास कुटुंबियांची जी धावपळ झाली त्याला जवाबदार कोण?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. सकाळी १० ते १०.३० दरम्यान मेघे रुग्णालयात रुग्णांसाठी डबा किवा इतर साहित्य दिल्या जाऊ शकतं असे तेथील प्रशासनाने सांगिल्याने उद्या शुक्रवारी दिपक कनोजिया व इतर नातेवाईक हे बहीणीसाठी नवा मोबाईल व घरचा डबा घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बहीणीचा आवाज ऐकायला आतूर-
एवढ्या वयोवृद्ध महिला रुग्णाला अचानक मेयो प्रशासनाने कुटुंबियांना कोणतीही सूचना न देता एवढ्या लांबच्या रुग्णालयात शिफ्ट केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.नवीन ठिकाणी,नव्या वातावरणात त्या कश्‍या आहेत,कोणत्या मनस्थितीत जगत असतील?या विचारांचे काहूर कुटुंबियांच्या मनात माजले आहे.कसेही करुन त्यांना आपल्या बहीणीला डोळ्याने एकदा बघायचे आहे,त्यांचा आवाज ऐकायाचा आहे,त्या सुखरुप व आनंदी असल्याची माहिती मिळाल्यावरच आम्ही सुटकेचा श्‍वास घेऊ असे कनोजिया म्हणाले.

मध्यरात्री रुग्णांना करतात शिफ्ट-
पुनम कनोजिया यांना नातेवाईकांना न कळवता इतर रुग्णालयात शिफ्ट केल्याच्या घटनेनंतर तेथील इतर नातेवाईकांनी देखील एका यू-ट्यूब पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार मेयो प्रशासन चक्क मध्यरात्री २-३ वाजता कोविड वॉर्डातील रुग्णांना कुठेही शिफ्ट करीत असल्याची तक्रार नोंदवली.एका रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार नोंदवत सांगितले की,त्यांच्या वडीलांना मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले मात्र तिथे कोणतीही सुविधाच नसल्याने पुन्हा त्यांना मेयोमध्ये आणण्यात आले परिणामी मेयोमध्ये पुन्हा रुग्णाचा ओपीडी कॉर्ड,संपूर्ण माहिती भरावी लागली,ही रुग्णांची क्रूर थट्टाच असल्याचे ते म्हणाले.याचे कारण ते सांगतात ‘डॉक्टर ही चेंज हो गये!’याच महिन्यात ९ सप्टेंबर रोजी त्यांचा आईचाही मृत्यू कोविडमुळे मेयोमध्ये झाला असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी सांगितली.
सायंकाळी ७ वा.फोन आला तुमचा रुग्ण नॉर्मल आहे,रुग्णानी घरचा डबा ही खालला आहे.रात्री १० वा.कळवले तुमच्या आईचे निधन झाले!मी माझ्या आईला खासगी रुग्णालयात भरती केले असते मात्र तशी संधीच मेयो प्रशासनाने दिली नसल्याचा उद्वेग त्यांनी व्यक्त केला.

प्रशासनाने केली चूक कबूल-
पुनम कनोजिया यांच्या बाबतीत तेथील डॉक्टर पृथ्वीराज राहांगळे यांनी चूक कबूल करीत प्रशासनाकडून चूक झाली असल्याचे मान्य केले.जवळपास त्यांनी वेगवेगळ्या रुग्णालयात फोन ही फिरवले अखेर ज्या एम्ब्यूलेंसनी पुनम यांना घेऊन जाण्यात आले त्या एम्ब्यूलेंसच्या चालकाने माहिती दिली त्याने पुनम यांना वाना डोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात सोडले आहे…..!तेथे वॉर्ड क्र.१३, तिस-या मजल्यावर त्या भरती आहेत ही माहिती मिळाल्यावर कुटुंबियांनी सुटकेचा श्‍वास सोडला. मात्र अद्याप आपल्या बहीणीची अवस्था कशी आहे हे त्यांना नेमके कळले नाही….!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *