उपराजधानीज्योतिष

उर्जेचं विज्ञान सांगणा-या आचार्य पूजा घाडगे

(दिवाळी विशेष)

लहानपणापासूनच पूजा यांना ज्योतिष विज्ञानाची आवड होती.शाळेत असतानाच ‘किरोचं’अंकशास्त्रावरील पुस्तक वाचलं.जन्म तारखेवरुन भविष्याचा अंदाज येऊ लागला.हस्तशास्त्रही बघण्याचा सराव झाला.या शास्त्रांबाबत अधिकाधिक जाणून घेण्याबाबत उत्सुकता वाढतच गेली.

महाविद्यालयीन पदवी मात्र भूगर्भशास्त्रात घेतली.पूजा या भूगर्भशास्त्रात एम.एस.सी पदवीप्राप्त आहेत.दगडांचा हा सखोल अभ्यास पुढे ज्योतिषशास्त्रातही रत्नांची पारख करताना कामी पडला.पूजा या ज्योतिषशास्त्राविषयी भरभरुन बोलतात.उर्जेचं विज्ञान सांगतात.गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर त्यांची अतुट श्रद्धा आहे.

पदव्यूत्तरानंतर त्यांचा विवाह सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य भूपेश घाडगे यांच्यासोबत झाला.सहजीवनाच्या प्रवासात आयुष्याचा जोडीदारही सारख्या आवडीनिवडीचा मिळाला,यालाही भाग्य लागतं,असं त्या सांगतात.

एवढं प्रगाढ ज्ञान आत्मसात करुनही पूजा या अहंभावापलीकडे असतात.देवावर व अध्यात्मावर त्यांची प्रगाढ भक्ती आहे.नर्मदेची त्यांनी अंतर्गत प्रदक्षीणा पूर्ण केली आहे मात्र तरुण वय असल्याने स्त्री म्हणून, संपूर्ण प्रदक्षनेला मर्यादा पडल्या.नर्मदा व भगवान शिव हे त्यांचे आराध्य दैवत आहेत.

शिवलीलामृत त्यांना मुखोद् गत आहे.शिवभक्तीमुळेच त्यांना सर्वाधिक खडतर समजल्या जाणा-या कैलास मानसरोवरचे दर्शन २०१७ साली घडले,असा त्यांचा विश्‍वास आहे.रुद्राष्टक,लिंगाष्टक त्यांना संपूर्ण पाठ आहे.

जिवनातील कोणत्याही समस्येवर भगवान शिव हे एकमेव उत्तर असल्याचे त्या सांगतात.भगवान शिवाने अमृत मंथनातून निघालेले विष स्वत:आपल्या कंठात धारण केले,त्याचा दाह सहन केला,त्यांनी विष कंठात धारण केले नसते तर अमृतही बाहेर पडले नसते.माणसाचे जीवन ही असंच आहे.दू:खाच्या अनंत वेदना सहन केल्यावरच सुखाची झुळूक मनाला सुखावत असते,असे त्या सांगतात.

मानवी मनाचा वेध घेताना त्या सांगतात की,मनुष्याच्या मनात अज्ञात गोष्टीविषयी जाणून घेण्याची इच्छा व आकर्षण असतं.उद्याचा दिवस आपल्यासाठी कोणत्या विशेष संभावना घेऊन येईल,हे जाणून घेण्याची उत्कंठा व उत्सुकता प्रत्येकाच्या अंत:करणात असते.सामान्यपणे आपले भविष्य काय आहे?हे जाणून घेणे एवढे सोपे काम नाही,असे त्या सांगतात.मात्र मनुष्याचे व्यक्तीमत्व हे अनेक विलक्षण संभावनेने संपन्न आहे आणि काही व्यक्तीमध्ये ही अद् भूत क्षमता भविष्य दर्शन करवून देण्याच्या रुपात प्रकट होत असते.

भविष्याला वर्तमानाप्रमाणे बघण्याचे सामर्थ्य या लोकांमध्ये कसे येते?हे सांगणे मात्र कठीण आहे.पण,या भविष्यवक्त्यांच्या अथवा भविष्य कथनाचा पडताळा घेतल्यास एवढं तर नक्कीच कळून येतं की परमेश्‍वराने मनुष्याला अनेक दिव्य संपदांनी समृद्ध करुन पृथ्वीवर पाठवलं आहे.आपण जर आपल्या या दिव्य संभावनांना साकार करु शकलो तर संपूर्ण मानवतेचे भविष्य देवत्वाने परिपूर्ण होऊ शकेल.

भृगूसंहिता ज्योतिष्याचा आद्य ग्रंथ मानला जातो.महर्षी भृगू व त्यांचा पुत्र महर्षी शुक्राचार्य यांच्यामध्ये झालेल्या चर्चेच्या रुपात हा ग्रंथ आहे.यात महर्षी भृगू यांच्या पुत्राने विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे आहेत.अनेक ठिकाणी प्रश्‍नांची उत्तरे देताना महर्षी भृगू आपल्या वक्तव्यात ‘दृशेत’या शब्दाचा उपयोग करतात,यावरुन असं लक्षात येतं,की ते भविष्याचे आकलन आपल्या दिव्य दृष्टिच्या माध्यमाने त्याला प्रत्यक्ष बघूनच करीत होते.

विलक्षण गोष्ट अशी,की भृगू संहितेत त्या सर्व व्यवसायांचा,कार्याचा,पदाचा व विद्येचा उल्लेख केला गेलेला आहे.ज्या संहिता लिहल्या जाण्याच्या काळात विकसितसुद्धा झाल्या नव्हत्या,तेव्हा त्या विषयी ग्रंथात वाचून असं स्वाभाविकपणे वाटतं की असे कसे शक्य झाले असेल?

प्रसिद्ध भविष्यवक्ते नॉस्टाड्रेम्स यांचा जन्म १४ डिसेंबर १५०३ ला रेमी दे प्रोवे नावाच्या छोट्याश्‍या गावात झाला.लहानपणापासूनच त्यांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीवरुन ते प्रसिद्धीस आले.त्यांचे वडील वैद्यकीय क्षेत्रातील ख्यातनाम चिकित्सक होते.त्यांना याच अभ्यासक्रमात प्रवेश दिला गेल्यानंतर त्यांनी मित्रांशी चर्चा करताना संबोधले होते,की हे शिक्षण पूर्ण करु शकणार नाही,येथूनच भविष्यकथनाला सुरवात झाली.असे म्हणतात,की नॉस्ट्राडेम्स ध्यानाच्या चरणावस्थेतील जी दृष्ये पाहात, त्यांनाच ध्यान संपल्यानंतर लगेच लिहून ठेवीत व याचमुळे पुढे प्रोफेसिस (भविष्यवाणी)या नावाने प्रख्यात झाले.

महर्षि पतंजली यांच्या योग सुत्रातील तृतीय अध्यायामध्ये काही विलक्षण विभूतींचा उल्लेख करताना म्हटले आहे-
‘परिणाम त्रयसंयमादतीता नागज्ञानम’
अर्थात संस्कार किवा कर्माच्या परिणामांचा संवाद केल्याने योग्याला भूतकाळ व भविष्यकाळाचा साक्षात्कार होतो.ज्या वक्त्याला आम्ही चमत्कार किवा भविष्यवाणीच्या रुपात जाणतो त्यातील अनेक तर आपल्या चित्ताचा परिष्कार केल्याने होणा-या ज्ञानाचाच परिणाम असतात.महाभारतात ज्या अनुशासन पर्व श्‍लोक १४५ मध्ये महर्षी वेदव्यास म्हणतात
केवलं ग्रह नक्षत्रं न करोती शुभाशुभम’
सर्वमान्यकृतं कर्म लोकवादो ग्रहा इति’
अर्थात फक्त ग्रह किवा नक्षत्रे कुणाचे शुभ-अशुभ करीत नसतात,त्यांच्या स्वत:च्या केलेल्या कर्मांना लोक ग्रहांचे नावे देत असतात.स्वत:चे भविष्य जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता व आवड असू शकते. पण आमचे भविष्य हे आम्ही स्वत: केलेल्या कर्मानेच निर्मित होत असतं.

आमच्या भावना जर शुभ असतील तर आमचे कर्मसुद्धा शुभ होणार आणि जर आमचे कर्म शुभ असतील तर आमचे भविष्यसुद्धा श्रेष्ठच राहील.चांगल्या भविष्याची आकांक्षा ठेवणा-या लोकांना फक्त आपल्या हातून चांगले कर्म घडावेत यावर विश्‍वास असायला हवा कारण कर्मबिजातूनच भविष्याचा वृक्ष जन्म घेत असतो.
‘मनुष्य हा स्वत:च आपल्या भाग्याचा निर्माता आहे’.

(शब्दांकन-डॉ.ममता खांडेकर)
संपादक-‘सत्ताधीश’वेब न्यूज पोर्टल
……………………

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *