अतिथी स्तंभउपराजधानी

सेवाव्रती महानुभाव निर्वतल्या…

(अतिथीस्तंभ)

डॉ. राष्ट्रपाल मेश्राम
[मराठी विभाग प्रमुख,
समाजकार्य महाविद्यालय, कामठी-नागपूर]

अनाथ,गरीब, परित्यक्ता, विधवा, वृद्ध इत्यादी आपंगिताहिनांना हृदयाशी धरून त्यांच्या राखरांगोळी झालेल्या पाषाणमय जीवनात सौंदर्याची लेणी कोरणाऱ्या अखिल महाराष्ट्राची माई, अनाथांची आई, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे काल दुःखद निधन झाल्याची बातमी सकाळी वृत्तपत्रात दिसली. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. दररोज अशा बातम्या येत असतात. क्षणभर वाईट वाटतं; पण आज हृदयातील आटलेले दुःखाचे झरे दाटून आले. कारण आज ज्या गेल्या, त्या कुणी परक्या नव्हत्या, तर पंथीय परिवारातील त्या सिंधुमाई होत्या.

अनाथांचं जीवन मोठं वेदनादायी असतं. दुःखात जगणं आणि दुःखात मरणं हाच त्यांचा जीवनक्रम असतो. या अनाथांकडे कुणी सावध घृणेने तर कुणी हिशेबी दयेने बघतो. अशा हिरोशिमा झालेल्यांच्या जीवनात आनंदाची फळबाग फुलवून सृजनाचे झरे मोकळे करणाऱ्या सिंधुताई म्हणूनच सर्वांसाठी अत्यंत आदरणीय, अनुकरणीय आणि अविस्मरणीय ठरल्या. सिंधुताईंना आपली महाराष्ट्र भूमी अनाथांचीआई (माई) म्हणून ओळखते. वर्धेच्या या सरितेने स्वतः वेदनांचा हलाहल पचवून अनाथांच्या जीवनात अमृताचा सिंधू उभा केला आणि खऱ्या अर्थाने त्या मानवतेची प्रेरणा ठरल्या. निष्ठुर नियतीशी अविश्रांत झुंज देऊन निराश्रितांच्या पुढ्यात त्यांनी वृंदावन फुलविले.

काळोखगर्भ दिशाहीन प्रवासातील बालकांच्या जीवनात देदीप्यमान तार्‍याच्या रूपात दीपस्तंभाप्रमाणे स्थितप्रज्ञ राहिल्या. महाराष्ट्रभूमीसंदर्भात श्रीचक्रधरस्वामींनी “ही बहुरत्ना वसुंधरा” असा उल्लेख केला. या वचनाला सार्थ ठरविण्याचे कार्य सिंधुताईंनी केले.
आठ दिवसांपूर्वी श्री चंद्रशेखरजी गायकवाड, श्री आनंदरावजी गजभिये या महानुभावा़ंसोबत मी वर्धेला गेलो होतो. निमित्त होते आचार्यप्रवर महंत श्रीकारंजेकर बाबाजी यांना भेटण्याचे. बाबांशी भेट झाली. महानुभाव पंथाच्या सद्य:स्थितीविषयी आणि पंथविस्ताराविषयी संवाद घडला. सायंकाळ झाली. बाबा तेथून परतीच्या प्रवासाला निघाले; आम्ही नागपूरचा मार्ग धरला. विशेष वंदन केल्याशिवाय उदक-अन्न घेता येत नव्हते. त्यामुळे गाडी परत मागे वळविली. वर्ध्येत महानुभाव पंथाचे मंदिर शोधू लागलो. रात्र झाली असल्याने रस्ते नीट गवसत नव्हते.

बऱ्याच शोधाशोधीनंतर आम्ही वर्धेबाहेर पिपरी या गावी पोहोचलो. तिथे आम्हाला रस्त्याच्या अगदी कडेला महानुभाव मंदिर दिसले. पूजाअर्चा केली आणि आनंदाचा नि:श्वास टाकला. पिपरी हे सिंधुताईचे जन्मगाव होते. तेथे बाजूलाच असलेल्या महानुभाव साधकाला सिंधुताईंबद्दल विचारपूस केली. त्यांनीही मोठ्या आनंदाने सिंधुताईंबद्दल माहिती दिली. ‘सिंधुताईंनी महानुभाव मंदिर उभे केले.आमच्या गवळी समाजात त्यांचा जन्म झाला. आज जगभर त्यांचा लौकिक आहे.आम्हीही गवळी समुदायाचे,महानुभाव पंथीय… ’ हे सर्व सांगत असताना सिंधुताईबद्दलचा अभिमान त्यांच्या शब्दाशब्दांतून झळकत होता. सिंधुताई ज्या मातीत जन्मल्या त्या मातीचे दर्शन घडले. भटकत का होईना पण आपण एका महान सेवाभावी महानुभावाच्या गावी आल्याचा आनंद झाला होता.

पिपरीवरूनन पुढे वर्धेकडे जात असताना वर्धा शहरात वाटेतच डाव्या हातावर ‘माई निवास’ नावाचे फलक दिसले. त्या फलकावर सिंधुताईंच्या फोटो होता. आम्हाला नवीन विषय गवसला होता. सिंधुताईंवर चर्चा करीत आम्ही रात्री उशिरापर्यंत नागपूर गाठले. आठ दिवसानंतर असं काही आक्रीत घडेल याची अल्पशीही कल्पना आमच्या मनाला शिवली नाही. नागपूर येथील देशपांडे सभागृहात सिंधूताईंचा सत्कार झाला होता. तेव्हा महंत श्री खंदारकरबाबा यांनी आपल्या खिशातील पाचशेची नोट काढून सिंधुताईना दिला परंतु त्यांनी अत्यंत आदरपूर्वक ते पैसे नाकारले.हा किस्सा श्री गायकवाडजी यांनी सांगितला.महानुभाव पंथीय कुटुंबात जन्मलेल्या सिंधुताई पांथासाठी भूषण आहेत. या वंदनीय माईच्या रोमरोमांत स्वामींच्या विचारांची गोदावरी वाहत आहे. पंथातील अशा महान व्यक्तिमत्त्वाचा आपण सत्कार करायला पाहिजे,असा विषय वर्धा ते नागपूर या प्रवासात चर्चिला गेला.

आज सिंधुताई जगाला सोडून गेल्याची बातमी ऐकताच आपल्याच महानुभाव परिवारातील अत्यंत सेवाभावी आदर्श हरवल्याचं दुःख डोळ्यांत तरंगू लागले.त्या अशा अचानक जायला नको होत्या; महानुभावांना एक संधी द्यायला हवी होती हा विचार शुलासारखा मनाला बोचत आहे. कोणीही व्यक्ती जेव्हा कर्तृत्वाची शिखरे गाठतात तेव्हा ती विशिष्ट समुदाय अथवा संप्रदायाची राहत नाही तर देशाची होऊन जाते. ही व्यापकता गाठणाऱ्या व्यक्तीचे फार मोठे समाजऋण असते.

चाकोरीबद्ध जीवन न जगता काहीतरी वेगळं जगावं असं ठरवणारी व्यक्तीला जग वेडसर ठरवतो. परंतु यांसारख्या व्यक्तीच पुढे जगाला प्रेरणा देणाऱ्या ठरतात. सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ सारी वर्धा जिल्ह्यातील पिंपरी(मेघे ) या गावी अत्यंत गरीब महानुभाव गवळी कुटुंबातझाला. जन्मापासूनच गरिबीचे दाहक चटके त्यांच्या वाट्याला आले. शिक्षण शिकण्याची अनिवार इच्छा असूनही घरच्या गरिबीमुळे व वैचारिक मागासलेपणामुळे त्यांना केवळ चौथीपर्यंत शिकता आले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा २६ वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसाशी त्यांचा विवाह लावून देण्यात आला. लग्नानंतर त्या सेलू तालुक्यातील नवरगाव या गावी (सासरी) नांदायला गेल्या. तेथे त्यांचा सासू व नवऱ्याकडून फार छळ झाला. गुरे राखणे, शेण फेकणे जंगलातून मोळ्या आणणे इत्यादी अतिकष्टाची कामे त्यांच्या पाचवीला पूजली होती. पहाटेपासून शेण उचलून जमा करणाऱ्या महिलांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळत नव्हता. गावातील जमीनदार त्याचा फुकट लाभ घेत होता. त्या काळी गुरे वळणे हाच मुख्य व्यवसाय होता. गावातील बायांना पहाटे उठून सर्व गुराढोरांचे शेण गोळा करावे लागत असे. बाया अर्धमेल्या होऊन शेण गोळा करण्याचे काम करत; परंतु त्याबदल्यात कोणताही मोबदला त्यांना मिळत नव्हता.

रस्त्यावर मुरूम टाकणाऱ्यांना मोबदला पण एवढं काम करणाऱ्यांना दमडीही मिळत नव्हती. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची जन्मसिद्ध शक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शेणासाठी पहाटेपासून खपणाऱ्या महिलांना त्यांच्या श्रमाचे दाम मिळावे यासाठी त्यांनी बंड पुकारले. त्यात त्यांचा विजय झाला. या बंडाने गावातील जमीनदाराला शेणापासून मिळणारा नफा बंद झाला त्यामुळे त्यांनी सिंधुताईंची बदनामी केली. नवऱ्याने आणि गावकऱ्यांनी सिंधुताईला गावातून हाकलून दिले. सख्या आईनेही त्यांच्याकडे पाठ फिरविली. पुढे रेल्वे स्टेशनवर दिवसभर भीक मागून मिळालेल्या अन्नाचा काला करून तिथल्या भिकार्‍यांना सोबत घेऊन त्या जेवायच्या. दोन दिवस भिकेचे अन्न न मिळाल्याने त्यांच्यासोबत एकत्र बसून जेवणारे भिकारी त्यांच्यापासून दुरावले.

पुढे त्यांनी स्मशान गाठलं आणि तिथे जळणाऱ्या चितेवर भाकरी भाजून भूक भागविली.तेथून पुढे त्या चिखलदऱ्याला गेल्या. तिथेही त्यांना काम न मिळाल्याने कोरभर भाकरीसाठी त्या मातीगोट्याची कामे करणाऱ्या मजुरांची मुले सांभाळण्याचे काम करू लागल्या. दिपक गायकवाड नावाचा एक अनाथ मुलगा तिथे त्यांना सापडला. त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांना गहिवर आला. पुढे महिन्याभरात दोन-तीन अनाथ मुले सापडली.त्या सर्वांना सिंधुताईनी मायेची ऊब दिली.अनाथ मुलांना सांभाळण्याचं पण त्यांनी केला.अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या गावात त्यांनी ‘ममता बाल सदन ही’ सेवाभावी संस्था सुरू केली. अनाथ व बेवारस मुलांना आधार देऊन त्यांचे संगोपन करणे, त्यांना शिक्षण देणे, भोजन, कपडे, आहार पुरविणे; एवढेच नव्हे तर शिक्षणानंतर त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करून ते उपवर झाल्यावर त्यांचा योग्य जोडीदाराशी विवाह लावून देण्याचे कार्य त्या करू लागल्या.

त्यांच्या या कार्याने त्यांना केवळ राज्यपातळीवरच नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावरसुद्धा आमंत्रित करण्यात आले. स्वतःच्या कार्याला पुढे नेण्यासाठी अनेकांनी त्यांना मदतीचा हात दिला. मुळात त्या अत्यंत प्रतिभासंपन्न कवयित्री आणि प्रभावी वेधवंती वक्त्या होत्या. त्यांचे शब्द म्हणजे साहित्यसोनियाच्या खाणीतून टपकणारे हिरेजडित ध्वनी होते. नऊवारी लुगडे घालून जवळपास बावीस देशांत त्यांनी प्रवास केला. त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाची दखल घेऊन २०२१ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा नागरी पुरस्कार बहाल केला. २०१२ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवित केले होते. सुमारे साडेसातशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले.

महानुभाव कुटुंबात जन्मालेल्या सिंधुताईवर पंथाचे संस्कार होते. सिंधुताईच्या वाट्याला खडतर जीवन आल्यावर महानुभाव साधकांचा व त्यांच्या मावशीचा सिंधुताईना आधार लाभला.सिंधुताईची मुलगी ममता व सिंधुताईला फैजपूर येथील बाबांनी काही काळ सांभाळल्याचा उल्लेख आढळतो. सिंधुताईच्या जीवनावर स्वामींच्या विचारांचा फार प्रभाव होता. त्यामुळेच त्या अत्यंत दुःख वाट्याला येऊनही आपल्या भूमिकेपासून ढळल्या नाही. त्या स्वामींच्या कुळातील खऱ्या ‘अच्युतगोत्रीय’ होत्या. स्वामींच्या शब्दसूत्रांनी त्यांच्या जीवनाला नवसंजीवनी दिली. त्या जीवनभर महानुभाव पंथाच्या निष्ठावान उपासक राहिल्या. स्वामींनी दीनदुबळ्यांसाठी बाराव्या शतकामध्ये धर्माच्या माध्यमातून समाजकार्याची सुरुवात केली आणि या विस-एकविसाव्या शतकात माईंनी स्वामींचे हेच सारसूत्र हाती घेऊन दीनदुबळ्यांच्या कल्याणार्थ आपला देह झिजविला. खरा साधू , खरा संत कोण ? प्रत्येक काळात असा प्रश्न निर्माण झाला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात,
“जे का रंजले गांजले
त्यासी म्हणी जो अपुले
तोची साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा”

सिंधुताई ह्या खऱ्या अर्थाने संत आहेत.त्यांच्या कृतीत ईश्वरी प्रचिती आहे. त्या आयुष्यभर वैरागी जीवन जागल्या. अनाथांवर मायेची सावली पांघरली. त्यांना शिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. स्वावलंबी व निर्भय बनविले.त्यांचे लग्न लावून दिले. नवी संस्कारी पिढी त्यांनी समाजाला व देशाला दिली. त्यांच्या या महान कार्याला तोड नाही. त्यांच्या कृतिशीलतेपुढे शब्दबंबाळ पंडित्य फार खुजे भासू लागते. दीनांच्या हृदयात दुर्दम्य आत्मविश्‍वास निर्माण करणाऱ्या, आत्मनिर्भरतेचा पाठ देणाऱ्या त्या साक्षात ज ग त् गु रू आहेत. आपल्या प्रत्येक कृतीतून समाजाला माणुसकीच्या महावाक्याचे दान देणाऱ्या या मायमाऊलीला कोटी कोटी दंडवत करून भावपूर्ण आसवांजली अर्पित करतो.

(मोबाईल क्रं- ९८६००४९६३८)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *