अतिथी स्तंभउपराजधानीमनोरंजन

‘गोदावरी’ चित्रपट आणि फसलेली क्रांति

(अतिथीस्तंभ)

प्रज्जवला तट्टे
(चित्रपट समीक्षक)

उच्चवर्णीय पारंपारिक अस्मिता कुरवाळत लोढणं बनलेल्या जुन्या वास्तूंपासून भावनिक मुक्ती मिळवून देऊ पाहणारा चित्रपट: गोदावरी

मध्यंतरी केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांनी त्यांच्या नागपुरातल्या ज्या महाल भागात गडकरीवाडा आहे तिथे जायला चांगले रुंद रस्ते मी बनवू शकलो नाही अशी खंत व्यक्त केली होती. अशा चकाचक विकास कामांमध्ये अडथडा त्याभागातल्या भोसलेकालीन ऐतिहासिक वास्तू, देवळं वगैरे असू शकतात. त्यांचे पारंपरिक मालक पैशांची गरज नाही म्हणून (अनिवासी भारतीय झाल्यामुळे) किंवा त्या वास्तु भाड्याने देऊन त्यावर गुजराण चालते आहे म्हणून त्या ज्या जागेवर आहेत ती जागा विकासकांना द्यायला तयार् नसतील तर गडकरींनी त्यांना निखिल महाजन, जितेंद्र जोशी यांचा ‘गोदावरी’ सिनेमा दाखवावा. त्याचं काम होऊ शकेल..!

यातला angry young man आहे जितेंद्र जोशी! त्यानेच विद्रोही ‘तुकाराम’ लिहिला, साकारला होता. त्याने परंपरेला शरण गेलेला निशिकांत ‘गोदावरी’त साकारला याचे वाईट वाटले. परंपरेचा अर्थही आज्यापासून, बापाकडे, मुलाकडे, नातीकडे असा लावून त्याचे नदीच्या प्रवाहाशी असलेले साधर्म्य अधोरेखीत केले ते मर्यादित अर्थाने. नदीवर आणि देशमुख वंशवेलीवर असलेले परंपरेचे ओझे निशिकांतला सहन होते नसते, त्याचा त्रागा त्रागा होतो. देशमुखांच्या काहीशे वर्षे जुन्या जीर्ण वास्तुतल्या भाड्याने दिलेल्या दुकानांचे भाडे दरमहा जमा करण्यात आपले आयुष्य करपले, ऐन उमेदीत आपल्याला विमानात बसून झू S S निघून जाता आले नाही, ओळखीच्यातल्या गौतमीशी ठरवून लग्न करावे लागले याची त्याला फार फार खंत वाटत असते.

म्हणून गोष्ट मध्यावर आल्यावर प्रेक्षकाला वाटायला लागते की आता निशिकांत नदीच्या सफाईचं काम हाती घेईल, तिला दूषित करणाऱ्या धार्मिक विधींना रोखण्यासाठी परंपरांचा पर्यावरणस्नेही अर्थ सांगेल, तसे पर्याय देईल. त्यात अवतीभवती वाढलेल्या अनियोजित, अनिर्बंध वासाहतींचे गटारपाणी सोडणाऱ्या शहरीकरणावर काही व्यवस्तीत उपाय सांगेल, फक्त सांगणारच नाही तर तसे करून दाखवेल… तुकडोजी महाराजांनी नाही का अस्थी विसर्जनासाठी आपापल्या गावातच कसे कुंड करावेत ते सांगितलं होतं, अंत्यसंस्काराच्या धार्मिक विधी गावातच करणारे स्थानिक जाणते तयार केले होते. अनेक हिंदू शेतकरी मृत्युनंतर शेताच्या धुऱ्यावर पुरावण्याची अंतिम इच्छा व्यक्त करतात, ते तिथल्या मातीशी एकरूप व्हायला. तितकं नाही पण मधला काही मार्ग काढून सर्वच नद्यांना निर्मल ठेवण्यासाठी या परंपरेची आठवण करून देणारे काही तरी निशिकांत करेल अशी आशा चित्रपटाच्या मध्यपर्यंत वाटत राहते. निशिकांत आता त्याचं जाणवं काढून फेकणार असं एकदा वाटतंही…

पण. हाय रे डेव्हलपरा! देशमुखांच्या जागेवर भव्य फ्लॅट स्कीमचे गटार शेवटी गोदावरीत जाणार का आणखी कुठे त्याचे उत्तर न देताच चित्रपट संपतो इतकंच नाही तर गोदावरीला प्रदूषित करणाऱ्या धार्मिक परंपरांना निशिकांत शरण जातो! मनापासून स्वीकारतो. मृत्युचे वास्तव समोर दिसण्याचे निमित्त की गळ्यातलं लोढण विकासकाला देऊ की नको या दोलायमान स्थितीतून बाहेर पडायला त्याला मदत होते. मग त्याच्या निर्णयाचं समर्थन करायला आपल्या आजापणज्याने ही दुसऱ्या कुणाच्या तरी मालकीची जागा लबाडीने बाळकावली हे गुपित उघड होते. त्याचा मित्र त्याला सांगतो की तो कसा चार वर्षांचा अनाथ होता तेव्हापासून या पिंडदानाच्या विधीतल्या भातावर जगत मोठा झालाय….. अन् या डेव्हलपर जमातीमुळे एक निशिकांत समाजिक क्रांती करण्याचा राहून जातो..

उच्चवर्णीय-मध्यमवर्गीय, गाव सोडून इतरत्र् स्थायिक झालेल्या प्रेक्षकांच्या भावना गोंजारत त्यांची भावनिक नाळ ज्या मध्ययुगीन, घोडे जाऊ शकतील इतपतच रुंद गल्लीबोळातल्या मंदिर किंवा परंपारीक घराशी जुळली आहे त्यांना त्या पासून मुक्ती देण्यासाठी हा सिनेमा बनवलाय की काय असे वाटते. यांच्यापैकीची जी पिढी आता अमेरिकेत स्थायिक आहे तिला मोक्ष मिळण्यात ही भावनिक नाळ एक मोठाच अडथळा ठरत असावी. मोठे सहनिवास आणि तिथपर्यंत मार्सिडिजने जाण्यासाठी रुंद रस्ता तयार करणाऱ्या रोडकरी विकासकांच्या हाती आपापल्या आज्या-पणज्यांच्या प्रॉपर्ट्या सोपवण्यासाठी मानसिक – भावनिक रूपाने तयारी हा सिनेमा बघून होते. कारण अमेरिकेत राहूनही उच्चवर्ण हिंदू अस्मितेचा अभिमान तर बाळगता यायला हवा पण तिसऱ्या जगातल्या कुण्या एका मागास गावातल्या गचाळ गल्लीतल्या जागेचे ओझेही नको. धार्मिक अस्मितेला फुगवणाऱ्या प्रथांची सोबत हवी पण त्याच्या एका जमिनीच्या तुकड्याला बांधून ठेवणारा नांगर नको. त्यापेक्षा त्या जागेच्या बदल्यात अधिक भांडवल मिळत असल्यास ते घेऊन पसार होता येत असेल तर काय वाईट? .. हा सिनेमा बघून या भावनिक घालमेलीतून सुटका होऊन अनिवासी भारतीयाच्या पिंडाला मिसिसिप्पी काठी अमेरिकन कावळा शिवून मोक्षाची मानसिक हमी मिळेल.

नागपूरच्या ६व्या ऑरेंज सिटी फिल्म फेस्टिवल (12 ,13 मार्च) मध्ये ‘गोदावरी’ बघता आला. या सिनेमाला भारतातल्या २०२१ च्या ५२व्या अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल (IFFI) मध्ये अभिनेता पुरस्कार मिळाला होता जो न्याय देणारा वाटतो. स्पेशल जयुरी अवॉर्ड निखिल महाजन यांना मिळाला तो स्पर्धेतल्या इतर सिनेमांपेक्षा हा बरा असावा म्हणून. गाणी, संगीत, सिनेमाटोग्राफीचे तंत्र खिळवून ठेवते यात शंका नाही. पण कथावस्तू फसली असे नमूद करावेसे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *