उपराजधानीराजकारण

पंधरा लाखांचं काम,गडकरी म्हणतात थांब!

डागा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीचे ‘दुखणे’ राजकीय आयसीयूत दाखल

वाहतूकीचा कोंडमारा:व्यापारी वर्गाची तीव्र नाराजी

नागपूर,ता.१० जुलै २०२२: शहरातील सुप्रसिद्ध शासकीय रुग्णालय असणा-या डागा रुग्णालयाची संरक्षक भिंत ही जीर्ण झाल्यामुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जमीनदोस्त करण्यात आली होती.या भिंतीच्या पुर्नउभारणीसाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर ही करण्यात आला,निविदा ही निघाल्या,कंत्राटदाराला काम ही देण्यात आले मात्र सरकारी कामात ‘गंगेत घोडे कुठे न्हाले’हे सामान्य जनतेला ही कळत नसल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी वाहतूकीची प्रचंड कोंडी होत असून,दररोजचा मनस्ताप सहन होत नसल्याने येथील व्यापारी वर्ग हा चांगलाच संतप्त झाला आहे.

विशेष म्हणजे,या मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार विकास कुंभारे यांनीच हे अति निकडीचे काम रोखून धरल्याचे वास्तव समोर आले आहे.यासाठी त्यांनी या मार्गावरील, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी संकल्पीत केलेल्या उड्डाण पूलाचे निर्माण होणार असल्याने, संरक्षक भिंतीचे काम थांबले(रोखून धरले)असल्याची कारणमीमांसा सांगितली असल्याचे येथील व्यापारी वर्गाने खास ‘सत्ताधीश’ला सांगितले.

फक्त ‘पंधरा लाखांचे काम मात्र गडकरी म्हणतात थांब’अशी प्रचिती येथील नागरिकांना आली असून,ही भिंत तोडल्यानंतर तात्पुरती जाड पांढरे कापड या ठिकाणी बांधण्यात आले असून, ते देखील मुख्य रस्त्यांच्या मधोमधपर्यंत बांधण्यात आलेले असल्याने ,दररोज वाहतूकीची प्रचंड कोंडी या रस्त्याने जाणे-येणे करणा-या वाहनधारकांच्या नशीबी आली आहे.

वारंवार पाठपुरावा करुनही या सरंक्षक भिंतीचे काम, पंधरा लाखांचा निधी मंजूर झाल्यावरही, आमदार विकास कुंभारे यांानी रोखून ठेवल्याने वेगवेगळ्या चर्चेलाही चांगलेच उधाण आले आहे.‘जनसेवेचे’ब्रिद मिरविणा-या ‘जनसेवकांना’खरोखरच जनतेच्या सेवेची,त्यांच्या प्रश्‍नांची,त्यांच्या समस्यांच्या सोडवूणकीसाठी, किती पराकोटीची काळजी असते हे या एका उदाहरणावरुन दिसून पडतं.

जनतेच्या सोयी सुुविधांसाठीची, अनेक प्रकल्पे शहरात मंजूर होत असतात मात्र राजकीय नेत्यांच्या ‘दूरदृष्टि’मुळे ती कश्‍याप्रकारे रेंगाळतात,याची प्रचिती या शहराचा नागरिक आपल्या आमदार,खासदारांच्या साक्षीने घेतच असतो, मात्र पंधरा लाखांचा निधी मंजूर झाल्यावर व कामाचे कंत्राट ‘बी ॲण्ड सी’कंपनीला देण्यात आल्यावरही, प्रस्तावित उड्डाण पूलासाठी ते रोखून धरण्याची किमया भाजपचे आमदारच करु शकतात.

या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांचे दररोज मरण होत आहे,महागडे,आटोक्या बाहेर गेलेले पेट्रोल व वेळ वाया तर जातोच मात्र मनस्ताप व संताप व्यक्त करण्या व्यतिरिक्त त्यांच्या हातात काहीही नसतं.गर्दीतून वाट काढत,रस्त्याच्या मधोमधपर्यंत बांधण्यात आलेल्या त्या कापडी कंपाऊंडकडे कटाक्ष टाकत,किडलेल्या,सडलेल्या व्यवस्थेला दोष देत,भुनभुनत निघण्या पलीकडे या मायबाप मतदारांच्या हातात सध्या तरी काहीही नाही आहे.

आजच्या धो-धो पावसामुळे ही वाट आणखी कठीण,आणखी निसरडी झाली होती.नागरी सुविधेचे जे काम महिनाभरात होऊन जायला हवे होते,त्या लहानश्‍या कामाला भाजपच्या आमदारांनी महिनो ना महिने रोखून धरले असल्याचे येथील व्यावारी वर्ग सांगतोय.

कोट्यावधींचे विकास प्रकल्प राबविणारे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव पुढे करुन,त्यांच्या मुळे डागा रुग्णालयाची संरक्षक भिंत बांधली जात नसल्याची आमदारांची सबब, म्हणजे शहरातील नागरिकांचा अंत बघणारीच आहे.

तात्पुरती भिंत बांधण्याची मिळाली परवानगी-
येथील व्यापा-यांचा रेटा जास्तच वाढल्यामुळे आमदार विकास कुंभारे यांनी कंत्राटदारासोबत, गडकरी यांची भेट घेतल्याचे कंत्राटदार बेहारखेडे यांनी खास ‘सत्ताधीश’ला सांगितले.पुढे-मागे जसवंत चौकापासून भांडेप्लॉटपर्यंत उड्डाण पूल बांधला जाणार असल्याने ‘टेंपररी’विटांची भिंत बांधण्याची परवानगी गडकरी यांनी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.

मात्र तरीही प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो,शंभर-दीडशे फूटांची आणि ६ मीटरची भिंत बांधायला, पंधरा लाखांचा निधी लागतो का?उर्वरित पैशांचा हिशेब कोण देणार आणि कोण घेणार?डागा रुग्णालयाचे अधिष्ठाता की मतदार?ऐन लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी म्हणजे २०२४ मध्ये या मार्गावरील उड्डाणपुलाचेही थाटात भूमिपूजन होईल,व्यापारी वर्गाचे प्रश्‍न सुटतील,वाहतूकीची कोंडी फूटेल,नागपूरकर नागरिक अगदी सुखद आवागमन ’करतील,सगळं ‘फिल गुड’असलं तरी फक्त विटांची बांधली जाणारी तकलादू भिंत ही, दाेन वर्ष तरी डागा रुग्णालयाचे तसेच वाहनधारकांचे सरंक्षण करु शकेल का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *