उपराजधानीमहाराष्ट्रराजकारण

घटनेचे रक्षण मीच करणार हे छातीठोकपणे सांगा:उद्धव ठाकरे

नागपूरातील वज्रमूठ सभेत संघ, भाजपा मोदींवरवर निशाणा

उलट्या पायाचं सरकार म्हूणन वारंवार गारपिट

शिंदे हे रामभक्त असते तर आधी सूरत नाही अयोध्येत गेले असते

फडणवीस मुख्यमंत्री असताना कधीही अयोध्येत गेले नाही

तुझा शर्ट माझ्या शर्टपेक्षा भगवा कसा?रामभक्तीची चालली स्पर्धा!

राज्यातला शेतकरी मेटाकुटीला मुख्यमंत्री देवदर्शनाला

मुख्यमंत्री काळात घरात बसून कारभार केला तरी देशातील पहील्या पाच मुख्यमंत्र्याच्या यादीत क्रमांक

राज्यात शिंदे-फडणवीस तर देशात मोदींनी आठ महिने व आठ वर्षांच्या कारभाराचा जनतेला हिशेब द्यावा

शिवसैनिक नव्हते तर बाबरी पाडताना चंद्रकांत पाटील व त्यांचे काका घटनास्थळी उपस्थित होते का?

सरसंघचालक मोहन भागवतांना चंद्रकांत पाटील व भाजपचे विचार पटतात आहेत का?

मैदानात या,मैदान मिळू नये म्हणून काड्या का करता?

त्यांचं हिंदूत्व गोमूत्रधारी

रोशनी शिंदे प्रकरणी गृहमंत्र्यांना फडतूस नाही म्हणणार तर दूसरा शब्द आहे का?

राहूल गांधी बोलले तर अपात्र केले सत्यपाल मलिक तर तुमचेच मग त्यांच्या शब्दांना तरी किंमत देणार का?

भाजपने कारगिल युद्धाच्या वीर सैनिकांच्या छायाचित्रांचेही केले सभेसाठी राजकारण!

देशातील सगळीच राज्य भाजपमय करायची:दिसली हंडी की फोडा:लोकशाही आहे की दहीहंडी?

आनंदाच्या शिध्याला बुरशी लागली

नागपूर,ता.१६ एप्रिल २०२३: नागपूरातील बहूप्रतिक्ष्त अश्‍या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार?याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना प्रचंड गर्दीच्या महासागरासमोर त्यांनी भाजप,संघ व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलेच तोंडसुख घेतले.लोकशाही असणा-या देशात ज्याप्रकारे मोदी यांच्या कार्यकाळात संविधानाला तिलांजली दिली आहे ते बघता ‘संविधान बचाव’सारखा पुळचट नारा देण्या ऐवजी ’मीच घटनेचे रक्षण करणार’असा प्रण करा,असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

याप्रसंगी मंचावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,जयंत पाटील,माजी गृहमंत्री अनिल देशमुख,सुनील केदार,संजय राऊत,आदित्य ठाकरे,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,आमदार विकास ठाकरे,वडेट्टीवार,जितेंद्र आव्हाड,नितीन देशमुख,काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे दुनेश्‍वर पेठे आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,की महाविकासआघाडीच्या वज्रमुठीची ही दुसरी सभा आहे.महाराष्ट्राच्या उपराजधानीत आल्यानंतर मला जुने दिवस आठवले जेव्हा शिवेसना ही काँग्रेस व राष्ट्रवादी विरुद्ध लढत असताना येथील कस्तुरचंद पार्कमध्ये सभा झाली होती,तेव्हा तत्कालीन सरकारला आम्ही राज्यातील शेतक-यांना कर्जमुक्त करण्याची जोरदार मागणी केली होती,राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर नागपूरातील पहील्याच अधिवेशनात आमच्या सरकारने शेतक-यांच्या कर्ज माफीची फक्त घोषणा केली नाही तर ‘करुन दाखवलं’अश्‍या शब्दात त्यांनी शिंदे-भाजप सरकारला टोला हाणला.

(छायाचित्र:वज्रमूठ सभेला उपस्थित गर्दी)

आज अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याचा अपार आनंद झाला मात्र हा सन्मान कोणाच्या हस्ते झाला?देशभर गल्ली बोळ्यामध्ये घराणेशाहीबाबत बोलत फिरतात त्यांना एका समाजसुधारकांच्या घराणया समोर झुकावं लागलं.कोणतीही सत्ता नाही,अधिकार नाही मात्र समोर कुणी जरी असला तरी सच्च्या समाजसुधारकासमोर झुकावंच लागतं,असं घडू शकतं हे महाराष्ट्राने संपूर्ण देशाला दाखवून दिलं. अप्पा साहेबांचं घराणं मोठं आहे .घराण्याची एक परंपरा आहे.त्या परंपरेमध्ये महत्वाचं एक काम ते जे करतात ते म्हणजे व्यसनमुक्ती.व्यसन हे वाईटच असतं.व्यसन हे दारुचं असतं,व्यसन हे नशेचं असतं आणि तसंच व्यसन आणि तशीच नशा ही सत्तेची सुद्धा असते.दारुची नशा ही एक घर उधवस्त करतं मात्र सत्तेची नशा ही देश उधवस्त करीत असते, हे आपण पाहत आहोत,आपण भोगत आहोत.त्यामुळेच खरंच हा प्रश्‍न उपस्थित राहतो आपल्या देशात लोकशाही आहे का?एवढी मोठी जनता या सभेसाठी जमली आहे,महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेत जमत असते,याचा अर्थ ही एवढी लोकं जमली म्हणजे आपल्या देशात लोकशाही आहे असे आपण मानतो,मात्र आज जर विचार केला तर आपल्या देशात लोकशाहीचा उपयोग फक्त जे सत्तेवरती बसले आहेत त्यांच्या मित्रांना गि-हाईक बनवण्यासाठी म्हणजे आपल्या पक्षाचा मतदार बनविण्यासाठीच होतो आहे,हा तरी कधी विचार केला का?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

यांचा मित्रांचा क्रम जगामध्ये श्रीमंतीच्या श्रेणीमध्ये वाढतच चालला असल्याची टिका ही उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी यांचे नाव न घेता याप्रसंगी केली.सत्ताधा-यांच्या मित्रांचे क्रमांक श्रीमंतीमध्ये वाढत वाढत चालला आहे आणि माझ्या देशातील गोर गरीबांच्या बाबतीतला क्रमांक हा खाली-खाली होत चालला असल्याचे ते म्हणाले.

नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली.नागपूर ही तीच भूमी आहे ज्या भूमीत बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला.ही क्रांतीकारकांची भूमी आहे.दीक्षाभूमी याच भूमीत आहे.ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना लिहली,संविधान दिलं,आज या मंचावर उगाच जागा राहीली म्हणून भारतमातेचं चित्र व संविधानाची प्रत ठेवली नसून हे काही डेकोरेशनचा भाग नसल्याचे त्यांनी सांगितले.भारत मातेच्या पायात आज पुन्हा बेड्या घालण्याचे काम केल्या जात आहे.फक्त एक माणूस देश कसा चालला पाहिजे,लोकशाही कशी नांदली पाहिजे हे संविधानाच्या माध्यमातून लिहून ठेवले,एक माणूस संविधान लिहू शकतो मग एवढी मोठी जनता त्या संविधानाचे रक्षण करु शकत नाही का?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

‘घटना बचाव’हा पुळचट शब्द आहे,‘घटनेचे रक्षण मीच करणार’हे छातीठोकपणे सांगून पुढे जाण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.
आठ-दहा दिवसांपूर्वी मी ‘फडतूस’शब्द वापरला.त्या शब्दा मागे एक उद्देश्‍य होता,संताप होता.आमच्या काळात जागतिक स्तरावरचं करोना महामारीचं संकट कोसळलं मात्र हे उलट्या पायाचं सरकार जेव्हापासून राज्यात आलं तेव्हापासून दर दोनचार दिवसात गारपिट होते,असा टोमणा त्यांनी हाणला.

आघाडीची ही दुसरी सभा आहे.भाजपनं फसवलं म्हणून आम्ही एकत्रित आलो.आम्ही आघाडी म्हणून काम करुन दाखवलं मग सभा घेत आहोत.नालायक असतो तर एवढ्या मोठ्या संख्येने लाेक जमले असते का?आमचं सरकार गद्दारी करुन पाडलं.महाराष्ट्राची ही परंपरा नाही.पाठीवर वार करुन ही अवकाळी सरकार आली.आमदार नितीन देशमुख यांनी पाणी यात्रा काढली.शेतक-यांचे नुकसान लाखो रुपयांमध्ये होत असताना त्यांना पीक विमा किती मिळणार?असा प्रश्‍न त्यांनी केला.बेलोरा गावाचे मनोहर डांगे या शेतक-याचे नुकसान चार लाख रुपये झाले असताना नुकसान भरपाई किती मिळणार?

एकीकडे राज्यातील शेतकरी सततच्या गारपिटीमुळे अडचणीत आला असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येत गेले.मी पण अयोध्येत गेलो होतो त्यावेळी काँग्रेसचे सुनील केदारही सोबत होते.ती वेळ वेगळी होती.मी जेव्हा पहील्यांदा अयोध्येत गेलो तेव्हा राम मंदिराचा मुद्दा हा न्यायालयात होता.थंड बस्त्यात होता.सुरवात शिवसेनेने केली.‘पहीले मंदिर फिर सरकार’हा आमचा नारा होता.भाजपने मात्र ’आधी सरकार फिर राम मंदिर’ची नीती अवलंबली.मोदी यांच्याकडे आम्ही राम मंदिराचा मुद्दा काढला होता की तुमचं सरकार आहे एक कायदा करा आणि राम मंदिर बनवा,आम्ही तुमच्यासोबत आहोत मात्र त्यांनी या मुद्दावर आता काही बोलू नका,जे व्हायचे ते होऊ दे असे त्यांनी सांगितले.नंतर कोर्टाने राम मंदिरावर निकाल दिला,या निकालानंतर आता तेच ‘टिकोजीराव’दावा करीत आहे,आता कोणीही राम मंदिरात जाऊ शकतो,कोट्यावधी लोकं आता राम मंदिरात जाणार आहेत,प्रत्येक वेळी प्रचार वाहिन्यांचे प्रतिनिधी तिथे जाणार आहेत?अशी जहाल टिका करीत हे जर रामभक्त असते तर पहीले सुरतला गेले नसते तर पहीले अयोध्येला गेले असते,अशी जहाल टिका याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी केली.यांच्या धमण्यांमध्ये जर हिंदुत्वाचं रक्त असतं तर पहीले गुहावटीला गेले नसते अयोध्येला गेले असते.

फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा कधीही अयोध्येत गेले नाहीत.आता एकनाथ शिंदे अयोध्येत पोहोचताच ते ही पोहोचले.’तुझा शर्ट माझ्या शर्टपेक्षा भगवा कसा?एकीकडे राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री देवदर्शनला जात आहेत.भगवान श्री राम हे प्रजेची काळजी घेत होते ते रामराज्य कधी येणार?टिका झाल्यानंतर मुख्यमंत्री शेतक-यांच्या बांध्यांवर गेले व आदेश काय दिले?तर ताबडतोब पंचनामे करा!

आमच्या सरकारने शेतक-यांच्या हातात थेटपणे मदत पोहोचवली होती.आता शेतकरी म्हणतोय,पंचनामे कशाला करताय सरळ मयतीलाच या!माझ्यावर टिका होते मी घरात बसून राज्याचा कारभार करीत होतो.असे असले तरी देशातील पाच चांगल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझे नाव होते,जनतेला काय हवं?नुसत्या भूलथापा?ते महागाई,बेरोजगारीवर बोलत नाही.नागपूरात,महाराष्ट्रात येऊ शकणारे उद्योग देखील गुजरातमध्ये पळविण्यात आले.आठ महिन्यात राज्यातील सरकारने तसेच आठ वर्षात मोदी यांनी देशासाठी काय केले याचा हिशेब जनतेला द्यावा.ते जनतेत येऊन काहीही सांगत नाही.ते तर वडील ही चोरतात.

चंद्रकांत पाटील यांनी तर बाबरी पाडण्यात शिवसैनिक नसल्याचा दावा केला मग कोण होतं तिथं?पाटील आणि त्यांचे काका होते का?सरसंघचालक मोहन भागवतांना तरी भाजपचे हे विचार पटतात का?बाळासाहेबांनी फोन करुन ’जर बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे’असे म्हणाले होते,ते शिवसेना प्रमुखांचाच अपमान करतात?त्यांना आमचे आव्हान आहे मर्द असाल तर मैदानात या,तुम्ही तर मैदान मिळू नये म्हणून काड्या करता!संघभूमीत संघालाच विचारतो,तुमचं आणि भाजपचं चाललंय काय?
त्यामुळेच आम्ही त्यांच्या हिंदूत्वाला ‘गोमूत्रधारी’म्हणतो.छत्रपती संभाजी नगरातील सभेत काही मुस्लिमही आल्यामुळे सभेनंतर त्यांनी सभास्थळी गोमूत्र शिंपडले!ती माणसे नाहीत का?अनेक जाती,धर्माची माणसे त्या सभेला आली होती,या ही सभेत आले असतील म्हणून येथे ही गोमूत्र शिंपडणार का?

एकीकडे मोहन भागवत मजिदीमध्ये जातात.मोदी हे मदरसासाठी ‘मन की बात’उर्दूमध्ये सांगतात आणि आमच्या हिंदूत्वावर ते टिका करतात,अशी टिका याप्रसंगी उद्धव ठाकरेंनी केली.

२०१९ मध्ये दिल्लीवाल्यांनी सत्तेसाठी दिलेले वचन मोडले.राज्यात रोशनी शिंदे या महिलेने शिंदे यांच्या कारभाराविषयी फक्त एक ट्टीट केले तर शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी तिला घेरुन मारले.मातृत्वासाठी ती उपचार घेत होती.तिने माफी मागणारा व्हिडीयो देखील व्हायरल केला तरी देखील तिला जबर मारहाण करण्यात आली.तिच्या पोटावर लाथा मारण्यात आल्या.हे आहे तुमचं हिंदूत्व?तिची तक्रार देखील घ्यायला पोलिस तयार नाहीत.उलट उपचार घेऊन बाहेर पडल्याबरोबर तिला अटक करण्यासाठी पोलिस तत्पर झाले आहे.अश्‍या प्रसंगी राज्याच्या गृहमंत्र्यांसाठी ‘फडतूस’नाही तर दूसर कोणता शब्द वापरला असता?असा सवाल त्यांनी केला.

मोदी,शहा आणि संघाला भाजपचा हा कारभार मान्य आहे का?असा सवाल त्यांनी केला. नागपूर,विदर्भात अनेक क्रांतीकार होऊन गेलेत,ही क्रांतीकारकांची भूमी आहे.यांना सत्तेवर बसवा यासाठी ते हुतात्मा झाले नाहीत.कोण होणार देशाचा पंतप्रधान,राष्ट्रपती याचा विचार करुन ते फासावर गेलेत नाहीत.विचार करा कोण असणार विद्यमान सरकारला पर्याय?यांना खूर्चीवर टिकू देऊ नका ही शपथ घ्या,आपल्या मतदानाचा वापर करीत क्रांती घडवा.यांचे बारा वाजवायचेच आहे.पर्याय म्हणून कोणीही येऊ द्या मात्र हे नकोत.यांच्या नजरेत अमेरिकेच्या हिंडेनबर्गचा अहवाल एवढा फालतू आहे तर एवढे ते का हादरलेत?

राहूल गांधी यांनी संसदेत प्रश्‍न विचारला तर त्यांनाच अपात्र केले,बेघर केले.आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही इडीने चौकशीसाठी बोलावले आहे.जम्मू काश्‍मीरचे राज्यपाल सल्यपाल मलिक हे तरतुमच्याच पक्ष्ाचे त्यांच्या आरोपांवर काय उत्तर आहे?पुलवामा हल्ल्याचे राजकीय भांडवल करण्याची शक्यता याविषयी त्यांनी खळबळजनक विधान केले आहे.

जनरल व्ही.पी.मलिक यांनी देखील कारगिल युद्धानंतर शहीद जवानांचे छायाचित्रे आपल्या राजकीय सभांमध्ये लावण्यास आक्षेप घेतला होता.ते शौर्य जवानांचे होते,सैन्याचे होते,भाजपचे नव्हते,तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी ते पाेस्टर मागे घ्यायला लावले होते.‘सरकारे आती है जाती है मगर देश रहना चाहीये’असे अटल बिहारी म्हणत असत.तुम्हाला दोन तीन वर्ष ही राज्यातील सरकार राहू द्यायची नव्हती.जणू विरोधी पक्षांची सरकारे ही भाजपसाठी दहीहंडी आहे.ते गोविंदा आहेत,दिसली दहीहंडी की दिल्लीवाले म्हणतात ती फोड!

आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने राज्य देतो फक्त आठ वर्षात त्यांनी देशासाठी काय केले,इतकंच सांगावं असे सांगत उज्वला गॅस सिलेंडरची योजना तर मंचावरील कोणत्याही नेत्यांच्या गावापर्यंतही पोहोचली नसल्याची टिका त्यांनी केली.

ते दाखवतात तसं सगळं काही आलबेल नाही.२०१४ पूर्वी डॉलरचा भाव काय होता?गॅस सिलेंडरचा भाव काय होता?आनंदाचा शिधा किती लोकांना मिळाला?एवढं दयावान सरकार जनतेला मिळालं आहे,यांच्या आनंदाच्या शिधेला बुरशी लागली असल्याची टिका त्यांनी केली.
आता ही लढाई जिंकेपर्यत थांबायचं नाही.ही वज्रमूठ आवळली आहे,जे चाललंय ते आम्हाला मान्य नाही त्यासाठीच ही वज्रमूठ आवळली आहे.जिंके पर्यंत सोबत रहा,देशातील लोकशाहीला मरु देणार नाही,जिवंतपणा कायम ठेवावा लागेल,जिंकल्याशिवाय थांबायचं नाही,असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी संघ,फडणवीस,शिंदे व मोदी यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.
……………………….

.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *