अतिथी स्तंभमहाराष्ट्रशैक्षणिक

महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये दीक्षांत समारंभ बंद!

(अतिथीस्तंभ)

[प्रा.डॉ संजय त्रिंबकराव खडक्कार]

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवीधर वर्गाला पदवी प्रदान केली जाते. ग्रॅज्युएशन दिवस हा काळा गाऊन आणि ग्रॅज्युएशन कॅप परिधान करण्याचा आनंददायी अनुभव प्राप्त करण्याचा खास दिवस.

दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक विशेष दिवस असतो कारण अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आणि समर्पणानंतर त्यांना त्यांच्या कष्टाने मिळवलेल्या शिक्षणाच्या पदव्या मिळतात.

काही वर्षांपासून,भारतीय विद्यापीठांनी,हळूहळू,दीक्षांत समारंभात, ब्रिटिश पध्दतीचा पेहरावाऐवजी, प्रमुख पाहुणे, कुलगुरू आणि विद्यापीठाचे अधिकारी यांच्यासह मान्यवरांसाठी पारंपरिक पद्धतीचे,भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी, पोशाख परिधान करण्याचा निर्णय घेतला.

यावर्षी,देशात पहिल्यांदाच, आय.आय.टी.पवईने, दीक्षांत समारंभाऐवजी ‘ ‘कमेंन्समेंट सेरेमनी’ आयोजित करण्याचे योजिले. यात विद्यार्थ्यांच्या अंतिम सेमीस्टरच्या परीक्षेनंतर त्यांच्यासाठी हा समारंभ आयोजित करण्याचे ठरविले. त्यात विद्यार्थ्यांच्या पालकांना पण आमंत्रित करण्यात येणार आहे. तथापि, कमेंन्समेंट समारंभात, विद्यार्थ्यांनी अजून परिक्षा उत्तीर्ण न केल्याने त्यांना कोणतीही पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार नाहीत. हा कार्यक्रम अंतिम सेमीस्टरच्या परीक्षेनंतर आयोजित करण्याचे कारण की बहुतांश विद्यार्थी पदवीच्या अंतिम सेमीस्टरनंतर, उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी परगावी जातात व त्यामुळे नंतर आयोजित दीक्षांत समारंभाला त्यांना व त्यांच्या पालकांना दीक्षांत समारंभात उपस्थित राहता येत नव्हते.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ च्या कलम १३० नुसार विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ शैक्षणिक वर्षातून किमान एकदा पदवी, पदवीधर पदविका प्रदान करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही हेतूसाठी आयोजित करण्यात येतो. परंतु,यावर लाखो रुपये खर्च होत असल्याने, पुढील शैक्षणिक वर्षापासून दीक्षांत समारंभ आयोजित करणे बंद करण्याचा मानस उच्च व तंत्र शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांसाठी पदवी प्राप्त करण्यासाठी सोपी प्रक्रिया निर्माण करणार आहे. राज्यातील विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली कोणतीही व्यक्ती विशिष्ट ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे थेट डिजी लॉकर वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवरून त्याचे पदवी प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतील.

मग काय दीक्षांत समारंभ बंद करणे योग्य ठरेल? विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवीधर वर्गाला पदवी प्रदान केली जाते. ग्रॅज्युएशन दिवस हा काळा गाऊन आणि ग्रॅज्युएशन कॅप परिधान करण्याचा आनंददायी अनुभव प्राप्त करण्याचा खास दिवस.दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक विशेष दिवस असतो कारण अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आणि समर्पणानंतर त्यांना त्यांच्या कष्टाने मिळवलेल्या शिक्षणाच्या पदव्या मिळतात.

दीक्षांत समारंभ म्हणजे विद्यार्थांसाठी त्यांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करण्याची वेळ. हा कार्यक्रम स्वतःचे अभिनंदन करण्याचा व अभिमान बाळगण्याचा क्षण. हा अभिमान फक्त विद्यार्थ्यांचाच नसून तो त्यांच्या कुटुंबासाठी पण अभिमानाचा क्षण आहे. कारण ते पण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे एक भाग आहेत व विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वासाठी विद्यार्थ्यांने किती मेहनत
घेतली याचे ते साक्षीदार आहेत. ते घडवून आणण्यासाठी त्यांनी पण त्याग केलेला असतो. त्यामुळे पदवीप्रदान समारंभ त्यांच्यासाठी पण महत्त्वाचा असतो. तसेच,ज्या मित्रांबरोबर पदवी प्राप्त करण्यासाठी शिकलो,बरोबरीने अभ्यास केला, त्यांच्या बरोबर भेटण्याचा व साजरा करण्याचा हा समारंभ.

दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांच्या नवीन प्रवासाचा प्रारंभ बिंदू आहे. या दिवसानंतर विद्यार्थ्यांचा मार्ग व जीवन बदलते. ग्रॅज्युएशन हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा. या क्षणी मागे वळून पाहिले तर विद्यार्थी आपल्या मागील शैक्षणिक प्रवासाचे अनुभव जिवंत करू शकतात.

दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अभिमानाचा टप्पा. यात प्राप्त झालेले प्रमाणपत्र हे फक्त कागदाच्या तुकड्यापेक्षा फार जास्त आहे. यात कर्तृत्वाची भावना आहे. या ‘पदवी’ रुपी शिडीव्दारे विद्यार्थी हा जीवनाची नवीन कारकीर्द सुरू करू शकतो. दीक्षांत समारंभाचा दिवस म्हणजे विद्यार्थासाठी स्वतःच्या पाठीवर थाप मारण्याचा आणि आपण किती पुढे आलो याचा अभिमान वाटण्याचा दिवस आहे.

पण, आता पुढील वर्षापासून, दीक्षांत समारंभ बंद झाल्यास विद्यार्थी वर्ग हा पदवीदान समारंभ साजरा करू शकणार नाहीत. दीक्षांत समारंभातील प्रमुख पाहुणे,जे सामान्यतः शैक्षणिक किंवा समाजातील जगमान्य व्यक्ती असतात त्यांचे मौलिक व बोधप्रद विचार ऐकण्याची अमूल्य संधी जी पदवीधरांना दीक्षांत समारंभात असते, त्यापासून ते मुकतील.

आता, हा दीक्षांत समारंभ बंद केला तर विद्यार्थी निश्चितच नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाला, व्यवहारीक दृष्टीने, दीक्षांत समारंभ बंद करण्याचा निर्णय कितीही योग्य वाटतं असेल तरी दीक्षांत समारंभाची परंपरा, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे कौतुक सोहळा व सत्कार, त्याबद्दल असलेली विद्यार्थी व त्यांच्या पालकांची भावनिकता जपण्यासाठी विद्यापीठांमधील स्टेकहोल्डर्सचे मत घेऊन यासंबंधीचा अंतिम निर्णय घ्यावा, असे वाटते.

(लेखक हे विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *