उपराजधानीक्राइमन्याय-जगत

दुहेरी जन्मठेप:इनसाईड स्टोरी

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.१६ जुलै २०२३: शहरातील बहुप्रतिक्षित कांबळे दुहेरी हत्याकांडात शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी,गावंडे यांनी गणेश शाहू,अंकित शाहू आणि गणेश शाहू याची पत्नी गुडिया शाहू या तीन सज्ञान आरोपींना सुप्रसिद अधिवक्ते उज्जवल निकम यांनी केलेल्या मागणीनुसार मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि..गुडिया नावाची आरोपी हिला न्यायालयातच रडू कोसळले.

ही घटना हूडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पवनसूतनगर येथे १७ फेब्रुवरी २०१८ रोजी घडली होती.या दिवशी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आरोपींनी शहरातील पत्रकार रविकांत कांबळे यांची आई उषा कांबळे व अवघ्या दीड वर्षाची चिमुरडी, जी आजीच्या कडेवर आपल्या इवल्याशा पायात पैंजण घ्यायला निघाली होती, तिचा ही गळा चिरुन निघृण हत्या केली व यानंतर त्यांचे मृतदेह पोत्यात भरुन उमरेड रोडवरील विहीरगावजवळच्या एका नाल्यात फेकून देण्यात आले होते. दुस-या दिवशी त्यांचे मृतदेह नाल्यात अश्‍या अवस्थेत बघून अवघे समाजमन सुन्न झाले होते.

हे निघृण कृत्य करताना आरोपी गणेश शाहूचे वय अवघे २६ वर्ष,गुडीया शाहूचे वय २३ वर्ष तर गणेश याचा भाऊ अंकित याचे वय फक्त १९ वर्ष होते!आज या घटनेला जवळपास साढे पाच वर्ष लोटले,आरोपी यांना आता किमान ३२ वर्ष तरी कारागृहाच्या काळकोठरीत जगावं लागणार आहे.कायद्याच्या लेखी आणि सभ्य समाजाच्या दृष्टिने हे तिन्ही आरोपी याच शिक्षेस पात्र होते.महत्वाचे म्हणजे हत्या करण्यात आपल्या पतीची मदत करणारी गुडीया ही, हे अघोरी कृत्य करताना स्वत: गरोदर होती!ती गरोदर असली तरी देखील…कृत्य घृणित होतं….कायदा भावना बघत नाही…कृत्य बघतो….!सायंकाळी ६ वाजता दोन जणांची हत्या करुन ही ती सामान्य होती..घरातली कामे करीत होती,दूकानात बसली होती…लोकांशी सामान्यपणे बोलत होती…यावरुन तिची मानसिकता दिसते….!

(छायाचित्र : अंकित,गणेश आणि गुडीया शाहू)

वाद फक्त भिसीच्या काही पैशांचा होता.कोर्टात सादर झालेल्या कागदपत्रांमध्ये नमूद असल्याप्रमाणे ७ हजार रुपयांची भिसी तर ७० हजार रुपये गणेशच्या लग्नासाठी गणेश शाहूच्या आईने उषा कांबळे यांच्याकडून घेतलेल्या उधारीच्या पैशांवरुन हा वाद घडला होता.न्यायदान करताना एक महत्वाची बाब बघितली जाते.मोटीव्ह काय?

न्यायसदनासमोर दिलेल्या साक्षीदाराच्या ग्वाहीनुसार उषा कांबळे या नाती राशिला घेऊन आरोपी गणेश शाहूच्या दुकानात आल्या होत्या.पैशांवरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपीने उषा यांना ‘वरती घरी चला तुमचा हिशेबच करुन टाकतो’ म्हणून वर बोलावले.उषा या गणेश शाहूच्या मागे दूकानाच्या वर असलेल्या घरात जाऊ लागल्या.याच वेळी दूकानात उपस्थित असलेल्या गुडीया ने दीड वर्षाच्या राशिला कडेवर घेत वरती गेली!

डोक्यात राग असलेल्या गणेशने निघृणपणे उषा यांच्या कानापासून हनुवटीपर्यंत व पुन्हा हनुवटीपासून दुस-या कानापर्यंत शस्त्राने वार केला!रक्ताच्या चिरकांड्या त्याच्या घरातील भिंतीवर उडाल्या.याच वेळी आजीच्या किंचाळळ्याने भेदरलेली चिमुरडी राशि मोठ्याने रडली असावी आणि….. माणूसकीचीच हत्या झाली..!तिचा ही इवलासा गळा अशाचप्रकारे चिरुन टाकण्यात आला होता…!

न्यायालयाच्या लेखी शस्त्र कोणी चालवले?कोणाच्या शस्त्राघाताने मृतकांचा जीव गेला?या सारखेच महत्व त्या क्षणी त्या ठिकाणी कोण-कोण उपस्थित होतं?त्यांना ही त्या कृत्यामध्ये तितकेच भागीदार मानून शिक्षा सुनावली जाते आणि गुडीया शाहूच्या बाबतीत देखील नेमके हेच घडले.एका असहाय,निशस्त्र असणा-या आणि आपल्या जन्मदात्रीच्या वयाच्या महिलेचा व अजाणत्या वयाच्या राशिचा गळा जरी गणेश शाहूने चिरला तरी त्या क्षणी घटनास्थळी उपस्थित गणेश याचा भाऊ अंकित शाहू आणि गुडीया शाहू यांना देखील त्या कृत्यासाठी कायद्याच्या लेखी तितकच अपराधी मानलं गेलं.

माणुसकीला लाजवणारे याहून वाईट कृत्य या आरोपींकडून घडले ते म्हणजे आपल्या आई व चिमुरडी च्या हरविल्याने सैरभैर झालेल्या रविकांत कांबळेंसोबत या कृत्याला अंजाम देणारा आरोपी गणेश शाहू हा देखील रात्रभर उषा व राशिचा शोघ घेत सर्वदूर फिरु लागला!गुडिया हिनेही नेहमीप्रमाणे दुकान सुरु ठेवले मात्र वस्तीत इतकी मोठी घटना घडली व तू दूकान सुरु ठेवली असे बोल ऐकून तिने ते बंद केल्याची ऐकीव माहिती आहे.

पत्रकाराची आई व चिमुरडी यांच्या मिसिंगची तक्रार प्राप्त झाल्यावर तत्कालीन झोन -४ चे डीसीपी नीलेश भरणे यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातले होते.आरोपीच्या कारवर धूतल्यानंतरही लपून राहू न शकलेले रक्ताचे डाग,या डागाचा पाठपुरावा करीत आरोपींच्या घरात पोलिसांचा झालेला शिरकाव,हत्याकांडानंतर घासून काढण्यात आलेली फर्शी,भिंती हूशार पोलिस अधिका-यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते.आरोपीच्या बयाणानंतर उषा व राशिचे मृतदेह नाल्यातून हस्तगत करने,आरोपींना झालेली अटक,या सर्व बाबी नागपूर शहरातील नागरिकांसाठी अतिशय वेदनादायी होत्या.

सर्वच माध्यमांमध्ये या घटनेला ठलक प्रसिद्धी मिळाली.या प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन पोलिस अधिकारी किशोर सुपारे यांची भूमिका या घटनेत संशयास्पद आढळल्याने त्यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला होता.सुपारे यांनी गुन्हा दाखल करताना आरोपींवर अट्रासिटीचे कलम ही लावण्यास टाळाटाळ केल्याचे बरेच आरोप झाले होते.

ही घटना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच गृहनगरात व त्यांच्याच गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात झाली असल्याने व अनेक माध्यमकर्मींनी त्यांची वैयक्तीक भेट घेतल्याने,नागपूर श्रमिक पत्रकार संघाने देखील मागणी लावून धरल्याने फडणवीस यांनी आरोपींविरुद्ध न्यायालयीन कामकाज बघण्यासाठी देशातील सुप्रसिद्ध अधिवक्ते ॲड. उज्वजल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली.या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त राजरत्न बनसोड यांनी केला.तपासाअंती आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले.

या प्रकरणात एकूण ३५ साक्षीदार तपासण्यात आले.राज्य सरकार व आरोपी या दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.गणेश,अंकित व गुडीया या तिघांना हत्येसाठी दोषी मानत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली मात्र उज्जवल निकम यांनी घटनेची क्रूरता या निकषावर, न्यायालयाचे लक्ष वेधून मरेपर्यंतच्या जन्मठेपेची मागणी केली,जी न्यायालयाने मान्य केली.मृतदेहांची विल्हेवाट, या कृत्यामध्ये मदत करणारा एक अल्पवयीन चुलत भाऊ देखील सहभागी होता.त्यावेळी त्याचे वय १७ वर्ष होते,आता साढे पाच वर्षांनंतर त्याला सज्ञान धरत न्यायालयाने त्याला देखील ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

हा निकाल ऐकताच आरोपी गुडीया ही रडू लागली.या गुडीयाने करोना काळात तिला मिळालेल्या जामिनाच्या काळात एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.करोना महामारीच्या काळात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अनेक कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले होते.याच काळात गुडीया ही स्वत: आई झाली.करोना नंतर केंद्राने कैद्यांना दिलेली विशेष सवलत मागे घेतली व गुडीया नावाच्या या आईचा प्रवास पुन्हा एकदा कारागृहाच्या बंदिस्त भिंतींच्या आत सुरु झाला.

नियतीची क्रूर थट्टा आज ती देखील भोगतेय.ज्याला जन्म दिला त्याच्यासोबत ती कधीही आपलं आयुष्य घालवू शकत नाही,त्याला मोठं होताना बघू शकत नाही.उलट त्याच्या कपाळावर या जन्मदात्रीने कायमचा सामाजिक कंलक लावला.एक निशस्त्र महिला व निरागस राशिच्या खूनाने आपल्या जन्मदात्यांचे हात बरबटले आहेत,या कृत्यासाठी ते कारागृहात आयुष्य कंठीत आहेत,मोठा झाल्यावर हे त्याला समाज कधीही विसरु देणार नाही.

राशि…ही जुळ्या बहीणींपैकी एक गोंडस भेट होती तिच्या जन्मदात्यांसाठी.आज ती कुठेच नाही…तिच्या बहीणीचा वाढदिवस जन्मदाते हे साजरा करने कायमचे विसरलेत….सोबत जगात आलेली राशि आज फक्त आजीच्या कडेवरील छायाचित्रात आठवणीच्या रुपात मागे उरली…..!ही देखील नियतीची थट्टाच म्हणावी लागेल.

स्वत: गरोदर असतानाही का केलं गुडीयाने असेल हे कृत्य?दिड वर्षाच्या चिमुरडीला कडेवर उचलून कश्‍याप्रकारे मृत्यूच्या दारेत गुडीया ढकलू शकली?रक्ताच्या चिरकांड्यांचा आसुरी आनंद घेऊ शकली?अश्‍या कृत्या मागे अचानक क्रॉनिक होणे,हे कारण असू शकतं,असं सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.सुशील गावंडे यांनी ‘सत्ताधीश‘सोबत बोलताना सांगितले.

गुन्हेगार हे दोन प्रकारचे असतात.एक सराईत गुन्हेगार असतात ज्यांना कोणाचीही हत्या करने,रक्त बघणे याचं काहीही वैषम्य वाटत नाही.त्यांचं मन हे या सर्व दृष्यांसाठी आणि कृत्यांसाठी कणखर झालेलं असतं.दुस-या प्रकारच्या गुन्हेगारीत भयंकर रागानंतरच्या कृत्यांनंतर, पश्‍चाताप दडलेला असतो.आपल्या हातून हे घडलंच कसं?अनेक प्रश्‍न त्यांच्या मनान उद् भवत असतात.गुडीयाच्या बाबतीत तर ती आई झाल्यावर पश्‍चातापाची भावना तीव्र झालेली असू शकते,अशी शक्यता ते वर्तवतात.अर्थात प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा मिळाल्यानंतर केलेल्या कृत्यांचा पश्‍चाताप होतोच असे नाही.

बंदिस्त कारागृहाच्या आत गुडीया आणि गुडीयासारख्याच अनेक स्त्रिया आहेत ज्या प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी नसतात मात्र,आपल्या जवळच्या पुरुषाला गुन्हा करताना त्या मदत करीत असतात.शिक्षा मात्र त्यांना पुरुषाच्या बरोबरीनेच भोगावी लागते.प्रत्यक्ष हत्या केली नसली तरी हत्येची कलम त्यांच्यावरही सारखीच लागत असते…..!

शुक्रवारच्या शिक्षेनंतर कारागृहात गुडीया आता कशी जगणार?तर…..प्रत्येक गुन्हेगार हा ‘आशे‘वर जगत असतो.गुडीयाला करोना काळात जामिन मिळाला होता हे विसरता येत नाही.पुढे ही फर्लो,पॅरोलसारखी अनेक मानवतावादी आयुधे आहेत जी अल्पकाळ का होईना एक जन्मदात्री म्हणून तिला या देशातला कायदा उपभोगू देणार आहे.अल्पकाळ का होईना तिला तिच्या सृजनासोबत जगता येणार आहे.कारागृहातील अधिका-यांची मात्र कसौटी असते.गुन्हेगार म्हणून न्यायालयाने शिक्षा देऊन झाली की मनाने खचलेल्यांना मनाची उभारी देणे,त्यांचं मानसिक खच्चीकरण न होऊ देणे,अगदी जन्मठेपेच्या कैद्यांना देखील सतत आशेवर जगवणे,त्यांच्या मानसिक आरोग्यासोबतच त्यांच्या शारिरीक आरोग्याची काळजी घेणे,यासारख्या अनेक कसौटीपूर्ण बाबींवर देखील काळजीपूर्वक त्यांना काम करावं लागतं.

गुडीया तर आजही तेच सांगते मी नाही केला खून कोणाचाही…..!गणेश,अंकितही हेच सांगतात आम्ही काहीच केले नाही….!याचा अर्थ त्यांचं मन अद्याप ही त्यांनी काय भयंकर आक्रीत केले, हे स्वीकारायला तयार नाही….!राशिच्या जन्मदात्यांच्या जीवनात त्यांनी कायमचा अंधार पेरला.रविकांत कांबळेंकडून मायेची उब कायमची हिसकावली.एकसाथ दोन अतिशय ह्दयस्थळी असणा-या नात्यांचा वियोग….हा कोणालाही वेडावून टाकणाराच असतो…जिवंत संवेदना असणा-या मनाला तिळतिळ वेदनेत जाळणारा असतो.

हे तिघेही सांगत नाहीत,उषा आणि राशिला तुम्ही तिघांनी नाही मारलं तर मग कोणी मारलं?हे तिघे ही एक ही शब्द बोलत नाहीत.शून्यात हरवलेले दिसतात.न्यायालयाने दिलेली शिक्षा ता-हयात भोगून देणे यांना आता क्रमप्राप्तच आहे,आरोपीच्या वकीलानेही न्यायालयात बाजू मांडून बघितली,घटनेच्या वेळी तिघे तिथे उपस्थितच नव्हते….न्यायमूर्ती म्हणालेत…झालं तुमचं बोलून!आणि….अल्पवयीन गुन्हेगारासोबतच या तिघांनाही त्यांनी कठोर शिक्षा सुनावली…दुहेरी जन्मठेप….!

ॲड.उज्वल निकम यांनीच मागणी केली होती.आरोपींना फाशी नको.फाशी ही त्यांनी केलेल्या कृत्यापासून कायमची सुटका करेल.त्यांच्या कृत्याला इतकी सहज,सोपी शिक्षा नको.त्यांना तिळतिळ जाळणारी,आयुष्य हळूहळू सरणारी शिक्षाच हवी..मरेपर्यंतची जन्मठेप…!

उज्वल निकम यांची पुन्हा एकदा सिद्धता-
या प्रकरणात प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता.मात्र,सबळ परिस्थितीजन्य पुरावे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे एक ही लूप होल न ठेवता न्यायालयाच्या पटलावर ठेवले.घटनेच्या दिवशी उषा या राशिला घेऊन आरोपींच्या दुकानात जाणे,नातीला पैंजण घेण्यासाठी घराजवळील सोनाराच्या दुकानात उषा घेऊन गेल्या होत्या,येताना आरोपी शाहू याच्या शिव किराणा स्टोर्सजवळ थांबणे,दूकानाच्या आत जाने,साक्षीदारासमोर पैशांना घेऊन वाद होणे,आरोपीने उषा यांना वरच्या मजल्यावरील घरी चलण्यास सांगणे.त्या ठिकाणी रक्ताचे डाग सापडणे,स्वयंपाक खोलीतील बेसिन व बाथरुमच्या नळाजवळही रक्ताचे डाग आढळणे.ज्या गाडीतून दोघींचेही मृतदेह नेऊन नाल्यात टाकले ती गाडी संशयास्पदरितीने स्वच्छ केलेली आढळणे,न्यायवैधक अहवाल,डीएनचे जुळवाजुळव इत्यादी अनेक बाबींचा तपशील उज्जवल निकम यांनी अतिशय अभ्यासपूर्णरित्या न्यायालयासमोर मांडला.त्यांच्या या कार्यसिद्धीचेच हे यश मानता येईल राशिच्या जन्मदात्यांना न्याय मिळू शकला.

केसच्या सुरवातीला आरोपी लोकांनी नाट्य मय पद्धतीने अनेक करणं सांगून प्रकरण लांबविले, रविकांत पत्रकार आहे म्हणून तपास यौग्य नाही, कोर्ट न्याय देणार नाही असे अनेक खोटे मुद्दे घेऊन आरोपींनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि परप्रांतात केस चालविण्याची मागणी केली. आरोपी चे सगळे दावे सुप्रीम कोर्टाने फेटाळले आणि याचिका रद्द केली.

अखेर प्रकरण सुरू झाले. सरकार पक्षातर्फे निकम साहेब यांनी एकूण ३५ सक्षदार पडताळले. फिर्यादी तर्फे मी बाजू मांडली. अंतिम युक्तिवाद झाला आणि न्यायालयाने सर्व पुरावे पाहून आज अंतिम निर्णय सुनावला.

न्यायालयाने सूनावलेला निर्णयातून आम्ही अतिशय समाधानी आहे. कांबळे परिवाराला आज खरा न्याय मिळाला आहे. दीड वर्षाची चिमुकली आणि तिच्या आजी ची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने आजीवन कारावास ठोठावला आहे, हा एक उत्तम निर्णय आहे आणि मी या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो,असे फिर्यादी रविकांत कांबळे यांचे वकील ॲड.समीर सोनवणे यांनी ‘सत्ताधीश’सोबत बोलताना सांगितले.

…………………………………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *