उपराजधानीन्याय-जगतराजकारण

ईडी अधिका-याने उघडले स्नानगृहाचे दार!

(संग्रहीत छायाचित्र)

उके बंधूंच्या मातोश्री पुष्पा उके यांचा गंभीर आरोप:अजनी पोलिस ठाण्यात केली तक्रार दाखल

पीएमएलए कोर्टात सादर केली तक्राराची प्रत

नागपूर,ता.२७ नोव्हेंबर २०२३: महाराष्ट्राच्या उपराजधानीत बहूचर्चित गाजलेली सक्त वसुली संचालनालयाची (ईडी)ची धाड म्हणजे पार्वती नगर येथील ॲड.सतीश उके यांच्या घरी ३१ मार्च २०२२ रोजी पडलेली धाड होय.गेल्या दीड वर्षांपासून ॲड.सतीश उके व त्यांचे थोरले बंधू प्रदीप उके हे मनी लाँड्रींगच्या आरोपामध्ये मुंबई येथील ईडीच्या अटके नंतर कारागृहातच आहे.नुकतेच उके यांच्या वडीलांचे महादेवराव उके यांचे निधन झाले.अंत्यसंस्कारासाठी पॅरोलवर उके बंधूंना मुंबईवरुन सांयकाळी ७ वाजता नागपूरला आणण्यात आले व त्याच रात्री वडीलांच्या अंत्यसंस्कारानंतर परत नेण्यात आले.२७ नोव्हेंबर रोजी वडीलांच्या तेरवीची विधी करण्यासाठी पुन्हा एकदा उके बंधूंना नागपूरात आणण्यात आले मात्र,त्यांच्यावर पाळत ठेवणा-या ईडीच्या एका अधिका-याने रात्री ११ वाजता कोणत्याही महिला पोलिस कर्मचा-यांशिवाय उके यांच्या संपूर्ण घराची पाहणी केली,एवढंच नव्हे तर उके यांच्या मातोश्री ज्यांना दोन महिन्यापूर्वीच ह्दयघात येऊन गेला व ज्यांना पाईल्सचा त्रास आहे त्या रात्री स्नानगृहात पाईल्सवरील उपचारासाठी टबमध्ये बसून गरम पाण्याचा शेक घेत असताना ईडीच्या अधिका-याने बाथरुमचे दार उघडले,यामुळे उके यांच्या आईला जबर मानसिक धक्का बसला.याची तक्रार प्रदीप उके यांच्या मार्फत त्यांनी अजनी पोलिस ठाण्यात केली असून याची एक प्रत पीएमएलए कोर्टात देखील सादर केली असल्याचे उके यांच्या वकीलांनी सांगितले आहे.

आमच्या आईला लज्जा येईल असे वर्तन ईडी अधिका-यांकडून घडल्याचा आरोप उपरोक्त तक्रारीत करण्यात आला आहे.उके बंधू हे १२ एप्रिल २०२२ पासून न्यायालय बंदी असून ऑर्थर रोड येथील कारागृहात बंदिस्त आहेत.त्यांच्या वडीलांचा महादेवराव उके यांचा मृत्यू १० नोव्हेंबर रोजी झाला. त्यांच्या तेरवीच्या विधीसाठी न्यायालयाने २१ ते २६ तारखे पर्यंत पोलिस पथकासोबत त्यांना नागपूरात येण्याची परवानगी प्रदान केली.

२२ नोव्हेंबर रोजी प्रदीप उके यांना मुंबईच्या पोलिस पथकाने सायंकाळी ६ वाजता पार्वती नगर येथील घरी पोहोचवले.रात्री ११ वाजता दोन ईडी अधिकारी हे घराच्या मागच्या बाजूने आले.त्यांनी प्रदीप तसेच त्यांच्यासोबतच्या पोलिस पथकाला परिचय दिला.त्यांनी त्यांना पोलिस ठाण्यातच थांबवण्यास सांगितले व त्यांनी सोबत असलेल्या पीएसएआय यांच्याशी बोलणी केली.तेव्हा प्रदीप उके व सोबतचे पोलिस पथक व ईडी अधिकारी तिथेच थांबले व एक ईडी अधिकारी घराच्या आत गेला व दहा मिनिटांनी संपूर्ण घराचा शोध घेऊन परत आला.

यानंतर त्याने हा मागचा गेट असल्याने मी समोरच्या गेटमधून येतो असे सांगून, दोन्ही ईडी अधिकारी निघून गेले.नंतर आईकडून ही धक्कादायक घटना कळली की त्या जेव्हा स्नानगृहात रात्री अकरा वाजता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाईल्सवर उपचाराकरीता गरम पाण्याच्या टबमध्ये बसून शेक घेत होत्या व नंतर आंघोळ करीत असल्याने संपूर्ण वस्त्र काढले होते.वयाने वृद्ध असल्याने त्यांच्या आईने स्नानगृहाचे दार फक्त लोटून ठेवले होते.
अश्‍या स्थितीत ईडीच्या एका अधिका-याने चक्क स्नानगृहाचे दार उघडले व आईला बघत उभा होता.आईने घाबरुन कोण आहे?अशी विचारणा केली असता,मी ईडीचा अधिकारी आहे,तुमच्या घराची झडती घेत असलयाचे आईला सांगितले.आईसाठी ही परिस्थिती अत्यंत लज्जा उदभवणारी असून तिने घाबरुन पुन्हा दार लोटून दिले.घाईघाईत तिने ओले कपडेच घालून बाहेर आल्या व बाहेर येऊन थरथरत उभी झाली.ईडीचे हे दोन्ही अधिकारी रात्रीच्या ११ वाजता कोणत्याही महिला अधिका-याला सोबत न घेता घराची झडती घेत होते.

ईडीचा हा अधिकारी हातात हॅण्ड बॅग घेऊन घरातील प्रत्येक खोलीची झडती घेत असताना मोबाईलवर इतर कोणत्यातरी वरिष्ठ अधिका-याशी सतत बोलत होता.पलीकडून या अधिका-याला काहीतरी शोध घेण्याची सूचना होत असावी.हा अधिकारी संपूर्ण घरात संशयास्पदरित्या फिरत होता व परत समोरच्या गेटने घरात येऊन पुन्हा साहेबांशी बोलत घराच्या आत बसला.

२३ तारखेच्या रात्री २ वाजताच्या दरम्यान मला आईसोबत घडलेला प्रकार समजला मात्र सध्या अडचणीत आहोत म्हणून मी आईची समजूत घातली व आईच्या झालेल्या अपमानाविषयी नंतर बोलू असे प्रदीप उके यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे कारण,२४ तारखेला वडीलांच्या १४ वी च्या विधीसाठी संपूर्ण नातेवाईक येणार असल्याने आईसोबत घडलेल्या या प्रकारामुळे आईचा अपमान झाला असता.मी आणि ॲड.सतीश उके त्या ईडी अधिका-याला ओळखत होतो कारण,ईडीच्या अटकेत असताना त्याच अधिका-याने अनेकदा चहा-नाश्‍ता आम्हाला पुरविला होता.

त्याला ओळखत असल्यानेच ॲड.सतीश उके यांनी त्या ईडी अधिका-याला सांगितले की ही खोली फारच लहान आहे इथे जागा होणार नाही व न्यायाधीश साहेबांनी तुम्हाला आमच्यावर फक्त पाळत ठेवण्यास सांगितले आहे.त्यामुळे समोर अंगणातील सोफ्यावर बसून देखील अगदी समोरासमोर बसून तुम्ही आमच्यावर पाळत ठेऊ शकता.जर विधी करतानाही तुम्ही माझ्यासोबत चिपकून बसले तर नातेवाईकांना वाटेल तुम्ही माझी कस्टडी घेतली आहे.तुम्ही चार फूटांवरुन माझ्यावर दाराच्या बाहेरुन नजर ठेऊ शकता.

त्या अधिका-याने, सतीशने फोनला हात लावता कामा नये असे कोर्टाने आदेश दिले असतानाही आपल्या वरीष्ठ अधिका-याशी बोलण्याकरीता फोन लाऊन दिला व नंतर, आम्ही कोर्टात जाऊन आता हे न्यायाधीश साहेबांना सांगू,असे बोलून ते निघून गेले.२४ व २५ तारखेला घरी विधी असल्याने कार्यक्रमात व्यस्त होतो.माझ्या वडीलांचा याच तनावामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप प्रदीप उके यांनी तक्रारीत केला.ईडी अधिका-यांनी कोणत्याही महिला पोलिस कर्मचा-यांना सोबत न घेता घराची झडती घेतली व आईला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

माझ्या आईला दोनच महिन्यापूर्वी ह्दयघात झाला असून, सतत तनावात राहत असल्याने तिच्याही जिवाला धोका निर्माण झाला असल्याचक तक्रारीत नमूद करण्यात आले.आईच्या जिवाला या घटनेमुळे कोणताही धोका निर्माण झाल्यास या ईडी अधिका-यांना फोनवरुन निर्देश देणारे ईडी अधिकारी व झडती घेणा-या दोन्ही ईडी अधिका-यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पुष्पा उके व प्रदीप उके यांनी केली आहे.

विशेष म्हणजे ईडी अधिका-यांनीच अजनी पोलिस ठाण्यात कोर्टाच्या अवमाननेची तक्रार नोंदवली असून ,सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा आरोप उके बंधूंवर करण्यात आला आहे.उके बंधूंनी ईडीच्या दोन्ही अधिका-यांना कोर्टाचे आदेश असतानाही घरातून हाकलून लावले असा आरोप करण्यात आला आहे.उके बंधु नागपूरात पोहोचल्यावर ईडी अधिकारी शिवराम हलदनकर(४९)व शिपाई टी.धर्मराज हे उके बंधूंसोबत पार्वती नगर येथील घरी पोहोचले होते.तेव्हा सतीश उके यांनी पाळत ठेवण्याच्या कृतीला बेकायदेशीर कृती ठरवित, ईडीच्या विरोधात कोर्ट केस करण्याची धमकी दिली व त्यांना तिथून पळवून लावले,अशी तक्रार अजनी पोलिस ठाण्यात उके बंधूंच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे.ही बाब २३ नोव्हेंबर रोजी रात्री २ वाजून १५ मिनिटांनी घडली.

या घटनेविषयी मात्र संशय व्यक्त करण्यात येत आहे.
………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *