उपराजधानीमहाराष्ट्रमुक्तवेध

ज्ञानदा हेच सांग…

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्रातील समाज माध्यम एका अति सामान्य घटनेमुळे पार ढवळून निघाले आहे ते म्हणजे ‘एबीपी माझा’या वृत्त वाहीनीची लोकप्रिय अँकर ज्ञानदा चव्हाण-कदम हिच्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद घाटन सोहळ्याचे वार्तांकन करीत असताना डोळ्यात भरुन आलेले पाणी,दाटून आलेला कंठ आणि शेवटी प्रेक्षकांची तिने मागितलेली क्षणाची विश्रांती,यावर ट्रोलक-यांनी तिला,तिच्या कर्तृत्वाला,बुद्धीमत्तेला,प्रामाणिपणेला तसेच १७ वर्षाच्या अनुभवसिद्ध पत्रकारितेला केलेले अतिशय खालच्या पातळीवर जाऊन केलेले लक्ष्य,‘काय सांगशील ज्ञानदा?’या टॅगलाईन खाली तिचा काहीही संबंध नसणा-या घटनासाेबत तिचे नाव जोडून तिला वाटेल ते प्रश्‍न विचारुन आरोपीच्या पिंज-यात उभे केले जात असतानाच,ज्ञानदाची बाजू उचलून धरुन ट्रोलक-यांना तिच्या समर्थनार्थ समाज माध्यमात देण्यात आलेले उत्तर,यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील माध्यम जगतच पार ढवळून निघाल्याचं दिसून पडंतय.

भगवान श्रीरामाची जन्मभूमी असणा-या अयोध्या येथील राम मंदिर ही गेल्या ७० वर्षांपासून एक वादग्रस्त वास्तू म्हणून जगाला माहिती आहे.१९९२ साली रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी या ठिकाणी असलेली बाबरी मज्सिद ढासळण्याची घटना घडली,यानंतर मुंबई बॉम्बस्फोटांची घटना घडली,अनेक धार्मिक,राजकीय व न्यायिक स्थित्यंरे बघत, अखेर सर्वोच्च न्यायालयात निवाडा झाला व राममंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला.येत्या २२ जानेवरी रोजी राम मंदिर उद् घाटनाचा सोहळा आयोजित करण्यात आला असून ही घटना अर्थातच माध्यम जगतासाठीही महत्वाची असल्याने, वार्तांकनासाठी माध्यमकर्मींनी उद् घाटन स्थळी जाने व आपापल्या वाहिन्यांच्या धोरणाच्या हिशेबाने वार्तांकन करने स्वाभाविक आहे.

एबीपी माझा ची ज्ञानदा ही देखील वार्तांकनासाठी गेली असता व मंदिराच्या विश्‍वस्तांपैकी एकाची मुलाखत घेत असताना,मंदिराच्या विविध वैशिष्ठांची माहिती घेत असतानाच,तब्बल ७० वर्ष प्रदीर्घ अशा धार्मिक, राजकीय व कायदेशीर लढयामुळे त्यांचे रामलला हे फक्त एका ओट्यावर रेग्झीनच्या अस्थायी पालेखाली ऊन,वारा,पाऊस,वादळे झेलत विराजमान राहीले,त्यामुळेच येत्या २२ जानेवरी रोजी ते स्वत:च्या जन्मस्थानाच्या भव्यदिव्य वास्तूमध्ये विराजमान होणार असल्याचे सांगताच भावविभोर झाले,ज्ञानदा हिच्या देखील डोळ्यात अश्रू तरळले,कंठ दाटून आला आणि…तिचा मुक्त संवाद अडखळला.

असं म्हणतात माणसाला जर भावनेवर नियंत्रण ठेवता आले असते तर तो ‘देव‘ झाला असता.ज्ञानदा मूळात एक स्त्री असल्यामुळे मनाचा हळवेपणा हा नैसर्गिकरित्या तिच्यात असणे हा तिचा दोष असू शकत नाही त्यातही ती ‘ऑन कॅमरा’भावूक झाली ही तिच्यातील जिवंत संवेदनशील मनाची आणि माणुसकीची साक्ष देणारीच घटना होती.यात दलित,पिडीत,शोषितांच्या संघर्षाचा विषय येतोच कुठे?भगवान श्रीरामाविषयी एखाद्याच्या भावना किवा श्रद्धा ही वैयक्तीक नसू शकते का?तुमचे आराध्य हे आराध्य आहेत आणि ज्ञानदाचे आराध्य हे अस्त्विात नसलेले थोतांड हे टिका करणारे तरी सिद्ध करु शकतात का?मूळात माध्यमकर्मी ही माणूसच असतात,त्यांनाही भावभावना असतात,एखाद्या प्रसंगी ते देखील भावूक होऊ शकतात,एवढी साधी निसर्गाची क्रिया,याला जातीय,राजकीय,सामाजिक वळण देण्यामागे काय हेतू असू शकतो?

ज्ञानदाच्या भावूक होण्याच्या एका अतिशय स्वाभाविक क्रियेवर आपापली टीआरपी,लाईक्स वाढवण्याची किमया साधून कोणी-कोणी जातीय व व्यवसायिक पोळी शेकून घेतली? तिच्यातील उपजत कर्तृत्वाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्याची नामी संधी साधण्या मागे काेणता उद्देश्‍य होता?

रवींद्र आंबेकर नावाच्या विभूतीने ज्ञानदा हिला ट्रोल करीत ‘रामलल्ला तंबूत राहिला म्हणून रडणराी अँकर मी तयार केली नाही याचा मला अभिमान वाटतो.या देशातील शोषित वंचित जनता अजून ही पालात राहते..भाक-या सुकवून खाते..या जनतेच्या डोळ्यातील आसवं टिपणारी टीम आम्ही तयार करु शकलो याचा मला समाधान आहे’अशी पोस्ट व्हायरल केली.

या पोस्टवर,ट्रोलधारकांनी ज्ञानदावर टिकेचा अक्षरश: पाऊस पाडला.शेतकरी आत्महत्या,हाथरस,गंगेत वाहणारी प्रेतं,लॉक डाऊनच्या काळात रस्त्याने हजारो किलोमीटर चालत जाणारे गरीब गरजू मजूर वर्ग,तेव्हा काय डोळे फूटले होते की पाणी आटले होते ज्ञानदा?असा असंबधीत प्रश्‍न ज्ञानदालाच विचारण्यात आला,या सर्व घटनांशी ज्ञानदाच्या श्रीरामाविषयीच्या सर्वस्वी वैयक्तिक भावनेचा काय संबंध?

ज्ञानदाच्या डोळ्यात पाणी तरळले तो विषय हा एका भावूक क्षणाशी निगडीत होता.अयोध्येतील वातावरणात संवेदनशील असणारे कोणाचेही मन भावूक होणे ही एक स्वाभाविक क्रिया होती.लगेचच याचा संबंध इतर घटनांशी जोडणे म्हणजे आपल्याच बुद्धीमत्तेची दिवाळखोरी नाही का?सूटबूटात वातानुकुलीत कक्षात बसून ज्ञानदाच्या कर्तुत्वावर जळफळाट ठेऊन, स्वत:ची टीआरपी वाढवण्यासाठी अशी पोस्ट व्हायरल करणा-याचे कोणते कर्तृत्व यातून सिद्ध झाले?

पत्रकारितेच्या थोबाडावर बुट ठेवुन साक्षी मलिक ढसाढसा रडली पण ज्ञानदा नाही रडली..उपचाराअभावी मूलं आणि माणसं तडफडत मेली पण ज्ञानदा नाही रडली..मणिपूरमध्ये स्त्रियांची नग्न धिंड काढली गेली पण ज्ञानदा नाही रडली..निष्पाप निरागस चिमुरड्या मुलींवर होणा-या बलात्काराच्या कित्येक बातम्या वाचल्या पण ज्ञानदा नाही रडली..हो पण..काल्पनिक देवांना मंदिराअभावी राहीलेलं पाहून ज्ञानदाला अगदीच गहीवरुन आलं आणि ज्ञानदा ढसाढसा रडली..ऐकलं होतं पत्रकार हा निष्पक्ष असतो. त्यांना जात नसते,धर्म नसतो पत्रकारिता हाच त्यांचा धर्म असतो,पण असे धर्मांध पत्रकार असल्यावर ते निष्पक्ष पत्रकारिता करत असतील का या बाबत शंका होती ती आता दूर झाली..जेव्हा ज्ञानदा धाय मोकलून ढसाढसा रडली..!‘काय सूचित करते ही टिका?ज्ञानदाच्या १७ वर्ष एवढ्या प्रदीर्घ पत्रकारितेचे मोल फक्त तिच्या एका भावूक क्षणाने मातीमोल ठरवले ही कोणाच्या अकलेची दिवाळखोरी? चूक?कृती करणा-याची की त्या कृतीचे अशा शब्दात आकलन करणा-याची?

आंबेकर यांच्या या पोस्टवर अनेकांनी आंबेकरांच्या अब्रूची अक्षरश:लक्तरे काढलेली दिसून पडते.आंबेकरांनी अनेक उद्योजकांना व पत्रकारांना मोठ मोठे स्वप्न दाखवून पळ काढला होता,अशी टिका देखील याच पोस्टवर वाचायला मिळते.चाय बिस्कूटवाल्या पत्रकारांचीही चांगलीच अब्रू नेटक-यांनी वेशीवर टांगली.निवडणूकीच्या वेळी ‘पॅकेज’घेणा-या यादीतील चमूचीही आठवण या निमित्ताने करुन देण्यात आली.

आधी ’जय महाराष्ट्र’ चॅनल वरुन शेट्टीला लुबाडलं, मग ‘मी महाराष्ट्र’ मधून समृद्धी फाऊंडेशनला लुबाडलं,त्यानंतर निखिळ वागळे सोबत ‘महाराष्ट्र-1’ ला लुबाडलं,सगळं करुन झाल्यावर ‘मॅक्स महाराष्ट्र’च्या नावाने स्वत:चा तापा दाखवून फंड गोळा करताय…काम करु द्या बिचा-याला मालकाने पैसे बरोबर पोहोचवले,मालकाची पोळी खालली तर टाळी तर वाजवावी लागेल….!’असेही बोल आंबेकरांच्या पोस्टवर उमटले.

‘बेरक्या उर्फ नारद’या बेनाम,स्वत:ची ओळख लपविणा-या समाजमाध्यमकर्मींनी देखील या वादात उडी घेत एक अजबच पोस्ट व्हायरल केली.

Analyser न्यूजचे सुशील कुलकर्णी यांनी देखील आंबेकर यांच्या या पोस्टवर सडेतोड उत्तर देऊन,‘पिंजरा’ चित्रपटातील ‘कशी नशीबाने थट्टा आज मांडली’,असं म्हणायची वेळ आज महाराष्ट्राच्या माध्यम विश्‍वात आल्याचे सांगितले.जळफळाटाची वृत्ती इतकी बोकाळली की राम मंदिरावर कोणी बोलत असेल,भावूक होणार असेल तर त्यांच्या विषयी प्रचंड राग मनात भरलेला आहे.ज्ञानदा चव्हाण-कदम या १७ वर्ष एकाच वाहिनीवर काम करतेय.सरिता कौशिक या संपादक झाल्यामुळे ज्ञानदाला अयोध्येला जाण्याची संधी मिळाली,राजीव खांडेकर संपादक असते तर ज्ञानदाला अशी संधी मिळाली असती किवा नाही,सांगता येत नाही कारण, पुरोगाम्यांना अशी परवानगी देणं आवडत नसतं पण सरिता कौशिक नागपूरच्या आहेत म्हणून त्यांनी ही परवानगी दिली असेल,अशी स्पष्टोक्ती सुशील कुलकर्णी यांनी आपल्या व्हायरल व्हिडीयोमध्ये दिली.

ज्ञानदा या अयोध्येत राम मंदिराविषयीचे वार्तांकन करीत असताना भावूक झाली व सगळे तथाकथित पुरोगामी तुटून पडले ज्ञानदावर,त्यातील दोन नावे महत्वाची आहेत.यात समाजवादी,डावे,राधा कृष्ण नावात असणारे ही होते.टिचकुल्या मारणारे ही होते.हे डावे तर विचाराने इतके डावे असतात की त्यांना जगात उजवं काही चाललं आहे यावर विश्‍वासच बसत नाही.त्यांनीही तोंडसुख घेतलं.ज्या दोन माणसांनी ज्ञानदाच्या कर्तृत्वावर तोंडसुख घेतलं त्यातील एक ’आम्ही लढतो,रडत नाही’असे सांगतात.लढता कोणाशी?लोकांना नागवं दाखवून त्याला लढाई म्हणायची असेल तर त्याला लढाई म्हणत नाही.एखाद्या बेडरुममधले खासगी दृष्य आमच्या हातात सापडले म्हणून ते आम्ही दाखवतोय आणि बघा-बघा असा कसा नागवा आहे,अशी बोंब मारतात,याला जनतेची लढाई म्हणत नाही.(भाजप नेते किरीट सोमेय्या प्रकरण)

कोण कोणासोबत झोपतोय आणि कसा झोपतोय हे सांगण्याला लढणं म्हणत नाही,याला पार्श्वभागात काड्या करणं म्हणतात.अशा पार्श्वभागात काड्या करण्याची लढाई लढणारे आम्ही लढतोय, रडत नाही अशा वाहिनीचे रिपोर्टर दाखवत पोस्ट व्हायरल करतात की आम्ही लढतो रडत नाही आणि ज्ञानदाला ट्रोल करतात,अशी टिका सुशील कुलकर्णी करताना दिसून पडतात.

दूसरे एक महाभाग जे सांगतात,बरं झालं मी माझ्या आयुष्यात असे अँकर नाही घडवले.७८ चा अजाण बालक तू,तू ४५-४६ वयात आपल्या कारकीर्दीत बदलेल्या नोक-यांची आणि केलेल्या उद्योगाची बेरीज काढली तर ज्ञानदाच्या अनुभवा इतकी भरेल,कधी या वाहीनीत कधी त्या वाहीनीत जाणारे, ज्ञानदाने १७ वर्ष एकाच वाहीनीवर काम केलं आणि स्वत:ला घडवलं हे विसरतात.ज्या ज्या वाहिनीवर या महाभागाने काम केलं ते ते चॅनल बुडवणारे महाभाग आपल्याकडे असल्याचे खरमरीत उत्तर कुलकर्णी देतात.

तुम्हाला लढायचंच होतं रडायचं नव्हतं तर मोतेवारांच्या चॅनलमध्ये असताना जेव्हा ‘मी मराठी’च्या मोतेवारांना लोकांचे पैसे बुडविल्याचा आरोपात अटक झाली तेव्हा ज्यांचे पैसे बुडाले ते लोक रडत होते तेव्हा हे लढणारे लढत होते हे मोतेवार कसे चांगले आहेत हे सांगण्यासाठी का?असा प्रश्‍न त्यांनी केला.

या माध्यमातील ट्रोलधारकांपैकी काहींनी डांसबारवाल्याच्या चॅनलमध्येही नोक-या केल्या.ज्यांनी डांसबारमधून नाचणा-या पोरींनाही रडवलं आणि त्यांना नाचवणा-या माणसांनाही लढवलं,ते कोणत्या लढाईची गोष्ट करत आहेत?त्यांनी शहाणपणा शिकवावा?जेव्हा जमेल तेव्हा एखाद्या भांडवलधारकाची चाकरी करायची आणि नाही जमलं तेव्हा भांडवलशाही किती वाईट आहे याचा प्रचार करायचा!एखाद्याची भावना चांगली असते,ज्ञानदाला रामलला इतकी वर्ष तंबूत राहीले असे सांगताना त्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू तरळले,तेव्हा ज्ञानदाच्याही डोळ्यात अश्रू तरळले कारण तिच्या भावना जिवंत आहेत.ज्यांच्या भावना जिवंत असतात त्या जिवंतपणाचंच प्रतीक अश्रू बनून ओघळत असतात.

पण ज्ञानदाच्या आसवांमध्ये यांची गाथा मात्र पार भिजून गेली.ज्यांना भावना माहिती नाही,आसवं येणं माहिती नाही, ती सर्वोच्च अभिव्यक्ती आहे हे माहिती नाही,अशा माणसांच्या कोरड्या पाषाणांच्याकडे आसवं येणं साेडा,आसवांचा विचार देखील नसतो अशा कोरड्या लोकांकडूनच ज्ञानदाला ट्रोल केल्या जात आहे.आम्ही नक्कीच ‘एबीपी’ चॅनलने मांडलेल्या काही मतांच्या विरोधात बोललो आहोत,कोणी ज्ञानदाच्या चॅनलला एबीपी ऐवजी ‘बीजेपी’ चॅनल म्हणतं तर कोणी चाय-बिस्कूट पत्रकारिता म्हणतं,नक्कीच बोलतात मात्र ,चॅनलची अभिव्यक्ती आणि ज्ञानदाची अभिव्यक्ती यात नक्कीच फरक आहे.म्हणून ज्ञानदा आम्ही तुझ्यासोबत आहोत.घाबरायचं नसतं ज्ञानदा,ज्यांचं वयच ४५ वर्ष आहे आणि ज्यांच्या नोक-याच तुझ्या अनुभवा एवढ्या बदलल्या ते काय घडवणार आहेत कुठल्या माणसाला?हा जळफळाट आहे नुसता जळफळाट.‘काय सांंगशील ज्ञानदा?’म्हणत तुझ्या नावाने सोशल मिडीयावर जो डंका फिरला आहे ना त्याच्या विषयीचा हा जळफळाट आहे.

एक मुलगी १७ वर्ष एकाच वाहीनीत काम करते आणि आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवतेय याचा जळफळाट आहे.कुठल्या तरी मराठी वृत्त वाहीनीच्या महिला अँकरच्या कर्तृत्वाची छाप पडली अशी एक ज्ञानदा व दुसरी निखिला म्हात्रे यांची नावे घ्यावी लागेल.ज्ञानदा अँकर म्हणून मराठी मनांवर प्रस्थापित झाली आहे.तिच्या प्रतिष्ठेला कुठे तरी धक्का लागावा यासाठीची तळमळ आहे,ती कुठेच सापडली नाही म्हणून ज्ञानदाच्या आसवांवर बोलून तिला धक्का लावण्याचं काम चालू आहे.हे सगळे कदाचित उजवी,हिंदूत्ववादी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील.असतोच आपण हिंदूत्ववादी.मनातून असतो.जेव्हा रामलल्लाचा विषय येतो जेव्हा आपल्या कृष्णाचा विषय येतो,अशी आसवं तरळतातंच.आजही ‘निज रुप दाखवा ह’हे भक्तीगीत ऐकताना माझी आसवं तरळतातच.ते रडणं नसतं,ती अभिव्यक्ती असते आपल्या मनातल्या भावनांची.मात्र डोळ्यातून तरळणा-या आसवांना,रडणं समजणारे,लोकांना रडवणारे असतात आणि त्यामुळेच त्यांच्या अशा भावना झालेल्या असतात.तू काम करत राह,तू ज्ञानदा व्हावीस,यांच्यासाठी ज्ञान देणारी ठरावीस,हीच शुभेच्छा देतोत आणि या आसवात भिजलेल्यांना सांगतो,कोरडे व्हा रे लवकर कारण तूमचा मूळ स्वभावच कोरडे पाषाण,असा आहे….!

अयोध्येतील रामभक्त भावूक,ज्ञानदा कदमचेही डोळे पाणावले’हा व्हिडीयो २.५ लाख लोकांनी बघितला….!कुप्रसिद्धीतून प्रसिद्धी कोणाची झाली?एबीपी माझाचे एक कोटी २१ लाख सबस्क्राईबर्स आहेत,हे विशेष.

थोडक्यात,ट्रोलजीवींचा हा समाज माध्यमांवरील आटा पिटा कशासाठीही असला तरी हेच सांग ज्ञानदा..खरंच ती आसवे एका आस्थेच्या चरणी वाहीलेली अतिशय वैयक्तिक अभिव्यक्ती होती.त्या क्षणी ती भक्त आणि तिचा एक आराध्य दैवत, एवढीच स्पंदने जुळली होती,व्यक्त झाली होती.ती एखाद्या वृत्त वाहीनीवरील नावाजलेली अँकर असली तरी त्या काही क्षणांसाठी ती पूर्णत: एक भावविभोर भक्त झाली होती आणि यात माणूस म्हणून,स्त्री म्हणून मी कुठेही चुकले नाही…हेच सांग ज्ञानदा…!

दहांनी ट्रोल केले शंभरांनी सपोर्ट केले: सरीता कौशिक(संपादक,एबीपी माझा)

आम्ही खरे पत्रकार कोणत्याही कौतूकाला तसेच टिकेला महत्व देत नाही.ज्ञानदाने नेहमीसारखेच अयोध्येच्या वार्तांकनात तिचे बेस्ट दिले आहे.एवढ्या मोठ्या तिच्या कारकीर्दीत फक्त तिची आसवेच दिसणे,बघणे याला पत्रकारिता म्हणत नाही.या ही वार्तांकनासंबंधी पाच ट्रोलधारकांनी तिच्या विरोधात पोस्ट केल्या असल्या तरी तिच्या कर्तृत्वाचा आणि माणूस म्हणून तिचा सन्मान करणा-या शंभर पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत,हे कशाचे द्योतक आहे?ज्ञानदालाही मी हेच सांगितले,या घटनेच्या फार खोलात जायचं नाही कारण,या घटनेला ख-या पत्रकारितेच्या जगतात काहीही महत्व नाही.

जिवंत माणसाला श्रद्धा ही असणारच: श्‍यामबुवा धुमकेकर(ज्येष्ठ कीर्तनकार,नागपूर)

श्रद्धा जिथे असते मग ती देवतेविषयी असो किवा व्यक्तीविषयी,त्यांना ईजा झाली की मनाला यातना होणारच.ती बाब सजीव आहे की निर्जिव,त्याचा इतर कोणत्याही बाबीशी संबंध असो किवा नसो फरक पडत नाही.भगवान श्रीराम तर हिंदूंचे आराध्य दैवत आहे,यात लपविण्यासारखे काय आहे?त्या आराध्यप्रति भावूक होऊन आपली भावना उस्फूर्तपणे प्रकट करने यात ट्रोल करण्यासारखे काय होतं?कोणाचीही टिंगळ टवाळी करु नये, ही त्यांच्या आराध्याचीही शिकवण नाही का?मी तर म्हणतो मूळात हा विषय धार्मिक किवा राजकीय नाहीच.काँग्रेसच्या मनातही राम आहेच फक्त राजकीय सोयीतून ते आपली भावना प्रकट करत नाही,एवढंच.घरातील देवघरात ते श्रीरामाची पूजा करीत नाही का?ओट्यावर पाल बांधून श्रीराम ७० वर्ष राहीले,हे ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येणे स्वाभाविक आहे.स्त्री असल्यामुळे हळवेपणा असने ही निसर्गाचीच देणगी आहे.एखाद्या स्त्रीला ट्रोल करने हे कोणत्या तत्वात बसतं?धर्मात बसतं?रामाचा विरोध असू शकतो,विराेधात मत असू शकतात मात्र याचा अर्थ एखाद्या स्त्रीचाच विरोध करने हे स्वत: बाबासाहेब असते तर त्यांना तरी हे मान्य झालं असतं का?

जाता-जाता….
याच ट्रोलजीवींपैकी काहींनी एबीपी माझाच्या संपादक सरीता कौशिक यांना देखील त्यांच्या मराठी भाषेवरुन ट्रोल केले.आम्हाला पुणे-मुंबईची भाषा ऐकण्याची सवय आहे,ज्ञानदा शेवटी आपलीच आहे मात्र विदर्भाची भाषा…..!

सरीता कौशिक यांनी आपली अख्खी हयात अनेक नावाजलेल्या इंग्रजी दैनिकात प्रख्यात पत्रकार म्हणून काढली आहे.त्यांचे इंग्रजीवरील प्रभूत्व याची कल्पना पश्‍चिम महाराष्ट्राचा टेंभा मिरविणा-या आणि अस्सल वैदर्भिय भाषेची टिंगळ उडविणा-या कोडग्या मनाच्या ट्रोलधारकांना येणे शक्य नाही.मूळात,विदर्भ हा महाराष्ट्रात नागपूर कराराद्वारे समाविष्ट झाला हेच विदर्भाचे दूर्देव मानल्या जातं ते अश्‍या कोडग्या आणि स्वार्थी मनोवृत्तीमुळेच.

देशात १९५६ साली भाषावार प्रांतरचना झाली.तीन मराठी भाषिक असलेले मराठवाडा आणि विदर्भ हे प्रदेश हैदराबाद व मध्यप्रदेश या राज्यांमधून वेगळे करुन तत्कालीन दैभाषिक मुंबई राज्यास जोडले गेले.मराठवाडा मूलत:एक मराठी भाषिक प्रदेश असूनही १७२४ सालापासून तो हैदराबादच्या उर्दू भाषिक निझामी राज्यात समाविष्ट होता.त्याचप्रमाणे विदर्भ हा मराठी भाषिक प्रदेश देखील १९०३ सालापासून हिन्दी भाषिक मध्यप्रांतात(सेंट्रल प्रॉव्हिन्स)समाविष्ट होता.१९५३ साली विदर्भ,मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या काही नेत्यांची बैठक नागपूरात झाली.त्या बैठकीत मागास मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागांना विकासाच्या बाबतीत झुकते माप दिले जाईल अशा अर्थाचा ‘नागपूर करार’पार पडला.परंतु १९६० नंतर हा करार महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी पाळलाच नाही.३० एप्रिल १९९४ सोली मराठवाडा,विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रासाठी वैधानिक विकास मंडळे स्थापित झाली.डॉ.वि.म.दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन राज्य सरकारने १९८४ साली या तिन्ही विभागात एकूण अनुशेष किती हे निर्धारित करण्यासाठी समिती नेमली.त्यावेळी मराठवाडा २३.५६ टक्के,विदर्भ ३९.१२ टक्के तर उर्वरित महाराष्ट्र ३७.३२ टक्के असा एकत्रित अनुशेष तीन हजार१८६.७८ कोटींचा होता.

दांडेकर समितीच्या या अहवाला महाराष्ट्र सरकारने केराची टोपली दाखवली.यानंतर ही मंडळे स्थापित झाल्यावर पुन्हा या तिन्ही विभागांच्या अनुशेषाचे पुननिर्धारण करण्यासाठी भुजंगराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली अनुशेष-निर्देशक समिती १९९५ साली नेमली गेली.या समितीचा अहवाल २००० साली शासनास मिळाला.

या अहवालात अनुशेष १४ हजार ७ कोटी एवढा झाला होता.यात मराठवाडा २८.७७ टक्के,विदर्भ ४७.६० टक्के आणि उर्वरित महाराष्ट्र २३.६३ टक्के असे होते.महाराष्ट्राच्या राज्यपालांनी २००१ साली राज्य शासनाला आदेश दिले की २००२-२००३ या वर्षाच्या अंदाजपत्रकात विभागावर अनुशेषानुसार खातेनिहाय निधीची तरतूद केली जावी.तसेच पुढीच चार वर्षांमध्ये सिंचनाचा अनुशेष हा पूर्णपणे भरुन काढला जावा,आणि पुन्हा त्या चार वर्षाच्या काळात पुन्हा नवा अनुशेष निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी.परंतु,राज्यपालांचे आदेश तत्कालीन राज्य सरकारने पाळले नाहीत उलट,विदर्भ-मराठवाड्यातील सिंचनाच्या अनुशेषापोटीचा निधी,आणि वार्षिक अंदाजपत्रकीय निधी असे दोन्ही प्रकारचे निधी पश्‍चिम महाराष्ट्राकडे वळविण्यात आले,परिणामी २००७ साली मराठवाडा व विदर्भ यांचे सिंचन अनुशेष प्रमाणाबाहेर वाढले तर उर्वरित महाराष्ट्राचा सिंचन अनुशेष हा शून्यावर आलेला दिसला.

हा संपूर्ण भूतकाळ उगळण्यामागील कारण, पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय नेतेच नव्हे तर सर्वसाधारण जनतेमध्ये देखील विदर्भ,मराठवाडाविषयी,त्यांच्या भाषेविषयी,भाषेच्या उच्चारणाविषयी जो पूर्वग्रहदूषित दृष्टिकोण आहे,तोच आजतागत कायम आहे,हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ज्ञानदाला ती ‘आपलीच’ आहे असे सांगून, नागपूरच्या सरीता कौशिक यांना मुंबईत एका लोकप्रिय मराठी वाहीनीत प्रतिष्ठेचे पद मिळाल्यामुळे कसा पोटशूल उठतो, हेच अधोरेखित करणारा आहे.

……………………………………………………

(व्हिडीयो सौजन्य: यूट्यूब/एबीपी माझा)

(व्हिडीयो सौजन्य: यूट्यूब/ Analyser न्यूज/सुशील कुलकर्णी)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *