उपराजधानीराजकारणव्यापार- वाणिज्य

विकासाचे विकेंद्रीकरण हा ‘ॲडव्‍हांटेज विदर्भ’चा होता उद्देश : नितीन गडकरी

खासदार औद्योग‍िक महोत्‍सव – ॲडव्‍हांटेज विदर्भ’चा थाटात समारोप

नागपूर, २९ जानेवरी २४: विकासाचे विकेंद्रीकरण करणे हा ‘ॲडव्‍हांटेज विदर्भ’ चा मुख्‍य उद्देश होता. त्‍या काही प्रमाणात सफल झाला असून पुढील वर्षी प्रत्‍येक जिल्‍ह्याचे स्‍वतंत्र दालन उभारून तेथील उद्योगांना स्‍थान देण्‍यात येईल. त्‍यामुळे प्रत्‍येक जिल्‍ह्यात विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केला.

असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट (एड) च्‍यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून आयोजित तीन दिवसीय खासदार औद्यो‍गिक महोत्‍सव – ॲडव्‍हांटेज विदर्भ या विदर्भातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचा आज सोमवारी थाटात समारोप झाला.

राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या प्रशासकीय इमारतीच्‍या भव्‍य परिसरात झालेल्‍या या कार्यक्रमाला राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री ग‍िरीश महाजन, खा. रामदास तडस, खा. कृपाल तमाने, आ. मोहन मते, अॅड. सुलेखा कुंभारे, मेट्रो सीएमडी श्रावण हर्डीकर, अर्थतज्‍ज्ञ आनंद राठी, गोयल गंगा ग्रुपचे अतुल गोयल, उद्योगपती सुरेश शर्मा यांच्‍यासह एडचे पदाधिकारी मंचावर उपस्‍थ‍ित होते.

विदर्भात गुंतवणूकदार यावे, मोठ्या प्रमाणात, गुंतवणूक व्‍हावी, येथील उद्योगाचा विकास व्‍हावा, त्‍यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्‍हावा, या उद्देशाने या महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर उद्योजक, मंत्री, विविध संस्‍थाचे अध्‍यक्ष व गंतवणूकदार यांनी या महोत्‍सवाला भरभरून प्रतिसाद दिल्‍याबद्दल नितीन गडकरी यांनी सर्वाचे आभार मानले.
अॅडव्‍हांटेज विदर्भमुळे विदर्भाची ताकद तर कमजोरी लक्षात आली. कमजोरीवर काम करून त्‍याचे ताकदीमध्‍ये परिवर्तन करण्‍याचे प्रयत्‍न केले जातील, असा विश्‍वास व्‍यक्‍त करत पुढील आणखी मोठ्या प्रमाणात महोत्‍सव आयोज‍ित केला जाईल, असे नितीन गडकरी म्‍हणाले.

ॲडव्‍हांटेज विदर्भच्‍या यशस्‍वीतेसाठी असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे; उपाध्यक्ष प्रणव शर्मा आणि गिरधारी मंत्री; सचिव डॉ.विजय शर्मा; कोषाध्यक्ष राजेश बागडी व सदस्य राजेश रोकडे, निखिल गडकरी, डॉ.महेंद्र क्षीरसागर, प्रदीप माहेश्वरी, प्रशांत उगेमुगे, रवींद्र बोरटकर यांचे सहकार्य लाभले.

आशीष काळे यांनी तीन दिवसीय या महोत्‍सवाबद्दल माहिती देताना यात यशस्‍वी स्‍टार्टअप, 250 हून अधिक स्‍टॉल, सर्व आकाराच्‍या इंडस्‍टीचा सहभाग राहिला. विदर्भात इंडस्‍ट्रीसाठी इकोसिस्‍टीम असल्‍याचे या महोत्‍सवातून लक्षात आले. अनेक सामंजस्‍य करार झाले. नितीन गडकरींचे व्हिजन आणि आमच्‍या प्रयत्‍नांचे हे यश आहे, असे ते म्‍हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. राजेश रोकडे यांनी आभार मानले.
…..
रामचरण ग्रुप व सियानमध्‍ये सामंजस्‍य करार
महोत्‍सवाच्‍या तीन दिवसांमध्‍ये अनेक सामंजस्‍य करार करण्‍यात आले. समारोपीय सत्रात त्‍यात आणखी एका कराराची भर पडली. रामचरण ग्रुप ऑफ चेन्‍नई व सियान नागपूर यांच्‍यात ‘टेक्‍नॉलॉजी ट्रान्‍सफर फॉर सीओटू’ संदर्भात सामंजस्‍य करार करण्‍यात आला. रामचरण ग्रुपचे कौशिक पलिचा व सियान अॅग्रोचे निखिल गडकरी व सारंग गडकरी यांनी यांनी या करारावर स्‍वाक्षरी केली.
……
‘व्हिजनरीज् ऑफ विदर्भ’ चे थाटात प्रकाशन
विदर्भाच्‍या मातीत उद्योग सुरू करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणा-या व विदर्भाचे नाव मोठे करणा-या ‘व्हिजनरीज् ऑफ विदर्भ’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन समारोपीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

‘व्हिजनरीज् ऑफ विदर्भ’ मध्‍ये विदर्भातील ३५ आघाडीचे उद्योजक, व्यावसायिकांच्‍या तसेच, ५ स्टार्टअप्स यांच्‍या यशोगाथांचा समावेश करण्‍यात आला आहे. यात नागपुरातील विको, सोलर इंडस्ट्रीज, हल्दीराम, बैद्यनाथ, इन्फोसेप्ट यासह ग्रामहित, टीसेकंड सारख्या स्टार्टअप्सचाही समावेश आहे. याशिवाय, विदर्भातील अन्य जिल्हे जसे अकोला येथील पडगीलवार इंडस्ट्रीज,रुहाटिया ग्रुप; मलकापूर येथील चैतन्य ग्रुप; खामगाव येथील विकमशी फॅब्रिक, अमरावती येथील प्लास्टी -सर्ज इंडस्ट्री; चंद्रपूरचे मल्टिऑर्गनिक्स; यवतमाळ चे ग्रामहित अश्या उद्योगांच्‍या यशोगाथा वाचायला म‍ि‍ळतील. या सर्व उद्योजकांचा नितीन गडकरी यांच्‍या हस्‍त सत्‍कार करण्‍यात आला. कॉफी टेबल बुक संदर्भात डॉ. विजय शर्मा यांनी माहिती दिली.
……
‘ॲडव्‍हांटेज विदर्भ’ रोजगार निर्मितीचे व्‍यासपीठ ठरेल : देवेंद्र फडणवीस

‘ॲडव्‍हांटेज विदर्भ’ मध्‍ये चांगल्‍या चर्चा झाल्‍या, उत्‍पादने प्रदर्शित झाली, सुंदर स्‍टार्टअप बघायला म‍िळाले, अनेक सामंजस्‍य करार झाले. विदर्भाचे औद्योग‍िकरण व्‍हावे, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी याकरीता आयोज‍ित करण्‍यात आलेला हा महोत्‍सव मैलाचा दगड ठरलेला आहे, असे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले. या महोत्‍सवामुळे विदर्भाची उद्योग क्षेत्रातील जमेची बाजू बाहेरच्‍या लोकांना लक्षात आली असून विद्यार्थ्‍यांना दृष्‍टी देणारा हा महोत्‍सव ठरला आहे. पहिल्‍याच वर्षी झालेल्‍या या यशस्‍वी आयोजनामुळे भविष्‍यात ‘ॲडव्‍हांटेज विदर्भ’ रोजगार निर्मितीचे मोठे व्‍यासपीठ ठरेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
…….
विदर्भाची उद्योगातील ताकद कळली : गिरीश महाजन
खासदार औद्योगिक महोत्‍सव – ॲडव्‍हांटेज विदर्भमुळे नागपूर, विदर्भातील उद्योगांची ताकद कळली असल्‍याचे मत पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. इतर राज्‍यांच्‍या तुलनेत महाराष्‍ट्र पर्यटनदृष्‍ट्या मागासलेला असून सर्वसमावेश पर्यटन धोरण आखल्‍यास देशविदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येईल. पर्यटन वाढल्‍याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल व पर्यटन व्‍यवसायाला बळकटी म‍िळेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *