उपराजधानीनागपूर मनपामुक्तवेध

मध्य नागपुरातील एकमेव उद्यानाचा बळी! “सत्ताधीश”ऑन द स्पॉट

सोखता भवनाचे मुद्दामून केले डम्पिंग यार्ड

वाणिज्यिक इमारतीच्या प्रस्तावात गौड बंगाल

गांधीबाग उद्यान बचाव समितीच्या सदस्यांचा खळबळ जनक आरोप

गांधीबाग उद्यानातील मंदिर झाली ओपन जागा!

आधीच उद्यान अपुरे: हक्काचा पश्चिम कोपरा नाही देणार: महिलांचा एल्गार

उद्यानातील ग्रीन जिमचे हाल बेहाल

उद्यान पण.. केटरिंगचे सामान!

नि:शुल्क पार्किंग का नाही? नागरिकांचा सवाल

लोटस कल्चरल नेमके कुणाचे?

उद्यानाच्या आत बेकायदेशीर कार पार्किंग

संतांचा पुतळा बाहेर महापुरुष आत!

पत्रकारिता झाली “काँग्रेसी”

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,१५ फेब्रुवरी २०२४: मध्य नागपुरातील एकमेव गांधीबाग उद्यानामध्ये व्यापारी संकुलाच्या बांधकामाला नागरिकांचा प्रचंड विरोध होत असून, या उद्यानाचा पश्चिमी कोपरा असणाऱ्या व सोख्ता भवनच्या मागच्या संरक्षक भिंतीला लागून असलेला ६३ हजार ३०० पेक्षा जास्त चौरस फूट जागा या प्रस्तावित व्यापारीक संकुलाला देण्यास प्रचंड विरोध होत असल्याचे आढळून येत आहे. यासाठी तेथील नागरिकांनी गांधीबाग उद्यान बचाव संघर्ष समितीची स्थापना केली असून, आजूबाजूचे व्यापारी हे देखील या मोहिमेत उस्फुर्तपणे सहभागी झालेले आढळून आले.

गेल्या शतकात महात्मा गांधी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी श्रमदान करून मध्य नागपूरमध्ये या उद्यानाच्या निर्मितीचे कार्य हातात घेतले आणि या उद्यानाला “गांधी”बाग असे नाव दिले अशी किवंदती आहे मात्र,आता या उद्यानावर काही राजकीय नेत्यांची वक्रदृष्टी पडल्याचा संताप संघर्ष समितीच्या सदस्यांनी खास “सत्ताधीश” कडे व्यक्त केला. स्वातंत्र्य सैनिक, लेखक, साहित्यिक आणि नागपूरकरांसाठी एक महान विभूती असणारे सोख्ता यांच्या स्मृती प्रित्यर्थ गांधीबाग उद्यानामध्येच सोख्ता भवन उभारण्यात आले.विशेष म्हणजे आजही या भवनाची इमारत ही अतिशय चांगल्या स्थितीत असून याच इमारतीची डागडुजी व रंगरंगोटी करून उपयोगात आणण्या ऐवजी मुद्दामून गेल्या अनेक वर्षांपासून डंपिंग यार्ड बनवण्यात आल्याचा आरोप संघर्ष समितीचे सदस्य करतात आता बगीचेचा लँड युज म्हणजे उपयोगिता वापर न बदलता हे सांस्कृतिक भवन पाडून ९ मजली व्यापारी संकुल बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. यासाठी मंत्रालयातून परवानगी घेण्यात आली. उद्यानाचा उपयोगीता वापर न बदलता उद्यानाची ६७ हजार चौरस फूट जागा या व्यापारी संकुलामध्ये समाविष्ट करून नऊ मजली इमारत बांधली जाणार आहे.

उद्यानाच्याच जागेत एकेकाळी सोख्ता भवन बांधण्यात आले असताना ते परत उद्यानासाठीच उपयोगी न आणता , सोख्ता भवन पाडून या ठिकाणी व्यापारी संकुल बनवण्याचे प्रयत्न २००३ पासूनच सुरू झाल्याचे येथील नागरिक सांगतात. ६,७०० चौरस फुटांमध्ये वसलेले सोख्ता भवन याची उपयोगिता बदलून इथे व्यापारी संकुल निर्माण करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्यात आली. त्याचवेळी येथील नागरिकांनी या योजनेचा प्रचंड विरोध केल्याने ही योजना काही काळ स्थगित ठेवण्यात आली मात्र,अचानक २०१६ मध्ये सोख्ता भवनाची ६,७०० फूट या जागेमध्ये गांधीबाग उद्यानाची आणखी ६८ हजार ३६० चौरस फूट जागा समाविष्ट करून नऊ मजली व्यापारी संकुल बांधण्याचा घाट घालण्यात आला. २०१८ मध्ये नागपूरचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे आणि माजी नगरसेवक रमण पैगवार यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्यात आले त्यामुळे, पुन्हा काही काळ ही योजना बारगळली मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे पुन्हा या जागेवर ६८ हजार ३००८ चौरस फूट बगीचा उद्यानामध्ये २,८९२,२२० वर्ग मीटर निर्माण कार्य करण्याची योजना तयार करण्यात आली आणि निविदा बोलवण्यात आली! “सिविल फेसिलेशन”च्या नावावर नगररचना विभागाची यासाठी परवानगी प्राप्त करण्यात आली.सार्वजनिक बगीच्या मध्ये व्यापारीक संकुल निर्माण करण्याच्या या प्रयत्नांवर स्थानिक नागरिक आणि दुकानदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही योजना राबविताना येथील नागरिकांचे, दुकानदारांचे कोणतेही मत घेण्यात आले नाही किंवा जी सार्वजनिक सूचना प्रसिद्धीस देण्यात आली ती फक्त एका मराठी आणि इंग्रजी दैनिकात देण्यात आल्याचा आरोप पैगावार यांनी केला. हा संपूर्ण भाग हिंदी भाषिक असल्यामुळे इथे मराठी किंवा इंग्रजी वृत्तपत्र येत नसल्याचे त्यांनी सांगितले.सर्वात महत्त्वाचे म्हणजे २००३ मध्ये फक्त ६,७०० चौरस फूट जमीन शासनाने सांस्कृतिक भवन बनवण्यासाठी मंजूर केली असताना २०१३ मध्ये “वर्ग फूटची” जागा “वर्ग मीटर” मध्ये परिवर्तित करण्याची आली असा आरोप येथील नागरिक करतात. ही जमीन नागपूर सुधार प्रन्यासने महानगरपालिकेला फक्त उद्यानासाठी हस्तांतरित केली होती, त्यामुळे बगीच्या च्या आत सोख्ता भवनाच्या आड कोणतेही व्यावसायिक संकुल बांधले जाऊ शकत नाही,असे नागरिकांचे म्हणणे आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या अनेक भाषणात शहराच्या प्रत्येक प्रभागांमध्ये, खेळण्याचे मैदान आणि उद्यानांचा विकास यावर भर दिला असताना आणि उच्च न्यायालयाने अनेकदा पर्यावरण या विषयावर प्रशासन आणि शासनाला धारेवर धरले असताना, मध्य नागपुरातील एकमेव उद्यानात हे व्यापारीक संकुल बांधून कोणाचे हित साधले जात आहे?असा सवाल येथील नागरिक करतात. मध्य नागपूर हे सर्वाधिक प्रदूषित भाग असल्याचे संघर्ष समितीचे सदस्य सांगतात. चारही बाजूने येथे सतत वाहनांची वर्दळ असते.अशा वेळेस या उद्यानामुळेच येथील नागरिकांना शुद्ध पर्यावरण मिळतं ,असे सांगतात. एका हिरव्यागार उद्यानाला नागरी सुविधा केंद्र आणि व्यापारी संकुल मध्ये परिवर्तित करण्यासाठी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने कोणत्या आधारावर मंजुरी प्रधान केली? असा सवाल करून, हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद असल्याचा आरोप कृती समितीचे सदस्य करतात.

एकेकाळी गांधीबाग उद्यान हे अतिशय वैभवशाली ठिकाण होते. पन्नास वर्षांपूर्वी या उद्यानातील तरणतालमध्ये पोहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असे.त्याकाळी हे एकमेव तरणताल होते असे येथील नागरिक सांगतात. हळूहळू तरणताल बंद करण्यात आले. तरणताल शेजारी चेंजिंग रूम होती. हिरवीगार झाडे आजही आहेत. त्या झाडांना पन्नास,शंभर वर्षापेक्षाही जास्त वर्षांचा इतिहास असल्याचे येथील नागरिक सांगतात. लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी कारंजे सुरू करण्यात आले, त्याची देखील अवस्था अतिशय दयनीय आहे. यानंतर नागपूरकर जनतेच्या पैशांचा सौंदर्यीकरणच्या नावाखाली जो चुराडा झाला तो अतिशय उद्विग्न करणारा आहे. ग्रीन जिम मधले तर सगळे यंत्र हे तुटले आहेत. गांधीबाग उद्यानाच्या वैभवासाठी, स्वच्छतेसाठी,सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांनी प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नसल्याचा आरोप येथील नागरिक करतात.

माजी महापौर असलेले,त्यांनी त्यांच्या कन्येचा साखरपुडाच काही महिन्यांपूर्वी भव्य प्रमाणात याच उद्यानात साजरा केला.त्यावेळी उद्याना च्याअगदी आतपर्यंत चार चाकी गाड्यांचा रांगा लागल्या होत्या. उद्यान ही सार्वजनिक मालमत्ता असताना माजी महापौरांनी त्याला खाजगी मालमत्ता समजून त्याचा चुकीचा वापर केला असा आरोप येथील नागरिकांनी केला.

उद्यानाच्या फाटकासमोर “लोटस कल्चरल” या कंत्राट दाराला पार्किंग साठी कंत्राट देण्यात आले असून विशेष म्हणजे उद्यान समोर पार्किंग ही नागरिकांसाठी नि:शुल्क असायला हवी मात्र, महिन्याकाठी लाखोचे वारेन्यारे होत असून, हे कंत्राट नेमके कोणत्या नेत्याने आपल्या “शुभचिंतकाला” दिले आहे आणि त्याद्वारे महिनाकाठी तो नेता किती लाखांचे वरेण्यारे करतो हे गांधीबाग परिसरातील प्रत्येक नागरिकाला माहिती असल्याचा दावा येथील नागरिक करतात. चार चाकी वाहनांसाठी तासाला वीस रुपये घेतले जात असल्याचे “ऑन कॅमेरा”कंत्राटदाराचा माणूसच सांगत आहे. याचा अर्थ दिवसभरामध्ये किती शे दुचाकी आणि किती चार चाकी या ठिकाणी पार्क केली जाता असावी याचा अंदाज येतो.

उद्यानाच्या आतमध्ये केटरिंग चे सामान ठेवण्यात आलेले आह. हे उद्यान नागरिकांच्या सुविधेसाठी आहे की कंत्राटदारांचे सामान ठेवण्यासाठी? असा प्रश्न येथील नागरिक करतात. स्वच्छतेचा अभाव, कचऱ्यांसाठी सोयी सुविधांचा अभाव,लहान मुलांसाठी अपुरी खेळणी, प्रशासनाचे दुर्लक्ष, ठळकपणे अधोरेखित करतात. या उद्यानात वर्धमान नगर पासून तर फार लांबच्या परिसरातील नागरिक देखील योगा करण्यासाठी, फिरण्यासाठी येत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या उद्यानाला आणखी सोयी सुविधा मयुक्त करून आणि याचे क्षेत्रफळ आणखी मोठे करण्याची गरज असताना, या उद्यानाचा पश्चिम कोपराच हा लाटल्या जात आहे ते ही वाणिज्य संकुलासाठी, यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. येथील नागरिकांनी बॅडमिंटन खेळण्यासाठी ओबडधोबड असलेली जमीन स्वतः समतोल केली. “सत्ताधीश”ने त्यांच्यासोबत संवाद साधला असता, कधी पाईपलाईन साठी तर कधी विजेच्या लाईन साठी आम्ही कष्टाने समतोल केलेली जमीन वारंवार खणली जाते अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. काहीही झाले तरी हे आमचे हक्काचे खेळाचे ठिकाण आहे. सोख्ता भवन पाडून व्यापारी संकुल बांधण्यासाठी आम्ही ही जागा देणार नसल्याचा इशारा त्या क्रीडा प्रेमींनी दिला.

सिंधी बांधवांचे आराध्य भगत कंवरराम या स्वातंत्र्य सैनिक यांचा पुतळा गांधी बाग उद्यानाच्या बाहेर बसविण्यात आला आहे.सिंधी बांधवांनी गांधी बागेत हा पुतळा बसवण्याची प्रशासनाला वारंवार विनंती केली होती. लेखी निवेदन दिले होते मात्र, तरी देखील गांधीबागच्या फाटकाच्या बाहेर संत कंवरराम यांचा पुतळा बसवण्यात आला मात्र, महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर गांधीबाग उद्यानाच्या आतमध्ये शेकडो चौरस फूट जागा वापरून राष्ट्रीय स्वयंसंघाचे संस्थापक डॉ.बळीराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या भव्य प्रतिमा बसवण्यात आल्या. यासाठी अनेक फूट जागेवर किल्ल्यासारखी प्रतिकृती उभारून सौंदर्यकरण करण्यात आले. महापुरुषांविषयी स्थानिकांना आदर आहे मात्र,संत कंवरराम यांच्या पुतळ्याला उद्यानाच्या बाहेर आणि हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमांना भव्य स्वरूपात उद्यानाच्या आत मध्ये प्रस्थापित केल्यामुळे, येथील सिंधी बांधवांच्या मनात प्रशासनाच्या आणि राजकीय नेत्यांच्या विरोधात चांगलाच रोष आढळून येतो.

महानगरपालिकेचे गांधीबाग झोनचे कार्यालय सोख्ता भवनात अनेक वर्ष होते मात्र, हे कार्यालय महालात हलविण्यात आले. सध्या सोख्ता भवनाला अवकळा आली असल्याचे प्रसिद्ध केले जाते मात्र, यात तथ्य नसून मनपा प्रशासनाने काही राजकीय नेत्यांचा “कू “हेतू साध्य करण्यासाठी या भव्य सांस्कृतिक इमारतीचे डम्पिंग यार्ड मध्ये रूपांतर केल्याचा आरोप गांधीबाग उद्यान बचाव संघर्ष समितीचे सदस्य करतात. या जागेवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने जप्त केलेल्या हात ठेल्यांसह इतर साहित्य हेतू पुरस्सर आणून टाकण्यात आले. सोख्ता भवन हा गांधीबाग उद्यानाचाच एक भाग आहे. हे भवन अद्यापही अतिशय उत्तम स्थितीत आहे. त्यामुळे इथे उद्यानात येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी क्रीडा संकुल बांधावे, येथील तरणताल पुन्हा सुरू करण्यात यावे आणि सोख्ता भवनाला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी ही मनपा प्रशासन आणि राज्य सरकारने स्वीकारावी अशी मागणी येथील नागरिक करतात.

या उद्यानामध्ये पश्चिम कोपऱ्याला लागून शिव, हनुमानाचे मंदिर आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावामध्ये ही मंदिराची जागा “ओपन लँड” दाखवण्यात आली असा धक्कादायक आरोप रमण पैगवार यांनी केला.

एकूण २८ हजार ९२२ चौरस मीटर क्षेत्रफळात व्यापारी संकुलाचे बांधकाम होणार असून, या प्रकल्पामध्ये तीन तळघर राहणार आहे. या ठिकाणी पार्किंगचे नियोजन केले जाणार आहे. यामध्ये २८३ चार चाकी ५६६ दुचाकी आणि ५६६ सायकल पार्किंगची क्षमता असणार आहे. या प्रकल्पामध्ये सातव्या माळावर ६०० आसन क्षमतेच्या सामाजिक सभागृहाचे बांधकाम नियोजित आहे. या प्रकल्पाची बांधकामाची किंमत २०७. ९८ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. आणि प्रकल्प बांधकामाचा कालावधी तीन वर्ष असणार आहे.

महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांना गांधीबाग उद्यान बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी निवेदन दिले मात्र, आयुक्तांनी मनपाला आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी वाणिज्य संकुलांची गरज असल्याचे सांगितले, असा दावा कृती समितीच्या सदस्यांनी केला. मनपा आयुक्त हे नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी पदावर बसले आहे की राजकीय नेत्यांच्या दबावाखाली स्वाक्षऱ्या करण्यासाठी असा देखील संताप नागरिकांनी व्यक्त केला.मनपा आयुक्तांना महापालिकेचे उत्पन्न वाढवायचे असल्यास याच परिसरात जवानांचे वसतिगृह असून एवढ्या मोठ्या वसती गृहात फक्त दहा-बारा जवान राहतात त्या वसतिगृहाचे पुनर्बांधकाम करून मनपाला भरघोस आर्थिक उत्पन्न मिळू शकतं असे देखील एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले.डिझाईन, बिल्ट ऑपरेट अँड सेल हे धोरण मनपाने उत्पन्न वाढीसाठी ठरवले असल्याचे रमण पैगवार यांनी सांगितले.

“सत्ताधीश”ने उद्यानात आलेल्या नागरिकांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला असता, एकाने ते “मोदी जी के साथ है” असे चमत्कारिक उत्तर दिले!पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि महाराष्ट्राच्या उपराजधानीतील मध्यवर्ती भागातील एक उद्यानाच्या प्रस्तावित वाणिज्य संकुलाचा काय संबंध आहे? याचे उत्तर मात्र ते सद्गृहस्थ देऊ शकले नाही. पंतप्रधान, राज्यातील सत्ता आणि ज्या महानगरपालिकेचे हे उद्यान आहे त्या नगरपालिकेत गेल्या पंधरा वर्षापासून ज्यांची सत्ता आहे,ज्या नगर रचना विभागाने उद्यानाचा उपयोगिता वापर बदलून उद्यानातच चक्क ९ मजली व्यापारी संकुलासाठी प्रस्ताव मंजूर केला तो नगरचना विभाग, महानगरपालिका, हे राज्य आणि केंद्र यामध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे या सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे,एवढंच साधर्म्य मोदी आणि उपराजधानीतील या घडामोडी मध्ये आहे. आज जरी महानगरपालिकेतील नेते हे माजी नेते किंवा माजी नगरसेवक झाले असले तरी, सत्तेचे अनिर्बंध अधिकार हे कधीही “माजी “होत नसतात, अशी बोचरी टीका या उद्यानातील एका ज्येष्ठ नागरिकांनी केली.

महत्त्वाचे म्हणजे “सत्ताधीश” गांधीबाग उद्यानामध्ये वार्तांकन करीत असताना काँग्रेस कडून बदनामी करण्यासाठी चित्रीकरण केले जात असल्याची टीका कानावर आदळली! पत्रकारिता ही निरपेक्ष असते याचे भान टीका करणाऱ्यांना नसावी. पत्रकारीता ही काँग्रेसची किंवा भाजपची किंवा कोणत्याही राजकीय पक्षाची नसते ती “निरपेक्ष” असते याचे भान ,भीती पसरविण्याचा, कोणाचा तरी चुकीचा हेतू साध्य करू पाहणाऱ्याला नव्हतेच, खोटे वृत्त पसरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा दुर्देवी प्रयत्न या प्रसंगी अनुभवास आला!

अनेक नागरिकांनी “सत्ताधीश” सोबत बोलताना सायंकाळी अंधार पडल्यावर गांधीबाग उद्यानात कुटुंबीयांसह येऊ शकत नसल्याची धक्कादायक माहिती सांगितली! पाच रुपये तिकीट असे शुल्क देऊन नागरिकांना सकाळी नऊ वाजता नंतर या उद्यानात प्रवेश दिला जातो. नऊ वाजता पूर्वी येथे नागरिकांना प्रवेश मोफत आहे. मात्र, रात्री अंधार झाल्यानंतर पाच रुपयाचे पन्नास रुपये दर हे येथे येणाऱ्या जोडप्यांसाठी आकारला जातो! या उद्यानाच्या पश्चिम भागाला जो पश्चिम भाग नवीन व्यापारी संकुलाला जोडल्या जाणार आहे पूर्णतः अंधारात आहे! या ठिकाणी कंत्राटदाराने हेतुपुरस्सर वीज बंद करून ठेवलेली आढळते. यामागे आर्थिक गौडबंगाल असल्याचे आरोप अनेक नागरिकांनी केला. “सत्ताधीश”ने या आरोपाचा पाठपुरावा करण्यासाठी रात्री अंधारलेल्या पश्चिम भागात फेरफटका मारला असता यात तथ्य आढळले. अंधारातील प्रत्येकच झाडाझुडपात जोडपी ही अश्लील कृत्यामध्ये दंग होती! महत्त्वाचे म्हणजे काल व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस साजरा होत असताना उद्यानाच्या मुख्य द्वारावर खुर्च्या टाकून एक पुरुष आणि दोन महिला पोलीस कर्मचारी हे कर्तव्य निभावत बसले होते मात्र, उद्यानाच्या पाठीमागच्या भागात अतिशय अंधारलेल्या भागात प्रेमाच्या नावाखाली अक्षरश: अश्लील चाळे सुरू होते, त्याच्याशी या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना काहीही घेणं देणं नव्हतं. या ठिकाणी सायंकाळी इतवारी, वर्धमान नगर पासून तर मध्य नागपुरातील अनेक भागातून अनेक कुटुंब लहानग्यांना उद्यानातील खेळ सामग्रीवर खेळण्यास आणतात मात्र, अनेकांनी “ऑन कॅमेरा” बोलण्यास नकार देत, चुकून ते या उद्यानात अंधार पडल्यावर पश्चिम भागातील त्या अंधारलेल्या भागात कुटुंबीयांसह जात नसल्याचे सांगितले!’सत्ताधीशने’ अंधारात जो व्हिडिओ शूट केला त्यामध्ये काही जुळतील नकळत चित्रबद्ध झाली.नशीब, हेडगेवार, गोवळकर गुरुजी आणि संत महात्मे यांची त्या दिशेने पाठ आहे!

गांधीबाग मधील सोख्ता भवन उभारणीला होणारा विरोध हा केवळ राजकीय विरोध आहे असे माजी महापौर दया शंकर तिवारी यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले. सोख्ता भवनातील नवीन बांधकामाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीच मंजुरी दिली होती. त्यावेळी जो प्रस्ताव होता तो आजच्या काळाप्रमाणे वाढविण्यात आला. हा प्रस्ताव १९९७ पासून अडकला होता.२०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बीओटी तत्वावर बांधकामास परवानगी दिली.त्या रचनेत सुधारणा करून उद्यान वाचविण्यासाठी भव्य प्रस्ताव तयार करण्यात आल्याचा दावा दया शंकर तिवारी यांनी केला.तेव्हा १२५ आसनी सभागृह बांधले जाणार होते आता ते ७५० आसनी बांधले जाणार असल्याचे ते म्हणाले. आज १.८० लाख चौरस फूट जागा पार्किंगसाठी निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे परिसरातील पार्किंगची समस्या दूर होणार आहे. बॅडमिंटन कोर्ट, जिम, क्रीडा क्षेत्र,व्यावसायिक जलतरण तलाव अशा आधुनिक सुविधा देखील या प्रकल्पात उपलब्ध करून दिल्या जातील. हा प्रकल्प जनतेच्या हिताचा असल्याचा दावा माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला.

मात्र,मध्य नागपुरातील एकमेव उद्यान असलेल्या गांधीबाग उद्यानामध्ये व्यापारी संकुल उभारण्याच्या निषेधार्थ गांधीबाग उद्यान वाचवा संघर्ष समितीच्या सदस्यांनी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सोपवले व या संकुलाचा विरोध केला. आमदार विकास ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थिती संघर्ष समितीचे निमंत्रक अतुल कोटेजा,माजी नगरसेवक रमण पैगवार यांच्या नेतृत्वाखाली राजाची लाटे यांच्यासह अनेक पर्यावरण प्रेमींनी महानगर महानगरपालिका आयुक्त चौधरी यांची भेट घेतली. इतवारी गांधीबाग संकुलातील हे एकमेव उद्यान असल्याचे शिष्टमंडळाने आयुक्तांना सांगितले. गजबजलेल्या परिसर असल्याने गांधीबाग संकुलात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून त्यामुळे येथील रहिवासी व दुकानदारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अशा स्थितीत या उद्यानाचा विस्तार करणे आवश्यक आहे परंतु, या उलट हे उद्यान अधिकाधिक लहान करून मोठ्या भागात व्यापारी संकुल सुरू करण्याचा घाट घालण्यात आला, असे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. काँक्रिटीकरणाला जनता विरोध करीत आहे. सोख्ता भवन जीर्ण अवस्थेत असेल तर ते पाडून तेथे क्रीडा संकुल स्केटिंग रिंग व लहान मुलांसाठी इतर उपक्रम उभारावेत असे पर्यावरण प्रेमीचे मत आहे. नाममात्र दरात जलतरण तलावाची दुरुस्ती करून कार्यान्वित करता येईल जे येथील नागरिकांसाठी सोयीचे असेल,अशी मागणी शिष्ट मंडळाने केली आहे.

शहरातील पर्यावरण प्रेमींचे लक्ष माध्यमात प्रसिध्द होणाऱ्या गांधी बाग उद्यान विषयीच्या वृत्तामुळे या व्यापारिक संकुलात बळी पडणाऱ्या असंख्य हेरिटेज झाडांकडे वळले असून, लवकरच ही झाडे वाचवण्यासाठी कायदेशीर पावले उचलण्याची ग्वाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दिली जाताना दिसून पडते.

शिष्टमंडळात रमण पैगवार राजाबाबू चिलटे पिंटू बागडी सुनील गुलगुलवार आशिष दीक्षित वसीम खान गजानन भिसीकर अतिक कुरेशी पापा मेरा राजवंसारी पुरुषोत्तम गोरकर अबूतकर खान अनमोल व्यास लक्ष्मीनारायण चड्डा सुभाष बहुरिया रवी पराते सोनी हरियाणी व नसीब अनवर प्रकाश साळुंखे अरुण वाडीकर दिलीप गांधी प्रकाश बांदे डॉक्टर प्रमोद चिंचखेडे प्रशांत बोर्डे अण्णाजी राऊत गंगाधर बांदेकर सुकेश निमजे अरुण पारडीकर सुनील पडोळे रमेश ठाकरे नारायण पुणेकर रवी गौड विजय ताजणे धर्म पाटील दिलीप कानपूरकर निजाम अन्सारी नफीस अहमद सुनील दहिकर हरीश कुंडले इत्यादी अनेक पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

……………………………………………………………

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *