नागपूर मनपाराजकारणशैक्षणिक

भाजपच्या ‘नमो’ युवा संमेलनात एनएसयूआयचा राडा

पोलिसांची झटापट :पाच विद्यार्थी जखमी: काँग्रेस विद्यार्थी परिषदेच्या पदाधिका-यांचा आरोप

रातुम विद्यापीठात लागले प्रशासनाच्या मुर्दाबादचे नारे 

शैक्षणिक परिसरात राजकीय कार्यक्रमावर होता आक्षेप

नागपूर,ता.४ मार्च २०२४: भारतीय जनता युवा मोर्चाचे ‘नमो’युवा संमेलन’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बजाजभवन परिसरात आज दिनांक ४ मार्च रोजी आयोजित करण्यात आले.शैक्षणिक परिसरात भाजपच्या राजकीय कार्यक्रमाला परवागनी देण्यात येऊ नये यासाठी अखिल भारतीय काँग्रेसच्या विद्यार्थी परिषदेने अशी मागणी कुलगुरु यांच्याकडे निवेदन देऊन केली होती.विद्यापीठ कायदानुसार शैक्षणिक परिसर राजकीय कार्यक्रमांसाठी उपलब्ध करुन देता येत नाही मात्र,सध्या नागपूरच नव्हे तर राज्यपातळीवर व संपूर्ण देशातच एका प्रकारच्या भीतीचे (थ्रेट) वातावरण निर्माण करण्यात आले असून, प्रशासन सत्ताधा-यांच्या विरोधात काहीही करण्यास धजावत नसल्याचा आरोप एनएसयुआयच्या पदाधिका-यांनी केला.त्यामुळेच गेल्या तीन दिवसांपासून सतत विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊन,घेराव घालून,आंदोलन करुन देखील आज भव्य स्वरुपात संपूर्ण विद्यापीठ परिसरात भाजपचा राजकीय कार्यक्रम पार पडला.दूपारी दोन ते तीन वाजता दरम्यान एनएसयुआयसह विविध संघटनांचे विद्यार्थी कार्यक्रमस्थळी पोहोचले व त्यांनी कुलगुरुंचा घेराव केला.परिणामी पोलिसांनी आंदोलनकारी विद्यार्थ्यांची धरपकड केली,बळजबरीने त्यांना अटक केली,यात काही विद्यार्थी जखमी झाले,ज्यांच्यावर मेडीकलमध्ये उपचार सुरु असल्याचे एनएसयुआचे पदाधिकारी अजित सिंग यांनी सांगितले.

आज विद्यापीठाचा संपूर्ण परिसर भाजपचे झेंडे,भाजपच्या नेत्यांच्या मोठमोठ्या कटआऊट्स यांनी सजला होता.भव्य डोम,लाखो खुर्च्या हा संपूर्ण तामझाम बघून कुलगुरुंना जाब विचारण्यासाठी विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यक्रमस्थळी पोहोचले.नागपूरच्या इतिहासात हे पहीले कुलगुरु आहेत ज्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तर न देता पोलिसांना पाचारण केले,असा आरोप आंदोलनका-यांनी केला.

कुलगुरुंना भेटू नये यासाठी युवा काँग्रेस व विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या.त्यांना अटक करण्याचे आदेश होते,असा दावा आंदोलनकर्ते करतात.कुलगुरु हे, भाजपचा हा कार्यक्रम व्यवस्थापन समितीच्या निर्णय प्रक्रिये अंतर्गत होत असल्याचे सांगतात.यासाठी विद्यापीठाला विकास निधी प्राप्त झाल्याचे कुलगुरुंनी सांगितले.रातुम विद्यापीठ आर्थिकरित्या इतकी असक्षम झाली आहे की राजकीय कार्यक्रमातून चंदा जमा करण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे?असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.

शैक्षणिक परिसरातील राजकीय पक्षाचे झेंडे काढ्ण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली यावर कुलगुरुंनी आपली असमर्थता जाहीर केली.आंदोलनकर्ते आपल्या मागणीसाठी आक्रमक होताच पोलिसांनी कारवाई करत युवा काँग्रेस,एनएसयूआई,शिवसेना उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी शरद पवार गट,आम आदमी पार्टी,वंचित बहुजन आघाडी तसेच नागपूर विद्यापीठ छात्र संघाच्या पदाधिका-यांना अटक केली.याप्रसंगी पोलिसांसोबत झालेल्या झटापटीमध्ये संघटनेच्या काही पदाधिकारी व विद्यार्थी जखमी झाले.

आंदोलनकर्ते यांनी आरोप केला आहे की रातुम विद्यापीठाचे कुलगुरु हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याकडून प्रेरित नसून भाजपा व सावरकरांची भाषा बोलत आहेत.भाजपतर्फे देण्यात येत असलेले दिशानिर्देशांचे कुलगुरु अनुकरण करीत आहेत.कार्यक्रमस्थळी ज्या गाड्यांवर भाजपचे झेंडे लागले होते केवळ त्याच गाड्यांना विद्यापीठाचे अधिकारी व सुरक्षा रक्षक आत सोडत होते.हा राष्ट्रसंतांचा अपमान असल्याची टिका त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरात आले असून त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारामध्ये
दरवर्षी दोन कोटी युवांना रोजगागर देण्याची हमी दिली होती.त्याच धर्तीवर नागपूर विद्यापीठात याच ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात ‘नमाे रोजगार मेळाव्याचे’आयोजन पार पडले होते.त्यात लाखो युवांचा डेटा गोळा करण्यात आला मात्र, फक्त काहीच युवांना रोजगार देण्यात आला.शहरभर मात्र ११ हजार युवांना रोजगार देण्याचे व आभार प्रकट करणारे फलक झळकविण्यात आले.ज्यांना रोजगार देण्याचा दावा करण्यात आला त्यांना त्यांच्या शिक्षण व पदवीच्या अनुषंगाचे रोजगारच मिळाले नसल्याचा आरोप, एनएसयूआयच्या पदाधिका-यांनी केला.ही संपूर्ण धुळफेक असून दूर्देवाने भाजपच्या या कटात रातुम नागपूर विद्यापीठ देखील सहभागी झाले असून विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ मांडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

जोपर्यंत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर कुलगुरु देणार नाही ताेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
……………………………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *