महाराष्ट्रमुक्तवेधविदर्भ

माऊली तुझ्या दरबारी बारा कुटूंबांच्या डोळ्यात गोदावरी!

(रविवार विशेष)

२०१७ पासून शेगाव संस्थान परिसरातील १२ दूकानदारांच्या दूकानासमोर बॅरिकेट्स!

मुख्य व्यवस्थापकांची नीतीमत्ताशून्य वर्तवणूक: १२ दूकानदारांमुळे मुख्य प्रवेशद्वार ही भाविकांसाठी केले बंद!

अरुंद प्रवेशद्वारातून हजारो भाविक घेतात मंदिरात प्रवेश

२०१२ पासून दूकानदार-व्यवस्थापकांमधील वादाला मिळाली आहे न्यायालयात स्थगिती

माऊलींच्या प्रकट दिनानिमित्त २०१७ मध्ये दूकानांसमोर लावलेले बॅरिकेट्स आजपर्यंत हटवले नाही!

भाविकांनी त्या १२ दूकानातून सामग्री खरेदी करु नये म्हणून सेवकेरींची चमू राहते उभी!

पुरातत्व विभागाने काळ्या दगडाची वास्तू आपल्या अखत्यारितीत घेऊ नये म्हणून संगमरवरी दगडात केले समाधीस्थळाला बंदिस्त!

नव्या व्यवस्थापकांनी बाजूला इतर धर्मियांचे पूजास्थळ असल्याचा व भाविकांना शांतता राखण्याचे लावले फलक

भाविकांना केलेल्या आवाहनावर समाज माध्यमात टिकेचा सूर

शेगाव संस्थान प्रदीर्घ न्यायालयीन लढाईत खर्च करत आहे भाविकांचाच पैसा

पंतप्रधान कार्यालयाच्या पत्रालाही दाखवली केराची टोपली!

डॉ.ममता खांडेकर
(Senior journalist)

नागपूर,ता.१८ मार्च २०२४ : संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्यावर श्रद्धा नसेल असा भक्त जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही.अकोल्या जिल्ह्यातील शेगाव येथील श्री गजानन महाराजांचं मंदिर ही विदर्भाची पंढरीच मानली जाते.अश्‍या या पंढरीत गेल्या सात वर्षांपासून म्हणजे २०१७ पासून मंदिर परिसरातील १२ दूकानदारांवर जणू मंदिराच्या विश्‍वस्तांनी उघड-उघड बहीष्कार टाकला असून, त्यांच्या दूकानांसमोर लोखंडी बॅरिकेट्स लाऊन ठेवण्यात आले आहे!इतकंच नव्हे तर भाविकांनी चूकूनही त्यांच्या दूकानातून सामग्री खरेदी करु नये यासाठी त्या ठिकाणी सेवेकरींचा अहोरात्र पहारा देखील असतो.मंदिराचे विश्‍वस्त म्हणा किवा व्यवस्थापक म्हणा त्यांनी या बारा दूकानदारांवर पर्यायाने त्यांच्या कुटूंबियांवर जी अघोषित आर्थिक आणिबाणि लादली आहे त्यातून ‘माऊली तुझ्या दारी बारा दूकानदारांच्या कुटूंबियांच्या डाेळ्यात गोदावरी’म्हणायची वेळ आली आहे.

ज्या गजानन माऊलींनी त्यांच्या उभ्या हयातीत भेदाभेद पाळला नाही.दुखी,कष्टी जिवांचा उद्धार केला,१८ व्या शतकात माऊलींचे अवतार कार्य झाले असले तरी तीन शतकानंतर देखील त्यांचाप्रति भक्तीभावात कुठेही भक्तांच्या श्रद्धे मध्ये खंड पडला नाही,अशा माऊलींच्या समाधीस्थळी दूकानदार आणि व्यवस्थापकांमधील कायदेशीर वादातून, अंगातच पाटीलकी असणारे व्यवस्थापक हे शिरजोर झालेत आणि त्यांनी चक्क या बारा दूकानदारांच्या विरोधात आक्रमक,गैरकायदेशीर आणि असंवैधानिक पवित्रा घेतला, इतक्या वर्षांपासून मंदिर परिसरात असणा-या दूकानातून प्राप्त होणा-या अर्थाजणाची कोंडी करुन ठेवण्यात आली.

हे कोणत्याही नीतीमत्तेत बसत नाही,भारताचा संविधान त्यांना अश्‍या वागणूकीची परवानगी देत नाही.न्यायालयाने देखील त्यांना अश्‍या स्वरुपाचे कोणतेही आदेश दिले नाहीत.त्यांच्यातील हा वाद २०१२ सालापासून न्यायालयात स्थगित आहे,याचा अर्थ मंदिराच्या व्यवस्थापकाला या १२ दूकानदारांना अर्थाजणच करु द्यायचे नाही,असा होत नाही.मंदिरातर्फे त्यांचा ‘लीगल सेल‘ हे न्यायालयात जरी खटला लढत असली तरी त्याचा खर्च हा मंदिराच्या व्यवस्थपनातूनच होत आहे आणि हा पैसा भक्तांचा आहे,यात वाद नाही.इतकी वर्ष न्यायालयात खटला सुरु असणे हे आर्थिक दृष्टिने कमकुवत असणा-या दूकानदारांनाही मुळीच परवडणारे नाही.मूळात हा वाद आपापसात समजुतीतून निकाली काढल्या जाऊ शकत असताना,त्याला न्यायालयीन वळण देणे व पुढे ‘माणूसकीच्या नीतीमत्तेत’ कुठेही न बसणारी व्यवस्थापकीय हूकूमशाही गाजवणे,याचे समर्थन माऊलींचा कोणताही भक्त करुच शकत नाही.

पाटील-देशमुखांचा वाद माऊलींनीच सोडवला होता.श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करणा-यांना ते मुखोद् गत आहे.असे असताना मंदिराचे आताचे व्यवस्थापक  यांना २०१२ पासून एक तप उलटले तरी दूकानदार व संस्थेमधील वाद सोडवता का नाही आला? माऊलींनी हरी पाटलांसोबत कुस्ती खेळून त्यांचे गर्व हरण केले होते.या गरीब दूकानदारांनी नीलकंठ पाटील या सध्याच्या व्यवस्थपकाचे किवा त्यांचे पूत्र हरी पाटील यांचे गर्व हरण करण्यासाठी नेमके काय करावे?असा सवाल समाज माध्यमात उमटला आहे.निसंगदिग्धपणे मंदिराचे व्यवस्थापन,स्वच्छता,दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या सुविधेत व्यवस्थापकांचे कार्य हे कौतूकास्पद आहे.अहोरात्र झटणारे हजारो सेवेकरींचे नि:स्वार्थ श्रम यांनी माऊलींच्या ख्यातीला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवले मात्र,असे असले तरी याच मंदिरातील बारा दूकानदार गेल्या सात वर्षांपासून तीळतीळ जळत आहेत,कोणत्याही भावना नसणा-या लोखंडी बेरिकेट्सकडे असहायपणे बघत बसले आहे.दररोज दूकाने उघडतात आणि बंद करुन निघून जातात.दिवसभरात एक ही भाविक त्यांच्या दूकानापर्यंत पोहोचू नये यासाठी अतिशय निष्ठूरपणे मंदिराच्या व्यवस्थपकांनी व्यवस्था रचून ठेवली आहे.जी महाराजांच्या भक्तांना मुळीच रुचणारी नाही.

मंदिर परिसरातील ७० ते ८० दूकानांपैकी नेमकी याच १२ दूकानदारांना अवैधरित्या लोखंडी बेरिकेट्सच्या मागे डांबून ठेवण्यात आले.चूकून कोणी भाविक त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो तर सेवकरी त्यांना दूसरीकडून वळून जाण्याचा सूचना करतात!गेल्या सात वर्षांपासून हे दूकानदार आज ही ’जय गजानन’म्हणून आपापली दूकाने उघडतात आणि रात्री ‘जय गजानन’म्हणूनच आज ही बंद करतात.एक पैसाचाही त्यांचा धंदा होत नाही तरी देखील ती कोणती अदृष्य शक्ती आहे जी त्यांना न्याय-अन्यायाची ही लढाई सुरु ठेवण्यास प्रेरित करते?

या संस्थेसाठी शंकरराव पाटील यांनी आपली अख्खी हयात घालवली.आज शेगावच्या मंदिराचा जो काही अभिमानास्पद डोलारा उभा आहे त्या मागे शंकरराव पाटलांची दूरदृष्टि,करुणामयी मन आणि नैतिकतेचा कारभार हा आहे.त्यांच्यानंतर त्यांचाच मुलगा नीलकंठ पाटील (वारसा हक्काने या पदावर बसता येत नाही)त्या पदावर बसले. कायद्यानुसार या साठी धर्मादाय आयुक्तांची सहमतीने देखील त्यांनी घेतली असावी मात्र,त्यांच्या हातात कारभार आल्यावर वडीलांच्या पुण्याईतून ,माऊलींच्या दरबारात येणा-यांना जी माणूसकीची मिळकत मिळतेय त्यावर बोळा फिरविण्यात आल्याचे या घटनेतून उघड होतं.

महत्वाचे म्हणजे १२ वर्ष झाले तरी न्यायालयातून कोणतेही आदेश मिळत नसल्याने या दूकानदारांनी चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला निवेदन दिले!तात्काळ याची दखल घेऊन पीएमओच्या कार्यालयातून मंदिर संस्थानाच्या नावे पत्र आले व त्यात ‘रिमूव्ह द बेरिकेट्स’अशी स्पष्ट सूचना दिली आहे मात्र,तरी देखील याची कोणतीही दखल ‘न्यायालयात खटला सुरु आहे,लीगल मॅटर आहे’इत्यादी वेळकाढू सबबीखाली, पंतप्रधान कार्यालयाच्या त्या पत्राला मंदिर संस्थानाने चक्क केराची टोपली दाखवली!

(छायाचित्र : पंतप्रधान कार्यालयातून मिळालेले उत्तर ’रिमूव्ह द बेरिकेड्स’तरीही….!)

रेंट कंट्रोल अधिनियमाप्रमाणे दोन्ही बाजू नियमानुसार ऐकण्याची सूचना करुन न्यायालयाने २०१२ साली या प्रकरणात स्थगिती दिली आहे.त्यात या दूकानदारांच्या दूकानांसमोर लोखंडी बेरिकेट्स लाऊन त्यांची वर्षानुवर्ष आर्थिक कोंडी करा,असा कुठलाही आदेश नसताना मंदिर व्यवस्थपकांनी असे हे ‘अमानवीय‘धोरण कुठल्या अधिकाराने उचलले?त्यांच्या लीगल सेलकडे याचे काय उत्तर आहे?हे त्यांच्या संवैधानिक,नैतिक व मौलिक अधिकाराचे हनन नाही का?मूळात न्यायालय किवा कागदापत्री लढाईपेक्षा आमोरासमोर बसून निदान लाखोंचे श्रद्धास्थान असणा-या गजानन महाराजांसाठीतरी तोडगा काढता आला नाही का?महाराजांचे अवतार कार्य संपले आहे त्यामुळे महाराज पुन्हा सदेह हरी पाटलांचे गर्वहरण करण्यासाठी प्रत्यक्षात येऊ शकत नाही मात्र,त्यांच्याच समाधीस्थळावर बारा दूकानदारांवर अशी ही अवस्था आणल्या जात असेल तर, माऊलींच्या ह्दयालाही वेदना होत असेल,यात शंका नाही.ती सर्वांची माऊली आहे.दिन दुखितांची,पापी-पुण्यवंतांची,कोणावरही माऊलींची माया आटू शकत नाही,खंडू पाटलावरी बाळंट आले ते माऊलीनी नासिले,हीच भक्तीभावनेची कास धरुन नीलकंठ पाटलांनी या १२ दूकानदारांना आपला गर्व बाजूला सारुन अर्थाजन करु द्यावे.हीच माऊलीच्या ख-या भक्ताची निशानी आहे.

महत्वाचे म्हणजे हा वाद सोशल मिडीयावरही चांगलाच चर्चिला जात आहे.अनेकांनी यावर दूकानदारांच्या बाजूने कमेंट्स केले आहे. आपल्या प्रगाढ श्रद्धास्थानी बारा दूकानदारांवरील अशी ही अरेरावी कोणत्याही भक्ताला रुचणारी नाही.मग यात संस्थेच्या लीगल सेलचे काहीही मत असो.कायदेशीर लढाई ही कायद्याने लढायची असते.अशाप्रकारे पदाचा आणि बळाचा वापर करुन जगातील काेणतीही लढाई जिंकता येत नाही.विद्यमान जगतात रशिया-यूक्रेनचे युद्ध याचे ज्वलंत उदाहरण आहे.बलशाली रशिया वर्ष उलटले तरी एवढ्याशा देशाला आपल्या अधीन करु शकला नाही. दरवर्षीप्रमाणे फेब्रुवरी २०१७ मध्ये महाराजांचा प्रकट दिवस शेगावातील या संस्थानात खूप भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला.प्रकट दिवसाचे निमित्त करुन या दूकानदारांच्या दूकानांसमोर लोखंडी बेरिकेट्स लावण्यात आले,ते अद्याप काढण्यात आले नाही,हा बळाचा आणि पदाचाच गैरवापर गरीब दूकानदारांवर करण्यात आला मात्र,त्यांनी देखील अद्याप हार मानली नाही.

(छायाचित्र : मंदिराची पुरातन वास्तू ,पुरातत्व विभागाने आपल्या अधिपत्याखाली घेऊ नये म्हणून जी आता पूर्णत: संगमरवरी करण्यात आली!)

शंकरराव पाटील हयातीत असताना ते संस्थेसंबंधी कोणताही निर्णय घेताना ग्रामसभेत विचार विमर्श करायचे.त्यांना दोन मुले असून एक मुलगा संस्थेचे इंजिनियर कॉलेजचे व्यवस्थापन बघत असतो तर दूसरा मुलगा हे मंदिराचे व्यवस्थापन बघतात.संस्थेच्या समितीवर एकूण १२ सदस्य आहेत.पिढी बदलली तसा कारभार ही बदलला.भक्तांच्या देणग्यासंबधी वाद सर्वदूर असला तरी शेगाव संस्थानात गैरवापरचा मुद्दा सध्या तरी गैरलागू आहे.माहितीच्या अधिकारात याबाबत माहिती मिळविली जाऊ शकते.मात्र,कधी नव्हे तो हिरव्या रंगाचा एक लक्षवेधी फलक मंदिर परिसरात झळकतोय!

मंदिराशेजारी अन्य धर्मियाचे धार्मिक स्थान असल्याने भाविकांनी शांतता ठेवावी.हा फलक मंदिरात येणा-या लाखो भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.काही तरुणांनी त्याचे छायाचित्र समाज माध्यमावर पोस्ट करुन,अन्य धर्मियांच्या धार्मिकस्थळामध्येही,‘शेजारी जगप्रसिद्ध संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचे संस्थान असल्याने शांतता राखावी’असा फलक का लावला नाही?असा प्रश्‍न विचारला जात आहे.पिढी बदलली की विचार बदलतो,कारभार बदलतो हे खरे असले तरी,श्रद्धा बदलू नये हेच खरे.

सर्वात महत्वाचे म्हणजे या संस्थेच्या व्यवस्थापकांनी या १२ दूकानदारांना येनकेन प्रकरणे जेरीस आणण्यासाठी काय करावे?तर त्यांनी मंदिराचे भव्य असे जुने प्रवेश दारच बंद करुन ठेवले आहे!परिणामी हजारो भाविकांना दररोज फेरा मारुन अरुंद अश्‍या प्रवेश दारातूनच मंदिरात प्रवेश करावा लागत आहे.एकीकडे शेजारील अन्य धर्मियांच्या श्रद्धाळूंना त्रास होऊ नये असा फलक ठलकपणे व तितक्याच दर्शनीस्थानी लावणा-या व्यवस्थापकांनी, आपल्याच धर्माच्या हजारो श्रद्धाळूंच्या गैरसोयीच्या विचार करु नये,ते ही १२ दूकानदारांना वठणीवर आणण्यासाठी,याला काय म्हणावे?

या विषयी अधिक माहिती जाणून घेतली असता १८ व्या शतकातील अतिशय पुरातन मंदिर हे पुरातत्व खात्याच्या अख्त्यारितीत जाणार हे समजल्याने राज्य शासन तसेच पुरातत्व विभागाशी कोणताही विचारविमर्श या ऐतिहासिक अश्‍या वास्तूची रचनाच बदलण्यात आली!संगमरवरी दगडांचा उपयोग करुन या मंदिराला आधुनिक स्वरुप प्रदान करण्यात आले.याची देखील चौकशी झाली पाहीजे,अशी मागणी केली जात आहे.

‘सत्ताधीश’ने शेगाव संस्थानाविषयी समाजमाध्यमांवर उमटलेल्या विविध प्रतिक्रिया तसेच या बारा दूकानदारांच्या बाबत मंदिराचे व्यवस्थापकांचे गेल्या सात वर्षांपासूनचे ‘अमानवीय’ धोरण याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी मंदिराचे व्यवस्थापक नीलकंठ पाटील यांच्या ७२६५२५२६३८ तसेच त्यांचा मुलगा हरी पाटील यांच्या ७६६६१४६१५६ या क्रमांकावर संपर्क साधला असता,प्रतिसाद मिळाला नाही.यानंतर ९४२२१००८६५ या क्रमांकावरुन ‘सत्ताधीश’सोबत संपर्क साधण्यात आला.हा क्रमांक प्रसिद्धी प्रमुख संतोष अढाव यांचा होता. त्यांना या संपूर्ण बाबींबाबत विचारणा केली असता, अकोल्यातील दैनिक सकाळचे संदीप भारंबे यांना हे संपूर्ण प्रकरण माहिती असल्याचे चमत्कारिक उत्तर त्यांनी दिले!‘सत्ताधीश’चा या माहितीशी काय संबंध?अशी विचारणा केली असता,आमचा लीगल सेल तुमच्याशी उद्या संपर्क साधेल,असे उत्तर त्यांनी दिले.

या उत्तरानंतर अकोला तसेच शेगावमधील सूत्राच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेतली असता,शेगावमधील संस्थानाचा हा कारभार तेथील झाडून पुसून सर्व पत्रकारांना माहिती आहे मात्र,काही पत्रकारांनी दूकानदारांची बाजू प्रसिद्ध करण्यास नकार दिल्याचे कळले!एका सुप्रसिद्ध हिंदी दैनिकाचा वार्ताहर,मंदिरातील नळावर गोमाता पाणी पित असल्याचे वार्तांकन करीत असताना या दूकानदारांनी ,त्यांचीही व्यथा मांडण्याची विनंती त्या वार्ताहराला केली असता,संस्थानाकडून त्यांना ‘पाकिट’मिळतं,तुमच्याकडून काय मिळणार?असे धक्कादायक उत्तर दिल्याची बाब समोर आली!

पत्रकारितेचा हा स्तर बघता या क्षेत्रातील काही पत्रकारांनी पत्रकारितेच्या मूल्याला कश्‍याप्रकारे पाकिटासाठी वारांगणेच्या कोठ्यावर नेऊन बसवल आहे,याची पुन्हा एकदा प्रचिती आली…..!

मंदिरातील १२ दूकानदारांपैकी एक असणारे पिडीत दूकानदार रत्नदीप तुळशीराम सोनवणे यांचा संपर्क क्रमांक-९६६९६४५३८९
……………………………….
(खुलासा- उद्या शेगाव मंदिराच्या संस्थानाच्या लीगल सेल कडून त्यांची बाजू कळविल्यास ‘सत्ताधीश’त्यालाही ठलकपणे प्रसिद्धी देण्यास कटीबद्ध आहे.)

…………………………………..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *