उपराजधानीमुक्तवेध

चैत्रबहर…

(मुक्तवेध)

[शाम पेठकर]

कोकिळेचा बडा ख्याल, छोटा ख्याल आळवून ती गायला सुरुवात करते, तेव्हा चैत्र आला असतो… चाफा आरक्त होत मूकपणे बोलू लागला असतो, तेव्हा चैत्र प्रकटला असतो… आंब्याचा मोहोर लाजलाजून फळला असतो, तेव्हा चैत्र अवतरित झाला असतो. मुग्ध तळ्याकाठी पाण्याच्या तरंगात ती हरवली असताना तो येतो आणि तिचे डोळे आपल्या हाताने झाकतो; त्याचे उष्ण श्वास तिचे गाल आरक्त करतात आणि तो विचारतो, “ओळख कोण ते?” तेव्हा चैत्र तिच्या बंद डोळ्यांतून आत आत पाझरत असतो… निरागस मर्यादापुरुषोत्तम शीतल चंद्रासाठी हट्ट करतो, तेव्हा चैत्र सर्वांगांनी बहरलेला असतो…

ऋतू आणि मासांचे असे येणे आणि कळ्यांची कूस उजवून फुलांचे उमलत जाणे, माणसाची पाकळी न् पाकळी उमलविणारे असते. पहारेकरी म्हणून लावण्याच्या गाली एखादा गर्दरेशमी तीळ असावा, तसे चैत्राच्या ओंजळीत लपून जाईल असा वसंत निनादत असतो. ऋतू आणि मासाचा असा देखणा संयोग क्वचितच जुळून यावा. वसंताला रंगांचं वेड असतं आणि चैत्राला गंधाची बेहोशी आलेली. या दिवसांना दवभरल्या हिवातील गर्भरेशमी हिरवी लव वेढून असते. प्रत्येक ऋतूची फुलं असतात. फुलांचे तर सारेच ऋतू असतात; पण चैत्रामध्ये पानांचीही फुलं होतात आणि फुलांचीही फळे होतात. हे दिवसच असे प्रसन्न, तृप्त, आकंठ आळसावलेल्या गर्भारशिणीसारखे असतात. पंखांवर आभाळ तोलणारे पक्षी सुरेल तानांवर या दिवसांमध्ये ढगांना नाचवितात. चैत्राच्या स्वागतासाठी कोकीळकरीने तरुशिखरांवर वर्षा राग आळवायला प्रारंभ केला की, मग चैत्रपूर्व पावसाचं अनोखं तांडव सुरू होतं. वेडे लोक म्हणतात, पाऊस बेमोसम आला आहे. पण खरं सांगू, ऋतूंच्या परवानगीशिवाय वृक्ष सावलीही धरत नाहीत… चैत्र येतो आणि अवघ्या जीवनाचा बगिचा करून टाकतो. मूर्तिमंत लावण्यमय कमनीयता म्हणजे चैत्र. मनाच्या परसदारी ज्यांना बाग फुलविता येतो, ते या दिवसांत चिरसौंदर्याचे वरदान मिळवू शकतात आणि सौंदर्याला वृद्धत्वाचा शाप नसतो! सौंदर्याचे कुठले तट किंवा बेटंही नसतात. या दिवसात मन निरभ्र करून एखाद्या कुब्जेनेही शांत तळ्याच्या आरस्पानी पाण्यात आपलं रूप न्याहाळलं, तर ती देखील सुंदरच दिसेल. चैत्र म्हणजे सौंदर्याचा परीसच!

खूप दिवस बंद असलेले एखादे अस्ताव्यस्त घर एखाद्या सुग्रणीच्या हाती दिले, तर ती ज्या लगबगीने घर नीटनेटके करण्यासाठी धावपळ करेल, आणि तिची ती धावपळही मोठी देखणी असेल… तसेच वर्षभराचा अनर्गल पसारा आवरण्यासाठी चैत्र इतक्या अनावरपणे कामी लागतो आणि त्याच्या धावपळीतूनही सुरेल कमनीयता जागोजागी सांडत असते. चैत्राचे असे सांडलेले क्षणही वेचले तरी जिवांचा मोरपिसारा व्हावा. चैत्राचा वासंतिक हात अलवारपणे फिरत जातो. सृष्टी मग बहुरूपी होते. एक एक चित्र मग रूप पालटू लागते. झाडांची पाने गर्द केशरी नाजूकपण पांघरतात. फुलांच्या ओंजळीची देखील फुलं होतात. आभाळाच्या भाळी मग चैत्र दिव्यत्वाचा शेला मढवून देतो! चैत्र म्हणजे एक मोठा सौंदर्यवेत्ताच. सौंदर्याचं तत्त्वज्ञान शिकविण्यासाठी चैत्राला शरण जावं. आयुष्यातलं सौंदर्य हरवलं की, माणूस करंटा होतो. सौंदर्याची लालसा नव्हे, तर सौंदर्याची पूजा करायची असते. सौंदर्याची गाणी नव्हे, तर आरती म्हणायची असते. मगच विश्वाचे आर्त एखाद्या ज्ञानियाच्या मनी प्रकाशते. चैत्र सौंदर्याला तेजाचं वरदान देतो. सौंदर्याची विविध रूपं दाखवितो. बहुअंगांनी मग सौंदर्य प्रकट होतं. हे सारं सारं टिपता आलं पाहिजे. काही करंट्यांना मग ‘सौंदर्यमेह’ होतो.

चैत्र गाणार्‍या पाखरांच्या पायात चाळ बांधतो आणि हे करंटे चाळांच्या झंकारांवरून त्या पक्ष्यांचा माग काढतात. त्या वेड्यांना कुणी सांगावं की, पक्षी पिंजर्‍यात अडकविला म्हणजे गाणं हरवतं! सौंदर्यवतीला बंधनात अडकविलं म्हणजे सौंदर्यावर सत्ता नाही गाजविता येत… पण हे कळत नाही. सौंदर्याला लालसेची काजळी चढते. चैत्र आपल्याला उजळण्याचं वरदान द्यायला आलेला असतो आणि आपण मात्र जळून कोळसा होतो. ‘मीच सुंदर’ हे ज्याला कळतं त्याच्या आयुष्याला झळाळी येते. स्वातंत्र्य हेच सौंदर्याच्या शाश्वततेचं गमक आहे; पण आपण मात्र स्वत:लाच आपल्या लालसेच्या तुरुंगात अडकवून घेतो. मनाच्या मोहोराला ‘मी’पणाची काजळी फासतो. दूरवर गाणार्‍या वेड्या पाखराच्या तानांमध्येही सौंदर्य असतं; भल्या पहाटे नादमय प्रवाहित होणार्‍या सरितेतही सौंदर्य असतं; शेतातल्या डहाळीवर आलेल्या पहिल्यावहिल्या फळातही सौंदर्य असतं; पण आपण थरथरणार्‍या फुलजड डहाळीवरचे फूल खुडून घेतो आणि इतरांसाठी मात्र उघडंबोडकं, कंगाल देठ ठेवतो. अशाने नाजूकपण कोमेजतं, हळुवार ज्योत विझून जाते. आयुष्याचा असा अंधार आपणच ओढविला असतो. चैत्र ‘मी’चं आकाश करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण मात्र भुकेच्या पिंजर्‍यात अडकून बसतो. कुण्या अज्ञाताच्या दिव्य हातांनीच या विश्वातला कण अन् कण प्रकाशला आहे, हे सत्य चैत्र सांगतो अन् आपण मात्र प्रत्येक श्वासागणिक ‘मी आहे म्हणूनच सारे आहे’चा अट्टहास आळवीत असतो.

चैत्र, विश्वाचे दान तुमच्या उदरी टाकणारा दिव्यमास आहे. पण त्यासाठी सौंदर्यभाव कळला पाहिजे. मन निर्गुण, निर्विकार करता यायला हवं. मग चैत्राचाही कर्ता करविता तुमच्या उदरात वाढू शकतो. चांदण्यांची फुलं अन् फुलांचं चांदणं करत चैत्र अवतरतो. म्हणूनच त्याच्या कुशीत दिव्यपुरुष अवतार घेतात. आपल्या कर्माने नीतीचं सौंदर्य आणि बळाचं सामर्थ्य रूढ करणारे अवतार मग चैत्रातच का, हा प्रश्न पडण्याचं तसंही काही कारण नाही. सौंदर्याचा आदर करणं हे पुरुषाचं सामर्थ्य असतं आणि त्याची राखण करणं हाच खरा पुरुषार्थ असतो, हे चैत्र-अवतारांनी दाखवून दिलं आहे. सौंदर्यप्रेम, भक्ती आणि सौंदर्यलालसा यातील फरक चैत्र-अवतारांच्या कार्याने दाखवून दिला आहे. सौंदर्यलालसेपोटी एका पुरंध्रीला सातासमुद्रापल्याड पळवून नेणारा सौंदर्यपिपासू आणि वनवासींच्या मदतीने केवळ सौंदर्यभक्तीच्या सामर्थ्यावर सौंदर्यमुक्त करणारा सौंदर्यपूजक चैत्रातच जन्म घेते झाले, यासाठी कारणं असावीत. शक्तीला भक्तीची विनयशील जोड असली की, बळ आणखीच वाढतं. हा आदर्श घालून देणारा रुद्रावतारही याच महिन्यातला. सौंदर्य हे स्त्रीचं सामर्थ्य असतं आणि सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य असतं, हेच चैत्र मास सांगत असतो. म्हणूनच मग कणखर रुद्रालाही अवतार घ्यायला हाच महिना योग्य वाटला असेल.

हा महिना कर्तृत्वाचा आहे. स्वसामर्थ्याचा आहे. पावसाळ्यातल्या ओलाव्यावरही कष्टाने पीक घेता येतं. नियोजनबद्धतेतलं सौंदर्य हे दिवस शिकवितात. पावसाचं पाणी उदरात दडवून ठेवलं की, मग रबीचा हंगाम फुलविता येतो. कृषक संस्कृती अधोरेखित करणारा हा महिना आहे. नवं आलेलं पीक निसर्गाला अर्पण करण्यातला समर्पित सौंदर्यभाव या महिन्यातही प्रकट होतो. अशा तेजाळलेल्या समृद्ध दिवसांत कुण्याही सासुरवाशिणीला माहेराची आठवण यावी. पण प्रत्येकाच्या घरी सख्याच्या सहवासात खुललेली संपन्न माहेरवाशीण येणार कशी? पण चैत्रबहरानं प्रेममय झालेली गावं आणि गावांवर आधिपत्य करणारा स्नेहमय अधिपती, हे आमच्या कृषक संस्कृतीचं वैशिष्ट्यच! मग त्या गणाधिपतीची सहचारिणी गौरी या दिवसांत प्रत्येकाच्या घरी माहेरवासाला येते. सख्याच्या मोहोरत्या स्पर्शानं पुलकित झालेल्या अर्धोन्मीलित यौवना माहेरी येणं, ही कल्पनाच काव्यमय आहे. तिच्यायोगे तिचा सखा-परमेश्वरही आलेला. मग नवनिर्मितीच्या रंगात रंगलेल्या त्या जिवांना हंगामाचा नवा बहर अर्पण करणे म्हणजेच पूजा… कैरीचं पन्हं, हरभर्‍याची डाळ आणि तांदळाची पेज… ही कशाची प्रतीकं आहेत?

ज्याला ‘कैरी’तील नजाकत कळली, त्याला चैत्र कळला. आंबा होण्याआधी कैरी चाखायला जावे, तर क्षण निसटून जातात. सांज अंधाराच्या मिठीत विसावताना तिची मात्र परतण्याची धडपड सुरू असते. तिची निघण्याची घाई आणि तो अनुरक्त झालेला. स्पर्शबावरी ती निघायचं म्हणते. त्याच्या निर्ढावलेल्या स्पर्शाला गोड गुपिताची ओढ लागलेली. तिला ते जाणवतं. म्हणूनच तिला सारं हवंहवंसं वाटत असतानाही निघायचं असतं. तो तिला थांबविण्याचा लटका प्रयत्न करतो. तिच्या साडीचा रेशमी पदर हळुवारपणे त्याच्या हातून निसटून जातो… चैत्रही वसंताचा पदर ओढून असाच निघून जातो. अबोध कैरीची नजाकत आपल्या वाट्याला आली नाही म्हणून वैशाख वेडापिसा होतो, त्याच्या झळांनी चैत्राच्या आश्रितांना तो होरपळून टाकतो. पण त्याला तरी काय माहिती, सौंदर्यबहर जळत नसतो म्हणून…!

……………………………………………………….

‘ऋतू स्पर्श’ या ललितबंधाच्या पुस्तकातून हा एक चैत्र सांगणारा ललितबंध.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *