उपराजधानीनागपूर मनपा

हात जोडतो, नागपूरातील हिरवळ नष्ट करुन प्रकल्प नको!


‘ग्रीन नागपूर‘चा ‘वातावरण बदल आणि राजकीय पक्षचा जाहीरनामा’ प्रसिद्ध

नागपूर,ता.१६ एप्रिल २०२४: शहरात सध्या सूरु असलेल्या सिमेंट रस्ते व तथाकथित विकास कामांमुळे शहरातील तापमान सतत वाढत आहे. वृक्षसंपदा झपाट्याने कमी होते आहे , तलावांसारखे जलस्रोत मृतप्राय झाले आहेत. शहरातील विविध कारणांमुळे होणारे प्रदूषण आणि त्याबरोबरच कोराडी , खापरखेडा येथे असलेले औष्णिक वीज प्रकल्प यांमुळे प्रदूषण व तापमान यांत भर पडते आहे. अवैध वृक्षतोड, कचरा जाळणे ही सामान्य व नित्याचीच बाब झाली आहे.येत्या काही वर्षात नागपूर हे शहर देखील बंगलोर किवा पुणे यासारखे होणार असून नागपूरातील हिरवळ व पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत असणारे तलाव वाचविले जाणार नाही तर नागपूरकरांना भीषण संकटांचा सामना करावा लागेल,त्यामुळे हात जोडतो पण प्रकल्पांसाठी शहरातील हिरवळ नष्ट करु नका,असे आवाहन ‘ग्रीन नागपूर’च्या सदस्यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.याप्रसंगी त्यांनी ’वातावरण बदल आणि राजकीय पक्षांचा जाहीरनामा’हा जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला.

देशात मोदींचे संकल्प पत्र असो किवा नागपूरातील गडकरी यांचा वचननामा,यात पर्यावरणाला मुळीच जागा नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.हा फक्त नागपूरकरांचा नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या अस्तित्वाचा तसेच पुढील पिढीच्या प्रदुषण मुक्त जगण्याच्या अधिकाराचा प्रश्‍न आहे,असे त्यांनी सांगितले.
नुकतेच नागपूर सुधार प्रन्यासने फूटाळा तलावाचा कॅचमेंट असणा-या व २७६ एकर मध्ये पसरलेल्या बॉटनिकल गार्डनमध्ये थीम पार्क बनवण्यासाठी सिमेंट कॉक्रिटीकरण सुरु केले आहे.ही जागा पंजाबराव कृषि विद्यापीठाची असून,कायदानुसार पीकेव्हीच्या जागेवर फक्त शेती संबंधी संशोधन करने बंधनकारक आहे.मात्र,मागील काही वर्षात शहरातील बहूतांश मोकळ्या भूखंडांवर नियमबाह्यरित्या ‘शासकीय अतिक्रमण’करुन पर्यावरणाची नासाडी केली जात असल्याची खंत ग्रीन नागपूरच्या सदस्यांनी व्यक्त केली.

मेट्रो ही कन्हानपर्यंत जाणार आहे त्यामुळे हा थीम पार्क त्या ठिकाणी निर्माण केल्यास,बॉटनिकल गार्डनसारखे नागपूरातील हिरवे कवच नष्ट होणार नाही आणि कन्हान पर्यंत नागपूरकरांना जाऊन पर्यटनाची संधी देखील मिळेल.

नागपूर हे शहर आजूबाजूच्या खाणीच्या क्षेत्रामुळे खूप नियोजनबद्धरित्या वसविण्यात आले आहे.आज स्मार्ट सिटीच्या नावाने ही डम्प सिटी होत चालली आहे.येणारी पिढी कधीही अश्‍या विकासाला दाद देणार नाही तर दूषणे देतील,असा इशारा ग्रीन नागपूरच्या सदस्यांनी दिला.
गुगलवर अवघ्या दहा वर्षांपूर्वीचे छायाचित्र बघितल्या संपूर्ण हिरवळीचे आच्छादन दिसत होते आता ७५ टक्के हिरवळ नष्ट झाली असून फक्त काही पॉकेट्स हिरवळीचे शहरात राहीले आहेत.अश्‍यावेळी पुन्हा नवनवीन प्रकल्पांच्या नावाने ही देखील हिरवळ नष्ट झाल्यास नागपूर हे दिल्ली,बंगलोर व पुण्याच्या प्रदुषण व विध्वंसाच्या रांगेत जाऊन बसेल.आमचा विकासाला विरोध नाही मात्र,आता एवढ्या छोट्याशा शहरात प्रकल्पांची गर्दी कोंबू नका,अशी मागणी सदस्यांनी केली.

अगामी लोकसभेच्या निवडणूकीच्या तोंडावर आम्ही भाजपचे उमेदवार नितीन गडकरी तसेच काँग्रेसचे उमेदवर विकास ठाकरे यांना देखील ग्रीन नागपूरचा जाहीरनामा दिला असून त्यांच्याकडून आम्हाला आमच्या शहरातील हिरवळ,तलाव,बगिचे आणि पाणथळीविषयी वचनबद्धता हवी,असे ते म्हणाले.

एका प्रश्‍नाच्या उत्तरात बोलताना,नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ .अभिजित चौधरी यांच्याशी भेट घेतली असता नागपूरात सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचा चौथा टप्पा सुरु असल्याची माहिती दिली मात्र,रेन वॉटर हारवेस्टींग राहून गेल्याचे सांगितले!यावरुन प्रशासकीय अनास्था,राजकीय अदूरदर्शीपणा आणि स्वार्थ यामुळे नागपूरचा विकास हा कोणत्या विनाशाच्या दिशेने जात आहे,हे सिद्ध होतं,अशी टिका त्यांनी केली.

मानवी आरोग्यावर हवामान बदलाचे भयावह परिणाम आता उग्र रूप धारण करीत आहेत व ते वाढत्या प्रमाणात अभ्यासले जात आहेत. वाढते तापमान आणि हवामानातील बदल यामुळे उष्णतेच्या लाटांची तीव्रता यामुळे अनेक आजार किंवा मृत्यूची कारणे वाढत आहेत. उष्णतेच्या लाटा आणि हवामानाच्या तीव्र घटनांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आरोग्यावर मोठा परिणाम होतो. जेव्हा लोक जास्त काळासाठी उच्च तापमानाच्या संपर्कात असतात तेव्हा त्यांना उष्णतेचे आजार आणि उष्णतेमुळे मृत्यू होऊ शकतो. थेट परिणामांव्यतिरिक्त, हवामानातील बदल काही रोग रोगजनकांद्वारे पसरतात यात डेंग्यू तापासारखे डासांमुळे होणारे रोग आणि अतिसाराच्या आजारासारखे जलजन्य रोग यांचा समावेश आहे. भविष्यात अनेक संसर्गजन्य रोग नवीन भौगोलिक भागात पसरतील.

हवामान बदलामुळे जगभरातील शेती आणि अन्न उत्पादनावर परिणाम होतो आहे. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होते आणि पशुधनाचे कुरण नष्ट होते. पशुधनाचे नुकसान आणि यामुळे दूध उत्पादन आणि मांस उत्पादन कमी होते. हवामानातील बदलामुळे जमिनीचा ऱ्हास आणि वाळवंटीकरण, जलस्रोतांवर विविध प्रकारे परिणाम होऊ शकतो. उपलब्ध गोड्या पाण्याचे एकूण प्रमाण कमी होत चालले आहे.

घर किंवा बहुमजली इमारत बांधतांना जो नकाशा बनवला जातो त्यात भूखंडावर इमारतीच्या भोवताल फक्त २ – ४ फूट जागा सोडली जाते , बऱ्याच ठिकाणी तर नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. हे असेच सुरु राहिले तर भविष्यात नागरी वस्तीतील वृक्ष नष्ट होऊन संपूर्ण शहर उजाड, भकास होणार आहे. या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन यावर तातडीने उपाय करून, आहे ती वृक्षसंपदा वाचवले आणि शहरात प्रत्येक भागात हिरवी बेटे तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच विद्यमान हिरवी बेटे राखून ठेवावी आणि नवीन UDCPR नुसार ‘विकास हा आता शहराबाहेर आणि उभा असावा.’ परंतु दुर्दैवाने सर्व शासकीय यंत्रणा व राजकीय पक्ष याबाबत उदासीन आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी पर्यावरणाला महत्त्व देऊन त्यावर कृती करावी यासाठी त्यांच्यावर दबाव आणि त्यासाठी जनजागृतीसाठी नागपूरच्या जागरूक नागरिकांनी “ग्रीन मॅनिफेस्टो” तयार केला आहे. हा जाहीरनामा म्हणजे सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना स्वच्छ पर्यावरणाकरिता त्यांची वचनबद्धता आगामी निवडणुकांपूर्वी याबद्दलचे आश्वासन यासाठी एक आवाहन आहे.

“ग्रीन मॅनिफेस्टो” शाश्वत विकासाबद्दल लोकांच्या अपेक्षा व प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करते ज्या आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत करू शकतात. आपल्याच येणाऱ्या पिढीचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी सर्व सामान्य नागरिकांनी याला पाठिंबा देऊन नेत्यांना, यंत्रणेला याबाबत प्रश्न विचारणे अपेक्षित आहे.

आज पत्रकार परिषदेत आशुतोष दाभोलकर, योगिता खान, प्रीति पटेल जामरे, रोहन अरासपुरे, ॲड. सुजय कालबांडे, साहिल  झाड़े व स्वच्छ असोसिएशनच्या अनुसूया काळे-छाबरानी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *