उपराजधानीराजकारण

न्याय न मिळाल्यास कळमन्यात जाऊन ईव्हीएम फोडणार


अपक्ष उमेदवार अरविंद मेश्राम यांचा इशारा

८ लाख मतदार मतदानापासून वंचित:अपक्ष उमेदवारांचा पत्रकार परिषदेत प्रशासावर गंभीर आरोप

मृत मतदारांची नावे यादीत जिवंत मतदारांची भर उन्हात मतदान केंद्रांमध्ये भटकंती

प्रशासनाने केली लोकशाही संवैधानिक अधिकाराची थट्टा:मतदार जनजागृतीसाठी खर्च केलेले कोट्यावधी रुपये पाण्यात

भाजपने एक महिन्यापूर्वीच सॉफ्टवेअर केले निर्माण:२१०५ बूथवर गडकरींच्या नावाची चिठ्ठी मतदारांना

अपक्ष उमेदवाराचे नावच मतदार यादीतून गायब!

गिट्टी-रेतीचा खेळ खेळणारे‘खेती’वर गप्प:काँग्रेसची भूमिका ही संशयास्पद

निवडणूक अधिकारी डॉ.इटनकर कर्तव्याच्या बाबतीत झाले ‘धृतराष्ट’

निवडणूक आयोग,पोलिस विभाग,प्रशासन,भाजप आणि काँग्रेसने केली मतदारांची पिळवणूक:अपक्ष उमेदवारांचा आरोप

नागपूर,ता.२४ एप्रिल २०२४ : निवडणूक प्रशासनाच्या ढिसाळ आणि तितक्याच उदासिन कारभारामुळे नागपूर शहरातील सात ते आठ लाख मतदार हे मतदानापासून वंचित राहीले.मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत होती तर जिवंत मतदार हे रणरणत्या उन्हात अनेक मतदार केंद्रात मतदानासाठी भटकत होते.प्रशासनाने आठ लाख मतदारांना मतदानपासून वंचित ठेवल्याने, नागपूर लोकसभेची निवडणूकच निवडणूक आयोगाने रद्द करावी व पुन्हा निवडणूक घ्यावी.अपक्ष उमेदवारांनाही समानतेची संधी मिळावी अशी मागणी करत, निवडणूक आयोगाकडून आम्हाला न्याय न मिळाल्यास कळमना येथील ईव्हीएम मशीन्स फोडून टाकू,असा गर्भित इशारा आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत जनहित पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद मेश्राम यांनी दिला.आज अपक्ष उमेवादांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तसेच भारतीय जनता पक्षाने बूथवरुन आचार संहितेचे उल्लंघन करुन केलेला प्रचार या विरोधात पत्रकार परिषद घेऊन रोष व्यक्त केला.

बहूजन मुक्ती पक्षातर्फे पुरस्कृत अपक्ष उमेदवार टेकराज उर्फ विक्की बेलखोडे म्हणाले की,आम्ही शपथपत्रावर जनतेला काही आश्‍वासन दिले होते.इतर उमेदवारांची गॅरंटी म्हणजे शपथपत्र नसून फक्त पत्रके होती.आमची शपथपत्रे म्हणजे जनतेला दिलेले आश्‍वासन पूर्ण न केल्यास आमच्या विरोधात जनता न्यायालयात दाद मागू शकते.आम्हाला प्रचार करण्यास पंधरा दिवसांचाही अवधी मिळाला नसला तरी प्रस्थापितांच्या विरोधात लढा देणे हाच आमचा उद्देश्‍य आहे.गिट्टी-रेतीशिवाय ‘खेती’बेरोजगारी आणि गरीबीवर बोलले जात नाही,मतदानाच्या एक दिवसाआधी रामनवमी उत्साहात साजरे करणारे आता हनुमान जयंतीच्या दिवशी गायब आहेत.आमचे मुद्दे ज्यांना भावले त्या मतदारांची नावेच यादीतून गायब होती.आमचा संवैधानिक हक्कच या निवडणूकीत हिरावण्यात आला.

एका अपक्ष उमेदवाराने केंद्रिय मंत्री व लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरींवर निशाना साधत,ज्याप्रमाणे शहरातील २१०५ बूथवर आपल्या तरुण कार्यकर्त्यांची फौज टेबल टाकून त्यावर सॉफ्टवेअर ठेऊन त्यातून मतदारांना गडकरी व त्यांचे पक्ष चिन्ह याचा प्रचार करणा-या चिठ्या काढून देण्यात आल्या ,ते सरळ-सरळ आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होते मात्र,आम्ही याची तक्रार करुन देखील निवडणूक अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही,असा गंभीर आरोप त्यांनी केला.प्रशासन हे पूर्णत: भाजपला सहकार्य करीत होते.ज्या गडकरी यांनी निवडणूक जाहीर होण्या पूर्वी मी प्रचार करणार नाही असे जाहीर केले होते त्यांनीच प्रत्येक बूथवर आचार संहितेचे उल्लंघन करुन प्रचार केला.

मतदानाच्या ४८ तासात कोणत्याही स्वरुपाचा प्रचार करता येत नाही. मतदाराला प्रलोभन देणे,मत प्रभावित करण्यासाठी बिल्ले,पत्रके,छायाचित्र,पक्ष चिन्ह,दुपट्टे इत्यादीचा वापर हे १९५१ च्या कायद्याच्या कलम १२६ अन्वये गुन्हा आहे.आमच्याकडे भाजपविरोधात अनेक पुरावे आहेत जे ऑथेंटिक आहेत,एम्बेडेड नाहीत.प्रचाराच्या संदर्भात ही निवडणूक प्रशासनाकडून अपक्ष उमेदवारांसोबत पराकोटीचा भेदभाव करण्यात आला असल्याचे अपक्ष उमेदवार ॲड.संतोष चव्हाण यांनी सांगितले.कोतवाली पोलिस ठाणे अंतर्गत मला सभा घेण्याची परवागनीच मिळाली नाही दूसरीकडे गडकरी हे नागपूरातील गल्लोगल्ली प्रचार करत होते.निवडणूक अधिकारी डॉ.इटनकर यांच्यासोबत मला माझ्याच संवैधानिक अधिकारासाठी भांडावे लागले,त्यांनी पोलिस ठाण्यातील पोलिसांना सुनावले व मला एका सभेची परवागनी मिळाली.वृत्तपत्रात जाहीराती देण्याची आमची ऐपत नाही त्यामुळे आमचे विचार आम्ही सभेच्या माध्यमातूनच मतदारांपर्यंत पोहोचवू शकतो,असे ॲड.चव्हाण म्हणाले.

याप्रसंगी बोलताना अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतला,की ज्या दिवशी १९ एप्रिल रोजी नागपूरात मतदान होते त्या दिवशी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी व कमळ हे चिन्ह याची जाहीरात सर्वच वृत्तपत्रात छापून आली.ही सरळ सरळ मतदारांना प्रभावित करणारी व तितकीच असंवैधानिक कृती होती.नागपूरच्या लोकसभेच्या निवडणूकीत आचार संहितेचे उल्लंघन यासोबतच लाखो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे अश्‍या घटना घडल्याने ही निवडणूकच रद्द करावी व पुन्हा मतदान घेण्याची मागणी त्यांनी केली.

विशेष म्हणजे भाजप तसेच प्रशासनाच्या या कृतीवर दूसरा मुख्य राजकीय पक्ष असणारी काँग्रेस यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही,असा आरोप त्यांनी केला.प्रशासनाने कोट्यावधी रुपयांचा खर्च या निवडणूकी पूर्वी मतदान जनजागृतीवर केला मात्र, मतदार यादीवर काम करण्याची प्रशासनाची उदासिनता ही  स्पष्ट दिसून पडली.प्रत्येक मतदान केंद्रावरुन जवळपास दोन हजार मतदारांची नावे गायब करण्यात आली,प्रशासनाची साईट देखील बंद होती.२२ लाख मधून ७ ते ८ लाख मतदारांची नावे गायब करण्यात आली.मतदारांची कोणतीही मदत निवडणूक प्रशासनाने केली नाही.सर्वदूर हेच चित्र उमटले होते.मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या असणा-या भागात मतदार यादीचा घोळ सर्वाधिक होता.

सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशासनाने ५६ टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात ४४ टक्क्यांचा जवळपासच मतदान झाले असल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला.प्रशासन आपली इभ्रत वाचवण्यासाठी खोटे बाेलत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला.ज्याप्रमाणे बँकेतून एक रुपया जरी काढला तरी त्वरित मोबाईलवर मॅसेज येतो,अश्‍या कोणत्याही अद्यावत तंत्रज्ञानाचा निवडणूक आयोग व प्रशासनाला अवलंब करण्याची गरज वाटत नाही.कोणाला मतदान केले हे कळवू नका मात्र,या मतदाराचे मतदान झाले,अशी सूचना तर मतदारांना मिळाली असती तर मतमोजणीच्या वेळी ती संख्या देखील प्रशासनाला उपयोगी ठरली असती,असे अपक्ष उमेदवारांचे म्हणने होते.

नागपूरात मतदानाविषयी कोणतीही पारदर्शिता न पाळल्याबद्दल निवडणूक अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही कोणालाही घाबरत नाही,जेल जाण्यासाठीही तयार आहोत मात्र, आपला न्याय हक्काचा लढा जिकरीने लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आचार संहितेच्या उल्लंघनाची सर्वात पहीली तक्रार सकाळी ७ वा.मी दिली होती असे ॲड. सूरज मिश्रा यांनी सांगितले.परवानगी नसताना भाजपचे कार्यकर्ते हे मतदान केंद्राच्या आत फिरत होते.नियमानुसार प्रचारासाठी एकच भोंगा लावण्यास परवागनी असताना गडकरी यांच्या प्रचारार्थ चार-चार भोंगे लावण्यात आले होते.१९ तारखेला मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर गडकरी यांच्या नावाची चिठ्ठी काढणारे सॉफ्टवेअर बूथ टेबलवर ठेवण्यात आले होते,यासाठी हजारो तरुणांना बूथवर बसविण्यात आले होते.शांतीनगर च्या झेंडा चौकातील बूथवरुन मी स्वत: एक सॉफ्टवेअर मशीन जप्त केली. दुपारी १.३० वाजता शांती नगरच्या पोलिस ठाण्यात तक्रार केली,त्यांनी निवडणूक आयोगाकडे जाण्यास सांगितले!मी जवळपास ३० बुथ फिरलो.जरीपटका पोलिस ठाण्यातील पोलिसांनी मात्र एका बूथवरुन त्या सॉफ्टवेअर मशीन्स जप्त केल्या.सायंकाळी ५.३० वा.आम्ही एक मशीन इटनकर यांच्या समोर ठेवली मात्र,त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही.लोकशाही देशात तानाशाहीचा कारभार चालला आहे,असा संताप त्यांनी व्यक्त केला.

प्रशासन हे दबावात काम करत आहे का?असा प्रश्‍न केला असता नक्कीच प्रशासनावर प्रचंड दवाब असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र,मतदारांचा संवैधानिक हक्क हिरावण्यात आला,प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.

अपक्ष उमेदवार सुर्यवंशी म्हणाले,की इटनकर यांनी नागपूरात २२ लाख मतदार मतदान करणार असल्याचा दावा केला होता मात्र,प्रत्यक्षात त्यांनी जे मतदान करणार होते ,मतदानासाठी जे भर उन्हात अनेक मतदान केंद्रांवर भटकले त्यांचीच नावे मतदार यादीतून गहाळ केली,प्रशासन हे एका राजकीय पक्षाला मदत करीत असल्याचा आरोप याप्रसंगी सुर्यवंशी यांनी केला.

१६ मार्च रोजी केंद्रिय निवडणूक आयोगाने निवडणूकीची घोषणा करताच देशात आदर्श आचार संहिता लागू झाली.मात्र,देशात त्याचे पालन होत नसल्याचे चित्र आहे.नागपूरात तर इटनकर यांनी हजारो बूथवर गडकरी यांच्या नावाच्या चिठ्ठ्या प्रकरणाला ‘बहोत हलके मे लिया’असा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला.भाजप,काँग्रेस,निवडणूक आयोग,प्रशासन आणि पोलिस विभागाने मतदारांची पिळवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.८ ऑक्टोबर २०१३ रोजी झालेल्या सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत ईव्हीएम मशीन्सद्वारे होणा-या निवडणूका या निष्पक्ष राहूच शकत नसल्याचा दावा करण्यात आला होता.अनेक तक्रारींनंतर २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्हीव्हीपॅटमधील मतांचीही मतमाेजणी करण्याचे आदेश आले.मात्र,संपूर्ण मतांची मोजणी होत नाही.यात गडबड होण्याची १०० टक्के संभावना आहे.नियमानुसार दूस-या क्रमांकाचा राजकीय उमेदवार हा फेरमतमोजणीची मागणी करु शकतो मात्र,काँग्रेस या संपूर्ण गडबडझाल्यापासून अलिप्त असलेली दिसतेय,भाजपसोबतच काँग्रेस पक्ष देखील जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला.

मतांच्या मूल्याला शून्य करण्याचे काम नागपूरात झाले असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.मी स्वत: ५५ हजार घरांपर्यंत पोहोचलो,भाजप व काँग्रेस दोन्ही पक्षांविषयी प्रचंड नाराजी दिसून पडली.त्यामुळेच अपक्ष उमेदवारांना चांगली मते पडण्याची शक्यता होती ज्यावर प्रशासनाने हेतुपुरस्सर पाणी फेरले.आम्ही आज आवाज नाही उठवणार तर येणारी पिढी ही मुकी निघेल,असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी अरविंद मेश्राम म्हणाले की,मूळात गडकरी यांचा प्रचार करणारे सॉफ्टवेअर हे एक महिन्याआधीच निर्मित केले असावे.लाखो रुपयांच्या खर्चातून असे सॉफ्टवेअर बनतात.निवडणूक आयोगाने गडकरी यांच्या निवडणूक खर्चाची इमानदारीने चौकशी करावी.२०२४ मध्ये भाजपची मतदान केंद्रावरच प्रचार करण्याची इतकी हिंमत वाढली आहे तर २०२९ च्या निवडणूकीत तर ते सरळ वसत्यांमध्ये बूथ लाऊन मतदान करुन घेतील,असा उपरोधिक टोला त्यांनी हाणला.

निवडणूक आयोगाकडे आम्ही जितक्या तक्रारी केल्या आणि आम्हाला जितकी उत्तरे मिळालीत तितक्या कागदांवर तर एक निवडणूक पार पडली असती असे एका अपक्ष उमेदवाराने सांगितले.

एका उमेदवाराने सांगितले की स्वत: उमेदवार असूनही माझे नावच मतदार यादीतून गायब करण्याची कमाल प्रशासनाने केली.माझ्या आईचे,वहीणीचे नाव ही मतदार यादीतून गायब होते.मला स्वत:ला मतदानासाठी प्रशासनासोबत भांडावे लागले.परिणामी मला दूपारी तर माझ्या आईला सायंकाळी साढे चार वाजता मतदान करण्याचा हक्क मिळाला.

लवकरच अपक्ष उमेदवार व नागपूरकर मतदारांवर प्रशासनानी केलेल्या अन्यायाविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ,असा निर्धार पत्रकार परिषदेत उपस्थित लोकसभा उमेदवार किविन्सकुका सूर्यवंशी,स्वतंत्र उमेदवार सुशील पाटील,संतोष चव्हाण,साहिल तुळकर,विक्की बेलखोडे,दिपक मस्के,सचिन वाघाडे आदींनी व्यक्त केला.

………………………………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *