उपराजधानी

मेडीकलमध्ये १२ वर्षांपासूनची १०८ सुरक्षा रक्षकांची नोकरी एका क्षणात संपुष्टात!

(छायाचित्र : ‘गेले ते दिन गेले….’एका कार्यक्रमात डॉ.राज गजभिये यांच्यासोबत महिला सुरक्षा रक्षक व कर्मचारी)

एजंसीसोबतचा करार आज समाप्त:नुतनीकरणा ऐवजी शासनाच्या ३०८ सुरक्षा रक्षकांकडे जबाबदारी

मेडीकलमधील सुरक्षा वा-यावर: कोर्टाने घेतली होती गंभीर दखल

उद्या गडकरींना भेटणार नोकरी गमावलेले १०८ महिला व पुरुष सुरक्षा रक्षक

नागपूर,ता.३० एप्रिल २०२४: गेल्या १२ वर्षांपासून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात(मेडीकल)सुरक्षा रक्षकाचे काम करणा-या १०८ कर्मचा-यांच्या नोक-या आज एका क्षणात संपुष्टात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.विशेष म्हणजे कामगार कायद्याची सरळ-सरळ पायमल्ली करीत या सुरक्षा रक्षकांना कोणतीही नोटीस न देता त्यांची सेवा समाप्त करण्यात आली. मेडीकलचे प्रमुख(डीन)डॉ.राज गजभिये यांच्या कक्षात दुपारी ४.३० वाजता बैठक पार पडली व सायंकाळी ५.३० वाजता एक साथ एजंसीच्या १०८ सुरक्षा रक्षकांना ‘आज पासून तुमची सेवा संपुष्टात आल्याचे’ पत्र देण्यात आले असल्याचे आज ‘सत्ताधीश’सोबत बोलताना या सुरक्षा रक्षकांनी सांगितले.

शेखर अदमाने यांच्या ’युनिटी सेक्युरिटी फोर्स’ या एजंसीमार्फत मागील एक दशकाहून अधिक काळापासून हे सुरक्षा रक्षक मेडीकलमध्ये अतिशय अल्प पगारात आपली सेवा देत होते.सुरवातीला पाच वर्ष फक्त ४ हजार ४०० रुपये पगार घेणा-या १०८ सुरक्षा रक्षकांना यानंतर फक्त ६ हजार रुपये पगार मिळत होता.एकीकडे महागाई गगनाला भिडलेली असतानाही या सुरक्षा रक्षकांनी कुटूंबाला हातभार म्हणून एवढ्या अल्प पगारात देखील आपली सेवा सुरु ठेवली होेेती.

१०८ सुरक्षा रक्षकांमध्ये २५ महिला आहेत.कोणाला पती नाही तर कोणाला मुलांचे शिक्षण पूर्ण करायचे आहे.कोणाला घराचे कर्जाचे हप्ते फेडायचे आहेत तर कोणाच्या घरी याच पगारातून जेवणाची सोय होत होती.आज अचानक त्यांची सेवा समाप्त करण्यात आल्याने या सुरक्षा रक्षकांना मानसिक धक्का बसला आहे.

२०२० आणि २०२१ मध्ये करोना काळात करोना बाधितांचा सर्वात पहीला सामना या सुरक्षा रक्षकांनीच केला होता.यानंतर डॉक्टरांसोबत त्यांची भेट होत होती.मेडीकलमध्ये मृतदेहांचा खच ही तेच सांभाळत होते!देशाच्या आणिबाणिच्या काळात त्यांनी बिंदास ड्यूटी केली.त्यांच्या या कामाची ना सरकारने दखल घेतली ना महाराष्ट्र प्रशासनाने.डीनच्या ऑफिस पासून तर प्रसृती विभागात,आपातकालीन विभागापासून तर अगदी बाहेरील पार्किंग ठिकाणापर्यंत,परिचारिका निवासस्थानापासून तर वसतीगृहांपर्यत, सर्वच ठिकाणी या सुरक्षा रक्षकांने अतिशय अल्प पगारात इमाने इतबारे आपले कर्तव्य चोख बजावले.
सर्वात महत्वाचे म्हणजे आपातकालीन लेबर रुममध्ये अटेंडेट उपस्थित नसताना रात्री-अपरात्री महिला सुरक्षा रक्षकांनीच अटेंडेंटची भूमिका बजावली.जेवण वाटण्यापासून बाळंत महिला,मुलांची काळजी वाहण्यापर्यंत सर्व कामे चोखपणे केली.याचे कारण अंगावरची खाकी वर्दी आणि या वर्दीसोबत जुळलेली कर्तव्य भावना.

गेली अनेक वर्ष मेडीकलमधील अटेंडेंजची पदे रिक्त आहेत.या सर्व सुरक्षा रक्षकांनीच सुरक्षा गार्ड व अटेंडेट अशी दुहेरी भूमिका आतापर्यंत चोखपणे बजावली.नुकतेच ६८० अटेंडेटच्या जागेसाठी लाखो तरुणांनी जानेवरी महिन्यापासून अर्ज केले आहेत.अटेंडेट अभावी याच सुरक्षा रक्षकांनी प्रसुतीगृहा जवळील भटक्या कुत्र्यांपासून लहान बाळांना जपले,हे विशेष.

बारा वर्ष हा काळ थोड-थोडका नाही.त्या भिंती,जो परिसर,मेडीकलची ती वास्तू,ते दुखी कष्टी,गरीब रुग्ण,पांढ-या कोटमधील डॉक्टर्स हे जणू त्यांच्या जिवनाशीच एकरुप झाली होती.आज मात्र,कोणतीही पूर्व कल्पना नसताना त्यांच्या हातात सेवा समाप्तीचे पत्र पडले आणि त्यांना मानसिक धक्का बसला.एजेंसी मालकासोबत पगार वाढीसाठी त्यांची मागणी सुरु होती.सहा हजार रुपयात प्रपंच चालत नसल्याने किमान दहा हजार रुपये पगार देण्याची मागणी त्यांनी केली होती.याच मागणीमुळे त्यांना कामावरुन आज काढून टाकण्यात आल्याचा गैरसमज देखील त्यांचा झाला होता.

महत्वाचे म्हणजे,मार्ड सारखी त्यांच्या अधिकारांसाठी लढणारी मेडीकलमध्ये कोणतीही संघटना नाही!

उद्या १ मे,कामगार दिन,याच दिवसाच्या आदल्या संध्याकाळी एका झटक्यात एका खासगी एजंसीसाठी काम करणारे १०८ कर्मचारी हे ‘बेरोजगार’झालेत.देशातील बेरोजगारीचे आकडे मोठमोठे विश्‍लेषक सांगत आले असले तरी त्यात महाराष्ट्राच्या उपराजधानीत आज आणखी १०८ कर्मचा-यांची भर पडली.असे का घडले?याचे कोणतेही उत्तर त्यांच्या जवळ नाही! उद्या सकाळी ११ वाजता केंद्रिय मंत्री नितीन गडकरींकडे एका क्षणात आयुष्यातून उधवस्त झालेले हे सुरक्षा रक्षक भेट घेऊन मदत मागणार आहेत.करोना काळात नागपूरकरांसाठी परराज्यातून ’ऑक्सीजन’ पुरविणारे गडकरी यांनी आता या कर्मचा-यांच्या जीवनातील व त्यांच्या पाल्यांच्या उज्जवल भविष्यातील हरवलेल्या ‘प्राणवायूची’ तरदूद तातडीने करावी,अशी विनंती ते गडकरींना करणार असल्याचे ते सांगतात.

मेडीकलचे डीन यांच्याशी ‘सत्ताधीश’ने संपर्क साधला असता,कोर्टाच्या आदेशामुळे महाराष्ट्र शासनाने ३०१ सुरक्षा रक्षक मेडीकलमध्ये पाठवले आहेत.‘युनिटी सेक्युरिटी फोर्स’ या खासगी एजेंसीसोबत आज आमचा करार संपुष्टात आला असून सरकारच्या आदेशानुसार या एजेंसीसोबतच्या कराराचे नुतनीकरण करण्यात आले नाही,त्यामुळे एजेंसीने त्यांच्या सुरक्षा रक्षकांना सेवा समाप्तीचे पत्र दिल्याचा खुलासा डॉ.राज गजभिये यांनी केला.

शासनाने किमान १२ वर्षांपासून सेवा देत असणा-या या १०८ सुरक्षा रक्षकांचे समायोजन त्या ३०१ सुरक्षा रक्षकांमध्ये का केले नाही?शासनाचे अटी,शर्थी,नियम हे माणसे जगवण्यासाठी असतात की आयुष्यातून उठवण्यासाठी?किमान सुरक्षा रक्षकासारख्या पदांसाठी,ते ही एका दशकापेक्षा जास्त अनुभवी असणा-यांसाठी,शासनाने आपल्या अटी शिथिल केल्या असत्या तर….?

उपमुख्यमंत्री व या शहराचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शहरातील शंभरच्या वर कर्मचा-यांवर कोसळलेल्या या संकटाची दखल घेत, योग्य सूचना करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.१०८ कर्मचारी व त्यांच्या कुटूबांचे अस्तित्व हे कोणत्याही कोर्टाच्या आणि शासनाच्या आदेशा पलीकडे असून ,शासनाने १०८ कर्मचा-यांचे समायोजन ३०१ सुरक्षा रक्षकांच्या नव्या भरतीत करावे,अशी आर्त साद या कर्मचा-यांनी फडणवीस यांना केली आहे.
……………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *