उपराजधानीनागपूर मनपा

राज्य शासनाचे आदेश डावलून मुंढेंनी धरले शहर वेठीस: महापौर संदीप जोशी

‘फेसबूक लाईव्ह’ दरम्यान मुंढेंच्या लॉक डाऊन वाढी निर्णया विरोधात महापाैरांचा घणाघात

नागपूर, ता.४ मे:  मनपा आयुक्त तुकराम मुंढे यांनी ३ मे रोजी २.० लॉक डाऊनची मुदत संपल्यानंतर रात्री नागपूर शहरासाठी लॉक डाऊन ३.० ची घोषणा केली. यावर महापौर संदीप जोशी यांनी आज सोमवार दि. ४ मे रोजी ‘फेसबूक लाईव्ह’दरम्यान मुंढे यांच्या या तुघलकी निर्णया विरोधात चांगलेच तोंड सूख घेतले. राज्य शासनाने पुणे,मुंबई, ,पिंपरी-चिंचवड,ठाणे,नाशिक आणि मलकापूर या व्यतिरिक्त राज्यातील इतर सर्व शहरात लॉक डाऊनबाबत निर्णय घेण्याची सूट प्रशासकीयस्तरावर दिली मात्र मनपा आयुक्त यांनी राज्य शासनाचा नागपूर शहरासंदर्भात निर्णय डावलून पुन्हा १७ मे पर्यंत लॉक डाऊन वाढवले,त्यांच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिक, लहान लहान व्यवसायिक,दूकानदार, गल्लोगल्ली धोबी,शिंपी,फूलं विकणारे,नाभिक,इलेक्ट्रीक्सचे दूकानवाले चहा टपरी,नाश्‍ता पॉईंटवाले इ. मिळून शहरातील २७ लाख लोकसंख्या ही निराश झाली.

बार,रेस्टारेन्ट,हॉटेल्स,धार्मिक स्थळे,मॉल्स,बगीचे इ.तसेच शहरातील रेड झोन प्रभाग सोडून इतर ठिकाणी आता उद्योग,व्यवसायाला संधी मिळेल अशी आशा गेल्या ४३ दिवसांपासून घरातच बंदिस्त असणा-या नागपूरकरांना होती मात्र आयुक्तांनी हातावर पोट असणा-या निम्न व अति निम्न वर्गाचा कोणताही विचार न करता,राज्य शासनाने त्यांना दिलेल्या आधिकारांचा वापर करुन पुन्हा १७ मे पर्यंत नागपूरात लॉक डाऊन वाढवले. नुकतेच वाडी येथील एका ३५ वर्षीय शिंपीने निराशेतून आत्महत्या केली. गेल्या दोन महिन्यांपासून मध्यमवर्गीयांचे चांगलेच कंबरडे मोडले असताना हातावर पोट असणा-या कामवाल्या बाया,मजूर, ऑटोरिक्शेवाले,रस्त्यावर सामान विकणारे फूटकळ विक्रेते ,कूली यांच्या दयनीय आर्थिक परिस्थितीची कल्पनाही करता येत नसल्यामुळेच आज महापौरांना सर्वाधिक प्रश्‍न हे लॉक डाऊन तसेच आयुक्तांच्या या निर्णयाबाबतच विचारण्यात आले.

आयुक्तांचे आदेश हे माझ्यावर तसेच नागपूरकरांवर बंधनकारक असलल्याचे महापौर हे म्हणाले. मात्र सतरंजीपुरा किवा मोमिनपूरात कोरोना बाधित सापडत असल्याने जयताळा किवा मनीष नगर येथील लहान-लहान दूकानदारांनी का मरावं!असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. संचार बंदीत असणारा नागपूरचा भाग वगळता,इतर भागांसाठी आयुक्तांनी वेगळे धोरण ठरवायला हवे होते,असे ते म्हणाले. आयुक्तांच्या लॉक डाऊन वाढीच्या निर्णया विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. या पूर्वी देखील सतरंजीपुरा येथील १२०० लोकांना विलगीकरणात ठेवल्यामुळे त्या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाली असून उद्या मंगळवारी यावर सुनावणी होणार आहे. या खंडपीठाने केंद्र सरकार,राज्य सरकार,जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्तांना या प्रकरणावर कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

भाजप शहराध्यक्ष् प्रवीण दटके यांनी काल रात्री जारी केलेल्या व्हिीडीयोबाबत देखील महापौरांना प्रश्‍न विचारण्यात आला,दटके यांनी आयुक्तांना सरसकट संपूर्ण शहर लॉक डाऊन न करता,सामान्य नागरिकांचा विचार करुन आयुक्तांनी मध्यम मार्ग स्वीकारण्याची विनंती केली होती. याबाबत बोलताना महापौरांनी,शहराध्यक्ष्ांची मागणी ही योग्य असल्याचे सांगितले.आयुक्तांनी टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्ग काढला असता तर लहान विक्रेते यांना दिलासा मिळाला असता,जे मत माझ्या पक्षाच्या शहराध्यक्ष्ाचे तेच माझे देखील असल्याचे महापौर म्हणाले.शासनाचा आदेश नागपूर शहरासाठी आयुक्तांनी वगळला.आम्ही लोकप्रतिनिधी असून लोकांच्या डोळ्यातले अश्रू सरकारी माणसांपेक्ष्ा लोकसेवकांनाच कळत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दिलेली परवानगी मोडीत काढून आयुक्तांनी त्यांना मिळालेले आधिकार यावर आदेश काढले जे सर्वांवर बंधनकारक असणार आहेत,असे ते म्हणाले.

आज नागपूर शहरात एक चार महिन्याचा बाळाचा बाप दूधाच्या डब्यासाठी वणवण भटकत असल्याचे मला फेसबूकच्या माध्यमातून कळल्यावर आधी दोन दूध पावडरचे डबे त्या माणसाच्या घरी स्वीय सहायकाकडून पोहोचवताच त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते.लॉक डाऊनमुळे आधीच अनेकांचे व्यवसाय बुडाले,सगळेच काही ना काही गमावून बसले आहेत.नागपूरच्या ४४ डिग्रीपर्यंत पोहोचलेल्या रणरणत्या उन्हात कूलर,एसी,इंवरटर,पंखे व्यवसायी यांचे देखील वारेमाप नुकसान झाले असून त्यांना देखील लवकरच दिलासा मिळणे गरजेचे असल्याचे महापौर हे म्हणाले.

एका नेटीझनने महापौरांनी आज ‘ग्रीन शर्ट’घातला असल्यामुळे नागपूर हे ‘ग्रीन झोन’मध्ये येईल का?असा प्रश्‍न विचारला असता,आपण सगळेच आशावादी आहोत.तुमची आशा आणि माझी आशा मिळून लवकरच हे घडेल.आपण सगळे कोरोना संबधीचे सगळे नियम व अनुशासन पाळल्यास नागपूर हे ग्रीन झोनमध्ये नक्कीच येईल,असे महापौर उत्तरले.

विलगीकरणाला घेऊन आयुक्तांसोबत झालेल्या आरोप-प्रत्यारोपाबाबत प्रश्‍न विचारला असता,एकाच बसमध्ये ज्या पद्धतीने ४० माणसे घेऊन जाण्यात येत होती,ते धक्कादायक व गंभीर असल्याचे महापौर म्हणाले. बसमधील ४० वा.माणूस हा जर २ -या क्रमांकाच्या माणसाच्या कोरोना बाधिताच्या संपर्कात आला तर हा धोका बाधित नसलेल्यांसाठी निश्‍चितच फार मोठा असल्याचे ते म्हणाले शिवाय व्हीएनआयटी असो किवा आमदार निवास,ज्या पद्धतीने ते नागरिक विलगीकरणात वावरत आहेत त्यावरुन विलगीकरणाच्या मूळ उद्ेश्‍यालाच हरताळ फासल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

‘तळीरामांच्या’प्रश्‍नावरआम्ही नागपूरकरांनी काय पाप केले?तिथे देशाच्या राजधानीत दारुची दूकाने उघडण्यात आली मग नागपूरात का नाही?’असा आर्त प्रश्‍न ही महापौरांना विचारण्यात आला.यावर उत्तर देताना दारुची सर्वच दूकाने उघडण्याचे राज्य शासनाचे आदेत आहेत.फक्त मुंबई,पुणे,पिंपरी चिंचवड,ठाणे व नाशिक सोडून मात्र आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर शहरासाठी देखील तो आदेश लागू केला.सामाजिक अंतराचे पालन करुन शहरातील दारु दूकानांबाबत ही आयुक्तांना योग्य तो निर्णय घेता येऊ शकला असता मात्र राज्य शासनानेच आयुक्तांना नागपूर शहरासंबधी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले असल्यामुळे,याबाबत महापौर म्हणून मी देखील आयुक्तांच्या निर्णयाला बांधिल असल्याचेच महापौर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *