उपराजधानीनागपूर मनपा

नागपूरचा विकास की कायमचा ‘सत्यानाश!’पर्यावरणवाद्यांचा तीव्र संताप

(भाग-१)

(छायाचित्र :सहकार नगर घाट येथील नामशेष झालेली हिरवळ,मनपा उद्यान विभागाचे अधिक्षक अमोल चोरपगार यांनी दिली सुबाभूळच्या नावावर शेकडो वृक्षे कापण्याची अनुमती!)

शहरातील लाखो झाडे झाली भुईसपाट

मनपा आयुक्त म्हणतात झाडांच्या कत्तलींचा मागोवा घेणे पत्रकारांचे काम! आमचे काम फक्त पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यापुरतेच!

नव्या कायद्यानुसार हेरिटॅज झाडे कापण्यासाठी अनुमती देण्याचा अधिकार मनपा आयुक्तांना देखील नाही तरीही शहरात हजारो झाडांची राजरोसपणे कत्तल सुरुच

मनपाच्या उद्यान विभागाचा कर्मचारीच संशयाच्या भोव-यात!उद्यान विभाग पांढरा हत्ती

एकीकडे हिरवळ निर्माण करण्यासाठी मनपाने मागवल्या निविदा दूसरीकडे कडबी चौकात पूलासाठी कापले शंभर वर्ष जुने झाड!

नारी येथे बिल्डरने कापले एक हजार चोवीस झाडे

येत्या एका दशकातच नागपूरकरांची ‘प्राणवायू’साठी होणार तडफड:पर्यावरणवाद्यांचा दावा

नागपूरात फेब्रुवरीतच तापमान ४० पल्ल्याड:मे भाजून काढणार:माणसाच्या लालसेवर भारी पडतोय निसर्गाचा कोप

तात्कालीक फायदा बघणारे नागपूरकर नागरिकही तितकेच दोषी!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.१३ मार्च २०२३:हिवाळी अधिवेशनादरम्यान म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये केंद्रीय वायुप्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल प्रसिद्ध झाला त्यात डिसेंबर महिन्यात फक्त १ दिवस वगळता उर्वरित सर्व दिवसांची नागपूरातील हवा प्रदुषित होती.शहरातील हिरवळीच्या व स्वच्छ हवेच्या ठिकाणची ही गुणवत्ता नोंदविण्यात आली हाेती,याचा अर्थ इतर अस्वच्छ ठिकाणी ही गुणवत्ता कशी असेल? याचा अंदाज येतो.१ ते ५ डिसेंबर या काळात हवेची गुणवत्ता ३०१ ते ४०० युनिट्स इतकी अर्थात सर्वाधिक निकृष्ट होती,या स्तराच्या प्रदुषणामुळेच श्‍वसनाचे आजार बळावतात व आरोग्य क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मंडळींनी देखील दमा व अस्थमाचे रुग्ण या काळात वाढले असल्याच्या माहितीला दूजाेरा दिला.

६ ते १३ डिसेंबर दरम्यान देखील हवेची गुणवत्ता ही २०१ ते ३०० युनिट्स अर्थात वाईट दर्जाची होती,थोडक्यात नागपूरच्या वातावरणात अति सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण(पीएम.२.५)अति प्रमाणात वाढले आहे.मागील काही वर्षात नागपूर शहराच्या तापमानात व प्रदुषणात कमालीची वाढ झाली असल्याचे हे निर्देशांक ठरले आहे.

शहरातील वायू प्रदुषण कमी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने जानेवरी १ जानेवरी रोजी २०२३ रोजी शहरातील काही प्रमुख रस्ते व चौकात हिरवळ(ग्रीन बफर)तयार करण्याचा निर्णय घेतला.यात शहरातील सात रस्त्यांची निवड ही करण्यात आली.जीपीओ चौक ते बोले पेट्रोल पंप,रहाटे कॉलनी चौक ते अजनी क्लॉक टॉवर ,झिरोमाईल जवळील मेट्रोचा पूल,वनामती ते अलंकार चौक,क्रीडा चौक रस्ता,रामगिरी,सेमिनरी हिल्स ते व्हिसीए स्टेडियम आणि कृपलानी चौक ते वर्धा मार्ग या रस्त्यांवर वायू प्रदुषण रोखण्यासाठी मनपा या बफर प्रकल्पावर ८.७४ लाख रुपयांचा निधी खर्च करणार आहे.यामध्ये फूटपाथ व चौकांच्या आसपास असलेल्या मोकळ्या जागांवर काही विशिष्ट प्रकारची झाडे,फूले लावण्यासाठी मनपातर्फे निविदा देखील मागविण्यात आल्या.

हिरवळीमुळे हवेतील धुळीचे कण कमी होतील,असा मनपाचा ‘गोड ’समज आहे.विशेष म्हणजे या पूर्वी शहराला नॅशनल क्लिन एअर मिशन अंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता.यापूर्वीच्या प्रदूषण नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मनपाने शहरात २४ ठिकाणी अशाप्रकारचे ‘बफर झोन’तयार केल्याचा दावा ही केला आहे.

थोडक्यात यावरुन नागपूर महानगरपालिकेला नागपूरातील ‘हिरवळ’हा किती चिंतेचा व महत्वाचा विषय वाटतो हे त्यांच्या ‘धोरणातून’तर सिद्ध होतं मात्र दूसरीकडे शहरात २०१४ नंतर विविध प्रकल्पांसाठी शहरातील लाखो झाडांचा बळी गेला असून, २०२३ मध्ये देखील यात कोणतीही कमतरता आली नसून उलट दिवसागणिक यात वाढ होत असल्याचा शेकडो घटना समोर येत आहेत,परिणामी शहरातील पर्यावरणवाद्यांसह आता नागरिकांचाही संताप चांगलाच अनावर झाला असून, सोशल मिडीयावर याविषयी नागपूर महानगरपालिका,नागपूर सुधार प्रन्यास,सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय रस्ते परिवहन महामार्ग विभाग तसेच मनपाच्या हेरिटेज समितीच्या कारभारावर कठोर टिकेची झोड उठली आहे.

शहरातील राजकीय भाग्यविधात्यांकडे शाश्‍वत(सस्टनेबल)विकासाचा दृष्टिकोणच नसल्यानेच त्यांच्या काळात नागपूर शहराचा झालेला विकास याला विकास म्हणायचा की कायमचा सत्यानाश?असा प्रश्‍न उघडपणे समाज माध्यमांवर विचारला जात आहे,सर्वात महत्वाचे म्हणजे पर्यावरणाशी निगडीत एवढ्या महत्वपूर्ण विषयावर प्रसार-प्रचार माध्यमांची ‘अर्थपूर्ण’चुप्पी यावर देखील समाज माध्यमात तीव्र रोष उमटला आहे.फार कमी माध्यमात नागपूर शहराचा झालेला व होणारा ‘विनाश’यावर प्रकाशझोत प्रसिद्ध होतो!

विशेष म्हणजे मनपाच्या उद्यान विभागातील अधिका-यांचे याबाबतीतील ‘मौन’बरेच काही सांगून जाणारे आहे.काँग्रेसच्या सत्ताकाळात सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला ‘पिंज-यातला पोपट’असे संबोधले होते,मोदींच्या काळात त्याच पोपटांनी कशी ‘गगनभरारी’घेतली आहे,हे अवघा भारत देश बघतच आहे मात्र स्थानिक पातळीवर देखील त्यांच्याच पक्षाचे काही सत्ताधारी हे किती प्रामाणिपणे त्यांचे अनुकरण करुन ‘पोपटधा-यांना’महत्वपूर्ण ‘पदांवर ’ बसवून लाभ उठवित अाहेत,याची देखील चर्चा समाज माध्यमांवर उमटली आहे.

या शहरात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा सर्वात पहीला प्रकल्प आला तो म्हणजे ‘मेट्रो’.सुरवातीला साढे आठ हजार कोटींचा असणारा या प्रकल्पाने आता साढे बारा कोटींचा पल्ला गाठला आहे.मेट्रोसाठी शहरातील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली.त्यावेळी तो विकास शहरवासियांनाही ‘सुखावह‘ वाटला होता मात्र हळूहळू मेट्रो नावाच्या या महा पांढ-या हत्तीने नागपूर शहरातील ‘संपूर्ण’ मोक्याच्या जागा गिळंकृत केल्या.या ठिकाणच्या हिरवळ भुईसपाट करुन टोलेजंग मेट्रो स्टेशन बांधले व आता तर चक्क त्याचा ‘व्यवसायिक‘उपयोग सुरु आहे,यातून मिळणारे उत्पन्न हा कोणा-कोणाच्या खिशात जातोय?मेट्रोला मिळणा-या या व्यवसायिक उपत्न्नामुळे नागपूरकरांवरील कर्जाचा बोजा कमी होत आहे का?कि तो जशा चा तसाच आहे? महत्वाचे म्हणजे हजारो कोटींच्या मोक्याच्या जागा गिळंकृत करुन देखील महामेट्रोची नजर आता पर्यावरणावरणा संधोशन करणारी संस्था’नीरी’हिच्या मोक्याच्या जागेवर पडली आहे,त्यामुळेच मेट्रोला आत कार पार्किंगसाठी नीरीची जागा हवी असून येथील २५० झाडांची हिरवळ नष्ट करुन कमर्शियल कार पार्किंग प्लाझा निर्माण करायचा आहे.मेट्रोची अशी कल्पकता आहे की नागपूरकर आपली कार या ठिकाणी पार्क करतील मग मेट्रोने गंतव्याकडे निघतील परत कार घेतील व घरी परततील!ज्याच्याकडे स्वत:ची कार आहे तो सरळ आपल्या गंतव्याकडे जाण्याचीच मानसिकता ठेवतो मात्र तरीदेखील नीरीवरील मोक्याच्या जागेवर मेट्रोचा सुरवातीला कार पार्किंग, यानंतर इतर ठिकाण सारखेच त्याचे ही कमर्शियल उपयोग,बक्कळ उत्पन्न मिळवण्याचा हेतू या धोरणातून स्पष्ट होतो.पर्यावरणवाद्यांनी नीरीची जागा मेट्रोला देण्याचा तीव्र विरोध केला असून या पुढे मेट्रोसाठी शहरातील आणखी कुठलीही हिरवळ नष्ट करण्याला पुरजोर विरोध दर्शवला आहे.विशेष म्हणजे नीरीचे पूर्व संचालक यांनी मेट्रोच्या या योजनेला रोखून धरले होते,एका प्रकणात त्यांची उचलबांगडी ‘दिल्लीत’आपले ’वजन’वापरुन करण्यात आली व त्यांच्या ठिकाणी ‘होयबा’ची नियुक्ती झाली असल्याने आता मेट्रोला नीरीच्या जागेवर ‘नियमानुसार ’ ताबा मिळाला असून कार पार्किंगचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती सोशल मिडीयावर देखील उमटली आहे.मानवाला जिवंत राहण्यासाठी प्राणवायू देणा-या लाखो झाडांचा महामेट्रो व उड्डाण पूलांच्या निर्मितीत आधीच कत्तल झाल्यानेच पुन्हा एका कार पार्किंकसाठी हिरवीगार व हेरिटेज असणा-या २५० झाडांची कत्तल याला पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

(छायाचित्र: हेरिटेज झाड विकासाच्या मध्ये आले की ‘विकास’ हेरिटेज झाडाच्या मूळावर उठला?)

नागपूर शहराचा ‘सात-बारा’ मेट्रोच्या नावाने केल्याची जहाल टिका ही पर्यावरणवाद्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केली असून, त्यावर अनेक बुद्धीजीवींनी देखील आपले परखड मत व्यक्त केले आहेत,यावरुन महामेट्रोच्या नागपूरातील हिरवळ नष्ट करणा-या धाेरणाविषयी पर्यावरणवाद्यांमध्ये किती तीव्र संताप उमटला आहे,हे निर्दशनास येतं.

स्वच्छ पर्यावरण,मुबलक प्राणवायू यासोबतच आरोग्याचा सोयी,सर्वांना सुलभ शिक्षण,खड्डेमुक्त रस्ते,सुलभ शौचालये,अद्यावत मल निस्सारण वाहीन्या,हिरवेगार बगिचे ,शहरातील हेरिटेज तलावांचे संवर्धन इत्यादी यासारख्या ‘शाश्‍वत‘ विकासाच्या संकल्पना राबविण्या ऐवजी शहराचे पर्यावरणीय संतुलन बिघडवणारे सिमेंट रस्ते,उड्डाण पुले,सौंदर्यीकरणाच्या नावावर शहरातील तलावांचे केलेले दोहन,शोषण याला विकास म्हणायचा की ‘सत्यानाश?’असा प्रश्‍न आता समाज माध्यमांवर विचारला जात आहे.

नारा श्‍मशान घाटाच्या पुलाजवळील जवळपास १५० हिरवीगार झाडे एका बिल्डरने जेसीबीने उखडून फेकली.यात अनेक झाडे ही हेरिटेज होती.वृक्ष मित्र सचिन खोब्रागडे यांनी मनपाच्या उद्यान विभागाला याची सूचना दिल्यानंतर आशीनगर झोन व मंगळवारी झोनच्या उद्यान विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.या ठिकाणी ‘रो-हाऊस’च्या निर्मितीसाठी बिल्डरने उद्यान विभागाची कोणतीही पूर्व परवनागी न घेता तब्बल दिडशे झाडांची निघृणतेनी कत्तल केली.या ठिकाणी ‘जेरी प्रॉफिट ग्रूप’या कंपनीचे फलक लागले होते.या फलकावर अनिल वाधवानी यांचा मोबाईल क्रमांक होता मात्र त्यांना फोन केल्यानंतर या जमीनीशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले तर हिरव्यागार झांडांना मूळासकट उखडून फेकणा-या कामगारांनी, हे काम त्यांना कमाल चौकात दूकान असणा-या लाला जायसवाल यांनी दिले असल्याची पुष्टि केली.

सहकार नगर घाटाजवळील झाडांची देखील हीच दशा याच वर्षी जानेवरी महीन्यात झाली.घाट मार्गालगतच्या झुडपी क्षेत्रातमध्ये अनेक वर्षांपासून मोठमोठी झाडे विसावली होती मात्र अज्ञात इसमाने काही मजुरांकडून ही हिरवीगार झाडे तोडण्याचा सपाटा लावला व एमएच/४१/ एटी/५८२५ आणि एमएच/४१ एटी/७५८८ या वाहनांमधून वाहून नेण्याचा प्रकार केला.याची माहिती वाइल्ड लाइफ वेलफेअर सोसायटीच्या सदस्यांना मिळताच त्यांनी संबंधित ठिकाण गाठून चौकशी केली असता,आम्ही नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी असून निविदा प्रक्रियानुसार झाडे तोडून नेत असल्याचे धक्कादायक उत्तर त्यांनी दिले! मात्र,या संर्दभात ते कोणातीही कागदपत्रे दाखवू शकले नाहीत.नागरिकांनी याचे मोबाईलवर चित्रिकरण केले व लक्ष्मीनगर झोनच्या कार्यालयात संपर्क साधला असता, असल्या प्रकारची कोणतीही निविदा काढली नसल्याचे सांगण्यात आले.या घटनेनंतर देखील मनपा कर्मचा-यांनी घटनास्थळी येऊन कागदाेपत्री खानापूर्ती केली व कर्तव्याची इतिश्री मानली!

उद्यान विभागाचे उपायुक्त भेलावे यांनी त्यांच्याच उद्यान कंत्राटदार मनोज कांबळे याला लक्ष्मी नगर जवळ जेरील लॉन शेजारी असणारे झाड विना परवानगी कापताना रंगे हात पकडले,हे विशेष!असे किती तरी डोलदार हिरवेगार झाडे कंत्राटदाराच्या अतिहव्यासाला बळी पडली असावीत ज्याची माहिती भेलावे यांना देखील नसेल.

जरिपटकाची प्रख्यात शाळा महात्मा गांधी हायस्कूलच्या मुख्याध्यपकांनी कोणतीही परवानगी न घेता शाळेच्या परिसरातील दोन कडू लिंबाची हिरवीगार झाडे कापून फेकली.या झाडांचा दोष एवढाच होता ते शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध हवा,प्राणवायू आणि सावली पुरवायचे!या मुख्याध्यापकाविरुद्धही फक्त जरीपटका पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल झाली, पुढे त्याचे काय झाले?किती दंड भरला किवा कारावासासाठी मनपा अधिका-यांनी पुरजोर प्रयत्न केला हा संशोधनाचा विषय आहे.

समाजातील सर्वात प्रतिष्ठित वर्ग डॉक्टर्स लोकांचा वर्ग हा देखील पर्यावरण व झाडांच्या बाबतीत किती निष्ठूर आहे याचे उदाहरण रामदासपेठ येथील डॉ. जसपाल अर्नेजा यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावरुन येते.त्यांनी देखील चार हिरवीगार,डोलदार झाडे मूळासकट उखडून टाकण्याचे कर्तृत्व झळकवले,सदर पोलिस ठाण्यात त्यांच्याही विरोधात उद्यान विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

आरटीपीएसच्या हेरिटेज झाड कापण्याची परवागनी देण्याचे महान कार्य उद्यान विभागाचे अधिक्षक अमोल चोरपगार यांनी अरुणा नागमोती यांना दिली,त्यांनी २० हजार चौ.मी.जागेवरील झाडे कापण्याची परवानगी मागितली होती यातच हेरिटेज झाडाचाही बळी गेला मात्र आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी हेरिटेज झाडांविषयी लागू केलेल्या नवीन कायद्यानुसार मनपाच्या उद्यान अधिक्षकांना हेरिटेज झाडे कापण्याची परवानगी देणयाचा अधिकार नसून, हेरिटेज झाड कापण्यासाठी आता ‘राज्य वृक्ष प्राधिकरण समिती’ची पूर्व परवानगी बंधनकारक आहे.मात्र,आरटीपीएसकडून ना-हरकत प्रमाणपत्र न घेताच चोरपगार यांनी नागमोतीला हे हेरिटेज झाड कापण्याची परवानगी दिली,यावरुन मनपाच्या उद्यान विभागाला कर्तव्यदक्षतेत, राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे,अशी बोचरी टिका ही समाज माध्यमात उमटली होती.

(छायाचित्र :हेच ते हेरिटेज झाड!नागमोती यांना चोरपगार यांनी कापण्याची परवानगी दिली!)

पाच महिन्यांपूर्वी मनपाच्याच लक्ष्मी नगर झोनमधील पाच झाडेच जमीनीपासून कापून टाकण्यात आली होती,वृक्ष मित्र सचिन खोब्रागडे यांनी बजाज नगर पोलिस ठाण्यात लक्ष्मी नगर झोनचे सहायक आयुक्त यांच्याच विरोधात तक्रार नोंदवली यावर त्या महिला अधिकारी यांनी चोरपगार यांच्याचकडे या ‘कृत्यासाठी’बोट दाखवले,हे विशेष! कुंपणच शेत खात असल्याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

(छायाचित्र: कुंपणच शेत खातं उक्ती सार्थ केली!लक्ष्मी नगर झोन कार्यालयातील हीच ती पाच झाडे ज्यावर निर्दयतेने चोरपगार यांच्या सहीनिशी घाव घालून फडशा पाडण्यात आला!)

विश्‍वेशवराय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान(व्हीएनआयटी)नागपूर येथे सूबाभूळ प्रजातीची उन्मळून पडलेली ५२५ झाडे व संपूर्ण वाळलेली ३८० झाडे कापण्याची परवानगी ऐन करोनाच्या काळात मे २०२१ मध्ये प्रदान करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.हे झाडे खरंच उन्मळून पडली होती का?यावर शंका व्यक्त करीत,चोरपगार यांनी कोणतीही सुरक्षा ठेव जमा न करता तसेच वृक्षारोपणाची हमी न घेताच ही परवानगी व्हीएनआयटीला प्रदान केल्याची बाब समोर आली आहे.विशेष म्हणजे दिलेल्या कालावधीत कोणतीही शहनिशा न करता रिन्यू परवानगी देखील व्हीएनआयटीला देण्यात आली.

यामुळेच व्हीएनआयटीचा आतील परिसर बोडखा झालेला दिसून पडतोय,विशेष म्हणजे शेकडो झाडांची कत्तल झाल्याने यावर पर्यावरणवाद्यांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर चोरपगार यांनी व्हीएनआयटीला वृक्षारोपण करण्याची लिखित सूचना केली यानंतरही सुबाभूळ,बाभूळ,गुलमोहर अशी एकूण ४ झाडांना कापण्याची पुन्हा परवागनी देण्यात आली. उद्यान विभागाच्या लेखी सुबाभूळ हे मानवाला प्राणवायू तसेच पक्ष्यांना आश्रय देत नसावेत,शहरातील शेकडो झाडे ‘सुबाभूळच्या’ नावाखाली कापून फेण्यात आली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ देखील झाडे कापून फेकण्यात मागे राहीला नाही,जानेवरी महिन्यात पार पडलेल्या ‘राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस’च्या आयोजनासाठी विद्यापीठ कॅम्पसच्या परिसरातील शेकडो हिरवीगार झाडे जेसीबी लाऊन कापण्यात आली.चोरपगार यांनी फक्त कारणे दाखवा नोटीस पाठवून कर्तव्याची इतिश्री मानली,या नोटीसीचे पुढे काय झाले?एफआयआर दाखल का करण्यात आली नाही?याचे उत्तर त्यांच्याजवळ ही नसावे.

एलआयसी चौकाला लागून हेरिटेज असलेले लिंबाचे झाड AFCON ने पाडून टाकले,चोरपगार यांनी याही घटनेत गच्च डोळे मिटले.

(छायाचित्र: एलआयसी चौकाला लागून असलेले हेच ते हेरिटेज लिंबाचे झाड AFCON ने पाडले, पुढे चोरपगार यांनी काहीच कारवाई केली नाही!)

रजवाडा पॅलेस शुक्रवारी तलावाजवळ २०० पेक्षा अधिक झाडे अगदी आताआतापर्यंत डोलदारपणे उभी होती,येणा-या पांथस्तांना रणरणत्या उन्हात उन्हाच्या काहीलीपासून संरक्षण देत होती मात्र या ही ठिकाणची १९३ डोलदार हिरवीगार झाडे कापण्याची परवागनी अग्रवाल नामक व्यक्तीला देण्यात आली, त्यांनी अनुमती घेतली त्याहीपेक्षा जास्त म्हणजे, सर्वच झाडे कापून या ठिकाणी औषधी बाजार आणि कापड बाजारासाठी दूकाने बांधण्यासाठी जमीन नांगरुन टाकली!आता या ठिकाणावरुन जाणारे नेहमीचे वाटेकरु हे उजाड,विराण रस्त्याचे रुप बघून अक्षरश: स्तब्ध झालेत!

(छायाचित्र: रजवाडा पॅलेस शुक्रवारी तलावा जवळ २०० पेक्षा जास्त झाडे होती त्यातील १९३ झाडे कापण्याची परवागनी मनपाच्या उद्यान विभागाने अग्रवाल यांना दिली मात्र औषध व कापड दूकानांसाठी संपूर्ण झाडेच नामशेष करण्यात आली,आता हा रस्ता पूर्णत:हिरवळ‘मुक्त‘झालेला आढळतो!)

मध्य रेल्व नागपूर मॉडेल अंतर्गत अजनी यार्डमध्ये ट्रॅक एक्पांशनसाठी मनमानेल त्या पद्धतीने हिरवीगाड झाडे कापून फेकण्यात आली.आता या कारभारासाठी रेल्वे आणि कंत्राटदार एकमेकांकडे बोट दाखवित आहे.अजनी यार्डमध्ये दीड किमी लांबीचे चार नवे ट्रॅक टाकण्यात येत असून अजनी पुलाखालून यार्डला ते जोडले जाणार आहे.हे गरजेचे असले तरी यासाठी फक्त दीड किलोमीटरच्या परिसरातील तब्बल ८० च्या जवळपास हिरवीगार झाडे कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय कंत्राटदाराने कापून फेकली!यात लिंबांच्या झाडांचा सर्वाधिक भरणा असून लिंबांचे झाड हे धुळी कण,कार्बन डाय ऑक्साईड शोषूण घेते असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले असतानाही व अजनीसारख्या ठिकाणी सर्वाधिक वाहनांचे प्रदूषण असतानाही ही डोलदार हिरवेगार वृक्ष कापून फेकण्यात आले.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर रेल्वे स्टेशनसोबतच अजनी स्टेशनचा कायाकल्प करणा-या योजनेचे भूमीपूजन केले होते.या रेल्वे स्टेशनच्या पुर्नविकासासाठी तब्बल २१४ झाडांचा बळी जाणार आहे,याशिवाय ही ८० झाडे त्या व्यतिरिक्त फक्त रेल्वे टॅकसाठी कापण्यात आली हे विशेष!

याशिवाय मनपाच्याच कर्मचा-यांतर्फे शांतिनगर येथील बंगाली देवी मैदान परिसरातील अनेक हिरवीगार झाडे कापण्यात आली.प्रकाश वीरेंद्र उपाध्याय नामक व्यक्तीने यावर आक्षेप नोंदवला व शांति नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.या ही ठिकाणी झाडे कापणा-यांनी मनपाच्या अधिका-यांच्या सांगण्यावरुन झाडे कापत असल्याचे सांगितले.

आता सी-२० च्या विदेशी पाहूण्यांसाठी करण्यात येणा-या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वर्धा रोड अजनी चौकात क्लॉक टॉवर समोरील चार डोलदार हिरवेगार वृक्षे मनपाने कापून चक्क अर्धे केले!

वृक्षमित्र सचिन खोब्रागडे यांनी मनपाचे उद्यान अधिक्षक अमोल चोरपगार व कंत्राटदाराच्या विरोधात धंतोली पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली. यावर पोलिसांनी चोरपगार यांना बयाणासाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यासाठी पत्र व्यवहारही केला मात्र,शहरवासियांवर वृक्ष तोडीसाठी कारवाई करणारे चोरपगार स्वत:मात्र, चार चार हिरवीगार डोलदार वृक्षांचा सी-२० सारख्या तात्कालीक उपक्रमासाठी करण्यात येणा-या सौंदर्यीकरणासाठी बळी घेऊन देखील, या कृत्याची जबाबदारी घेण्यास धजत नाहीत,हे सिद्ध होतं

लक्ष्मीनगर जवळील सायंटिफिक सोसायटीजवळ शहरात दारोदारी फिरुन वृक्षांच्या फांद्या तोडण्यासाठी काम मागणा-याला इसमाला, एका हिरव्यागार वृक्षाच्या फांद्यांच्या छटाईचे काम देण्यात आले होते मात्र शहरभर फिरणा-या वृक्ष कापणा-या टोळीच्या या इसमाने फक्त फांद्यांची छटाई न करता जडापासून हे डोलदार वृक्षच कापून टाकले!या आरोपीजवळ असणा-या गाडीत त्या वृक्षाची लाकडे भरली जात होती.बजाज नगर पोलिस ठाण्यात या आरोपीविरोधात स्थानिकांनी तक्रार ही नोंदवली आहे.

जरीपटका भागातील ७०० झाडे कापून टाकण्याविरोधात महाराष्ट्र(नागरी क्षेत्रे)झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ च्या कलम२१(१) अन्वये जरीपटका पोलिस ठाण्यात २८ फेब्रुवरी २०२३ राेजी तक्रार नोंदविण्यात आली.७०० ही संख्या निश्‍चितच भीतीदायक आहे.मागील वर्षी २ जून २०२२ रोजी मानकापूर पोलिस ठाण्यात देखील ७८ झाडे कापण्याच्या विरोधात एफआयआर दाखल आहे.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनीच मागील वर्षी सकाळी, रामदासपेठ येथील क्रिम्स हॉस्पीटल समोरुन सायकलिंग करीत असताना विना परवानगी कापलेल्या डोलदार हिरव्यागार झाडांच्या फांद्यां, याची दखल घेत बजाज नगर पोलिस ठाण्यात या रुग्णालयाच्या संचालकांविरुद्ध तक्रार नोंदवली होती.शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडीचे गंभीर संकट ओढवले असताना, नुकतेच मनपात पार पडलेल्या पत्र परिषदेत मनपा आयुक्तांना त्यांनी केलेल्या तक्राराविषयी पुढे काय झाले?आरोपींना दंड किवा शिक्षा मिळाली का?अशी विचारणा केली असता,त्याचा मागोवा पत्रकारांनीच घ्यावा,आमचे काम  फक्त तक्रार नोंदविण्यापुरतीच आहे,असे चमत्कारिक व तितकेच बेजवाबदारपणाचे उत्तर त्यांनी दिले!

या शहराची पालक संस्था असणा-या नागपूर महानगरपालिकेच्या प्रमुखांचाच जर या शहरातील जलद गतीने नष्ट होणा-या पर्यावरणाविषयी एवढा ‘लाईट’दृष्टिकोण असेल तर, त्यांच्या व त्यांच्या अधिनस्थ अधिका-यांकडून पर्यावरण रक्षणाची कोणतीही अपेक्षा निदान नागपूरकर नागरिक करु शकत नाही.

महत्वाचे म्हणजे,राज्यात गेल्या वर्षी जून मध्ये सत्ता बदल होताच अनेक अधिका-यांची उचलबांगडी झाली मात्र सप्टेंबर २०२० पासून नागपूर मनपात ठाण मांडून बसलेल्या आयुक्तांची खूर्ची सहीसलामत राहीली,या मागे शहरातील कोणत्या मंत्र्यांचा वरदहस्त त्यांच्यावर आहे?त्यांच्या कार्यशैलीवर कोणकोणते सत्ताधारी ‘संतुष्ट‘आहेत?याचा ही शोध सोशल मिडीयावर पर्यावरणवादी घेताना आढळतात.

मनपाचा परिवहन विभाग कापणार मोरभवन येथील १०१४ झाडे-
ज्यांच्यावर शहरातील हिरवळीचे रक्षण व संवर्धनाची जबाबदारी आहे त्याच स्थानिक स्वराज्य संस्था शहरातील हिरवळी कश्‍या नष्ट करीत चालल्या आहेत याचेच आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे मनपाच्या परिवहन विभागाकडून सादर झालेल्या अर्थसंकल्पात मोर भवन या सर्वात प्रदुषित ठिकाणच्या व जिथे सर्वाधिक हिरवळीची गरज असलेल्या ठिकाणचीच एकूण १०१४ झाडे तोडण्यासाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली!या ठिकाणी या विभागाला बस डेपो साकारायचा असून वाडी नाका येथील बस डेपोसाठी देखील त्या ठिकाणची हिरवीकंच डोलदार अशी २११ झाडे कापली जाणार आहेत!शहरातील मध्य भागातील अतिशय प्रदुषित भागांचे प्रदुषण कमी करणा-या उपाय योजना साकारण्या ऐवजी, आहे त्या हिरवळींचा देखील फडशा पाडून त्या ठिकाणी अर्थाजन मिळवून देणारे बेछूट कमर्शियल बांधकाम करणा-या योजना, मनपा कोणाच्या इशा-यावरुन राबवित आहे?याचा शोधही पर्यावरणवादी समाज माध्यमात घेत आहे.

आता नजर अंबाझरीच्या पायथ्याशी असणा-या हिरवळीवर-
अंबाझरी तलाव हे हेरिटेज तलाव असून देखील या ठिकाणी असणा-या उद्यानाचा ठेका सुरवातीला ३५ वर्षांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने नरेंद्र जिचकार नामक उद्योजकाला विकसित करण्यासाठी लीजवर दिले. या ठिकाणी हे उद्योजक अनेक कमर्शियल बांधकाम करणार आहेत.यातच हेरिटेज असणा-या अंबाझरी तलावातच लेझर शोसाठी मोठमोठे पाईपलाईन्स टाकण्यात येणार असून शहरातील हा आणखी एक ऐतिहासिक ठेवा व नागपूरकरांच्या हक्काचे ठिकाण खासगी विकासकाच्या भेट चढले असताना, आता नागपूर सुधार प्रन्यासची नजर अंबाझरीच्या पायथ्याशी गेली आहे.नासुप्रने या ठिकाणी नवे पार्किंग तयार करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

धरमपेठ कॉलेजजवळील टी-पॉईंट आणि मेट्रोचे धरमपेठ स्थानक यादरम्यान तलावाच्या पायथ्याशी हे पार्किंग तयार करण्याचे काम नासुप्रने हाती घेतले आहे.सुमारे दीड एकर परिसरात हे पार्किंग तयार होणार आहे.या ठिकाणी ८० दुचाक्या व ५३ कार पार्किंग करता येणार आहे.या ठिकाणी खाद्य पदार्थांचे स्टॉल्सही तयार करण्यात येणार अाहेत.मात्र या पार्किंगसाठी एकूण किती पुरातन झाडे हिरवीगार झाडे कापण्यात येतील?ही बाब नासुप्र सभापतींनी गुलदस्त्यातच ठेवली आहे.

गडकरींची देण..महामार्गावरील बोडके रस्ते!
नाशिक येथील ‘आपलं पर्यावरण‘ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी तर ‘गडकरीजी,बोडक्या रस्त्यांवरुन गायब झाडांचा मूक आक्रोश ऐका’म्हणून खरमरीत लेखच खरडला आहे.देशातील महामार्गाचा विस्तार करताना शाश्‍वत विकासाचा दृष्टिकाेणच महामार्गांवर दिसत नाही.पूर्वी महामार्ग तयार करताना कडेच्या वृक्षांना तेवढेच महत्व दिले गेले होते.ती तोडली गेली नाहीत.प्रवासाला त्यामुळे वेळ लागत असला तरी तो प्रवास पांथस्तांना आल्हाददायक वाटत असे.आता तर सर्वदूर बोडक्या महामार्गांवरुन जाताना अनेकांचे रोजगारच हिरावले गेले आहे.चहा टपरी,रसवंती,पंचरवाले,गॅरेजवाल्यांची आर्थिक गणिते कायमची विस्कटली.अनेक गावांची ओळखच पूर्णत:पुसल्या गेली आहे.

महामार्गांसाठी डोंगर प्रचंड प्रमाणात पोखरले जात आहेत.दगड मातीसाठी मोठा उपसा केल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.नैसर्गिक नाल्यांचा श्‍वास कायमचा कोंडला.डोंगरच कापल्यामुळे या ठिकाणच्या पर्जन्यमानावर गंभीर परिणाम झाले.चक्क वन जमिनीतून महामार्ग बांधण्यात आले त्यामुळे अशा ठिकाणच्या प्रदेशनिष्ठ वृक्षांच्या तोडीमुळे तेथील जैवविविधता पूर्णत:संपृष्टात आली!आजूबाजूच्या शेतीवर दुष्परिणाम झाला.

मूळात जुन्या महामार्गांचा विस्तार चार आळी(फोर लेन)ते आठ आळी(ऐट लेन)पर्यंत केला जात असल्यामुळे जुन्या महामार्गाच्या दोन्ही बाजूचे,शेकडो वर्ष जुने वृक्ष सर्रास गडकरी यांच्या विभागाकडून कोणताही दूरदृष्टिकोण न ठेवता तोडले गेले व तोडले जात आहेत.हे वृक्ष तसेच ठेऊन जमीन संपादन करने शक्य असताना फूटपट्टीच्या रेषेत समृद्धी महामार्ग असो किवा सूरत ते चेन्नई,अहमदाबाद ते हैदराबाद या महामार्गांसाठी जमीनी संपादित केली जात आहे.मात्र,जुना महामार्ग दुचाकी व तीन चाकींसाठी तर वृक्षांच्या बाजूचा मार्ग चार चाकी व अवजड वाहनांसाठी ठेवता आले असते.हा प्रयोग गडकरींनी आता तरी एखाद्या महामार्गासाठी अवलंबिण्यात आणावा,अशी अपेक्षा ही व्यक्त केली जात आहे.

वृक्ष म्हणजे अडथळा,वृक्ष म्हणजे अडगळ,वृक्ष् म्हणजे उपद्रवी घटक,वृक्ष म्हणजे विकासाला बाधा….हा दृष्टिकोण बाजूला सारुन आता तरी वृक्ष म्हणजे मानवी जीवन व पशुपक्ष्यांचे प्राण वाचविणारा,त्यांना प्राणवायूंचा पुरवठा करणारा कल्पवृक्षच असल्याची भावना गडकरी यांच्या विभागाच्या कोणत्याही प्रकल्पांमध्ये उमटेल का?आठशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग,आधुनिक साधनसामग्री असल्याकारणाने केवळ चार वर्षात बांधू शकत असल्याची शेखी मिरविणा-यांनी केवळ चार वर्षात एखादे वडाचे,पिंपळाचे,चिंचेचे झाड किती उंच वाढवू शकता?याचा थोडासा तरी विचार केला का?अशी विचारणा आता केली जात आहे.

पूर्वजांनी आपल्या पिढीसाठी जतन करुन ठेवलेला निसर्गाचा हा अमूल्य ठेवा केवळ विकासाच्या नावाखाली सहज नष्ट करुन, भविष्यातील पिढीसाठी किती महाभयंकर संकट ओढवून ठेवीत आहे,याचा विचार कोण करणार?एकीकडे महाकाय वृक्षांची कत्तल करीत सुटायचे दुसरीकडे ‘हरित रस्ते’ तयार करण्याच्या वलग्ना प्रत्येक भाषणात करायच्या!ज्या तातडीने रस्ता बांधणीचे काम सुरु केले तितक्याच तडफेने रस्त्याच्या दूतर्फा वृक्ष् लागवड व संवर्धन झाली पाहिजे व या ठिकाणच्या झाडांची वाढ झाल्यानंतरच टोल वसूली झाली पाहिजे.असा संताप ही समाज माध्यमांवर उमटलेला दिसतो.

समृद्धी महामार्गासारख्या पथ दिव्यांनी‘चकाकणा-या’ रस्त्यांवरुन प्रवास करणा-या अनेकांनी पुन्हा एकदा गंतव्य ठिकाणी पोहोचण्यासाठी जुन्या राज्य महामार्गावरुन प्रवास करण्याचा ध्यास घेतल्याचं दिसून पडतंय.याचं कारण समृद्धीवरुन शेकडो किलोमीटर प्रवास करुन देखील हिरवळ,माणसे,गाव,आल्हाद,चैतन्य ,जिवंतपणा नजरेस पडत नाहीत…..!याशिवाय ११ जानेवरी २०२३ रोजी नागपूर ते शिर्डी पर्यंतच्या या महामर्गाच्या उद् घाटनानंतर अवघ्या अडीच महिन्यात लहान मोठे अश्‍या घडलेल्या तब्बल ६०० दूर्घटना अनेकांच्या मनाचाही थरकाप उडवून गेला आहे.

नुकतेच विकासाच्या नावावर नागपूरातील कडबी चौक ते गोळीबार चौक आणि संत्रा मार्केटपर्यंत बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या ‘खांबासाठी’ या ठिकाणी गेल्या शंभर वर्षांपासून डोलदारपणे उभे असणारे पिंपळाचे झाड निर्दयतेने नामशेष करण्यात आले!हा मानवनिर्मित कृत्रिम खांब हे झाड वाचवून थोडा पलीकडूनही बांधला जाऊ शकला नसता का? शंभर वर्ष ज्याची साथ मिळाली,प्राणवायू मिळाला,सावली मिळाली,तेच शंभर सेकंदात मूळासकट उखडण्यात आले! हा विकास नव्हे तर ‘विध्वंस’ बघून स्थानिकांच्या डोळ्यातही अश्रू तरळले….!त्यांच्या बालपणीच्या आठवणी कायमच्या पुसल्या गेल्या.या पुलाचे भूमिपूूजन एप्रिल २०२१ मध्ये केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याच हस्ते झाले होते.दीड वर्षात हा पूल पूर्ण करण्याचे अभिवचन त्यांनी जाहीर भाषणात दिले होते आता २०२३ चा मार्च महिना उजाडला आहे मात्र या पूलाचे अर्धेही काम पूर्ण झाले नसून परिसरातील नागरिकांचे या अर्धवट कामामुळे अतोनात हाल होत आहेत.हा पूल पूर्णत्वास नेण्या ऐवजी बोले पेट्रोल पंप,तसेच कॅम्पस ते वाडीपर्यंतच्या पुलाला प्राधान्य देण्यात आल्याची नाराजी देखील स्थानिकांनी व्यक्त केली.

कंत्राटदारांना उड्डाण पुलांचे कंत्राटे देण्याचे सुसाट धोरणच राबविण्यात येत असून, अश्‍या उड्डाण पुलांची मागणी स्थानिकांनी केली असो किवा नसो,त्यांना साधं काळं कुत्र ही विचारणा करीत नसल्याचा रोष व्यक्त करीत,ही उड्डाण पुले खरंच नागपूरचा विकास करण्यासाठी बांधली जात आहेत?२०५० च्या पुढील पिढीचा विचार करुन तसेच वाढणा-या वाहतूकीचा विचार करुन बांधली जात आहेत?की कंत्राटदारांकडून ‘टक्केवारी‘ मिळाली असल्यामुळे, स्थानिकांचे मत लक्षात न घेता सार्वजनिक उपयोगाच्या जमीनींवर,पर्यावरणाची ऐसीतेसी करीत,रस्त्यांना बापजाद्यांची जागीर समजून, हिरवळी नष्ट करुन हा विकास साधला जात आहे?असा देखील तीव्र संताप समाज माध्यमात उमटलेला दिसून पडतोय.

(क्रमश:)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *