उपराजधानीनागपूर मनपा

मनपा उद्यान अधिक्षक चोरपगार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

जी-२० साठी शहरातील तब्बल तीन हजार झाडांवर वीजेच्या रोषणाईसाठी ठोकले खिळे

खिळ्यांमुळे झाडे सुखून मृत झाली तरच दाखल होतो गुन्हा:मनपाच्या विद्युत विभागाच्या अधिका-यानी तोडले अकलेचे तारे

नागपूरकर पत्रकरांना काहीच ‘चांगले’ दिसत नाही:मनपा आयुक्तांचा त्रागा!

एकूण ६० विदेशी पाहूण्यांसाठी होणार २०० कोटींचा खर्च!

दो दिन की चांदनी फिर अंधेरी रात:कोट्यावधीच्या उधळपट्टीवर नागपूरकर जनतेचा समाज माध्यमांवर नाराजीचा सूर

स्थानिक पत्रकारांना सी-२०च्या उपक्रमांमध्ये उपस्थितीची परवानगी नाही:केंद्राचा उपक्रम असल्याने स्थानिक माध्यमांची भूमिका नगण्य!

विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त,जिल्हा जनसंपर्क अधिकारी यांच्याही सहभागितेविषयी संभ्रम

नागपूरकरांना करायचे आहे हटके परदेशी पाहूण्यांचे स्वागत:सुप्रसिद्ध जादुगार एन.सी.सरकार यांचे आवाहन

नागपूर,ता.१७ मार्च २०२३: अजनी चौक येथील राजीव गांधी पुतळ्या जवळील चार हिरवीगार डोलदार वृक्षे बोडखी केल्यामुळे मागील वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये धंतोली पोलिस ठाण्यात नागपूर महानगरपालिकेचे उद्यान अधिक्षक अमोल चोरपगार यांच्याविरुद्ध वृक्ष मित्र सचिन खोब्रागडे यांनी तक्रार दाखल केली होती.या संबंधात चाेरपगार यांना वारंवार बयाणासाठी बोलविण्यासाठी धंतोली पालिस ठाण्यातर्फे पत्र व्यवहार केला असता त्यांनी एकदा ही हजेरी लावली नसल्याने, काल रात्री साढे दहा वाजताच्या दरम्यान अमोल चोरपगार यांच्याविरुद्ध महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे)झाडांचे संरक्षण व जतन(२१)(१)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

वर्धा रोड येथील अजनी चौकातील क्लॉक टॉवर समोरील चार झाडे अर्धे करण्यात आले होते.या विरोधात चोरपगार व कंत्राटदार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.धंतोली पोलिस ठाण्यातर्फे चोरपगार यांना वारंवार बयाणासाठी पत्र व्यवहार करुन देखील ‘हम करे सो कायदा’या उक्तीचा वापर करीत,एवढ्या महत्वपूर्ण पदावर असलेले अमोल चोरपगार यांनी कुठलेही गांर्भीय पोलिसांच्या या पत्रांविषयी दाखवले नाही.अखेर खोब्रागडे हे काल रात्रीपर्यंत धंतोली पोलिस ठाण्यात तळ ठोकून बसल्याने रात्री साढे दहा वाजता चोरपगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष म्हणजे एवढ्या महत्वपूर्ण पदावरील जबाबदार अधिका-यांकडून सध्या जी-२० च्या निमित्ताने शहरात जो काही ‘तात्कालीक’ बेछूट उधळपट्टीचा सावळा गोंधळ सुरु आहे त्याविषयी देखील नागपूरकरांच्या मनातील पराकोटीची तीव्र नाराजी समाज माध्यमात उमटलेली दिसून पडतेय.शहरातील विविध भागातील ३ हजारच्या वर झाडांवर अक्षरश:खिळे ठोकून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.या झाडांना वेदना होत नसल्याचा समज विद्युत विभागाचे मुख्य अधिकारी मानकर यांना होत नसल्यानेच,खिळे ठोकल्यामुळे ही झाडे वाळली व मृत पावली तरच गुन्हा दाखल होऊ शकतो असे अतिशय रुक्ष व चमत्कारिक उत्तर त्यांनी एका दैनिकाच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्‍नावर दिले असल्याची बाब समोर आली आहे.

(छायाचित्र:खिळे ठोकून विद्युत तारा झाडांभोवती अश्‍या गुंडाळण्यात आल्या!)

विशेष म्हणजे जी-२० परिषद भारत देशात होणे ही समस्त भारतीयांसाठी अत्यंत गौरवाची बाब असली तरी, आपल्या भारतात एक म्हण आहे ‘जेवढी चादर आहे तितकेच पाय पसरावे’२०० कोटी रुपये केंद्राने महाराष्ट्राच्या उपराजधानीला यासाठी उपलब्ध करुन दिले असले तरी, दिनांक २० ते २२ तारखेदरम्यान फक्त तीन दिवस उपराजधानीत वास्तव्य असणा-या एकूण ६० विदेशी पाहूण्यांच्या ‘देखाव्यासाठी’ उपराजधानीचे फक्त ‘वरवरचे’ रुपडे बदलले जात आहे.

या शहरात सुलभ शौचालयांपासून तर गरीबांसाठी शाळांची वाणवा आहे.मनपाची आरोग्य केंद्रे,शासकीय मेडीकल कॉलेज,मेयो,डागा इत्यादी विविध रुग्णांलयांची कार्यक्षमता, करोनाच्या महाभयंकर त्रासदीत नागपूरकरांनी अनुभवलीच आहे,शंभर वर्ष ‘पुरातन’ड्रेनेज लाईन्स अनेक ठिकाणी लीकेज होऊन सरळ पिण्याच्या पाण्यात मिसळत आहेत व नागरिक तेच दुर्गंधीयुक्त पाण पिण्यास बाध्य आहेत,कच-याची समस्या देखील या शहराची गंभीर आहे,शहरातील तलावांची दशा ही शोचनीय असून अनेक हॅरिटेज वास्तू अतिक्रमणात गडप झाल्या आहेत.त्यांच्या जतनासाठी दोनशे कोटी तर सोडा दोन कोटींचे देखील बजेट, सरकारच्या कोणत्याच वर्षीच्या अर्थसंकल्पात नसतात,मात्र, फक्त तीन दिवसांसाठी उपराजधानीत येणा-या परेदशी पाहूण्यांच्या नजरेला हे शहर जरा ‘बरे’दिसावे म्हणून ठिकठिकाणी ‘ठिगळं ’ असणारं माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचे, एका केंद्रिय मंत्र्यांचे,सर्वच पक्षातील अनेक माजी मंत्र्यांचे असणारे हे शहर, विद्युत रोषणाईच्या लखलखाटात झाकोळण्याची करामात मात्र जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा कार्यालयातर्फे युद्धस्तरावर सुरु आहे.

स्वच्छता न झालेल्या दूर्गंधीयुक्त नाग नाल्यावर(नदी म्हणने नदीचाच अपमान ठरेल)ठिकठिकाणी रंगबिरंगी टिनांचे शेड झाकून, परदेशी पाहूण्यांना तर मनपा धोका देऊ शकते पण? दररोज त्या दुर्गंधीतच आयुष्य कंठणा-या नागपूरकरांना ही तकलादू ‘झाकपाक’पराकोटीची चीड आणणारी ठरत आहे जी मोठ्या प्रमाणात साेशल मिडीयावर व्यक्त होत आहे.दोनशे कोटी ही रक्कम लहान नाही त्यात हा निधी परदेशी पाहूण्यांच्या खिशातून खर्च होत नसून ती या देशाच्या करदात्याचा घामाच्या पैशातून देशभर खर्च होत आहे.

ज्यावेळी भारताला या परिषदचे यजमान पद मिळाले व भारताच्या कोणत्या शहरात परेदशी पाहूण्यांचे आगमन होणार हे दिल्लीश्‍वरांनी निश्‍चित केले त्याच वेळी एवढ्या पैशांतून शाश्‍वत सौंदर्यीकरणाच्या अनेक बाबी करता आल्या असत्या मात्र ‘वरवरची’ रंगरंगोटी व विद्युत रोषणाईची ‘भपकेबाजी‘ दाखवून वेळ मारुन नेण्याची सरकारी नोकरशाहीची वृत्ती खरोखरंच चीड आणणारी आहे.ज्या मेट्रो पिल्लरवरील आकर्षक चित्रांसाठी वाहवाही लृटली जात आहे त्याच पिल्लरवर असणा-या किती पुलांच्या रस्त्यांना अवघ्या वर्षभरातच खोल तडे गेले आहेत?ते पण दाखवणार का विदेशी पाहूण्यांना भारताचे वैशिष्ठ म्हणून?असा खोचक सवाल समाज माध्यमांवर ‘खर्चिक‘प्रशासनाला विचारला जात आहे.

यावर कहर म्हणजे या सर्व वरवरच्या बाबींवर होणारा कोट्यावधींचा खर्च याविषयी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांना पत्रकारानी प्रश्‍न विचारला असता ,पत्रकार लोक फक्त बुराई करीत राहतात,तुम्हाला फक्त नुक्स काढायची असतात,नागपूरकरांना काही चांगलं केलेलं दिसतच नाही,तुम्हाला काही तक्रार आहे तर ‘यू गो टू द पुलिस!’मनपा आयुक्तांचा हा अनुभव एका अतिशय तरुण महिला पत्रकाराला आला व पत्रकार जगतात याची चांगलीच चर्चा देखील रंगली.ज्या व्यवस्थेत एक प्रशासकीय अधिकारी आपल्या कामांसाठी, पत्रकारांच्या प्रश्‍नांना पर्यायाने जनतेच्या प्रश्‍नांना, बांधिल नसतो आणि असे ते परखडपणे सांगण्याचं धाडस दाखवतात त्यावेळी त्यांच्या मागे कोणती ‘अदृष्य’ शक्ती उभी आहे,याचा अदमास येण्यास कोणत्याही विद्यापीठ शाखेच्या पदवीची गरज नसते.

(छायाचित्र :इतका झगमगाट….!पुढील चार उन्हाळ्यांच्या महिन्यात नागपूरकरांवर ३७ टक्के वीज दरवाढीची कोसळणार कु-हाड )

रविनगर चौकात गेल्या सहा-आठ महिन्यांपासून पडलेला भला मोठा जीवघेणा खड्डा काही शे रुपये खर्चून बुजवण्यासाठी एवढी तत्परता मात्र मनपा दाखवित नाही दुसरीकडे तकलादू रंगरंगोटी,आदीवासींचे देखावे,आपली बस वर ‘जी-२०’चे रॅपिंग,पुतळे,लॅण्डस्केपिंग,झाडांवर रोषणाई यासारख्या बाबींवर कोट्यावधींची उधळपट्टी सुरु असल्याचे बोल समाज माध्यमांवर उमटले आहे.

(छायाचित्र : या नागपूरकरांनो रात्रीच्या अंधारात आणि दिवसाही रविनगर येथील या खड्ड्यात येऊन मरा…!मरणाचे उत्तम ठिकाण…!)

जिल्हाधिकारी कार्यालयातील जनसंपर्क विभाग देखील जी-२० संदर्भातील पत्रकारांच्या जिज्ञासा व प्रश्‍नांना त्यांच्याच ‘अज्ञानात’मोडताना दिसतात.विदेशी पाहूणे हे स्थानिक शहरांचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी,त्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी परिषदेत सहभागी होत घेत आहेत,उपराजधानीची देखील नागरी पातळीवरील विविध समस्यांवरील व विविध पैलूंवरील चर्चा या परिषदेत होणार असून, ते काही इंटर एक्शनचे व्यासपीठ नाही,असा ज्ञानाचा ‘डोज’स्थानिक पत्रकारांनाच पाजला जात आहे.ही केंद्रीयस्तरावरील परिषद असून स्थानिक पत्रकारांचा यात काही एक ‘रोल’ नाही,अशी स्पष्ट माहिती त्यांना दिली जात आहे!

एवढंच नव्हे तर केंद्रीय पातळीवरील या आंतरराष्ट्रीय परिषदेत विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त तसेच जनसंपर्क विभागालाच सहभागी होता येणार आहे की नाही? याबाबत ही अद्याप अस्पष्टता किंबहूना संभ्रम असल्याचे सांगितले जात आहे!या परिषदेविषयीची‘जी काही छायाचित्र मिळतील तीच तुम्ही छापा!’असे सांगून ते मोकळे ही होतात.स्थानिक पत्रकारच जर (विदेशी पाहूण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोणातून) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे वार्तांकन करण्याच्या योग्यतेचे केंद्राच्या लेखी नसतील, तर मग दोनशे कोटींच्या ‘उधळपट्टी’ची महत्ता, नागपूरकरांना कधी कळू ही शकणार नाही,असेच आता म्हणावे लागेल.

परिषदेच्या नावाखाली उपराजधानीत मनमानेल तसा पर्यावरणाचा -हास, प्रशासकीय स्तरावर सुरु असल्यानेच खोब्रागडे यांच्यासारखे काही जागरुक पर्यावरणप्रेमी हे प्रशासकीय अधिका-यांना पोलिस ठाण्याचा रस्ता दाखविण्यास तत्पर होतात आणि अशी ही बातमी ठलकपणे प्रसिद्ध करने, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभांतील सर्वच माध्यमांना म्हणूनच क्रमप्राप्त ठरतं.

दुसरीकडे उपराजधानीतील सुप्रसिद्ध जादुगार एन.सी.सरकार यांना देश विदेशातील तब्बल शंभरपेक्षा जास्त भाषा अवगत असल्याने, त्यांनी या विदेशी पाहूण्यांसमोर ‘भाषेची जादु’ दाखविण्याची ईच्छा खास ‘सत्ताधीश’कडे व्यक्त केली आहे.

खिळे ठोकलेल्या झाडांवरील विद्युत रोषणाई ऐवजी ‘अस्सल’ उपराजधानीतील कलेचा अविष्कार हा विदेशी पाहूण्यांना जास्त भावेल अशी भावना ही ते व्यक्त करतात मात्र,प्रशासकीय नोकरशाहीच्या मनोवृत्तीची झेप, अश्‍या कल्पक संकल्पांपर्यंत पोहोचण्याची नसल्यानेच ‘झाकपाक‘कार्यशैलीतून ते उपराजधानीत ठिकठिकाणी व्यक्त होताना दिसतात…..!

……………………………………………..

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *