उपराजधानीमहामेट्रो

महामेट्रोत आणखी एक गैरकायदेशीर अधिकारीक नोकरभर्ती!


प्रशांत पवार यांचा आरोप

व्यवस्थापक एम.पी.सिंग यांची नियमबाह्य नियुक्ती

ग्रेड ७ वरुन ग्रेड २ वर केली नियुक्ती

माजी व्यवस्थापकीय संचालक ब्रृजेश दिक्षीत यांचे आणखी एक बेकायदेशीर कृत्य

विद्यमान व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर हतबल!

सिंग यांच्याकडे पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता देखील नाही!

प्रतिनियुक्तीवर आलेल्या सिंग यांना रेल्वे विभागात परत न पाठवता महामेट्रोत दिली बढती!

दक्षता अधिका-याचीही चौकशी व्हावी:प्रशांत पवार यांची मागणी

नागपूर,ता. २१ नोव्हेंबर २०२३: बारा हजार कोटींच्या पलल्याड गेलेला व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या महामेट्रोत अगदी सुरवातीपासून गैरकायदेशीर प्रशासकीय कारभार,भ्रष्टाचार तसेच नियमबाह्य अधिकारी,कर्मचा-यांच्या नियुक्तीचे आरोप-प्रत्यारोप होत असतानाच आज पुन्हा महामेट्रोतील एका अधिका-याच्या गैरकायदेशीर नियुक्तीचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे नेते व ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. महामेट्रोचे व्यवस्थापक(एचआर)एम.पी.सिंग यांना या पदावर गैरकायदेशीररित्या नियुक्ती देण्यात आल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला.

सिंग यांच्या गैरकायदेशीर नियुक्तीची तक्रार केंद्रिय दक्षता आयोगाकडे करण्यात आली असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.एम.पी.सिंग(एम्पलॉई क्र.७४३००५०)हे नागपूर रेल्वेमध्ये ग्रेड ७ स्तरावर कार्यरत होते.सात वर्षांपूर्वी त्यांना तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बृजेश दिक्षीत यांनी प्रतिनियुक्तीवर २०१६ साली महामेट्रोत आणले.मात्र,२०१८ साली नियमबार्ह्यरित्या त्यांनी ग्रेड २ स्तरावर एचआर पदी नियुक्ती दिली.

त्यावेळी त्यांची वेतनश्रेणी ९३००-३४,८०० अशी होती.२०१६ मध्ये नागपूर रेल्वेमधून त्यांची प्रतिनियुक्ती महामेट्रोत झाली.त्यांनी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षीत यांना पत्राद्वारे कळवले की,२०१६ पासून ते सहायक व्यवस्थापक(एचआर विभाग) पदावर कार्यरत आहे.त्यांचा २५ वर्षांचा अनुभव बघता बढतीद्वारे व्यवस्थापक पदावर त्यांना नियुक्ती देण्यात यावी.त्यानुसार त्यांना ग्रेड-२ पासून सरळ ग्रेड-२ पदावर कायमस्वरुपी नियुक्ती देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.सिंग यांची वेतन श्रेणी १०००० ते १५२००० प्रमाणे करण्यात आली.

महामेट्रोच्या धोरणानुसार इतर शासकीय विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना नोकरीमध्ये सामावून घेताना फक्त ग्रेड-१ वरीत पद देता येते परंतु,सिंग यांना ग्रेड-७ पासून सरळ ग्रेड-२ ची नियुक्ती देण्यात आली.या संदर्भात सोहेल शेख यांनी विविध खात्यांकडे तक्रार केली असल्याचे पवार यांनी सांगितले.महत्वाचे म्हणजे व्यवस्थापक पदासाठी बंधनकारक असणारी शैक्षणिक अहर्ता देखील सिंग यांच्याकडे नाही.व्यवस्थापक पदासाठी एमबीए ही पदवी बंधनकारक असताना मॅकेनिकल अभियंते असणा-या सिंग यांना नियमबार्ह्यरित्या बृजेश दीक्षीत यांनी नियुक्त केले.

महामेट्रोमध्ये अनेक राजकीय-अराजकीय वशिलेबाजीतून नोकर भर्ती झाली असून यात महामेट्रोतील अधिका-यांनी देखील आपल्या कुळाचा चांगलाच उद्धार केला असल्याची बोचरी टिका याप्रसंगी प्रशांत पवार यांनी केली.सिंग हे स्वत: बेकायदेशीररित्या या पदावर रुजू झाले नाहीत तर, त्यांनी त्यांचे नातेवाईक करमवीर कुमार यांनासुद्धा गैरकायदेशीररित्या महामेट्रोत कनिष्ठ अभियंता पदी ८ ऑक्टोबर २०१८ रोजी रुजू करुन घेतल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला.कनिष्ठ अभियंता(सिव्हील)या पदासाठी महामेट्रोतर्फे जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती.जाहीरातीत बी.टेक.,एम.टेक अशी शैक्षणिक अर्हता बंधनकारक करण्यात आली होती.सोबतच रेल्वेमध्ये सुमारे १ वर्षाचा अनुभव आवश्‍यक होता.करमवीर कुमार यांच्याकडे फक्त डिप्लोमाची पदवी होती याशिविाय रेल्वेमधील अनुभव सुद्धा नव्हता,तरी देखील करमवीर कुमार यांना महामेट्रोत कनिष्ठ अभियंता पदी रुजू करुन घेण्यात आले.

याशिवाय रजनीकांत किशोर हे सुनील माथुर(संचालक मेट्रो) यांचे जवळचे नातेवाईक असून त्यांच्या जवळ देखील महामेट्रोमध्ये नोकरीसाठी बंधनकारक असणारी शैक्षणिक पात्रता नसल्याचा आरोप याप्रसंगी प्रशांत पवार यांनी केला.रजनीकांत यांना सिग्नलिंग या विभागात सामावुन घेण्यात आले.या विभागासाठी बी.ई.इलेक्ट्रीक्स या पदवीची पात्रता जाहीरातीमध्ये महामेट्रोने दिली असताना रजनीकांत या मॅकेनिकल क्षेत्रातील उमेदवारास नियुक्ती देण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला.

एकीकडे नोकरभरतीमध्ये अनुसूचित जाती,जमाती व महिला प्रवर्गामध्ये संवैधानिक आरक्षण न देता महामेट्रोत अनेक राजकीय-अराजकीय दबावातून नोकरभरती करण्यात आली असून याची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी यावेळी प्रशांत पवार यांनी केली.

मेट्रो प्रकल्पामध्ये विविध शासकीय कार्यालयातून .सेवानिवृत्त अधिकारी यांना नोकरी देण्यात आली.शासकीय नियमाप्रमाणे अश्‍या अधिका-यांच्या आधीच्या नोकरीमधील पदापेक्षा फक्त एक पद जास्त बढती देण्यात येते.परंतु,रेल्वे,नागपूर सुधार प्रन्यास तसेच नागपूर महानगरपालिके व सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक अधिका-यांना जवळपास ५ ते ७ ग्रेड जास्तवर सामावुन घेण्यात आले.पूर्वीच्या नोकरीमध्ये ज्यांची वेतनश्रेणी ३० हजार होती त्यांना महामेट्रोत एक लाख पन्नास हजार पगार देण्यात येऊ लागला,या संपूर्ण भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची मागणी याप्रसंगी प्रशांत पवार यांनी केली.

आर्थिक व नोकरीच्या भ्रष्टाचारची विविध प्रकरणे समोर येऊन सुद्धा मेट्रोमधील दक्षता अधिकरी अनिल कोकाटे यांनी कोणतीही कारवाई केली नाही.भ्रष्ट कारभाराला पाठीशी घालण्याचे काम दक्षता अधिकारी यांनी केली असून त्यांची देखील चौकशी करण्याची मागणी यावेळी प्रशांत पवार यांनी केली.
महामेट्रोने नागपूर शहर सुंदर बनविण्याची फसवी संकल्पना मांडून संपूर्ण मेट्रो मार्गावरील पिल्लर रंगविण्यात जवळपास ५० ते ६० कोटी खर्च केले. आज तेच शहर मेट्रोच्या पिलर्सवर जाहीरातींसाठीची परवानगी देऊन शहराचे विद्रुपीकरण सुरु असल्याची टिका त्यांनी केली.

मेट्रो चार दिवसात बंद पाडणार असल्याविषयी त्यांनी दावा केला होता,याविषयी प्रश्‍न विचारला असता महामेट्रोला रेल्वे चालविण्याची परवानगीच नसल्याचे ते म्हणाले.ज्या दिवशी तो कागद मला मिळेल,मेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षीत हे जेलमध्ये असतील,असा दावा त्यांनी केला.विद्यमान एम.डी.श्रावण हर्डीकर हे हतबल असल्याची कोटी देखील पवार यांनी यावेळी केली.

पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर,युवक अध्यक्ष विशाल खांडेकर,माजी नगरसेवक राजेश माटे,सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष .अरविंद ढेंगरे,विभाग अध्यक्ष रवि पराते,संदीप सावरकर,उपाध्यक्ष निलिकेश कोल्हे,महासचिव मिलिंद महादेवकर, विभाग उपाध्यक्ष स्वीकार सीगरु आदी उपस्थित होेते.

………………………………………

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *