उपराजधानीराजकारण

अशी ही आपली लोकशाही….


नागपूर,ता.२० एप्रिल २०२४: लोकसभेच्या पहील्या टप्प्यातील निवडणूक आटोपली.पूर्व विदर्भात नागपूरसह,रामटेक,भंडारा-गोंदिया,गढचिरोली-चिमूर आणि चंद्रपूरसाठी मतदान आटोपले मात्र, भारतीय म्हणून लोकशाहीचा हा अभिमानास्पद उत्सव साजरा करताना अनेक गोष्टी,घटना वा व्यक्ती या उत्सवात अनेक गोष्टींची भर घालणारा ठरतो ज्याची चर्चा होत असते.

पिपरी नगर परिषद कन्हान येथील मतदान केंद्रावर महिलांच्या रांगेतील एका महिलेने तीन दिवसांपासून तिच्या घराजवळ मोठे झाड पडले असून यामुळे तिला व तिच्या कुटूंबियांना फार त्रास होत असल्याचे ‘सत्ताधीश’ला सांगितले.त्यामुळे ती मत द्यायला आली होती!तुमच्या घराच्या परिसरातील झाड हा देशाचा खासदार उचलणार का?ज्या मतदान केंद्रात तुम्ही मत देण्यासाठी आलात त्याच नगर परिषदेच्या सदस्य किवा अध्यक्षांना का तुमची समस्या सांगितली नाही?असा प्रश्‍न केला असता,तीन वेळा नगर परिषदेत येऊन सांगितले पण अजूनही कोणी झाड उचलले नाही,त्यामुळे मी हे वोट देण्यासाठी आल्याचे या महिला मतदाराने सांगितले आणि आपल्या एका बहूमुल्य मताद्वारे आपण पाच वर्षांसाठी आपले शहर व देशासाठी धोरण ठरविणारा खासदार निवडून देत आहोत याची यत्किंतिचही कल्पना या देशातील लाखो मतदारांना नाही.अगदी नगर सेवक निवडून देतो त्या पद्धतीने आपल्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी लोकसभेची ही निवडणूक असते,असे लाखो मतदारांना जर वाटत असेल तर स्वातंत्र्याच्या अमृत काळात लोकशाहीची कुचंबना  करणारी ठरते ,अशी ही आपली लोकशाही…!

रामटेकच्याच समर्थ हायस्कूलमध्ये पहील्यांदा मत देण्यासाठी आपल्या पालकांसोबत आलेल्या तरुणीला,पाच वर्षांसाठी देशाचा खासदार निवडून देणार असल्याने खासदारांकडून काय अपेक्ष्ा आहेत?असा प्रश्‍न केला असता,किती तरी वेळ एक ही शब्द बोलताच आले नाही व न बोलताच आपल्या पालकांसोबत मत देण्यासाठी आत निघून गेली.१८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुणाईला या देशाचा संविधान मत देण्याची,आपल्या पसंदीचा खासदार निवडण्याची संधी प्रदान करतो मात्र,समाज माध्यमांवर पराकोटीची सक्रिय असणारी तरुणाई,आपल्या मताचे मूल्यच सांगू शकत नसेल ,आपलं मत देताना कोणतंही ‘मत’ठरवू शकत नसेल तर लोकशाहीच्या उत्सवात फक्त सहभागिता दर्शवणारी ठरते,अशी ही आपली लोकशाही….!

केवळ तरुणाईच नव्हे तर सावनेरच्या एका मतदान केंद्रात मतदान जागरुगतेसाठी निर्माण करण्यात आलेल्या सेल्फी फलकां समोर उत्साहात कुटूंबियांसह सेल्फी घेणा-या एका गृहीणीला ,मत तर टाकून आले,आपल्या खासदारांकडून गृहीणी म्हणून काय अपेक्षा आहेत?असा प्रश्‍न केला असता,एक ही अपेक्षा त्यांना सांगता आली नाही मात्र,दररोजच महागाई,भाववाढ,भाजी पासून तर गॅस सिलेंडरचे वाढलेले दर,वीज,मुलांचे शिक्षण यावर कडाकडा बोटे मोडणारी हीच गृहीणी देशाचा खासदार निवडताना ‘अबोल’ होते,तेव्हा पुढील लोकसभेत ३३ टक्के संवैधानिक आरक्षण घेऊन करणार काय?अश्‍या प्रश्‍नाला थेट जाऊन भिडते,अशी ही आपली लोकशाही…!

लोकसभेचे मतदान हे स्वतंत्र व निष्पक्ष(फ्री ॲण्ड फेअर) होण्यासाठीच आदर्श आचार संहितेचे संवैधानिक नियम तयार करण्यात आले.मतदानाच्या एक दिवस आधी सगळ्या प्रकारचा प्रचार बंद केला जातो.याचे कारण मतदान करताना मतदारावर कोणत्याही उमेदवार किवा पक्षाचा प्रभाव असू नये.मतदार हा आपली सद् सद् विवकेबुद्धि वापरुन खासदार निवडतील (किती उदात्त हेतू होता संविधान निर्मात्यांचा)पण नागपूरात हा लोकशाहीचा उत्सव सुरु असतांना अनेक मतदान केंद्रांवर,मतदान सुरु असताना,मतदारांच्या हातात जी चिठ्ठी दिल्या जात होती त्यावर उमेदवार व पक्षाचे चिन्ह होते!मतदारांवर प्रभाव पाडण्याचे हे तंत्र,असंवैधानिक,बेकायदेशीर व गुन्हेगारी स्वरुपाचे व तितकेच लोकशाहीचा मूळ गाभा याला मारक आहे, याकडे त्या ठिकाणी उपस्थित निवडणूक अधिकारी असो किवा पोलिस यंत्रणा,सर्वांनी डोळेझाक करुन ठेवली होती, कारण ज्यांच्या नावाची चिठ्ठी त्या यंत्रातून निघत होती तेच दहा वर्ष संवैधानिकरित्या या देशाचे एक धोरणकर्ते होते,संघभूमी आणि दीक्षाभूमीत सत्तेसाठी इतकी र्निलज्ज झालेली बघून,सर्वसामान्यांकडे हताश होऊन बघते,अशी ही आपली लोकशाही….!

४२ पेक्षा अधिक तापमानात काल नागपूरच्या रणरणत्या उन्हात आपल्या नेहमीच्या मतदान केंद्रांवर मतदारयादीत नाव न दिसल्याने जवळपास वीस हजारांच्या वर मतदारांची अक्षरश: दैना उडाली.या केंद्रातून त्या केंद्रात आपले नावे शोधता-शोधता हा लोकशाहीचा पायीक, मेताकुटीला आला व अखेर निराश होऊन घरी परतला एक हूरहूर मनात घेऊन,देशासाठी त्याच्या पसंदीचा खासदार निवडण्याची संधी त्याची पाच वर्षांसाठी हूकली,यात हेकेखोर प्रशासन व तितकाच बेजवाबदार मतदार दोन्ही तितकेच लोकशाहीला मारक ठरले,काल पहील्या टप्प्यात पार पडलेल्या लोकशाहीच्या उत्सवात, ही लोकशाही गेली पंचाहत्तर वर्ष जिवंत ठेवणारे सर्वसामान्यांचे‘मत’हेच काल हरवले होते,डिलीट झाले होते किंबहूना करण्यात आले होते,आता ४ जून रोजी मतमोजणी होईल,विजयाचा उन्माद साजरा केला जाईल मात्र,हरवलेल्या या मतांची बेरिज कुठेतरी संविधानच ‘हरल्याच्या’ कृतीवर, शोक करताना दिसून पडेल ,हीच तर आहे आपली लोकशाही….!

तृतीय पंथियांनी काल आपल्या मतदानाचा उत्साहपूर्वक उत्सव नेहमीसारखा साजरा केला.आम्ही पण या देशाचे नागरिक असून इतर सामान्य नागरिकांप्रमाणेच आम्हाला देखील तितकेच अधिकार मिळाले पाहिजे,ही अपेक्षा ठेऊन मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.संविधानातील समानतेचा मौलिक अधिकार यापेक्षा आखणी काय वेगळा असू शकतो,तृतीय पंथिय,एलजीबीटीक्यू या समुदायांनाही ’एक व्यक्ती एक मत’हे मूल्य समानतेने प्रदान करते,अशी ही आपली लोकशाही….!

एकीकडे गडचिरोलीतील दूर्गम भागातील फक्त एका मता साठीही १७ किलोमीटर लांबून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली व मत घेऊन गेली.याच आदिवासी बहूल भागात वीस किलोमीटर येणे व वीस किलोमीटर परत जाण्याची किमया मतदारांनी लिलया साधली कारण त्यांच्यासाठी मतदान हा ख-या अर्थाने उत्सवच असतो. या भागातील मतदान केंद्रे ही विशिष्ट पद्धतीने सजवली जातात,रंगरंगोटी केली जाते,इतंकच नव्हे तर मतदारांना येथे पोलिस यंत्रणेतर्फे गोडधोडाचे जेवण देखील दिले जाते.

या क्षेत्रातील मतदारांची यादी देखील पोलिस यंत्रणेच्या मदतीने तयार होत असते इतकी घनिष्ठ ओळख मतदार व पोलिसांनामध्ये असते.या आदिवासी बांधवांच्या प्रत्येक सुख-दु:खात येथील पोलिस यंत्रणा,जिल्हाधिकारी व प्रशासकीय यंत्रणा सहभागी असतात.त्यांचे सर्व प्रकारचे सरकारी कागदपत्रे काढूण देण्यात हीच यंत्रणा पुढे असते त्यामुळे मतदानासाठी हे मतदार जंगलाच्या मार्गातून किती ही किलोमीटर रणरणत्या उन्हातही सहज पायपीट करतात.सर्वात महत्वाचे म्हणजे पूर्व विदर्भाच्या ज्या पाच मतदारसंघात काल मतदान पार पडले त्यात सर्वाधिक मतदान हे गडचिरोली-चिमुरमध्ये ६६.२७ टक्के एवढे होते तर महाराष्ट्राच्या उपराजधनीत हेच प्रमाण ५३.९० एवढे होते!

राज्य एकच मात्र त-हा दोन.१५ एप्रिल रोजी वडीलांच्या मृत्यूनंतर ही कर्तव्यावर सज्ज झालेले व यशस्वीरित्या मतदान पार पाडणारे गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने व कुठे हजारो मतदारांना नागपूरच्या रणरणत्या उन्हाचे चटके सोसत या मतदार केंद्रातून त्या मतदार केंद्रात भटकंती करुन ही मतदानापासून वंचित ठेवणारे,मतदारांसाठी प्रत्येक मतदार केंद्रात उन्हापासून बचावासाठी,थांबण्यासाठी स्वतंत्र खोली असणारचा दावा करणारे मात्र,कुठेही अशी व्यवस्था न ठेवणारे,भर उन्हातच रांगेत सर्वच वयोगटाच्या मतदारांना तासनतास उभे राहण्यास बाध्य करणारे नागपूर जिल्हाचे कर्तबगार जिल्हाधिकारी कुठे.‘लोकांचे,लोकांसाठी,लोकांद्वारे’राबविली जाणारी ‘अशी ही लोकशाही ’काल उपराजधानीत ठलकपणे नागपूरकरांना कुठेही अनुभवास आली नाही….!
……………………..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *