उपराजधानीराजकारण

रामटेकमध्ये ना उमेदवार ना पक्ष फक्त ‘पंजा’ची हवा

उद्धव ठाकरे गटाने पलटली संपूर्ण बाजी

रामटेक मतदारसंघात मोदी लहर मात्र, कमळच गायब!

‘कटप्पाने बाहूबली को क्यो मारा’धर्तीवर राजू पारवेंविषयी मतदारांमध्ये विचारणा!

उद्या २० तारखेनंतर महायुतीतील पक्ष होणार वेगळे!कार्यकर्त्यांना निरोप:युती फक्त लोकसभेपुरती

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.१९ एप्रिल २०२४: लोकसभेच्या निवडणूकीचे पहीले चरण आज संपले यात नागपूरसह रामटेक मतदारसंघात देखील मतदान झाले.‘सत्ताधीश’ने आज खास रामटेक मतदारसंघातील कन्हान,रामटेक देवलापार,सावनेर,कळमेश्‍वर इत्यादी अनेक मतदारसंघातील मतदानकेंद्रावर जाऊन मतदारांच्या कल काय आहे,याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता,रामटेकची जागा ही काँग्रेसचा पंजा जिंकणार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.महत्वाचे म्हणजे उमरेडचे कॉंग्रेसचे आमदार राजू पारवे हे रामटेकमधून शिंदेंच्या शिवेसनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढत आहेत.उद्धव ठाकरे गटाचा तगडा पदाधिकारी मतदानाच्या दिवशी आज अचानक सक्रिय झाल्याने संपूर्ण बाजू पंजाच्या बाजूने पलटल्याचे वास्तव समोर आले.

रामटेक मतदारसंघातील कळमेश्‍वर तसेच रामटेकमध्ये मोदींची लहर जाणवली.कन्हानमध्ये पंतप्रधान मोदींनी भव्य सभा देखील घेतली होती.माेदींना मानणारा व चाहणारा फार मोठा मतदार वर्ग रामटेक मधील सहा ही विधानसभा मतदारसंघात होता मात्र,ईव्हीएम मशीनवर भाजपचे ‘कमळ’चिन्हच नसल्याने मतदारांची दाणादान उडाली.‘कमळ’नंतर ‘पंजाच’चालत असल्याने पर्यायाने मोठ्या प्रमाणात येथील मतदारांनी ‘पंजा’चे बटण दाबले.

या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटातील एका मोठ्या नेत्याने रामटेकमधील राजू पारवेंचा गेम बिघडवल्याचे सांगितले जात आहे.त्याने संपूर्ण मते पंजाकडे वळती केल्याने राजू पारवे यांच्या समोर दिव्य प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.उद्धव ठाकरे गटाने रामटेक मतदारसंघात मोठ्या खुबीने शिवसेना पक्षाचे दोनफाड करण्याचा वचपा काढला आहे,हे मात्र खरे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोनवेळा या मतदारसंघात पारवेंसाठी येऊन गेले.मोटरसायकलवर फेरफटका मारला,भर उन्हात नियम मोडून विना हेल्मेट फिरले मात्र,त्याचा कोणताही उपयोग पारवे यांना मतदानात झाला असल्याचे दिसून पडत नाही.

एवढंच नव्हे तर रामटेक लोकसभेतील मतदारसंघात आणखी एक बाब ठलकपणे जाणवली ती म्हणजे,काँग्रेसने श्‍यामकुमार बर्वे यांच्या ऐवजी इतर ही कोणता उमेदवार उभा केला असता तरी ‘कमळ‘चिन्हाच्या अभावी तो ही हमखास निवडून आला असता.येथे रश्‍मी बर्वे यांचे ज्या पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर तिकीट कापण्यात आले,त्याची कोणतीही सहानुभूतीची लाट मतदारांमध्ये आढळली नाही.या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ग्रामीण तसेच आदिवासी बहूल भाग येत असल्याने ,येथील ज्या नेत्यांवर या गावक-यांचा विश्‍वास बसतो त्याच्या सांगण्यानुसार त्या चिन्हाचे गावकरी बटण दाबून येतात!

परिणामी,मोदींच्या सभेचा किवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या परिश्रमाचा जलवा या लोकसभेच्या मतदारसंघात निष्प्रभावी ठरला.या उलट भारतीय जनता पक्षाचा उमेदवार रामटेकमध्ये दिला असता तर हमखास ही सीट भाजपने मोदींच्या खात्यात टाकली असती,यात वाद नाही.मात्र,‘कमळच’ गायब असल्याने ‘पंजाला’ मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे.

भाजपने महायुतीच्या चर्चेत अखेरपर्यंत रामटेकची जागा भाजपसाठी सोडण्यासाठी शिंदे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता मात्र,शिंदे यांनी अट्टहासाने ही जागा शिवसेनेकडे राखून ठेवली.परिणामी,काँग्रेसमधून आलेले राजू पारवे यांना भाजपात न घेता शिंदे गटात पाठविण्याची फार मोठी चूक किवा अति शहाणपणा भाजपला भोवणार असल्याचे दिसून पडतंय.

यात पक्षादेश शिरोधार्ह्य माणना-या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पारवे यांच्यासाठी झोकून देऊन काम केलेच नसल्याचे बोलले जात आहे.या ठिकाणी भाजपचे शंकर चांगदे यांनी आधीपासूनच मतदारसंघ बांधून ठेवला होता.त्यांना डावलून पारवे यांना तिकीट देण्यात आली ते ही शिंदेंच्या धनुष्यबाणावर लढण्यासाठी.यात मोठा फटका भाजपलाच बसणार असल्याचे चक्क मतदारांनीच सांगितले.चांगदे यांना उमेदवारी दिली असती व ‘कमळ’ हा ईव्हीएम मशीनवर राहीला असता तर ही जागा ‘पंजा’ ऐवजी ‘कमळ’लाच सुटली असती.

या मतदारसंघात धनुष्यबाणावरील कृपाल तुमाने यांनी दहा वर्ष खासदारकी उपभोगली.ते खाटीक समाजातून येतात.खाटीक समाज हा धर्माच्या आधारावर राजकारण करीत नाही.पारवे हे देखील त्याच समाजातून येतात मात्र,मोदी यांचा ‘राम’या ठिकाणी प्रभावीहीन झाला.

याशिवाय भाजप सत्तेत आला तर संविधान बदलणार आहेत,याची देखील हवा चांगलीच पसरविण्यात आली.परिणामी,बौद्ध समाजाची मते ही देखील ‘पंजा‘च्या बाजूने वळलीत.वंचितने पाठींबा दिलेले किशाेर गजभिये यांच्या विषयीचे मत मतदारांमध्ये नकारात्मक आढळले.ते भाजपच्या छुप्या पाठींब्याने पंजाची मते खाण्यास उभे राहीले असल्याचे मत समोर आले.गोंडवाना गणतंत्रच्या रोशनी गजभिये यांना देखील मतदारांची साथ मिळाली नसल्याचे दिसून पडले.

येथील अनेक आदिवासी महिला मतदारांनी ‘लालच मागे दरिद्री येते’पारवे याने अति लालच केला असा स्पष्ट आरोप केला तर अनेक युवकांनी ‘कटप्पाने बाहूबली को क्यो मारा’याचे काेडे उलगडण्यासाठी बाहूबलीचा दूसरा भाग बघावा लागला होता,राजू पारवेंनी पलडा बदलल्याने काय झाले,हे बघण्यासाठी ४ जून रोजी येजा,असे अतिआत्मविश्‍वासाने सांगितले.पारवेंने तर आपले उमरेड विधानसभेचे पण नुकसान केले,असे येथील मतदारांचे मत आहे.

कळमेश्‍वर हा पट्टा भाजपचे नेते डॉ.राजीव पोतदार यांचा गड असला तरी सावनेर हा केदार यांचा गड आहे.

काटोल हा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा गड असून शरद पवार यांची राष्ट्रवादी व केदार यांची काँग्रेस हे महाविकासआघाडीतील घटक आहेत त्यामुळे काटोल येथे देखील पंजावर मोठ्या प्रमाणात मत टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पिपरी नगर परिषद रामटेक, समर्थ हायस्कूल,सखी मतदान केंद्र रामटेक, बांबू कट्टा देवलापार रामटेक,सावनेर,कळमेश्वर येथील अनेक मतदारकेंद्रांवर ‘पंजाला’भरघोस मते पडली आहेत किंबहूना पाडण्यास सांगण्यात आली आहेत.हिंगणामध्ये भाजपचे आमदार सागर मेघे यांचा जोर कायम असल्याने पारवे यांना फक्त हिंगणामधूनच थोडी फार लीड मिळू शकते,असा दावा केला जात आहे.

महत्वाचे म्हणजे महायुतीतील कार्यकर्त्यांपर्यंत आजच्या मतदानानंतर उद्या २० एप्रिल पासूनच वेगवेगळे व्हायचे व युतीतून बाहेर पडायचे असल्याचा निरोप पोहोचल्याची जोरदार चर्चा या मतदारसंघात ऐकू आली!

थोडक्यात,अति आत्मविश्‍वाशी भाजपने महाराष्ट्रात जे काही फोडाफोडीचे राजकारण केले व महायुतीची सत्ता स्थापन केली त्या ट्रिपल इंजिनची सरकार ओढता -ओढता आपल्याच हमखास जिंकून येणा-या जागा निदान विदर्भात तरी मोठ्या प्रमाणात गमावणार असल्याचे चित्र उमटले आहे.यात रामटेकसह चंद्रपूर व भंडारा याचा देखील समावेश आहे.

…………………………………………….

पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले असून रामटेकमध्ये एकूण ५८.५० टक्के मतदान झाले आहे.

………………….

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *