उपराजधानीराजकारण

आता या स्तरावर उतरले आहे नागपूरचे राजकारण:मतदार यादीतून केली नावेच गायब!

नागरिकांमध्ये प्रचंड रोष

भाजपचा उद्दामपणा:प्रशासनाची बघ्याची भूमिका

नागपूर,ता.१९ एप्रिल २०२४: लोकशाही,संविधान,विकास यासारख्या मोठमोठ्या गोष्टी करणा-या नेत्यांची भाजपा आज, मतदानाच्या दिवशी ज्या स्तरावर उतरली व आचार संहितेला ज्या उद्दामपणे गाशात गुंडाळून ठेवले ते बघता,मतदारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.उत्तर नागपूरात अचानक मतदानाची गती संथ करण्यात आली,उत्तर नागपूरात बौद्ध धर्मिय व मुस्लिमांची लाखांच्या घरात मते आहेत व ती मते भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना मिळणार नसल्यानेच अनेक मतदान केंद्रातून हजारो मते ही ‘डिलीट’करण्यात आल्याचा आरोप आज हजारो मतदारांनी ‘ऑन कॅमरा‘केला.

निवडणूक जिंकण्यासाठी साम,दाम,दंड,भेदाची नीती वापरण्यात सगळेच राजकीय पक्ष तरबेज असले तरी भाजपने आज अति केली.चक्क मतदान केंद्रांच्या बूथवर मतदार क्रमांकाची विचारणा करण्यात येणा-यांना बूथवरील तरुण-तरुणी हे एका लहानशा यंत्रातून चक्क विचारणा करणा-या मतदारांची चिठ्ठीच काढून देत होते!यात गडकरी यांचे नाव, कमळ या पक्षाचे चिन्ह होते.ते बघून हे आचार संहितेचे उल्लंघन नाही का?अशी विचारणा करीत अनेकांनी उत्तर नागपूरातील एका मतदान केंद्रावर काँग्रेसच्या बाबू खान यांनी चांगलाच धिंगाणा घातला.

(छायाचित्र : हेच ते यंत्र व हीच ती प्रचारकी चिठ्ठी!)

भाजपने प्रत्येक मतदान केंद्रावर तरुणांची एक फौजच बसवून ठेवली होती व त्यांच्या हातात बूथवरील मतदारांच्या याद्या देण्यात आल्या होत्या.मतदानाविषयी विचारणा करणा-यांना चक्क गडकरी यांचे छायाचित्र असणारी व कमळ चिन्हाची चिठ्ठी मिळत असल्याने हा आचार संहितेचा भंग होता तरी देखील प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली होती.सत्ताधा-यांना जिंकण्याच्या उन्मादात लोकशाहीची बूज राखण्याचे देखील भान राहीले नाही.‘हम करे सो कायदा’या थाटात भाजपचे पदाधिकारी प्रत्येक बूथवर वावरत होते.नागपूरातील सुजाण नागरिकांनी मात्र,अश्‍या पद्धतीच्या वर्तवणुकीचा निषेध नाेंदवला.

महत्वाचे म्हणजे,उत्तर नागपूरातील फक्त मतदानाची गतीच संथ करण्यात आली नाही तर लाखो मतदारांची नावेच यादीतून गायब झालीत!आतापर्यंत नियमित मतदान करणा-यांची नावेच नसल्याने प्रचंड प्रमाणात गोंधळ उडाला.रणरणत्या उन्हात हजारो मतदारांनी जवळपास चार ते पाच बूथवर चकरा मारल्या मात्र,त्यांचे नाव ‘डिलीट’झाल्याचे प्रशासनाच्या कर्मचा-यांनी सांगितले,परिणामी,हजारो मतदार हे मतदानापासून वंचित राहीले.

हे केवळ मुस्लिम आणि बौद्ध मतदारांविषयीच घडले नाही तर गोधनी येथील अनेक हिंदू मतदारांना देखील प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा चांगलाच फटका बसला.अगदी अंबाझरी पर्यंतच्या बूथपर्यंत गोधनी येथील अनेक मतदारांनी धाव घेतली मात्र,निराश होऊन त्यांना परतावे लागले.

महत्वाचे म्हणजे,ज्या भागातून भाजपला सर्वाधिक कमी मतदान होते व विरोधकांना फायदा होतो त्याच भागातील मतदार यादींमध्ये प्रंचड घोळ होता.प्रशासनाने स्पष्टीकरण देताना सांगितले, की एकाच मतदार केंद्रावर दहा हजार मतदारांची गर्दी होऊ नये म्हणून सह केंद्रे बनविण्यात आली व दहा हजार मतदारांची यादी अडीच,दोन-दोन इत्यादी अश्‍या प्रकारे मुख्य मतदार व सह मतदार केंद्रांमध्ये विभागणी करण्यात आल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला.मात्र,जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी असणारे डॉ.विपीन इटनकर यांनी मतदाना पूर्वी अनेकवेळ पत्रकार परिषदा घेतल्या त्यात अश्‍या प्रकारच्या सह केंद्राची माहिती का दिली नाही?असा प्रश्‍न आता विचारला जात आहे.

विशेष म्हणजे,मतदाना पूर्वी बीएलओ हे घरोघरी जाऊन मतदानाची चिठ्ठी मतदारांपर्यंत पोहोचवतात.भाजपच्या मतदारांचा प्रभाग समजल्या जाणा-या मतदारसंघात घरोघरी त्या पोहोचल्या देखील मात्र,उत्तर नागपूरातील बौद्ध धर्मिय तसेच मुस्लिम वस्तींमध्ये बीएलओ पोहोचलेच नसल्याचे मतदान केंद्रातील अनेक मतदारांनी सांगितले.

(छायाचित्र : उत्तर नागपूरातील हरीश मुलचंद बोधवानी,भर उन्हात मतदानासाठी भटकताना,महात्मा गांधी सिंधी हायस्कूल,खोली क्र. १३ मध्ये यांचे मतदान होते!)

यावर प्रशासन सांगते की त्या भागात बीएलओ यांना नागरिक हकलून लावतात!कश्‍यासाठी माहिती विचारत आहेत?असा संशय घेतात त्यामुळे त्यांच्यापर्यंत मतदानासंबधीची योग्य माहिती पोहाचत नाही.हे जरी खरे असले तरी यात प्रशासनाचे अपयश नाही का?आज हजारो मतदार निराश होऊन घरी परतले,प्रशासनाचा उद्देश्‍य हा मतदानाचा टक्का वाढवणे होता की कमी ठेवणे?या मागे कोणाचे हित साधायचे होते?असा सवाल आता केला जात आहे.

जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका शहरातील हजारो मतदारांना बसला आहे. शहरातील अनेक मतदान केंद्रावर मतदान कार्ड असणाऱ्यांची नावेच मतदार यादीतून प्रशासनाने डिलीट केल्याने हजारो मतदार मतदानापासून वंचित राहीले. उमेदवारांच्या प्रतिनीधींना दिलेल्या मतदार यादीत या मतदारांची नावे होती. मात्र मतदान केंद्रावर या मतदारांच्या नावासमोर डिलीटचा शिक्का मारलेला होता, हे विशेष. या संदर्भात इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रतिनिधी अनिल वडपल्लीवार यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

सामान्य नागरिकांसाठी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी होती. तसेच मोबाईल बाहेर ठेवा अशा सूचना देण्यात येत होत्या. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर जाताना, यादीवर सही करताना, तसेच मतदान केल्याचे बटन दाबतानाचे आणि VVPAT चे ही शुटींग केलं. त्यामुळे नियम फक्त सामान्यांसाठीच असतो का असा सवालही नागरिकांची उपस्थित केला. यासह अनेक मतदान केंद्राच्या आतमध्ये भाजपचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने प्रचारही करत होते!

लोकशाहीत दर पाच वर्षांनंतर एकदाच सर्वसामान्य जनता ही ‘राजा’होत असते.नेहमी हवेत उडणारे नेते हे जमीनीवर येऊन मतदारांसमोर हात जोडून उभे होतात.या मतदार राजालाही पाच वर्षांसाठी आपला खासदार,आमदार,नगरसेवक निवडताना लोकशाहीचा अभिमान वाटतो.मात्र,नागपूरमध्ये निवडणूक अधिका-यांचे कर्तव्य पार पाडणा-या प्रशासकीय नोकरशाहीने जणू भाजपच्या उमेदवाराला फायदा पोहोचविण्यासाठी संविधाचाच गळा घोटला,असा तीव्र संताप उत्तर नागपूरात अनेक मतदान केंद्रावरील जनतेत उमटला होता.

चक्क मतदान केंद्रांवरच भाजपच्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेऊन टेबल लावण्यात आले,त्यावर यंत्रे ठेवण्यात आली इतकंच नव्हे तर विचारणा करण्यासाठी येणा-या मतदारांच्या हातावर कमळ व गडकरी यांची चिठ्ठी देण्यात आली तरी देखील प्रशासनाने त्याकडे चक्क डोळेझाक केली.

नागपूरात राजकारण हे कोणत्या स्तरावर पोहोचले आहे,यावरुन दिसून पडतं.आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा उपहास उडवणारे अनेक मिम्स भाजपच्या आयटी सेलतर्फे व्हायरल करण्यात आले.त्यात काँग्रेसच्या विकास ठाकरेंना चक्क ‘बली का बकरा‘म्हणून उपहास करण्यात आला.नागपूरातील सुजाण नागरिक अश्‍या स्तराच्या राजकारणाला कधीही पसंद करीत नाही.राजकारणात वैचारिक मतभेद असतात मात्र,भाजपने २०१४ नंतर राज्याची व देशाची सत्ता सांभाळ्यानंतर राजकारणात ‘शत्रूत्व‘आणले.

माजी महापौर संदीप जोशी यांनी त्यांच्या फेसबुकवर विकास ठाकरे यांच्या विषयी ‘सीझनल रामभक्त‘म्हणून टर उडवणारी पोस्ट टाकली.रामभक्तीचा ठेका जणू फक्त भाजपवाल्यांची मक्तेदारी असल्याचे ती पोस्ट द्योतक होती.आ.विकास ठाकरे हे दर वर्षी लक्ष्मी नगरमध्ये भव्य प्रमाणावर दूर्गोत्सव साजरा करतात,त्या उत्सावाची सजावट व रोषणाई बघण्यासाठी अवघे नागपूर उमडते.अश्‍या ‘हिंदू’ असणा-या आमदारावर ‘सीझनल रामभक्त‘सारखे पालुपद लाऊन भाजपला अल्पकालीन लाभ तर होऊ शकतो मात्र,दिर्घकालीन नाही.रामनवमीनिमित्त पोद्दारेश्‍वर राममंदिरात भगवंतांच्या रथाचे सारथ्य विकास ठाकरेंनी देखील केले होते,त्यावर त्यांचा उपहास करण्यात आला होता.

महत्वाचे म्हणजे राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यावर देखील मुस्लिम बहूल भागातील मुस्लिमांनी विकास ठाकरे यांनाच मतदान केले.याचा अर्थ मुस्लिमांच्या लेखी धर्म हा राजकारणा पलीकडे असतो,आम्ही हिंदू मात्र आपल्या धर्माला राजकारणाच्या परिघातात अतिशय संकुचित करीत असतो,याचे ही भान आपल्याला राहत नाही.

थोडक्यात,लोकशाहीत प्रत्येक राजकीय पक्ष हा जिंकण्यासाठीच निवडणूकीत उभा राहतो मात्र,चक्क संविधानाने दिलेला लोकशाहीचा गाभाच गुडांळून ठेऊन भाजपने ‘अबकी बार..चारसौ पार व ‘कहो दिल से ..नितीन जी फिर से’च्या नादात नागपूर लोकसभा मतदारसंघात आज ज्याप्रमाणे नियमांची सर्रास पायमल्ली केली,अनेक मतदारांना घरी निराश होऊन पाठवले त्या विरोधात जमीनीस्तरावर भाजपविषयी प्रचंड रोष असून,येणा-या विधानसभेत देखील भाजपला आपल्या या तानाशाह प्रवृत्तीचा फटका बसू शकतो,यात दुमत नाही.
……………………………

 

One thought on “आता या स्तरावर उतरले आहे नागपूरचे राजकारण:मतदार यादीतून केली नावेच गायब!

  • Rajendra Harshwardhan

    राम राम ………..राम राम!!!!!!!!!!!!!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *