उपराजधानीराजकारण

मतदारांनो तुमचीच चूक….


प्रशासनाने झटकले हात:२४ हजार ८३७ मतदार वाढले असल्याचा केला दावा

आचार संहितेच्या तक्रारी निकाली!नेमक्या कश्‍या?याचे उत्तर अनुत्तरित!

नागपूर,ता.२६ एप्रिल २०२४ : मतदानाचे प्रमाण कमी झाले असले तरी मागील लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत एकूण २४ हजार ८३७ इतके मतदान वाढले असल्याचा दावा आज जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केला.जानेवरी महिन्यापासून दोन वेळा मतदार यादी विषयी सूचना देऊन ही मतदारांनी यादी तपासण्याची तसदी घेतली नसल्यानेच काही हजार मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले असल्याचे सांगून, इटनकर यांनी १९ एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी नागपूर तसेच रामटेक मतदान केंद्रांमध्ये झालेल्या ‘न भूतो ना भविष्यती’अश्‍या अभूतपूर्व गोंधळासाठी एकप्रकारे मतदारांवरच खापर फोडले.

बीएलओ यांनी योग्यरित्या सर्वेक्षण करुन घरोघरी मतदार चिठ्ठया पोहोचवल्या,अर्थात यात अपवाद ही आहे,काही भागामध्ये बीएलओ सर्व्हेसाठी गेले असता त्यांच्या अंगावर कुत्रे सोडण्यात आले किवा त्यांना हाकलून देण्यात आले.परिणामी,अश्‍या काही घटनांमुळे मतदार यादीतील नावे अद्यावत करता आली नाही.अनेक भागात पतीचे नाव एका केंद्रात तर पत्नीचे नाव दूस-या केंद्रात शोधावे लागले याचे कारण मतदारांनीच तीन-तीन वेळा संधी देऊन व आवाहन करुन देखील आपले नाव मतदार यादीत तपासण्याची तसदी घेतलीच नाही,असे इटनकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

येत्या विधानसभेसाठी मतदारांनी अर्ज क्र.६,७ व ८ भरुन द्यावे.ज्यांचे पते बदलले आहेत,ज्यांच्या कुटूंबियांची नावे सुटून गेली आहेत तसेच नवमतदार यांनी आता तरी काळजीपूर्वक नावे तपासून घ्यावी. १ जानेवरी पर्यंत १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांची नावे नोंदवली गेली आहेत त्यांचे एपिक क्रमांक देखील यादीत अपडेट झालेत तसेच त्या पुढील तारखेनंतरच्या नवमतदारांना विधान सभा निवडणूकीसाठी मतदान करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.अनेक मतदार हे दूसरीकडे राहायला गेले त्यामुळे त्यांची नावे जुन्या पत्त्यावर तसेच नवीन पत्त्यावर देखील नोंदवली गेल्याने देखील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे इटनकर यांनी सांगितले.

एएसडी म्हणजे अबसेंटी,शिफ्टींग आणि डेथ या तीन कारणांची बीएलओंनी घरोघरी जाऊन पडताळणी केली यानंतर नावे डिलिट करण्यात आली. जानेवरी व मार्चमध्ये प्रशासनाने मतदारांना नावे तपासण्याची संधी दिली होती,असे ते म्हणाले.याचा अर्थ १९ एप्रिल रोजी भाजून काढणा-या रणरणत्या उन्हात जो लाखोच्या संख्येने प्रामाणिक मतदार, हा मतदानासाठी घराबाहेर पडला मात्र ,यादीतील घोळामुळे मतदानाच्या संवैधानिक हक्कापासून तो वंचित राहीला ही त्याचीच चूक होती की त्यांनी मतदार यादीत दर वेळी प्रमाणे त्यांचे नाव असेल हे गृहीत धरले व मतदार यादी तपासली नाही,प्रशासनाची तसेच घरोघरी जाऊन तपासणी करणा-या बीएलओची काहीही चूक नाही,असे तुमचे म्हणने आहे का?असा प्रश्‍न केला असता,प्रत्येक बूथवर मतदानच १२०० असताना प्रत्येक बूथवरुन हजारो मते गायब झाली हा आरोप चुकीचा असल्याचे इटनकर यांनी सांगितले.याशिवाय सर्वात जास्त नावे यंदा आम्ही यादीत समाविष्ट केले.यासाठी शेकडो महाविद्यालयात पोहोचून मतदार यादीत नावे नोंदविण्यास आपण विद्यार्थ्यांना प्रेरित केलं,त्यामुळे जवळपास अडीच लाख नवमतदारांची नावे यादीत समाविष्ट झाली.मतदान वाढवण्यासाठी जवळपाास साढे चारशे बैठका घेतल्या.सर्वात आव्हानात्मक असतं मतदार यादीत नावे समाविष्ट करने,असे ते म्हणाले.

तुमचे प्रयत्न खूप प्रामाणिक होते मात्र,तुमच्या अधिनस्थ जे कर्मचारी होते त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं का?असा प्रश्‍न केला असता ,प्रत्येक दिवशी रात्री ९ वा.माझ्याकडे रिर्पोटिंग येत होती,असे ते म्हणाले.नियमाच्या बाहेर तर बीएलओ परवानग्या देऊ शकत नाहीत,असेही ते म्हणाले.

नागपूरमध्ये २२ लाख २३ हजार २८१ मतदार होते ,२०१९ च्या लोकसभेच्या मतदारांच्या तुलनेत यंदा ६३ हजार मतदार वाढले होते.२०१९ मध्ये ५४.७४ मतदान झालं होतं तर १९ एप्रिल रोजी ५४.३० टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे.पॉईंट तीन टक्क्यांनी यंदा मतदान कमी झालं मात्र,यात ही पुरुष मतदार ८ हजार २५२ वाढले आहेत तर महिला मतदारांची संख्या ही १६ हजार ५६८ वाढली,याचा अर्थ २४ हजार ८३७ मतदार वाढले आहेत,अशी पाठ त्यांनी थोपटून घेतली.

१६ मार्च रोजी यादी लॉक झाली असून आता ४ जून रोजी मतमोजणीनंतर पुन्हा ओपन होईल,त्यावेळी नागपूरकर मतदारांनी आपापली नावे पुन्हा एकदा अर्ज क्र.६,७ आणि ८ भरुन देण्याचे आवाहन त्यांनी केले.२०१९ नंतर महाराष्ट्रात निवडणूकाच झाल्या नसल्याने मतदारांनी यादीत आपले नाव तपासण्याची तसदी घेतली नाही.दर वेळी प्रमाणे निवडणूकी संदर्भात आपले नाव यादीत असेलच हे गृहीत धरले,आता येत्या विधान सभेच्या निवडणूकी पूर्वी मतदार यादीतील नावे अद्यावत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की नागपूर आणि रामटेक लोकसभा  निवडणूकीत उपयोगात आलेल्या सीलबंद ईव्हीएम सुरक्ष्त ठेवण्यासाठी कळमना कृषी उत्पन्न समितीच्या न्यू ग्रेन मार्केट परिसरात स्ट्रॉगरुम तयार करण्यात आली असून, त्यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले.शुक्रवारी १९ एप्रिल रोज मतदान झाले.शनिवार उशिरापर्यंत या ईव्हीएम स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आल्या.सुरक्षेसाठी आजूबाजूचा परिसर बंद करण्यात आला आहे.केंद्रिय पोलिस दल,राज्य राखीव पोलिस दल आणि महाराष्ट्र पोलिस अशी त्रिस्तरीय सुरक्षा स्ट्रांगरुमला देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर व रामटेक मतदार संघात अनुक्रमे सहा विधानसभा मतदार संघ आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी अनुक्रमे २० टेबल्स लावण्यात आले आहेत. सहा मतदार संघासाठी ही संख्या १२० टेबल्स एवढी एका लोकसभा मतदार संघासाठी राहील. निकालासाठी सुमारे १७ मतमोजणी फेऱ्या पुरेशा ठरतील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

आचार संहितेच्या भंगच्या शेकडो तक्रारी करण्यात आल्या होत्या,यात भारतीय जनता पक्षाद्वारे बूथवरच गडकरी यांचे नाव असणारी तसेच कमळ हे चिन्ह असणारी चिठ्ठी मतदारांना देण्यात येत असल्याची तक्रार होती,यावर काय कारवाई केली?असा प्रश्‍न केला असता, राजकीय पक्षांना मतदान केंद्रापासून १०० मीटर दूरवर बूथ लावण्याची परवागनी बहाल करण्यात आली होती.दूपारी भाजपच्या बूथवरुन अश्‍या चिठ्ठ्या मतदारांना देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर अनेक बूथवरुन ते सॉफ्टवेअर जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.भाजपच्या रॅलीत विना हेलमेट समर्थक सहभागी झाले होते,यावर काय कारवाई केली?असा सवाल केला असता,अशी कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नसल्याचे ते म्हणाले.भाजपच्या बूथवरुन किती सॉफ्टवेअर्स जप्त केले?असा प्रश्‍न केला असता,याचा आकडा देण्यास इटनकर यांनी टाळले.दुपारच्या घटना होत्या,कारवाई झाल्यानंतर नाही घडल्या,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.

फक्त भाजपच नव्हे तर काँग्रेस पक्षाकडून देखील आचार संहिता भंग झाल्याच्या तक्रारी मतदानाच्या दिवशी मला प्राप्त झाल्या.अनेक पत्रकारांनीच मला त्या व्हॉट्स ॲपवर पाठवल्या असल्याची माहिती इटनकर यांनी दिली.तक्रारींचे निराकारण झाले असल्याचे त्यांनी सांगितले मात्र,नेमक्या किती तक्रारी आल्या?काय निराकरण केले?याचे उत्तर अुनत्तरितच राहू दिले.

कोट्यावधींचा खर्च करुन निवडणूकी पूर्वी प्रशासनाने मतदान जनजागृतीपर अनेक उपक्रम राबवले मात्र,तरी देखील मतदानाचा टक्का हा पंचाहत्तरीपर्यंत पोहोचू शकला नाही,कोणाचे हे अपयश आहे?असा सवाल केला असता,५४ टक्के मतदान झाले असून २०१९ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी ही वाढली आणि हे यशच असल्याची मखलाशी त्यांनी केली.

नागपूरात साढे चार हजार मतदान केंद्र होते.बूथ निहाय व्हीव्हीपॅटचे रिवाईस आम्ही घेत असल्याची माहिती एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी दिली.२२ लाख मतदारांपैकी बारा लाख मतदारांनी मतदान केले असल्यास दहा लाख मतदारांपैकी मतदान यादीतील घोळ झाला हे मान्य केल्यासही, जास्तीत जास्त दोन ते तीन लाख मतदार मतदानास वंचित राहीले असावे,असे गृहीत धरल्यास देखील ,उर्वरित सात ते आठ लाख मतदार हे मतदानासाठी का बाहेर पडले नाहीत?हा प्रश्‍न कळीचा असल्याचे,एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.

पत्र परिषदेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे,जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार उपस्थित होते.
…………………………….
……………………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *