उपराजधानीनागपूर मनपाराजकारण

मनपा प्रशासन कंत्राटदारावर मेहरबान: झाडांचा गुदमरला श्‍वास!


जागे व्हा अन्यथा….परिणाम भोगा (भाग-३)

न्यायालयाच्या आदेशाला मनपाने दाखवली केराची टोपली

नागपूरात वेगाने हिरवे पट्टे नष्ट: भाजपच्या वचननाम्यात पर्यावरणाला स्थानच नाही

‘ग्रीन नागपूर ’चळवळीचे सदस्य सरसावले हिरवळ संरक्षणासाठी:प्रशासन मात्र नेत्यांच्या मागे उभी!

नागपूर,ता.२७ एप्रिल २०२४: अलीकडे समाज माध्यम असो किवा प्रिंट माध्यम जगत (प्रादेशिक वृत्त वाहीन्यांसाठी पर्यावरण हा विषय तसा ही टीआरपी शून्य असतो) नागपूरातील वेगाने नष्ट होणारे हिरवळी पट्टे यावर गंभीर भाष्य करताना आढळतात.दूसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उष्णतेच्या लाटेशी संबंधित परिस्थितीचा सामना करण्यासंबंधी सज्जतेविषयी आढावा बैठक १२ एप्रिल रोजी घेतली असून, ,उन्हाळ्यातील हवामानाचा अंदाज आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याच्या शक्यतेबद्दल देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर, आरोग्य क्षेत्राच्या सज्जेचाही पंतप्रधान मोदींनी आढावा घेतला मात्र,देशासाठी पुढील पाच वर्षच नव्हे तर अगदी २०४९ पर्यंतच्या दिलेल्या आपल्या ‘गॅरेंटीनाम्यात’कुठेही पर्यावरणाचा साधा उल्लेख देखील नसल्याने,एकीकडे संबंध सजीव सृष्टिला भाजून काढणा-या उष्णतामानेवर चिंतन बैठक, तर दूसरीकडे पर्यावरणाचा अतोनात -हास करणारी धोरणे नेटाने रेटने, या विरोधाभासावर समाज माध्यमात तीव्र संताप उमटलेला आढळून येतो.

विदर्भ आणि मराठवाड्याला तसाही उष्णतेचा श्राप आहेच.उन्हाळ्यातील तीन महिने भाजून काढणारे उन्ह सहन करणारे विदर्भवासी यंदा उष्णतेच्या लाटेत नामशेष होण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत.नागपूरचाच विचार करावयाच्या झाल्यास कधी नव्हे ते हे शहर ,शहरवासियांसाठी ‘डेंजर झोन’मध्ये पोहोचले आहे.गेल्या काही वर्षातच अनेक शासकीय तसेच गैरशासकीय प्रकल्पांनी एकेकाळी हिरवेगार शहर म्हणून नावलौकिक असणा-या या शहराला चक्क ‘बोडखं’करुन सोडलं आहे.मेट्रोपासून सुरवात झालेल्या विकासाची वेगवान वाटचाल शहरातील अनेक भागात बघता बघता पोहोचली आणि शहराचे पालकत्व ज्या नागपूर महानगरपालिकेकडे किंबहूना मनपाच्या उद्यान विभागाकडे आहे तो विभागच शहरातील हिरवळीच्या मूळावर उठलेला दिसून पडतोय.

पूर्वीचे मनपा आयुक्त हे किमान शहरातील पर्यावरणाचा -हास होणा-या प्रकल्पांची अडवणूक करण्याचा प्रयत्न तरी करीत होते किवा त्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न होत होते.विद्यमान मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी सरसकट ३८ प्रस्तांवाना मंजुरी देऊन टाकली.यावर ना आक्षेप मागवले,ना कोणती सुनावणी घेतली ना नागपूरातील अल्प प्रमाणात शिल्लक राहीलेले हिरवळी पट्टे कायमचे नामशेष होण्यापासून रोखण्यासाठी आपले प्रशासकीय अधिकार वापरले,यावर समाजमाध्यमांवर शहरातील पर्यावरणवाद्यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे.

एकीकडे पंतप्रधानांच्या सूचनेनुसार नागपूरात हिट ॲक्शन प्लानवर मनपा प्रशासक ‘वांझोटी’ चर्चा झोडत आहेत मात्र,उन्हापासून बचावासाठी हिरवीगार झाडेच उपयुक्त ठरतात,शहरातील हिरवळी पट्टेच(ग्रीन कव्हर)महत्वाचे असतात,एवढे साधे गणित आयएएस असणा-या आयुक्तांना कळत नाही का?असा सवाल त्यांना विचारला जात आहे,अर्थात ,राजकीय नेत्यांच्या खासगी घरातील बैठकीत वेळेवर हजेरी लावणारे मनपा आयुक्त नागपूरकर जनतेच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यास तसेही बांधिल नाहीत.दूर्देवाने नागपूर शहराला अलीकडच्या काळात असे मनपा आयुक्त लाभलेत ज्यांच्या कार्यकाळात नागपूरातील हिरवळी पट्ट्यांवर सर्वाधिक कंत्राटदारांच्या कु-हाडी चालल्या.यात जी-२० चे कोट्यावधींचे यशस्वी ‘आर्थिक‘नियोजन करणारे माजी आयुक्त असो किवा विद्यमान आयुक्त,यांच्या कार्यकाळात शासकीय असो किवा खासगी प्रकल्पांचे कंत्राटदार,त्यांनी आधी प्रकल्पांची मंजुरी घेतली,निविदा काढल्या,कामाची सुरवात केली नंतर कळलं की प्रकल्पांच्या शेकडो एकर जमीनींवर नागपूर शहराचे तापमान आटोक्यात ठेवणारे हिरवळी पट्टे आहेत!त्यांची कटाई आधी केली जाते नंतर  परवानगीचा ‘कागद’ मनपाच्या उद्यान विभागाकडे पोहोचता केला जातो!

आजपर्यंत नागपूरकरांवर अतोनात उपकार करणारी ही झाडे बोलू शकत नाहीत,राजकारण्यांना मत ही देऊ शकत नाही(मत देणा-यांना तरी कुठे या झाडांची काळजी?)ट्री एक्टचा कायदा सांगतो खासगी असो किवा सरकारी जितकी झाडे प्रकल्प,रस्ते,उड्डाण पुले किवा महामेट्रोसाठी कापली त्यापेक्षा दुप्पट झाडे लावा मात्र,एकसाथ ३८ प्रस्तावांना मंजुरी प्रदान करणारे मनपा आयुक्त असाे किवा मनपाचा उद्यान विभाग,कोणीही प्रकल्पांचे निरीक्षण करीत नाही,ट्री एक्टचा कायदा पाळताना दिसत नाही.पर्यावरणवादींना न्यायालयात धाव घ्यावी लागते,न्यायालयाच्या डोळ्यात ही मनपा प्रशासन धूळ झोकण्याचेच काम ‘लई हुशारीने’ करते असेच एक उदहारण अजनीवनचे नागपूरकरांनी अनुभवले.

अजनी स्टेशनच्या विस्तारित प्रकल्पात की-शाईन इन्फ्रा लि.या कंपनीने शेकडो झाडे कापली.संपूर्ण एक हिरवा पट्टाच कायमचा नष्ट केला.या विरोधात पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात धाव घेतली.न्यायलयात कंपनीने दावा केला की त्यांनी कापलेल्या झाडांच्या मोबदल्यात त्याच ठिकाणी झाडांचे रोपण केले आहे,न्यायालयाने येत्या २ मे रोजी त्याचा सविस्तर अहवाल मागवला असल्याने मनपाचे उद्यान अधिक्षक अमोल चोरपगार हे या कपंनीने थातूरमातूर लावलेल्या झाडांच्या समोर छायाचित्र काढत असून हेच छायाचित्र आता न्यायालयात दाखविले जाणार!मोठ्या झाडांच्याखालीच लहान रोपे लावण्यात आली,जे रस्ते लवकरच रुंदीकरणात गायब होणार आहेत त्याच रस्त्यांच्या बाजूला या कपंनीने रोपे लावलेली दिसून पडतेय,मूळात कापली शेकडो झाडे लावली फक्त काही रोपे!जो संपूर्ण हिरवळी पट्टा नागपूरच्या नकाशावरुन या कंपनीने नामशेष केला त्याची परवागनी कापण्या पूर्वी घेतली नसल्याचा दावा पर्यावरणवादी करतात!रात्रीच्या अंधारात झाडे मूळासकट कापून,ट्रकमध्ये भरुन विक्री करण्याचे व त्यातूनही पैसा कमविण्याचे अनेक छायाचित्रे सोशल मिडीयावरही चांगलीच व्हायरल झाली आहेत.

यावर कहर म्हणजे कंत्राटदाराचे काम संपल्यानंतर जी काही झाडे शिल्लक असतात त्याच झाडांच्या मूळांच्या ठिकाणी संपूर्ण बांधकामाचा कचरा,गिट्टी,रेती,लोखंड टाकून कंत्राटदार पसार होताना आढळून येतात.रामदासपेठ पुलाचे कवित्व हे त्यातीलच एक.रामदासपेठच्या विद्यापीठ ग्रंथालयाच्या जवळील पूलाचे बांधकाम सनी इन्फ्रा प्रोजक्ट लि.या कंपनीला ८ कोटी ३ लाख ५३ हजार ५६४ रुपयात शेकडो अटी व शर्थीसह मिळाले.(माहितीच्या अधिकारात  ‘सत्ताधीश’ने ती संपूर्ण कागदपत्रे प्राप्त केली)१२ महिन्यांच्या मुदतीत काम पूर्ण होण्याची अट असताना या पुलाच्या बांधकामाला सहा महिने तर सुरवातच करण्यात आली नाही.कंत्राटदाराने दोन्हीकडे लाेखंडी पत्रे लाऊन सहा महिने रस्ता अडवून ठेवला.‘योगायोगाने’२३ सप्टेंबर रोजी अंबाझरी ओव्हरफ्लोमुळे पंचशील चौकातील धीरन कन्या समोरील पूल हा रस्त्यासह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने दक्षीण नागपूरला उत्तरेशी जोडणारे दोन्ही मुख्य रस्तेच बंद झाले!यशंवत स्टेडियम समोरील मेहाडीया चौक देखील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामामुळे बंद होता!परिणामी संपूर्ण वाहतूक ही अलंकार चौकात कोंडू लागली.

वाहनधारकांचा राेष व रामदासपेठ नागरिक मंचाने न्यायालयात केलेली याचिका यामुळे सनी इन्फ्रा वर लवकरात लवकर काम सुरु करण्याचे आलेले दडपण यातून काम सुरु झाले.दोन महिन्यांपूर्वी हा पूल नागपूरकर नागरिकांसाठी खुला करण्यात आला मात्र,अटी व शर्थीनुसार काम पूर्ण झाल्यावर मनपाच्या आरोग्य अधिका-याकडून परिक्षण झाल्यावरच कंपनीला कामकाज पूर्णत्वाचे प्रमापत्र(Work Completion Certificates)दिले जातील मात्र,पहीला प्रश्‍न बांधकाम विभागाशी संबंधित कामकाजाचे परिक्षण आरोग्य अधिका-याकडून करण्या मागे हेतू काय?दूसरा महत्वाचा विषय म्हणजे असे कोणतेही परिक्षण न होताच या कंपनीचे संपूर्ण बिल तातडीने मंजूर करुन देण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली.न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना कंत्राटदारांना बांधकामाचा मलबा झाडांखाली,रस्त्यांवर टाकून जाता येणार नाही मात्र,रामदासपेठेतील या पुलाच्या दोन्ही बाजूच्या झाडांच्या खाली या कंपनीने बांधकामाचा मलबा,रेती,गिट्टी,लोखंड टाकून पोबारा केलेला आढळतो.

महत्वाचे म्हणजे या कंपनीसोबतच्या करारानुसार पुढील वीस वर्ष या पुलाची देखभालाची जवाबदारी (डॅमेज रिपेअरिंग)या कपंनीची असणार आहे (डीएलपी) मात्र,लवकरच हा देखील रस्ता सिमेंट काँक्रिटचा बनेल किवा अमृत योजनेची पाईप लाईन्स टाकण्यासाठी खोदण्यात येईल तेव्हा ही कंपनी अश्‍या खोदकामाची जवाबदारी घेईल का?धरमपेठ झोनच्या सहायक आयुक्तांनी या कंपनीला संपूर्ण भुगतान होण्यापूर्वी कंपनीच्या कामाचे ऑडीट केले का?अटी व शर्थीनुसार आरोग्य अधिका-यांनी काम संपल्यानंतर सर्वेक्षण केले का?कंपनीला कामकाज पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, सर्वेक्षण न करताच देण्यात आले का?या रस्त्यावरील दोन्ही बाजूला असणा-या हिरव्यागार व अतिशय जुन्या झाडांच्या फक्त फांद्या कापण्याची परवानगी असताना कोणाच्या परवानगीने दोन्ही बाजूच्या झाडांच्या वर्मावर घाव घालण्यात आले व त्यांना बोडखे करुन सोडण्यात आले?न्यायालयाचे आदेश असताना देखील या कंपनीच्या कंत्राटदारांनी बांधकामांची संपूर्ण गिट्टी,रेती,लोखंड इत्यादी साहित्य झाडांच्या मूळापाशीच टाकून दिली असल्याने न्यायालयाच्या आदेशाची ही अवमानना नाही का?

मूळात संपूर्ण शहरातच सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे बांधकाम सुरु असून असाच बांधकामांचा मलबा हा आजूबाजूच्या झाडांच्या मूळापाशी टाकून कंत्राटदार पसार होत असताना, या विरोधात या शहराचे पालकत्व असणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेचे मनपा आयुक्त आता काय कारवाई करणार आहेत?असा सवाल आता विचारला जात आहे.मूळात ही कंपनी कोणत्या राजकीय पक्षाच्या विदर्भातील कोणत्या खासदाराच्या मुलाची आहे?मनपामधील अनेक एजेंसीज,कंत्राटे व ठेके हे कोणत्या पक्षाच्या कोणकोणत्या नेत्यांच्या मुलांना,नातेवाईकांना,स्वीय सहायकांना आवंटित झाले आहेत? याचा देखील खुलासा करण्याचे आव्हान पर्यावरणवादी समाज माध्यमांवर करीत आहेत.

नागपूर शहरात याच उरलेल्या हिरवळी पट्ट्यात लवकरच हॉटेल्स,मॉल्स निर्माण होणार असून या जागा देखील बिर्ल्डस आणि हॉटेल मालकांना देण्यात आल्याचा दावा केला जात आहे)

बघता बघता या शहरातून एम्प्रेस मॉल समोरील २०० हिरवीगार झाडे भुईसपाट करण्याची परवानगी मागितली मात्र ५०० झाडे भुईसपाट झाली!रजवाडा पॅलेसच्या पुढच्या जागेवर एकेकाळी हिरवीगार झाडांमुळे सावलीतूनच जाणा-या नागपूरकरांना अचानक त्या रस्त्यावरील संपूर्ण झाडेच भुईसपाट झाल्याची दिसताच धक्का बसला.ही ४० एकरची जागा रामदेव अग्रवाल यांची आहे.मनीष नगर रेल्वे क्रासिंग व रुळाला लागून असणारी ३० हिरवीगार झाडे विना परवानगी रेल्वे विभागाने कापून फेकली.या विरोधात वृक्षमित्र सचिन खोब्रागडे यांनी बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या जेएमएफसी कोर्टात रेल्वेच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे.रामदेव अग्रवाल यांच्या कंपनीतर्फे ११० झाडे कापण्याची परवागनी मागितली असता ३५० झाडे भुईसपाट केली.उद्यान अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली असता पंचनामासाठी माणसे पाठवली,नंतर काहीच कारवाई झाली नाही.नागपूरातील मोठ्या नेत्याचे जिव्हाळ्याचे संबंध शहरातील काही उद्योगपतींसाठी वरदान ठरत असले तरी पर्यावरणाच्या जीवावर उठले आहेत,ज्याचे परिणाम मुंबईत घर करुन राहणा-या नागपूरच्या नेत्याला नव्हे तर नागपूरकरांनाच भोगून द्यावे लागणार आहे!

नुकतेच हल्दीरामच्या अग्रवाल यांनी हिस्लाॅप कॉलेज जवळील ५४-५५ झाडे कापण्याची परवानगी मागितली व ३५ हजार वर्ग फिटची ही जागा आता खासगी प्रकल्पासाठी सज्ज झाली आहे कारण ती सर्व झाडे नामशेष झाली आहेत !फक्त झाडांच्या फांद्या कापण्याची परवानगी मागून पाटणी ऑटोमोबाईल्सने २५ ते ३० हिरवीगार झाडे नामशेष केली!नारा श्‍मशान घाटच्या अर्धा किलोमीटर पुढे आर.संदेश ग्रूपच्या ३० एकर जागेवर ३०० सागवानची झाडे होती,संदेश ग्रूपचे मालक रामदेव अग्रवाल यांनी या ठिकाणची १२० झाडे कापण्याची परवागनी उद्यान विभागाला मागितली होती,ती मिळण्या आधीच संपूर्ण ३०० झाडे भुईसपाट केली! काही राजकारण्यांसाठी अतिशय महत्वाकांक्षी असणारा ‘ऑरेेज सिटी स्ट्रीट’प्रकल्प तुकड्या तुकड्याने निर्माण होत असून या प्रकल्पासाठी देखील शेकडो झाडांचा आधीच बळी गेला आहे!

मनपा आयुक्त व त्यांच्या प्रशासनाच्या कल्पकतेची कमाल म्हणजे गोरेवाडा परिसरात केवळ सार्वजनिक मूर्ती विसर्जनाकरिता १०२ वृक्षांची कत्तल करुन कृत्रिम मूर्ती कुंड निर्माण केल्या जात आहे!ही झाडे या कृत्रिम कुंडाच्या निर्मितीत अडथळा ठरत असल्याचे सांगून संबंधित अर्जदाराने जाहीरातीद्वारे झाडे कापण्यासंबंधी आक्षेप मागितले आहेत. जाहीरातीमध्ये अर्जदाराचे नावच गायब आहे.या वृक्षांचे वय ४७ वर्ष ते १० वर्ष आहेत! राज्य सरकारने शहरातील तलाव प्रदुषित होण्या पासून वाचवण्यासाठी मनपाला कृत्रिम तलाव निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत मात्र,एका स्तुत्य उपक्रमासाठी पर्यावरणाची हानि करुन उपक्रम राबविण्याची कल्पकता, याला शहरातील पर्यावरणवादीच उपहासाने दाद देत असल्याचे समाज माध्यमांमध्ये दिसून पडतंय.त्रिमूर्ती नगर मधील गजानन महाराज मंदिरासमोरील जागेवरील शेकडो झाडे डॉ.गाजरे यांच्या खासगी रुग्णालयासाठी आधीच भुईसपाट झाली आहेत.

(छायाचित्र : गोरेवाडा येथील हीच ती जागा जिथे कृत्रिम मूर्तीकुंड निर्माण होत आहे!)

गोरक्षण मधील हिरवागार पट्टा कधीचाच ‘गुगल मॅप‘वर नष्ट झालेला आढळतो.त्याला लागून असलेल्या कारागृहाच्या जागेवरील एकमेव उरलेला हिरवा पट्टा हा देखील केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या वचननाम्यातील ‘युरोपियन स्केर्वस‘साठी लवकरच बळी चढणार आहे.इटलीच्या धर्तीवर या ठिकाणी वाणिज्यिक संकूलाचे बांधकाम होईल मात्र,बंगलौरच्या धर्तीवर मग नागपूरकरांना पाण्यासाठी रेल्वेने पाणी आयात करावे लागेल,असा रोष पर्यावरणवादी व्यक्त करतात.

जी-२० साठी शहरभर झाडांवरच वीज रोषणाईसाठी उद्यान विभागाच्या परवानगीनेच लोखंडी खिळे ठोकण्याची परवागनी, कंत्राटदारांना मिळाली होती,हे अद्याप नागपूरकर विसरले नाहीत.परदेशी पाहूण्यांसाठी नैसर्गिक झाडे टप्प्या टप्प्याने नष्ट करुन कृत्रिम झाडांने स्वागताची कल्पकता याला शहरातील पर्यावरणवाद्यांनीही चांगलीच उपहासात्मक‘दाद’दिली होती.

थोडक्यात,गेल्या काही वर्षात नागपूर शहराचा जो ”विकास’ झालेला दिसून पडतोय त्यात कुठेही शहरातील तलाव,हिरवळ,झाडे यांची काळजी घेण्यात आली नाही.नेते,कंत्राटदार,खासगी विकासक प्रत्येकाला प्रकल्प उभारण्याची घाई झाली आहे.यासाठी सर्रास लाखो झाडांचा कृतघ्नतेने बळी घेण्यात येत आहे.२०१७ मध्ये गुगल नकाशावर जे नागपूर हिरवेगार दिसत होते त्यातील ७५ टक्के हिरवळ कायमची नामशेष झाली आहे.उर्वरित २५ टक्के देखील लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळेच या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान उष्णतेची लाट तीव्र असणार आहे व तापमानात २ ते ५ अंशांनी वाढ होणार आहे असा इशारा भारतीय हवामान खात्याने जो दिला आहे त्यात नागपूर शहराचा क्रमांक देखील अव्वल असणार आहे,यात शंका नाही.

नागपूर शहरातील राजकीय हव्यास,प्रशासकीय उदासिनता किंबहूना ‘हतबलता’,नागपूरकर जनतेचे जनमानस विचारात न घेता प्रकल्पांची भरमार,सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे जीवघेणे जाळे,मेट्रोचे ’वाढता वाढता वाढे ’प्रकल्प,शहरात मोजक्याच असणा-या तलावांवरील राजकीय,शासकीय व खासगी अतिक्रमण,उड्डाण पूलांची भरमार,त्यात झाडांचा जाणारा बळी,अमृत योजनेच्या खोदकामात झाडांना त्यांच्या अस्त्विासाठी मिळणारे दुय्यमत्व आणि या सगळ्यात नागपूरकरांची व संपूर्ण सजीव सृष्टिंची होणारी होरपळ लक्षात घेऊनच ‘ग्रीन नागपूर’ची एक आशादायक चळवळ शहरातील काही बुद्धिजीवी पर्यावरणवाद्यांनी सुरु केली आहे.व्हॉट्स ॲप ग्रूप्सच्या माध्यमातून ही चळवळ अधिकाधिक व्यापक केली जात आहे.हे शहर वाचवण्याची जवाबदारी फक्त पर्यावरणवाद्यांची नव्हे तर प्रत्येक नागरिकांची असल्याचे ते सांगतात.

आपल्या पूर्वजांनी कोणतीही नासाडी न करता पर्यावरणपूरक असे नागपूर शहर आपल्या पिढीला सोपवले होते मात्र,२०२० मध्ये जन्माला आलेल्या पिढीसाठी २०४० चे नागपूर हे जगण्यासाठी,पाण्यासाठी,प्रदुषणासाठी,मूलभूत गरजांसाठी फार भयाण राहणार आहे,त्यामुळे जिथे-जिथे शक्य आहे,राजकीय हव्यासाला,प्रशासनाच्या नाकर्तेपणाला राेखण्यासाठी तसेच नागपूरकर नागरिकांना जागवण्यासाठी ‘ग्रीन चळवळ‘सुरु केल्याचे ते सांगतात.लदाख मधील पर्यावरणवादी वांगचूक पासून प्रेरणा घेऊन नागपूरातील संविधान चौकातील पर्यावरणवाद्यांचे आंदोलन निश्‍चितच आशा निर्माण करणारे आहे.या लढ्यात हवी नागपूरकरांची साथ ,असे सांगत मोठ्या प्रमाणात ग्रीन चळवळीशी जुळण्यासाठी व्हॉट्स ग्रूपवर वर सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.
………………..

[अधिक माहितीसाठी संपर्क करा- ९४२२८०७६५६]

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *