उपराजधानी

कोराडी येथे १६९ हेक्टर परिसरात टेक्स्टाईल पार्क

कोराडी परिसरातील महाजेनकोच्या अतिरिक्त १६९ हेक्टर जागेवर टेक्स्टाईल पार्कच्या निर्मितीसंदभार्तील संपूर्ण प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी येत्या १५ दिवसात तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात. नागपूर सुधार प्रन्यासच्या सभागृहात टेक्स्टाईल पार्क संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए), महाजेनको, वस्त्रोद्योग संचालनालय व औद्योगिक विकास महामंडळ तसेच उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे, महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा, महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त व सभापती श्रीमती स्नेहल उगले, वस्त्रोद्योग संचालक डॉ. श्रीमती माधवी खोडे, महाजेनकोचे मुख्य अभियंता अभय हरणे, अनंत देवतारे, कार्यकारी संचालक शिरुडकर, महाजेनचे संचालक सुधीर पालिवाल, अधीक्षक अभियंता एस. एच. गुज्जेलवार, महाव्यवस्थापक अजय रामटेके आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महाजेनकोच्या कोराडी येथे अतिरिक्त १६९ हेक्टर जागेवर टेक्स्टाईल पार्क उभारण्यासंदर्भात नागपूर महानगर विकास प्राधिकरण ही नोडल एजन्सी म्हणून राहणार असून टेक्स्टाईल पार्कसाठी लागणाºया सर्व सुविधा आदी बाबींची पूर्तता करुन येत्या १५ दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, टेक्स्टाईल पार्कसंदर्भात वस्त्रोद्योग संचालनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच महाजेनकोच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक घेवून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधासंदर्भात महानगर आयुक्तांनी बैठक घेवून संपूर्ण प्रस्ताव तयार करावा, असेही या बैठकीत पालकमंत्र्यांनी सांगितले.

गांधीबाग परिसरातील व्यावसायिक तसेच उद्योजक यांना टेक्स्टाईल पार्क येथे जागा उपलब्ध करुन द्यावी. तसेच सर्व उद्योजकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतील व एकाच ठिकाणी विविध उत्पादन तयार व्हावे, ही टेक्स्टाईल पार्क सुरु करण्यामागची भूमिका असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा यांनी यावेळी सांगितले. महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त श्रीमती स्नेहल उगले यांनी कोराडी येथील प्रस्तावित टेक्स्टाईल पार्कसंदर्भात माहिती दिली. टेक्स्टाईल पार्कच्यासंदर्भात सर्व संबंधित विभागाची बैठक घेवून आराखडा तयार करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *